जिनपिंग यांनी नेमलेल्या मंत्री किंवा अधिकाऱ्यांवर एकापाठोपाठ हकालपट्टीची नामुष्की ओढवते, हे केवळ चिनी लष्कर वा पक्षातील हेवेदावे/ स्पर्धा इतपत मर्यादित असू शकत नाही. एकंदर असंतोषाची पार्श्वभूमी, कधीतरी पुढे येऊ शकतेच…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे विश्वासू मानले जाणारे चिनी परराष्ट्रमंत्री किन गांग हे २०२३ मध्ये कसे महिनोनमहिने बेपत्ता झाले होते आणि मग परराष्ट्रमंत्रीपद वांग यी यांना देण्यात आले, त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत जिनपिंग यांच्या विश्वासातलेच चीनचे संरक्षणमंत्री ली शांग्फू यांनाही पदावरून कसे ‘हटवण्यात’ आले, अशा चर्चा आता थोड्याफार विस्मृतीत जाऊ लागल्या आहेत तोच २८ नोव्हेंबर रोजी जिनपिंग यांच्या तिसऱ्या विश्वासू सहकाऱ्याची चौकशी सुरू झाल्याच्या (म्हणजे एकप्रकारे, हकालपट्टीच झाल्याच्या) बातमीला अधिकृत दुजोरा मिळाला. हे ताजे प्रकरण आहे चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाचे (सेंट्रल मिलिटरी कमिशन- यापुढे ‘सीएमसी’) राजकीय कमिसार, अॅडमिरल मियाओ हुआ यांचे. कमिसार हा लष्कराला राजकीय दिशा देण्यासाठी आणि त्यावर राजकीय नियंत्रण ठेवण्यासाठी कम्युनिस्ट पार्टीने नेमलेला अधिकारी असतो. जिनपिंग यांच्या तिघा विश्वासू सहकाऱ्यांना एकापाठोपाठ गोत्यात आणले गेले, याचा अर्थ चिनी कम्युनिस्ट पक्ष (‘सीसीपी’) जिनपिंग व त्यांच्या बिनीच्या सहकाऱ्यांबाबत समाधानी नाही; बीजिंगमधले सत्ताधारी जिथे राहातात त्या ‘शोन्गानहाइ’च्या तटबंदीमध्ये धुसफूसच आहे, असा अर्थ लावला जातो आहे.

त्यातच ‘पीएलए’ (पीपल्स लिबरेशन आर्मी) या चिनी सेनादलाच्या रॉकेट फोर्समधील वरिष्ठ जनरल पदावरील अधिकाऱ्यांसह काही जण अलीकडेच बडतर्फ झाले होते, हे लक्षात घेता, पीएलएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील चौकशीचे वर्तुळ आता विस्तारले आहे, असे सूचित होते. अद्याप अधिकृत दुजोरा नसला तरी, ताज्या बातम्या अशा की, पीएलएच्या ईस्टर्न थिएटर कमांडचे कमांडर जनरल लिन झियांगयान आणि आत्तापर्यंत सीएमसीच्या जॉइंट स्टाफ विभागाचे प्रमुख लिऊ झेनली या दोघांची चौकशी सुरू आहे. ‘ईस्टर्न थिएटर कमांड’ हा तैवानविरुद्ध आघाडीचा विभाग आहे. लिऊ झेनली हे पीएलएचे वरिष्ठ अधिकारीदेखील आहेत. चीनचे संरक्षणमंत्री अॅडमिरल डोंग जुन यांची चौकशी आधीपासूनच सुरू आहे.

