प्रतिकाराचे दुसरे नाव संघर्ष होय. अण्णा भाऊ साठे यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले. वाटेगाव ते मॉस्कोपर्यंतचा प्रवास हा त्यांच्या संघर्षाचा पुरावाच होय. अण्णाभाऊंचा जन्म ज्या सातारा-सांगली-वाटेगाव परिसरात झाला त्या भागात अनेक क्रांतिकारकांनी जन्म घेतला होता. एखाद्या विचारप्रणालीचा स्वीकार हा बहुधा त्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीवर अवलंबून असतो. अण्णाभाऊंना भाकरीचा प्रश्न महत्त्वाचा वाटला. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने येणाऱ्या कामाचे महत्त्व सांगणाऱ्या मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा परिचय त्यांना झाला आणि त्यातूनच ते मार्क्सवादाकडे वळले. त्यामुळे त्यांना जात जाणिवेबरोबरच वर्गजाणीवही होऊ लागली.
जात आणि वर्ग जाणिवा हेच अण्णाभाऊंच्या साहित्याचे प्रयोजन झाले. शेवटी या दोन्ही जाणिवा मानवी प्रतिष्ठा व मानवमुक्तीचा संदेश देतात. मार्क्सवादाची ओळख अण्णाभाऊंना सर्वप्रथम रेठरे यात्रेत क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या भाषणामुळे झाली. जन्मापासून जातीयतेचे चटके त्यांनी सोसलेले होते. कामगार हा केवळ एक वर्ग नसून कामगारांचीही एक जात असते, याचा त्यांना अनुभव मोरगाबच्या गिरणीत काम करत असताना आला. त्यांची नेमणूक त्रासणखान्यात झाली होती. त्यांना तुटलेले धागे पुन्हा जोडावे लागत व धागे तोंडातली थुंकी लावून जोडावे लागत. तेथील कामगारांना अण्णाभाऊंची जात माहीत झाली आणि याच्या थुंकीने बाटलेल्या धाग्याला आम्ही हात लावणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. अण्णाभाऊंनी तेथील काम सोडले. हीच जातीयतेची जाणीव त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडून, सामाजिक आंदोलनाची रूपरेषा निर्माण केली.
हेही वाचा – स्वामी विवेकानंदांना समजावून घेऊया!
समाज परिवर्तनासाठी त्यांनी साहित्य हे माध्यम निवडले. अण्णाभाऊंच्या साहित्याचे सार प्र. के. अत्रे यांनी मार्मिक शब्दांत सांगितले आहे- ‘अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांचे साहित्य’, असे सार्थ वर्णन त्यांनी केले आहे. मात्र तत्कालीन साहित्य निकषांनुसार अण्णाभाऊंचे साहित्य हे साहित्य मानले जात नव्हते. अण्णा भाऊ रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांचे वाक्य उद्धृत करतात- ‘जो साहित्यिक जनतेची कदर करत नाही, त्या साहित्यिकाची कदर जनताही करत नाही.’ अण्णाभाऊंनी विविध साहित्यप्रकार हाताळले. त्यात ३५ कादंबऱ्या, आठ पटकथा, १५ स्फुट कथा, एक प्रवासवर्णन, तीन नाटके, १२ उपहासात्मक लेख, १४ लोकनाट्ये, १० पोवाडे एवढी मोठी साहित्यसंपदा निर्माण केली.
