किरण कुलकर्णी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतातील निवडणूक प्रक्रिया वर्षानुवर्षांच्या अनुभवातून विकसित झाली आहे आणि कालपरत्वे त्यात भर पडते आहे. प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार बजावून पुढील पिढ्यांमध्ये या जबाबदारीविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे गरजेचे आहे…
शासनव्यवस्था आणि तंत्रज्ञान या दोन मानवनिर्मित गोष्टी सर्वव्यापी होत चालल्या आहेत. कधी प्रत्यक्षपणे तर कधी अप्रत्यक्षपणे! अलीकडे त्यांच्या सर्वव्यापकतेला परिणामकारक आयाम प्राप्त होतो आहे. शासनव्यवस्था कशी आहे यावर नागरिकांचे जीवन सुखकर होणे अवलंबून असते. त्याचे कारण शासन व्यवस्थेच्या निर्णयांचा आणि अंमलबजावणीचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होतच असतो. उदाहरणार्थ, एखाद्याच्या राहण्याच्या ठिकाणापासून कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचणे वेळ, श्रम आणि वृत्ती यांच्या निकषांवर सुखकर होत नसेल तर शासनव्यवस्थेच्या निर्णयांना आणि अंमलबजावणीला जबाबदार धरावे लागेल. शासन व्यवस्थेमध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या सर्व शासकीय-निमशासकीय यंत्रणा आणि शासनप्रणीत महामंडळांचा आणि इतर संस्थांचाही समावेश होतो. हाच मुद्दा कळीचा आहे.
शासन व्यवस्था कोणी चालवावी याचा निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे, हे दैनंदिन जीवनात काही त्रास झाल्यावर शासनाच्या नावाने खडे फोडणाऱ्यांना लक्षात येत नाही. दिवाणखान्यात रंगणाऱ्या अनेक चर्चांमध्ये शासनाच्या निर्णयावर किंवा अंमलबजावणीवर हिरिरीने टीका करणाऱ्यांनी हे समजून घ्यायला हवे. हेच लोक मतदानाच्या दिवशी स्वत:चा मताधिकार वापरणे टाळतात, तेव्हा त्यांचा दांभिकपणा उघडा पडतो. शासक आणि शासित यांमधल्या शासितांना आपल्यामधून शासक निवडण्याचा अधिकार आणि प्रसंगी ते बदलण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला आहे. त्यासाठीच निवडणूक प्रक्रिया घडते. मतदानाच्या दिवसाला जोडून सुट्ट्या आल्या की मुलांबाळांसह बाहेरगावी पळण्याची संधी साधणारा वर्ग आपण काय गमावतो आहोत, याविषयी अनभिज्ञ असतो असे मानायचे का? आपल्या पुढच्या पिढीपुढे कोणते आदर्श ते ठेवत असतात? उच्च उत्पन्न आणि उच्चशिक्षित शहरी समाजघटकांमध्ये मतदानाविषयीची अनास्था आकडेवारीवरून स्पष्ट होते. ही चिंतेची बाब आहे. शासक निवडण्याच्या या प्रक्रियेमध्ये आपले मत प्रतिबिंबित व्हावे, म्हणून प्रत्येकच घटकाने प्रयत्न केले पाहिजेत. जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे.
हेही वाचा >>> लेख : जात खरंच जात नाही का?
भारतीय राज्यघटनेने प्रत्येक प्रौढ भारतीय नागरिकाला दिलेला मतदानाधिकार हा जणू एक दिवा आहे आणि प्रत्येकाने त्या दिव्याच्या प्रकाशात वाटचाल करणे घटनेला अपेक्षित आहे. जो नागरिक मतदान करत नाही, तो ही प्रकाशातली वाटचाल नाकारतो असे म्हणावे लागेल. निवडणूक आयोगाने मतदानाच्या आकडेवारीचे पृथक्करण करून मतदानाविषयी औदासीन्य दाखवणाऱ्या घटकांची यादी केली आहे आणि यापूर्वीच्या निवडणुकांतील मतदानाच्या आकडेवारीवरून क्षेत्रनिश्चितीसुद्धा केली आहे. शहरी भागांतील मतदार, युवा मतदार, निम्न उत्पन्न गटातील मतदार असे काही घटक त्यामध्ये समाविष्ट आहेत. औद्याोगिक क्षेत्रांत राहणारे मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांना वेतनी सुट्टी देण्याचे निर्देश आहेत. आदिवासी आणि भटक्या जमातींमधील मतदारांसाठी विशेष प्रयत्न चालू आहेत. महिलांमधील मतदानाचे प्रमाण वाढावे म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. हा विषय केवळ प्रचार- प्रसिद्धीचा नसून मतदानाची भावना मन:पूर्वक निर्माण होण्यासाठी जाणकारांचे योगदान गरजेचे आहे. स्वत:चे उदाहरण आणि इतरांना मतदानास प्रवृत्त करून प्रत्येकच सुजाण भारतीयाने लोकशाहीच्या उत्सवातली आपली जबाबदारी पार पाडायला हवी. भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वांना हे आवाहन आहे आणि आव्हानसुद्धा!
