अमोल उदगीरकर
या वर्षी ‘मुंज्या’ आणि ‘स्त्री – २’ या हॉरर कॉमेडी सिनेमांनी तिकीटबारीवर धमाल उडवून दिली असतानाच कार्तिक नायर या लेखकाचं ‘सीइंग थिंग्ज : स्पेक्ट्रल मटेरियलिटीज ऑफ बॉम्बे हॉरर’ पुस्तक वाचनात यावं हा एक रोचक योगायोग आहे. भारतीय सिनेमात भयपटांना फारशी प्रतिष्ठा नव्हती. भय सिनेमा म्हणजे भयंकर रक्तपात आणि लैंगिक दृश्यांनी भरलेले चित्रपट अशी एक प्रतिमा जनमानसात होती. या सिनेमाला एका बौद्धिक वर्गात प्रतिष्ठा नसली तरी निमशहरी भागात आणि ग्रामीण भागात त्यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद होता. कार्तिक नायरने सत्तर आणि ऐंशीच्या दशकात बनणाऱ्या हिंदी भयपटांना केंद्रीभूत ठेवून हे पुस्तक लिहिलं आहे. या काळात बॉलीवूडमध्ये बनणाऱ्या भयपटांना त्याने नाव दिलं आहे ‘बॉम्बे हॉरर’. सुरुवातीला लेखक याच विषयावर एक रिसर्च पेपर करत होता. नंतर त्याचंच रूपांतर पुस्तकात झालं. या सिनेमांमधून कॅमेरा, साऊंड, संगीत, मेकअप यांच्या मदतीने लोकांच्या मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या भीतीला कसं छेडलं जातं याचा भारतीय परिप्रेक्ष्यातून अभ्यास करून निष्कर्ष मांडणं हा लेखक कार्तिक नायरचा पुस्तक लिहिण्यामागचा मुख्य हेतू. सत्तर आणि ऐंशीची दशकं भारताच्या इतिहासात अस्थिरतेची आणि राजकीय-सामाजिक घर्षणाची म्हणून ओळखली जातात. योगायोगानं हाच काळ- विशेषत: ऐंशीचं दशक- हा बॉलीवूड सिनेमाच्या इतिहासातलाही सगळ्यात सुमार काळ मानला जातो. मात्र ‘बॉम्बे हॉरर’च्या उत्कर्षाचा काळ हाच आहे! लेखक या सगळ्याचा एकमेकाशी असणारा परस्परसंबंध उलगडून दाखवतो.

या पुस्तकात सहा प्रकरणं आहेत. पुस्तकाची ओळख करून देणाऱ्या पहिल्या भागात लेखकानं हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विस्तारानं विशद केली आहे. नंतरच्या पाच प्रकरणांत दरवाजा, जानी दुश्मन, पुराना मंदिर, वीराना आणि कब्रस्तान या पाच भयपटांवर विस्तृत लिखाण केलेलं आहे. या पाच चित्रपटांच्या विश्लेषणातून लेखकाने ‘बॉम्बे हॉरर’ च्या तांत्रिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय अंगांचा आढावा घेतलेला आहे. हे लिखाण विश्लेषणात्मक असल्याने ते शब्दांचे फुलोरे उडवणारं, आकर्षक वाक्यरचना असणारं आणि विशेषणांचा भडिमार असणारं नाहीये. हे लिखाण गांभीर्याची डूब असणारं आणि विश्लेषण जसं असतं तसं काहीसं कोरडं आहे. पण सिनेमाला मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन बघणाऱ्या लोकांसाठी हे पुस्तक म्हणजे फार मोलाचा ऐवज आहे.

loksatta editorial on girl marriage age
अग्रलेख: दहा ते २१!
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Loksatta editorial on Gau rakshak killed Brahmin boy Aryan Mishra in Faridabad
अग्रलेख: वाद आणि दहशत
loksatta editorial on president draupadi murmu
अग्रलेख: अब द्रौपदी प्रश्न न पूछेगी…
Loksatta editorial on Chief Economic Advisor Dr V Anantha Nageswaran talk about financial market and finance 3 0 summit
अग्रलेख: बुडबुडा बुडवे बहुतां…
Loksatta editorial on pm Narendra modi dig at China in Brunei over supports development not expansionism
अग्रलेख: ‘या’ विस्ताराचे काय?
Loksatta editorial Opposition protest against maharashtra government over shivaji maharaj status collapse in rajkot Sindhudurg
अग्रलेख: जोडे, खेटरे, पायताण, वहाणा, चप्पल इ.
loksatta editorial on tax on medical insurance premium issued in gst council meeting
अग्रलेख: आणखी एक माघार…?

