सद्यस्थितीत रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख गट हे सत्ताधारी पक्षांबरोबर आहेत. त्यामध्ये खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष भाजपाचा मित्र पक्ष असून केंद्रातील सत्तेत सहभागी आहे. त्यांच्या पक्षाने राज्यातून लोकसभेच्या निवडणुकीत एकही जागा लढवली नाही. बिनशर्त पाठिंबा दिला. त्या बदल्यात त्यांनी केंद्रात मंत्रीपद पदरात पाडून घेतले. संपूर्ण समाजातून भाजप आणि त्यांच्या सरकारला, त्यांच्या ध्येय धोरणांना प्रचंड विरोध असतानाही रामदास आठवले यांनी आपली भूमिका न बदलता भाजपासोबतच राहणे पसंत केले. आणि त्याचे बक्षीसही मंत्रीपद मिळवून घेतले. शिवाय आगामी विधानसभेतही आपला पक्ष भाजपासोबतच लढेल हे जाहीरही करून टाकले आहे, तर दुसरे रिपब्लिकन नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनीदेखील आपला पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेला आहे, असे जाहीर केले, मात्र त्यांनीदेखील लोकसभेची निवडणूक लढवली नाही. उलट महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला.

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या वेगवेगळ्या अटी-शर्तींमुळे ते शक्य झाले नाही. त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यांच्या पक्षाचा एकही खासदार निवडून आला नाही. याखेरीज इतर छोट्या मोठ्या रिपब्लिकन गटाच्या नेत्यांनीही महायुतीलाच पाठिंबा दिला. मात्र इंडिया आघाडीच्या बाजूने ते उभे राहू शकले नाहीत. डॉ. राजेंद्र गवई यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. ते स्वतः लढले नाहीत. पण एक उमेदवार उभा केला. त्यांनाही यश आले नाही. अशा सर्व पार्श्वभूमीवर सर्व प्रस्थापित रिपब्लिकन नेते हे सत्तेच्या लालसेने विभिन्न भूमिका घेऊन सत्ताधारी पक्षाकडून आपल्याला लाभाचे पद मिळेल का, यासाठी प्रयत्नशील दिसतात. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष बलशाली व्हावा, यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. म्हणूनच या वेळच्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकरी समुदायाने कोणत्याच प्रस्थापित रिपब्लिकन नेत्याला पाठिंबा न देता, त्यांच्यामागे उभे न राहता, त्यांना मतदान न करता, संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीला मोठ्या संख्येने मतदान करून रिपब्लिकन नेत्यांना योग्य तो धडा शिकविल्याचे दिसते.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Kishore Jorgewar expressed his displeasure with Sudhir Mungantiwar front of Devendra Fadnavis
थेट फडणवीसांसमोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी… म्हणाले, “मला उमेदवारी मिळू नये म्हणून…”
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’

आणखी वाचा-‘उपवर्गीकरण’ हाच सामाजिक न्यायाचा मार्ग आहे का?

आता पुढे काय? आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील सुजाण जनतेने, कार्यकर्त्यांनी, विविध लहान-मोठ्या संघटनांनी, तरुण कार्यकर्त्यांनी अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला रिपब्लिकन पक्ष प्रस्थापित रिपब्लिकन नेत्यांनी धुळीस मिळवला आहे. या पक्षाचे नामोनिशान सर्व सदनांतून मिटवून टाकले आहे. अशा परिस्थितीत या पक्षाला पुनश्च स्वाभिमानाने उभे करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्यभरातील निष्ठावान रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी, विविध रिपब्लिकन संघटनांनी, सर्वसामान्य जनतेने त्यासाठी पुढाकार घेण्याची आणि एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आगामी विधानसभा निवडणूक ही रिपब्लिकन पक्षाच्या नावे लढण्यासाठी पक्षाची नव्याने उभारणी करणे आवश्यक आहे.

प्रस्थापित रिपब्लिकन नेत्यांना बाजूला सारून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा राजकीय पक्ष, त्याचे संघटनात्मक स्वरूप, रचना योग्य प्रकारे उभी करून या पक्षाच्या नावे निवडणूक लढवावी लागेल. या पक्षाचे अस्तित्व सदनात दाखवून द्यावे लागेल. याचे कारण आंबेडकरी जनतेचे रिपब्लिकन पक्षाशी अतूट नाते आहे. हे नाते जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि जणू रक्ताचे आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष ताठ मानेने महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर देशाच्या राजकारणातही उभा राहणे ही समस्त आंबेडकरवाद्यांची गरज आहे. इच्छा आहे. देशभरातल्या वेगवेगळ्या प्रांतात आंबेडकरी चळवळीतील इतर पक्ष अल्पवधीत उभे राहतात, त्यांचे खासदार- आमदार निवडून येतात. आणि ज्या महाराष्ट्राच्या भूमीने आंबेडकरी विचार सबंध देशाला दिला, त्या महाराष्ट्राच्या भूमीत, बाबासाहेबांच्या भूमीत रिपब्लिकन पक्ष उभा राहू शकत नाही, त्याचे आमदार, खासदार निवडून येऊ शकत नाहीत? यासाठी सर्वांनी मतभेद गाडून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ते केल्यास निश्चितच महाराष्ट्राच्या भूमीतही रिपब्लिकन पक्षाचे आमदार खासदार निवडून येऊ शकतील. योग्य ती राजकीय रणनीती, योग्य ते युती आघाडीचे धोरण अवलंबले गेले तर निश्चितपणे बौद्ध समाजाचेही पुरेसे प्रतिनिधित्व सदनांमध्ये दिसू शकेल. आंबेडकरी आवाज विविध सदनांच्या पटलावर घुमू शकेल. याचा विचार सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे.