हेही वाचा >>> भारतीय नौदलातील स्त्रीशक्ती…

काही महिन्यांपासून पीएलएच्या शीर्षस्थानी सत्ता संघर्षाबद्दल दोन प्रकारच्या अफवा किंवा कुजबुजी पसरवल्या जात आहेत. पहिला म्हणजे ‘सीएमसी’च्या दोनपैकी एका उपाध्यक्षपदावर ‘आश्चर्यकारकरीत्या’ जनरल हे वेइडॉन्ग यांना पदोन्नती मिळाल्याने ‘पीएलए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांत नाराजी आहे. जन. वेइडॉन्ग पुरेसे अनुभवी वा वरिष्ठ नसूनही उपाध्यक्ष झाले, असे या नाराजांना वाटते आहे. दुसऱ्या प्रकारची कुजबुज म्हणजे जनरल झांग युक्सिया आणि जनरल हे वेइडॉन्ग यांच्यात स्पर्धा आहे. जन. युक्सिया हे व्हिएतनामशी लढलेले अनुभवी योद्धे आहेत; तर जन. वेइडॉन्ग यांना तैवानशी झालेल्या संघर्षाचा अनुभव आहे. वेइडॉन्ग हे दक्षिण आणि पूर्व थिएटर कमांडमध्ये प्रभावशाली आहेत खरे, पण त्याहीपेक्षा जिनपिंग यांच्याशी त्यांनी घनिष्ठ संबंध टिकवले आहेत- १९९९ ते २००२ दरम्यान जिनपिंग फुजियान प्रांतात असताना हे दोघे एकत्रच मद्यापान करत. कुजबुज अशीही आहे की, वेइडॉन्ग पीएलएमधील ‘तैवान गटा’चे प्रतिनिधित्व करतात.

दुसरीकडे, ‘सीएमसी’चे उपाध्यक्ष झांग युक्सिया हेदेखील ‘वरिष्ठांच्या घराण्यातले’ आणि क्षी जिनपिंग यांचे ‘पिढीजात’ मित्र आहेत. या दोघांच्याही वडिलांनी १९४०च्या दशकात एकत्र काम केले. घराण्यांची जवळीक आणि लष्करातली झांग युक्सिया यांची प्रतिष्ठा यामुळे, त्यांनी निवृत्तीचे वय ओलांडले असले तरीही त्यांना ‘सीएमसी’मध्ये उपाध्यक्ष म्हणून कायम ठेवा, असा आग्रह खुद्द जिनपिंग यांनी २०२२ मधील विसाव्या चिनी कम्युनिस्ट पार्टी महाअधिवेशनात धरला होता. मग, चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समिती पॉलिटब्यूरोतर्फे नेमल्या जाणाऱ्या दोघा ‘पीएलए’ अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून युक्सिया यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. युक्सियांच्या ज्येष्ठतेमुळे ‘पीएलए’ कर्मचारी आणि आजी-माजी वरिष्ठांमध्ये त्यांचा दबदबा आहे.

हेही वाचा >>> ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ पाळला गेलाच पाहिजे…

मियाओ हुआ- जे गेल्या आठवड्यात चौकशी सुरू होईपर्यंत अॅडमिरल या पदावर होते, त्यांनादेखील विसाव्या पार्टी महाअधिवेशनाने ठराव करून ‘सीएमसी’च्या राजकीय कार्य विभागाचे संचालक म्हणून कायम ठेवले होते. हुआ यांचा पूर्वेतिहास असा की, शियामेनजवळील नानजिंग लष्करी विभागातील ‘पीएलए-३१’ या खास तुकडीतून इतक्या वरच्या पदापर्यंत पोहोचलेले ते पहिलेच अधिकारी. ते आणि ‘पीपल्स आर्म्ड पोलीस’ या निमलष्करी दलाचे कमांडर वांग निंग, तसेच पीएलएचे आर्मी कमांडर हान वेइगुओ यांसारखे इतर जण क्षी जिनपिंग जेव्हा फुजियानचे पक्ष उपसचिव होते, तेव्हापासून त्यांच्या संपर्कात आले. या सर्वांनाच पुढल्या बढत्या अतिवेगाने मिळाल्या, हे आणखी एक साम्य.