हेही वाचा : मंदीच्या कृष्णछाया दिसत आहेत?

भारतीय हॉरर सिनेमा आणि रामसे परिवार हे एके काळी जवळपास अद्वैत होतं. रामसे बंधूंनी तयार केलेल्या ‘दरवाजा’ या चित्रपटाची जाहिरात ‘भारतातला पहिला भीतीपट’ अशी करण्यात आली होती. अनेक भयपटांची निर्मिती करणाऱ्या रामसे परिवारासाठी सिनेमा बनवणं ही एक कौटुंबिक कृती होती. सहा रामसे बंधूच निर्मिती, दिग्दर्शन, एडिटिंग, चित्रीकरण, ध्वनी संयोजन हे फिल्म मेकिंगचं डिपार्टमेंट सांभाळायचे. इतकंच काय, सेटवर कलाकारांसाठी आणि तंत्रज्ञांसाठी बनणारं जेवण पण रामसे बंधूंच्या मातोश्री बनवायच्या. ‘कुटुंब रंगलंय भयपटात’ असा वाक्यप्रयोग रामसे परिवारासाठी चपखल बसतो. रामसे बंधूंच्या ‘दरवाजा’ सिनेमाच्या निमित्ताने लेखक मुख्यत्वे आढावा घेतो भारतातल्या सेन्सॉर बोर्डाच्या कार्यपद्धतीचा. लेखाच्या सुरुवातीलाच लेखकाने महत्प्रयासाने मिळवलेल्या ‘दरवाजा’च्या सेन्सॉर सर्टिफिकेटचे छायाचित्र दिलं आहे आणि त्याचं सविस्तर विश्लेषण केलं आहे. तत्कालीन सेन्सॉर बोर्ड आणि त्यावरले सदस्य हे अतिशय रूढीप्रिय आणि पारंपरिक विचारसरणीचे होते. भय सिनेमात असणारा हिंसाचार आणि रक्तपात या सदस्यांना अनावश्यक वाटायचा. ‘दरवाजा’च्या वेळेस या सगळ्याला नुकत्याच लागू झालेल्या आणीबाणीचीही पार्श्वभूमी होती. आणीबाणीच्या काळात सेन्सॉर बोर्डाच्या कात्र्यांना आणखीच धार चढली होती. ‘दरवाजा’ सिनेमाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळवताना रामसे बंधूंना तत्कालीन व्यवस्थेशी जो संघर्ष करावा लागला आणि अनेक ‘अपील युद्धं’ खेळावी लागली याचा परामर्श लेखकानं या प्रकरणात घेतला आहे. लेखकाच्या मते सेन्सॉर बोर्डाची सिनेमावरची पोलादी पकड ही राज्यसंस्थेच्या ताकदीचं प्रतीक असते. ‘कापलेल्या फिल्म्स ही सेन्सॉर बोर्डाची मुक्त अभिव्यक्ती असते,’ असा खोचक वाक्यप्रयोग लेखक करतो.

