कडक राजकीय शिस्तीच्या चीनमध्येही नातेवाईकशाही आहेच, त्यात या राष्ट्राध्यक्षपत्नी संगीत-नृत्य पथकात असल्याने त्यांना प्रसिद्धी अमाप मिळते आहे. चिनी प्रसारमाध्यमे एकतर सरकारी वा दबलेली आहेतच, पण व्यवस्थेला वळसा घालून खुशमस्करेगिरीची लागण चीनला झाली आहे का?

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी आपल्या पत्नी पेंग लियुआन यांना चिनी कम्युनिस्ट पार्टी’च्या (सीसीपी) मध्यवर्ती समितीची धोरणे ठरवणाऱ्या पॉलिटब्यूरोमध्ये पदोन्नती देण्याची योजना आखल्याची अफवा चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून कायम आहे. असे पाऊल धाडसी, निर्रगल तसेच ‘सीसीपी’मधल्या ज्येष्ठ- कनिष्ठ अशा सर्वच निष्ठावंतांना अस्वस्थ करण्याची शक्यता आहे; परंतु जिनपिंग यांनी आतापर्यंत कधीही पायंडे मोडण्यास मागेपुढे पाहिलेले नाही; त्यामुळे पुढे काय होईल कुणी सांगावे?

भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
nepal prime minister kp oli visit china importance in perspective on Belt and Road
पंतप्रधानपद पणाला लावून चीनशी सहकार्य!

या प्रश्नाला, या चर्चेला दुजोराच देणारा अहवाल ‘पीपल्स डेली’ या वृत्तपत्रात २० ऑगस्ट रोजी प्रकाशित झाला. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या या अधिकृत मुखपत्राने चीन-भेटीस आलेले व्हिएतनामी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि व्हिएतनामी अध्यक्ष टू लाम यांच्या पत्नी न्गो फुओंग लाय यांनी १९ ऑगस्ट रोजी बीजिंगमध्ये पेंग लियुआन यांची भेट घेतल्याचा जरा जास्तच सविस्तर वृत्तान्त प्रकाशित केला, हे अनेकांच्या नजरेस येणारे ठरले.

पेंग लियुआन आणि न्गो फुओंग लाय या दोघींच्या भेटीवर आधारित छोटेखानी लेखच होता हा. तोही छायाचित्रासह. त्यात पेंग लियुआन यांनी, ‘चीन आणि व्हिएतनाम हे पर्वत आणि नद्यांनी जोडलेले मैत्रीपूर्ण शेजारी आहेत आणि दोन्ही देशांमध्ये संस्कृती सामायिक आहे’’ असे न्गो फुओंग लाय यांना सांगितल्याचा उल्लेख होता तसेच या व्हिएतनामी राष्ट्राध्यक्षपत्नीस चिनी राष्ट्राध्यक्षपत्नीने चिनी ऑपेरा, नृत्य, लोकसंगीत आणि इतर कार्यक्रमांसाठी आमंत्रित केल्याचा तपशीलही होता. या स्वागताबद्दल व्हिएतनामी राष्ट्राध्यक्षपत्नींनी चिनी राष्ट्राध्यक्षपत्नी पेंग लियुआन यांचे आभार तर मानलेच, पण ‘‘मुली आणि महिलांच्या शिक्षणाच्या प्रगतीसाठी युनेस्कोच्या विशेष दूत म्हणून पेंग यांच्या सकारात्मक योगदानाबद्दल कौतुक व्यक्त केले’’ असाही उल्लेख पीपल्स डेलीने केला. एकंदर पेंग लियुआन यांना आणि त्यांच्या कामाला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या या अहवालातून त्यांचे महत्त्व वाढवण्याचा उद्देश दिसत होता. त्यात क्षी जिनपिंग यांचा उल्लेख नव्हता, हेही विशेष.

हेही वाचा >>> एक देश एक निवडणूक : राष्ट्रीय की राजकीय गरज?

पेंग लियुआन या क्षी जिनपिंग यांना ‘लष्करातील वरिष्ठ नियुक्त्यांसाठी छाननीच्या कामात मदत करणार’ असल्याची बातमी हाँगकाँगहून प्रकाशित सिन्ग ताओ वृत्तपत्राने गेल्या वर्षीच्या मे महिन्यात दिली होती. पेंग लियुआन यांना सेंट्रल मिलिटरी कमिशन (सीएमसी)च्या तशा गोपनीयच असलेल्या ‘परीक्षा आणि मूल्यमापन आयोगा’चे सदस्यपद देण्यात आल्याचेही त्यात म्हटले होते. ‘सिन्ग ताओ’ने या बातमीसह, समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ होत असलेली एक प्रतिमाही छापली… त्यात ६१ वर्षीय पेंग लियुआन लष्करी गणवेशात, लष्करी शैक्षणिक संस्थेची तपासणी करताना दिसत आहेत. पेंग लियुआन लष्करात आहेतच. १९८० मध्ये त्यांच्या लष्करी कारकीर्दीची सुरुवात झाली आणि आजही त्यांना लष्करी अधिकारीपदावरून निवृत्त करण्यात आलेले नाही. पण आता त्या चिनी लष्करातील (‘पीपल्स लिबरेशन आर्मी’तील) नियुक्त्यांवर देखरेख ठेवणार, अशी अटकळ यावरून पसरली. त्यासाठी त्यांना लेफ्टनंट जनरल म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे की नाही हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