पण मियाओ हुआ यांची क्षी जिनपिंग यांच्याशी जवळीक जरा अधिकच, कारण जिनपिंग झेजियांग प्रांताचे पक्ष सचिव असतानाही (२०१२), हा प्रांत ज्या ‘लॅन्झोउ लष्करी विभागा’त येतो, त्या विभागात मियाओ हुआ यांना उपराजकीय आयुक्त आणि शिस्त तपासणी आयोगाचे सचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि काही महिन्यांतच त्या लष्करी विभागाचे राजकीय कमिसार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या सुमारास, हाच लॅन्झोउ लष्करी विभाग जियांग झेमिन गटाच्या गुओ बॉक्सिओन्ग यांचा ‘राजकीय बालेकिल्ला’ म्हणून ओळखला जात होता हे लक्षात घेता, गुओ बॉक्सिओंग यांच्या विरोधात तपास करण्यात आणि या प्रदेशातील त्याच्या प्रभावाची नावनिशाणीही मिटवून टाकण्यात मियाओ हुआ यांची भूमिका असणारच, हे उघड आहे. पुढे एप्रिल २०१४ मध्ये क्षी जिनपिंग यांच्याशी निष्ठा व्यक्त करणारे लेख चिनी वृत्तपत्रांत लिहिणाऱ्या वरिष्ठांमध्ये मियाओ हुआ हे वरिष्ठ पीएलए अधिकाऱ्यांपैकी एक होते. जिनपिंग यांनी हुआंना ‘दुहेरी पदोन्नती’ दिल्यामुळेच, पीएलएचे जनरल पद तरुण वयातच मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी हुआ हे एक ठरले.

अशा या मियाओ हुआ यांची ‘चौकशी’च्या नावाखाली हकालपट्टी कोणत्या का कारणाने झाली असेना, हुआंचे सहकारी, समर्थक आणि त्यांच्या शिफारशीवर नियुक्त झालेले सारे जण यांनासुद्धा अस्थिर करणारा इशारा देणारीच ही कारवाई आहे. याचा संबंध, सीएमसीचे उपाध्यक्ष म्हणून ‘आश्चर्यकारकरीत्या’ नियुक्ती झालेले जनरल हे वेइडॉन्ग यांच्याशीही असू शकतो. आणखी असे कितीतरी अधिकारी हुआंच्या वरदहस्तामुळे वरिष्ठपदी पोहोचले असावेत.

मात्र, या हकालपट्ट्यांचे परिणाम निव्वळ हुआ यांच्या वर्तुळापेक्षाही अधिक व्यापक असू शकतात. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांना वरिष्ठांच्या नियुक्त्या करताना योग्य निर्णय घेता येत नाहीत काय, हा प्रश्नसुद्धा त्यातून टोकदार होऊ शकतो, खुद्द जिनपिंग अस्थिर ठरू शकतात. जिनपिंग यांच्या धोरणांबद्दल लोकांमध्येच नव्हे तर चिनी कम्युनिस्ट पक्षातसुद्धा पुरेसा असंतोष आहे. अर्थव्यवस्थेतील मंदी आणि परिणामी बेरोजगारी, त्यातही पदवीधरांची बेरोजगारी आणि राहणीमानाचा वाढता खर्च यामुळे सामाजिक असंतोष वाढला आहे. क्षी जिनपिंग यांना ‘पीएलए’मधून किती पाठिंबा मिळतो आणि झांग युक्सिया – हे वेइडोंग यांच्यातील मतभेदांच्या अफवांमध्ये काही तथ्य आहे की नाही, यावर बरेच काही अवलंबून आहे. देशांतर्गत असंतोष वाढत असताना चीन-अमेरिका संबंधांमध्ये वाढणारी अनिश्चितता क्षी जिनपिंग यांच्यासाठी पुढील काळ कठीण आहे, हेच सांगते आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rising dissent against chinese president xi jinping zws