रामसे बंधूंव्यतिरिक्त राजकुमार कोहली, मोहन भाखरी, विनोद तलवार हे निर्माता-दिग्दर्शक पण भयपटनिर्मितीमध्ये अग्रेसर होते. ‘बॉम्बे हॉरर’च्या चित्रपटांमध्ये पंजाबी दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ मोठ्या प्रमाणावर दिसतात. लेखकानं याचं श्रेय पंजाबात रुजू लागलेल्या फुटीरतावादी चळवळीला दिलं आहे. पंजाबात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी कृत्यं सुरू झाल्यावर तिथल्या अनेक कलावंतांनी मुंबईत आश्रय घेतला होता. ‘बॉम्बे हॉरर’चा इतिहास त्या अर्थाने भारताचा पण सामाजिक- राजकीय इतिहास आहे. ‘बॉम्बे हॉरर’ सिनेमाच्या कथानकांमध्ये भारतीय जातिव्यवस्थेचं आणि स्त्रियांच्या समाजातल्या दयनीय अवस्थेचं प्रतिबिंब कसं पडलं आहे याचं कार्तिक नायरनं केलेलं विश्लेषण मुळातूनच वाचण्यासारखं आहे. त्यावेळच्या बहुतेक भय सिनेमांमध्ये एक अत्याचारी ठाकूर असतो आणि त्याची एक प्रशस्त हवेली असते. ताकदीच्या उन्मादातून, धनाच्या लाभातून किंवा जागेच्या वादातून अनेकदा हा ठाकूर कुठल्या तरी गरीब परिवारावर अत्याचार करतो. त्या परिवाराच्या तळतळाटातून आणि शापातून त्या ठाकूराला आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांना भुताटकीचा शाप लागतो. हा तत्कालीन आणि सध्याच्याही व्यवस्थेत आढळणारा वर्गसंघर्ष ‘बॉम्बे हॉरर’च्या सिनेमांमध्ये पुन्हा पुन्हा दिसतो. ‘जानी दुश्मन’ सिनेमात गावाबाहेरच्याच एका गुहेत राहणारं आणि परकायाप्रवेश करणारं भूत गावातल्या ज्यांचं लग्न होणार आहे अशा स्त्रियांना उचलून घेऊन जात असतं. या सिनेमाच्या निमित्ताने गावगाड्यात असणाऱ्या स्त्रियांच्या स्थानावर आणि त्यांच्या मर्जीविरुद्ध त्यांचा वापर करण्याच्या पुरुषी मानसिकतेवर लेखक भाष्य करतो. हा सिनेमा येण्याच्या काहीच वर्षं आधी घडलेल्या आणि देशभरात गाजलेल्या मथुरा बलात्कार प्रकरणाचाही ‘जानी दुश्मन’वरच्या प्रकरणात उल्लेख आहे. एक मजेशीर बाब म्हणजे तिकीटबारीवर विक्रम करणाऱ्या ‘स्त्री – २’ या सिनेमावर ‘जानी दुश्मन’चा बराच प्रभाव आहे.

हेही वाचा : ‘चीन प्लस वन’ हे धोरण भारतासाठी फायद्याचे कसे आहे?

सिनेमा ही जितकी सर्जनशील कला आहे तितकीच तांत्रिकदेखील आहे. सिनेमा हा शेवटी तंत्राचाच खेळ आहे. कार्तिक नायरने ‘बॉम्बे हॉरर’च्या तांत्रिक अंगाचा ऊहापोह करण्यात अनेक पानं खर्चली (चांगल्या अर्थानं) आहेत. पुस्तकात उल्लेख असलेल्या भयपटांमधल्या निगेटिव्ह इमेजेस, जम्प कट्स, स्लो डिसॉल्व, सिंगल टेक्स यांचा सढळ वापर आणि या सिनेमांचं शॉट डिव्हिजन या सगळ्यांची विस्तृत माहिती लेखकाने दिलेली आहे. सिनेमाच्या कलर पॅलेटमध्ये निळा, पिवळा, पांढरा, हिरवा रंग यांचा वापर का केला जायचा याचं रोचक विश्लेषण लेखकानं केलं आहे. ‘बॉम्बे हॉरर’च्या सिनेमातली ओबडधोबड मेकअप असलेली भुतं हा आता चेष्टेचा विषय बनली असली तरी (रामसेंच्या एका सिनेमात भुताच्या पायात स्पोर्ट्स शूज दिसतात) या सिनेमातला वेशभूषा विभाग हा कसा महत्त्वाचा होता हेदेखील या पुस्तकात येतं. ‘बॉम्बे हॉरर’मधल्या बहुतेक सिनेमांच्या प्रेरणा या बाहेरच्या सिनेमांमधून आलेल्या होत्या आणि या सिनेमाच्या मेकर्सनी नसफरातू , व्हॅम्पायर, ड्रॅक्युला यांच्यावरच्या विदेशी सिनेमांमधून कशी यथेच्छ उचलेगिरी केली आहे यावरही पुस्तकात प्रकाशझोत टाकला आहे.