पेंग लियुआन या चिनी लष्कराच्या (पीएलए) बिगर-लढाऊ विभागातच प्रथमपासून होत्या आणि आताही तेथेच आहेत. चिनी लष्कराच्या संगीत व नृत्य विभागात आता त्यांच्याकडे ‘मेजर जनरल’पद असल्यामुळे, पीएलएतील अधिकाऱ्यांशी त्या परिचित आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पीएलए रॉकेट फोर्सच्या अर्धा डझनसह एक डझनहून अधिक जनरल अधिकाऱ्यांना अचानक ‘काढण्यात’ आल्याने पीएलएच्या वरिष्ठ पातळीवरील पदे रिक्त आहेतच, त्यांसाठी निवड कोणाची होणार, याबद्दल तर्कवितर्क सुरू असतानाच निवडीच्या कामात राष्ट्राध्यक्षपत्नी लक्ष घालणार असल्याची बातमी हाँगकाँगहून आली. वरिष्ठ पदांवरून ‘काढलेल्यां’पैकी अनेकांची नियुक्ती खुद्द क्षी जिनपिंग यांनीच केली होती. त्यांच्यामध्ये चिनी कम्युनिस्ट-वरिष्ठ घराण्यातले वारसदार आणि जिनपिंग यांचा घरोबा असलेले माजी संरक्षणमंत्री ली शांगफू आहेत. डेंग झियाओपिंग यांचे नातू आणि पीएलएच्या पायदळाचे उपप्रमुख (लेफ्टनंट जनरल) डेंग झिपिंग यांच्यावरही चौकशीचा फेरा आला होता. या बड्या व्यक्तींच्या छाननीचे काम पेंग लियुआन करणार, असे प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे.

खुद्द पेंग लियुआन यांची लष्करी (संगीत-नृत्य पथकातली) वाटचाल १९८० पासून सुरू झाली. पण १९८४ मध्ये त्यांना थेट पॉलिटब्यूरोशी संबंधित संगीत-नृत्य पथकात बढती देण्यात आली. मग पुढल्याच वर्षी (जुलै १९८५) त्यांना कम्युनिस्ट पक्षातही स्थान देण्यात आले. पेंग लियुआन या पारंपरिक चिनी गायक-नर्तक घराण्यांपैकी, त्यांच्याकडेही कलेचा वारसा आहे. त्यामुळे अल्पावधीत त्या प्रसिद्ध कलावंत ठरल्या. अमेरिका व संयुक्त राष्ट्रांतही त्यांनी कार्यक्रम केले आहेत, ‘मेजर जनरल’ हे पद कमी वयात मिळवणाऱ्या थोड्यांपैकी त्या एक आहेत. लष्करी संगीत-नृत्य पथकापैकी पॉलिटब्यूरोशी संबंधित विभागात काम केल्याने अनेक वरिष्ठांशी त्यांची ओळख आहे.

या राष्ट्राध्यक्षपत्नी आधीच मनोरंजन क्षेत्रात आणि प्रसिद्ध, त्यामुळे चिनी प्रसारमाध्यमे त्या जणू फॅशन-नायिकाच असल्याप्रमाणे त्यांच्याकडे लक्ष पुरवतात. पण क्षी जिनपिंग यांनी लष्करी सेवेत असलेल्या पत्नीला अधिकृत दौऱ्यांवर पत्नी म्हणून बरोबर नेऊ नये, हा प्रघात या जोडप्याने वारंवार मोडला असूनसुद्धा त्याकडे चिनी प्रसारमाध्यमे दुर्लक्ष करतात. बीजिंगमध्ये क्षी जिनपिंग येण्याआधीपासून पेंग लियुआन यांनी जम बसवलेला होता. माजी राष्ट्राध्यक्ष जिआंग झेमीन, पॉलिटब्यूरोच्या स्थायी समितीचे माजी सदस्य झेंग क्विंगहॉन्ग अशा अनेकांशी त्यांचा चांगला परिचय आहे. किंबहुना, अनेक पॉलिटब्यूरो सदस्य हे क्षी जिनपिंग यांना मोठे पद मिळण्याच्या आधीपासूनच पेंग लियुआन यांना ओळखत होते. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोवर पेंग लियुआन यांची वर्णी लागणारच, असे संकेत केवळ प्रसारमाध्यमेच देत नसून अनेक वरिष्ठांची तशी अटकळ आहे. तरीही, राष्ट्राध्यक्षपत्नीस पॉलिटब्यूरोचे पद मिळाल्यावर गहजब आणि टीका तर होणारच. पक्षातले कार्य पाहूनच पॉलिटब्यूरोत बढती दिली जाते. त्यामुळे चिनी नेत्यांच्या कुटुंबातील महिला यापूर्वी पॉलिटब्यूरोवर नेमल्या गेल्या असल्या तरी, ते सदस्यपद त्यांनी स्वकर्तृत्वाने मिळवल्याचे मानले गेले. माओ झेडाँग यांच्या पत्नी म्मे जिआंग क्विंग (कुप्रसिद्ध चौकडीचे अर्थात ‘गँग ऑफ फोर’चे नेतृत्व यांच्याकडे होते), लिन बिआओ यांच्या पत्नी यु कुन आणि चाउ एन लाय यांच्या पत्नी डेंग यिंगशू यांचा त्यात समावेश होता. सन यत सेन यांची मेहुणी (पत्नीची बहीण) सूंग चिंग लिंग याही चिनी कम्युनिस्ट पक्षात होत्या, पण त्यांना उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचता आले.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य; ‘सेंटर फॉर चायना ॲनालिसिस ॲण्ड स्ट्रॅटेजी’चे अध्यक्ष

Story img Loader