आणखी वाचा-दंगली- जाळपोळ- लुटालूट… हे बांगलादेश नाही; इंग्लंड आहे इंग्लंड!

उत्तर प्रदेश सारख्या भल्या मोठ्या राज्यात चंद्रशेखर आजाद- रावण याच्यासारखा तिशीतला तरुण आझाद समाज पार्टीच्या नावे खासदार होऊ शकतो. तामिळनाडू सारख्या राज्यात व्हीसीके पक्षाचा अध्यक्ष थीरुमावलं व इतर खासदार निवडून येऊ शकतात. तर महाराष्ट्रात ते का होऊ शकत नाहीत? आपणही महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष उभा करू शकतो, हा आत्मविश्वास इथल्या लोकांच्या मनामध्ये, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी असो अथवा महाविकास आघाडी असो यांच्यासोबत युती करून आंबेडकरी चळवळीचा आवाज बुलंद करता येऊ शकेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेले रिपब्लिकन पक्षाचे स्वप्न साठ वर्षानंतरही साकार होऊ शकलेले नाही किंबहुना ते साकार करण्यास प्रस्थापित रिपब्लिकन नेते अयशस्वी ठरले. मात्र आजच्या वर्तमान पिढीतील उमद्या, नव्या तरुण कार्यकर्त्यांनी हे आव्हान स्वीकारले तर निश्चितपणे त्यात ते यशस्वी होऊ शकतात. रिपब्लिकन पक्षाची धुरा ही नव्या दमाच्या तरुणांकडे, महिलांकडे देण्याची आवश्यकता आहे. तसे केल्यास येणारा काळ रिपब्लिकन पक्षासाठी निश्चितच यशदायी ठरेल. त्याची सुरुवात महाराष्ट्राच्या विधानसभेपासून करायला हवी.

त्यासाठी आगामी महिना- दोन महिन्यांच्या काळात राज्याच्या वेगवेगळ्या भागांत, प्रत्येक जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीतील सर्व राजकीय पक्ष संघटनांच्या बैठका घेण्यात येऊन निश्चित स्वरूपाचे धोरण ठरवायला हवे. ज्याचा उल्लेख वर करण्यात आला आहे. त्यासाठी एकमेव कार्यक्रम म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष उभा करणे. हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे. असे केल्यास लोकांचे प्रचंड पाठबळ उभे राहू शकते. शिवसेना व राष्ट्रवादी हे मान्यताप्राप्त पक्ष फुटीनंतरही नव्याने अल्पावधीत निवडणुकीला सामोरे गेले आणि तशाही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी अथवा शरद पवार यांनी मेहनत घेऊन आपल्या वेगळ्या पक्षाच्या नावावर स्वतःचे खासदार निवडून आणले. आपल्या पक्षाला मान्यता मिळवून दिली. हे त्यांनी साध्य केले. तर आपल्याला ते का नाही होणार? आपण त्या पद्धतीने काम केल्यास रिपब्लिकन पक्षालाही उभे करता येऊ शकेल. राजकीय पक्षाची मान्यता आणि चिन्हही मिळवता येऊ शकेल. आणि ती संधी आता विधानसभेच्या निमित्ताने चालून आली आहे.

आणखी वाचा-मोदीजी, विनेश उपांत्य फेरी जिंकली, पण श्रेय लाटण्याची वेळ आता निघून गेली

अशावेळी राज्यभरातील सर्व निष्ठावान रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी, आंबेडकरी जनतेने बाबासाहेबांचे रिपब्लिकन पक्षाचे स्वप्न साकार करण्यासाठी एकजूट करण्याची आवश्यकता आहे. सर्व प्रकारची तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी समाजातील विधीज्ञांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राची विधानसभा ही रिपब्लिकन पक्षाच्या नावे लढवून आंबेडकरी जनतेचे प्रतिनिधी सदनांमध्ये पाठवायचेच असा इरादा ठरवून काम करायला हवे. तसे केल्यास निश्चितपणे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल या दोन पक्षांना जसे यश मिळाले, तसेच यश रिपब्लिकन पक्षालाही मिळू शकते. ही जाणीव कार्यकर्त्यांनी बाळगण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेने याबाबत सर्व स्तरांवर प्रबोधन करण्याची आणि कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. याकरिता सर्वत्र सभा बैठकांचे सत्र सुरू होण्याची आवश्यकता आहे.

sandesh.pawar907@gmail.com