वेगवेगळ्या पातळ्यांवर म्हणजे देश, राज्य आणि स्थानिक पातळीवर आपले शासक कोण असावेत, हे ठरवण्याचा अधिकार मतदार म्हणून निवडणुकीद्वारे मिळतो. शासनव्यवस्थेत सहभागी होण्याची ही मतदारांसाठी संधी असते. माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे, ही वृत्ती मतदानप्रक्रियेविषयी औदासीन्य दाखवते. थेंबाथेंबाने जर तळे साचून जलसंचय होतो, तर एकेका मताने जनमन तयार होऊन आपले शासक कोण असावेत, याचा कौल ठरतो. भारतीय राज्यघटनेने आपल्या समाजाला शासन व्यवस्थेत सहभागी होण्याची ही संधी दिली आहे आणि ती भेदभावरहित संधी सर्वांना दिली आहे. त्यासाठीची सुव्यवस्थित अंमलबजावणी करणारी यंत्रणा दिल्लीपासून गल्लीपर्यंत मेहनत करते. अशी परिस्थिती जगातल्या सर्व समाजांसाठी आहे, असे म्हणण्याजोगी स्थिती नाही. म्हणूनच भारतीय राज्यघटना हे आपले वैभव आहे आणि त्यातला सर्व प्रौढ भारतीयांसाठीचा मताधिकार आपला अभिमान आहे. हा मताधिकार सहजी मिळालेला नाही. आपल्या आधीच्या अनेक पिढयांचे त्यासाठी योगदान आहे. महापुरुषांची दूरदृष्टी आहे. धर्म, जात, पंथ, लिंग इत्यादी कोणत्याही भेदाच्या पलीकडे जाऊन समतेसाठी झटणाऱ्या अनेकांच्या रक्ताचा, घामाचा आणि अश्रूंचा गंध त्यात आहे.
भारतातील निवडणूक प्रक्रिया वर्षानुवर्षांच्या अनुभवातून विकसित झाली आहे आणि कालपरत्वे त्यात भर पडते आहे. महाकाय देशासाठी काटेकोर निवडणूकप्रक्रिया राबवणे हे एक आव्हानच आहे आणि नागरिक या महत्त्वाच्या सहभागी घटकाच्या सक्रियतेमध्ये त्याचे फलित आहे. म्हणूनच सर्वच समाजघटकांतील नागरिकांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होणे गरजेचे आहे. देशासाठी म्हणूनच नव्हे तर स्वत:साठीसुद्धा! कारण देश म्हणजे देशातील माणसे! केवळ भौगोलिक सीमा नव्हेत, तर माणसांचा जिवंत समूह! मताधिकाराचा इतिहास अनेक चांगल्या वाईट घडामोडींनी भरलेला आहे. त्या घडामोडींचा निष्कर्ष म्हणून आज आपण मताच्या अधिकाराचे धनी झालो आहोत. आपल्या दैनंदिन जीवनातल्या हातभर तक्रारींचे ते बोटभर उत्तर आहे. मतदानाचा अधिकार बजावणे म्हणजे घटनेमधील समतेच्या तत्त्वाचे अभिनंदन! घटनाकारांच्या भविष्यदर्शी दृष्टीला वंदन! सुशासनाच्या आकांक्षेचे मंडन!