त्यावेळी एक वाद सुरू होता- ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’. अण्णाभाऊंनी जीवनासाठी कला या अनुषंगाने आपली साहित्यसंपदा निर्माण केली. तसेच समाजातील वंचित, दीन दलित, कष्टकरी, स्त्रिया, भटके यांच्या व्यथा-वेदना साहित्यातून मांडल्या. त्यांच्या प्रत्येक कादंबरीचा, कथेचा, नाटकाचा, लोकनाट्याचा विषय हा समाजातील तळाची बंडखोर व्यक्ती होता. लोकनाट्याद्वारे त्यांनी कामगारांच्या श्रमाचा पुरस्कार करणारे आणि जमीनदारांच्या शोषणाचा धिक्कार करणारे तत्त्वज्ञान मांडले. अण्णांनी ‘लालबावटा कलापथक’ (१९४२) व इप्टा यांच्या माध्यमातून वर्गशोषण म्हणजेच जमीनदार, सावकार यांच्या शोषणाचे जाहीर प्रगटन केले. अण्णांच्या साहित्यातील सर्व व्यक्तिरेखा अन्यायाविरुद्ध लढतात. तसेच त्यांच्या कथांत दलितेतर व्यक्तिसुद्धा सामाजिक न्यायाच्या भूमिका घेताना दिसतात. उदा. विष्णुपंत कुलकर्णी (खुळंवाडी). अण्णाभाऊंच्या साहित्याबद्दल डॉ. एस. एस. भोसले म्हणतात की, ‘फुले-आंबेडकरांचा वारसा घेऊन उभे राहिलेले व प्रस्थापित मराठी साहित्य संस्कृतीची परंपरा नाकारणारे अण्णाभाऊ हे पहिले दलित बंडखोर लेखक आहेत.’
कोणत्याही कलावंताच्या कलेची समीक्षा करत असताना आपण त्यांचे सामाजिक संदर्भ टाळू शकत नाही व टाळायचे नसतात. अण्णाभाऊ जात-वर्गीय हितसंबंधाच्या पूर्ण विरोधी आहेत. प्रखर बुद्धिवाद, समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, समाजवादी विचार यांच्या वौचारिक साधनेवर अण्णा भाऊंचा वाङ्मयीन दृष्टिकोन उभा आहे.
लोकशाहीर म्हणून त्यांनी ‘लालबावटा कलापथका’सह संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. या कलापथकासाठी त्यांनी लोकनाट्य लावण्या, पोवाडे असे वाङ्मय प्रकार हाताळले. ‘अकलेची गोष्ट’, ‘शेटजीचं इलेक्शन’ इत्यादी लोकनाट्यांद्वारे ते लोकांपर्यंत पोहोचले. कार्ल मार्क्सच्या इतिहासाच्या उत्क्रांतीची संकल्पना समजावून सांगणे व सामाजिक बदलाच्या प्रक्रियेमधील कामगारांचे स्थान त्यांच्या मनावर ठसवणे हा या लोकनाट्यांचा मुख्य उद्देश होता. या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी विदर्भ व खानदेशात कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार व प्रसार केला.
१५ ऑगस्ट १९४७ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. काँग्रेस पक्षाने देशभर उत्सव साजरा केला. परंतु अण्णा मात्र उदास झाले होते. ते विचार करू लागले देश स्वातंत्र्य झाला म्हणजे काय झाले? स्वातंत्र्य कुणाला मिळाले? शेठजींना, भटजींना, भांडवलदारांना, कारखानदारांना, अधिकाऱ्यांना की गरीब जनतेला? जे स्वातंत्र्य भुकेकंगाल जनतेचा विचार करत नसेल ते काय कामाचे? १६ ऑगस्टला चिरागनगरमधील कामगारांना एकत्र करून मुंबईच्या कचेरीवर मोर्चा काढला तेव्हा उपस्थित जनतेतून आवाज आला, ‘इन्कलाब जिंदाबाद! लाल सलाम जिंदाबाद…! जनता अमर रहे, गरीबों का राज आना चाहिए. इस देश की जनता भूखी है। ये आजादी झूठी है। ये आजादी झुठी हैं।’ मोरारजी देसाई यांनी ‘लोकमंत्री’ या लोकनाट्याच्या प्रयोगावर बंदी घातली तेव्हा अण्णाभाऊ भूमिगत होऊन कार्यक्रम सादर करत. अतिशय जिद्दीने अण्णांनी प्रबोधनाची परंपरा कायम ठेवली.