या भयपटांचा प्रेक्षकवर्ग हा मुख्यत्वे ग्रामीण- निमशहरी भारतात असलेला पुरुष वर्ग होता. स्त्रिया हा सिनेमा बघायला चित्रपटगृहात आल्या आहेत असं दृश्य दिसणं जवळपास अशक्य. शहरांमधल्या चांगल्या चांगल्या थिएटर्समध्ये आघाडीच्या प्रॉडक्शन हाऊसेसचे आणि स्टार्सचे सिनेमे लागायचे. या भयपटांच्या नशिबी गावातली जीर्णशीर्ण थिएटर्स यायची. या सगळ्या घटकांचा प्रभाव या लो बजेटच्या भयपटांच्या ‘आर्थिक मॉडेल’वर पडला होता. ‘बॉम्बे हॉरर’ची थिएटर्स आणि त्यानिमित्ताने सिनेमा क्षेत्रावर प्रचंड मनोरंजन कर लादून सिनेमाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करण्यास अनुत्सुक शासन व्यवस्था यावर लेखक कठोर भाष्य करतो. भारतातली सिनेमांची वितरण व्यवस्था किती गुंतागुंतीची आहे आणि त्यात लो बजेट सिनेमांना थिएटर्स मिळणं किती अवघड आहे याचं ‘बॉम्बे हॉरर’च्या संदर्भातलं विश्लेषण वाचत असताना परिस्थिती आजही फारशी बदललेली नाही हे जाणवतं. काही लोकांची बटीक बनून राहणं हेच सिनेमाच्या वितरण व्यवस्थेचं भागध्येय असावं बहुतेक. भारतीय सिनेमातून स्टुडिओ सिस्टम अस्तंगत झाल्यानंतरच्या काळात या हॉरर फिल्म्स बनल्या. त्यामुळे असंघटितपणा आणि अनागोंदी ‘बॉम्बे हॉरर’ च्या गुणसूत्रांमध्येच आली असावी असं मानायला जागा आहे. व्हिडीओ कॅसेट्सचं भारतात आगमन झाल्यावर ‘बॉम्बे हॉरर’ला शेवटची घरघर सुरू झाली. बाजारपेठेतल्या संरचनात्मक बदलांचा प्रभाव सिनेमावर कसा पडतो याचं पुस्तकातलं अर्थशास्त्रीय विश्लेषण सिनेअभ्यासकांना नक्की आवडेल.

हेही वाचा : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ केवळ घोषणेपुरतेच?

हे पुस्तक दृृश्य पातळीवरसुद्धा सुंदर आहे. भयपटांची अनेक दुर्मीळ पोस्टर्स आणि शूटिंगच्या दरम्यान काढलेले दुर्मीळ फोटो पुस्तकात आहेत. ‘बॉम्बे हॉरर’च्या सिनेमात फारसे ‘ए लिस्टर्स’ काम करत नसले तरी या सिनेमांची स्वत:ची अशी एक ‘स्टार सिस्टम’ होती. लेखक जातीनं जाऊन यातल्या काही अभिनेत्यांना भेटला आणि त्यांचे शूटिंगचे अनुभव त्याने शब्दबद्ध केले आहेत.

या पुस्तकात मनोरंजन, मसाला, गॉसिप नाही. आहे ते सटीक विश्लेषण. विश्लेषण हे कोरडं असतं आणि त्यात वाचनीयता अनुपस्थित असते या ‘मिथ’ला कार्तिक नायरची लिखाणशैली खोटं ठरवते. सखोल विश्लेषण फक्त समांतर सिनेमांचं किंवा क्लासिक्सचंच व्हावं असा एक गैरसमज आहे. प्रेक्षकप्रिय सिनेमांचं आणि पिटातल्या म्हणून हेटाळणी केलेल्या प्रेक्षकांच्या आवडीच्या सिनेमांचंही सखोल विश्लेषण व्हायला पाहिजे याची जाणीव हे पुस्तक वाचताना होते. सिनेमाच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, सिनेमा हे मनोरंजनाचं फक्त एक साधन आहे यापलीकडे जाऊन विचार करणाऱ्यांनी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. यूट्यूब कृपेने ‘बॉम्बे हॉरर’ सिनेमा पुन्हा बघितला जात आहे आणि एक प्रकारे या सिनेमांचं पुनरुज्जीवन झालं आहे. इतिहासाचं चक्र पुन्हा फिरून त्याच जागी आलं आहे.

‘सीइंग थिंग्ज- स्पेक्ट्रल मटीरिअॅलिटीज ऑफ बॉम्बे हॉरर’

लेखक : कार्तिक नायर

प्रकाशक : युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया प्रेस

पृष्ठे : ३०४ ; किंमत : २५२० रु.