मतदानाविषयीचे औदासीन्य झटकून आपण सारे मतदान करू या. या देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावू या. इतरांनाही मतदान करायला सांगू या. योग्य लोकप्रतिनिधी निवडून आपले आणि पुढच्या पिढ्यांचे भविष्य सुनिश्चित करू या. परदेशी जाऊन आलेल्या, विशेषत: पाश्चिमात्य देशांमध्ये जाऊन आलेल्या भारतीय नागरिकांमध्ये तिथल्या सुविधांचे कौतुक करण्याची वृत्ती कित्येकदा आढळते. आपल्या देशातल्या सुविधांची तुलनाही कित्येकदा ‘तिकडच्या’ सुविधांशी केली जाते. हे करताना आपले शासक आपणच निवडलेले आहेत, या तत्त्वाचा त्यांना विसर पडलेला दिसतो. मतदानाच्या दिवशी हीच मंडळी मिळालेल्या सुट्टीचा फायदा घेऊन इतर गोष्टी करतात पण मतदानाचे कर्तव्य मात्र बजावत नाहीत, असे अनेकदा दिसून येते. मतदानाच्या दिवशी मिळणारी सुट्टी ही मतदानाचा अधिकार बजावता यावा म्हणून मतदाराला मिळालेली कामापासून दूर राहण्याची मुभा असते. या सुट्टीचा इतर कारणांसाठी उपयोग ही फसवणूकच म्हणायची. सुट्टी देणाऱ्यांची आणि स्वत:चीही!
घटनेने मोठ्या उमेदीने सर्व प्रौढ भारतीय नागरिकांच्या हातात मताधिकार दिलेला आहे. सामान्य भारतीय मतदार या विशालकाय देशामध्ये विविध प्रांतांत, शहरांत, गावखेड्यांत वेगवेगळ्या परिस्थितीत राहत असतो. विविध प्रकारच्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीय नागरिकांना बांधणारा मताधिकार हा समानतेचा धागा आहे. भारतीय म्हणून मताधिकार बजावून सर्वांनीच एकजूट दाखवणे आवश्यक आहे. विशेषत: उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींनी आणि सुशिक्षितांनी हा मुद्दा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. मतदान ही केवळ एक कृती नाही. लोकशाहीप्रति आणि निवडणूक प्रक्रियेबद्दल आदरभावना व्यक्त करण्याची ती एक संधी आहे. याचा मतदाराच्या घरातील मुलाबाळांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. पुढच्या पिढीला जे द्यायचे त्याचे संचित अशा छोट्या कृतींवरूनच ठरते. लोकशाही हे जर मूल्य आहे आणि केवळ राजकीय व्यवस्थेचे नाही तर जीवनमूल्य आहे, हे नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांतील वाक्य! हे वाक्य प्रत्यक्षात आणणारे पालक कळत-नकळत पुढच्या पिढीवर काही संस्कार करत असतात. मतदान आणि एकूणच लोकशाही मूल्याविषयी पालकांचे, शिक्षकांचे विचार काय आहेत, यावरून नवीन पिढीचा दृष्टिकोन घडतो. तो घडवायचा की बिघडवायचा, हा निर्णय ज्याने त्याने घ्यायला हवा. पुढच्या पिढीला द्यावयाचे संचित बळकट करण्यासाठी मतदानाबद्दलचा आणि लोकशाही प्रक्रियेबद्दलचा आदरभाव संक्रमित करणे प्रत्येकच पिढीसाठी महत्त्वाचे आहे. ही बाब थोडीशी पर्यावरणसंरक्षणाच्या विषयाशी साधर्म्य दाखवते. पुढच्या पिढीसाठी स्वच्छ आणि चांगले पर्यावरण संचित म्हणून ठेवणार की दूषित आणि संकुचित वृत्तीने केलेला पर्यावरणाचा ऱ्हास? तसेच हे आहे.
भारत निवडणूक आयोगाने अभ्यासाअंती निश्चित केलेले मतदान औदासीन्य आढळलेले घटक आणि क्षेत्रे यामध्ये महाराष्ट्र राज्यात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने काळजीपूर्वक नियोजन करून उपक्रम आखले आहेत. त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कल्पक उपक्रम राबवले जात आहेत. त्यासाठी अतिशय सर्जनशील असे प्रचारसाहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिले आहे. त्या साहित्याचा वापर करून पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज यासारखी माध्यमे वापरता येतील. त्याचबरोबर घरोघरी भेट देऊन मतदान करण्यातील अडचणी समजून घेणे, पथनाट्ये सादर करणे, अडचण असलेल्या मतदारांची मतदान केंद्रापर्यंत आणि परत अशी वाहतूक करण्याची शासनातर्फे व्यवस्था करणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. स्वयंसेवी संस्थांनी, जबाबदार नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी मतदानाचा अधिकार बजावण्यास परिसरातील प्रत्येक मतदारास प्रवृत्त करावे. मतदान करणे ही ‘लोकांची इच्छा’ होण्यास त्यामुळे मदतच होईल.
लेखक अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य