१९५६ला महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. कम्युनिस्ट पार्टी या लढ्यात संपूर्ण ताकदीनिशी उतरली. लालबावट्याचे पुन्हा पुनरुज्जीवन करण्याचे पार्टीने ठरवले आणि दत्ता गव्हाणकर व अण्णाभाऊंनी पुन्हा कलापथकाची बांधणी केली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कलापथकाच्या कार्यक्रमात सुरुवात केली. अण्णाभाऊंच्या कलापथकांनी ‘माझी मुंबई’ हे लोकनाट्य तयार केले. ‘संयुक्त महाराष्ट्रा’ची चळवळ महाराष्ट्रात उभी करण्यात अण्णा भाऊ साठे व त्यांच्या कलापथकाचा सिंहाचा वाटा होता. अण्णाभाऊंच्या कलापथकावर बंदी घालण्यात येऊन अण्णांना अमरावतीच्या तुरुंगात ठेवण्यात आले आणि तिथेच त्यांनी माझी मौना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली ही प्रसिद्ध लावणी तयार केली. १९५८ च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा प्रचाराचे कार्य सुरू केले. संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले.
हेही वाचा – सह्याद्रीच्या कडय़ाची ढाल ढासळू नये..
१९५६ नंतरचे अण्णा भाऊंचे साहित्य हे परिवर्तनवादी व प्रबोधनवादी आहे. अण्णा भाऊ साठे १९४६ पासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आंदोलनाने प्रभावित झाले होते. त्यांनी त्यांच्या एका वगातही लिहिले होते. अण्णाभाऊ मार्क्सवादी विचारांनी झपाटलेले होते, हे निर्विवाद सत्य असले तरी त्यांनी मार्क्सवादाची चिकित्सा भारतीय समाजव्यवस्थेच्या सदंर्भात करणे सुरू केले होते. मार्क्सवाद जगाचा अभ्यास करताना कामगारांच्या शोषणाचा, त्यांच्या पिळवणुकीचा विचार मांडतो. परंतु भारतीय दलितवर्ग हा आर्थिक शोषणाचा बळी आहे. तसा तो तेथील मनुवादी जातीय समाजरचनेने निर्माण केलेल्या सामाजिक शोषणाचाही बळी आहे. याचे भान अण्णा भाऊंना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक लढ्यांनी दिले. ‘फकिरा’ ही कादंबरी त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला’ अर्पण केली. कार्ल मार्क्सने कामगारांच्या हातात क्रांतीच्या मशाली दिल्या तर डॉ. आंबेडकरांनी दलितांना आंदोलनकारी केले. अण्णाभाऊंनी लिहिलेल्या ‘सापळा’, ‘बुद्धाची शपथ’, ‘उपकाराची फेड’ व ‘वळण’ या कादंबऱ्या आंबेडकरी विचारांनी प्रभावित होऊन लिहिलेल्या आहेत. अण्णा भाऊ साठे हे खऱ्या अर्थाने दलित साहित्याचे प्रवर्तक ठरतात. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेबांचा विचार शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले. अण्णाभाऊंच्या साहित्यात कधीही जातीय संघर्ष दिसून येत नाही. सत्य व असत्य या प्रवृत्तीचा संघर्ष दिसून येतो.
अण्णाभाऊ तत्कालीन सर्व साहित्यप्रकारांच्या विरोधी व विद्रोही होते. प्रस्थापित सर्व साहित्याच्या चौकटीलाच त्यांनी आव्हान दिले. त्यांच्या साहित्याचे एकूण प्रयोजन सामान्यातल्या सामान्य माणसाला क्रांतीप्रवण करणे व या देशातील जात-वर्गाला मूठमाती देणे होय. तत्कालीन व्यवस्थेतील मार्क्सवादी व आंबेडकरवादी यांनी त्यांना पूर्ण स्वीकारले नाही. त्यांच्या अनुयायांनी अण्णाभाऊंना व्यक्ती व त्यांचा नेता म्हणून स्वीकारले पण त्यांच्या विचारांचा वारसा मात्र स्वीकारला नाही. सामाजिक वास्तवाची प्रखर जाणीव असलेल्या या क्रांतिकारी साहित्यिकाला विनम्र अभिवादन !
(लेखक उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात राज्यशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक आहेत.)
vishwambar10@gmail.com