डॉ. सुनिल धापटे
अपघातांशिवाय रस्ता सुरक्षेच्या इतर समस्यांचा ही विचार करायला हवा. वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि मोठ्या रस्त्यांवर आणि शहरांमध्ये भेडसावणारी वाहतूक कोंडी या समस्यांमुळे सामान्य माणसाला जीव नकोसा झाला आहे. दुचाकी, तीन चाकी वाहने वापरणाऱ्यांच्या मानेपासून ते कमरेपर्यंतच्या शरीराची उतार वयात अक्षरशः चाळण होऊन जाते. प्रचंड वाया जाणारा पैसा, वेळ आणि मानसिक ताण खरंतर केव्हाच असहाय्यतेची आणि सहनशीलतेची पातळी ओलांडून गेला आहे. परिस्थिती दयनीय आणि गंभीर आहे. मोठ्या संख्येने आणि सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे माध्यमांमध्ये सुद्धा आता अपघातांच्या बातम्यांचे स्थान अत्यंत अल्प झालेले दिसून येते. परंतु पाहिजे तशा गांभीर्याने या समस्येकडे पाहिले जात नाही. रस्ता सुरक्षा सप्ताह केवळ एक औपचारिकता ठरते आहे काय असा प्रश्न पडतो.
प्रत्येक व्यक्ती या ना त्या मार्गाने रस्ता वापरत असतेच. रस्ता वाहतुकीमुळे प्रवासाचे अंतर कमी झाले आहे, परंतु धोके मात्र वाढले आहेत. प्रत्येक वर्षी लाखो व्यक्ती रस्त्यावरील दुर्घटनेमध्ये आपला जीव गमावतात, तर करोडो कायमचे जायबंदी होतात. जागतिक पातळीवरती दरवर्षी सुमारे १५ लाख लोक आपला जीव गमावतात, तर करोड व्यक्ती जायबंदी होतात. भारतात दरवर्षी जवळपास दीड लाख लोक रस्त्यावरील अपघातात दगावतात. हे प्रमाण जगातील संख्येच्या जवळपास १३ टक्के आहे. वाहन चालविणाऱ्यांची भूमिका अनेक दुर्घटनांमध्ये महत्त्वाची असते, त्यामुळेच रस्ता सुरक्षा शिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते. रस्ता सुरक्षेबाबत आताच्या आणि पुढच्या पिढीला माहिती देणे यामुळेच महत्त्वाचे आहे, ज्यामुळे रस्त्यावरील दुर्घटनांमध्ये दगावणाऱ्या आणि जखमी होणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकेल.
वाहनांचे तंत्रज्ञान, रस्त्यांची अपेक्षा आणि रस्ता वापरणाऱ्यांची मानसिकता यांचा मेळच बसत नाही. भरकटलेली वाहने, गर्विष्ठ व मगरूर रस्ता वापरणारे, परिस्थितीशी संबंध तुटलेले रस्ता विकासक आणि असंवेदनशील अंमलदार यांच्या वाढलेल्या प्रमाणामुळे रस्त्यावरील परिस्थिती बिकट होत जाते. आणि कायद्याचा मान राखणाऱ्यांना जीव मुठीत धरून दुर्दैवाने असुरक्षितेला सामोरे जावे लागते.
आपल्या प्रत्येक हालचालीसाठी रस्त्याची आवश्यकता आहे. रस्त्याशिवाय जीवन केवळ अशक्य. माणसाला जसं पाणी, हवा आणि अन्नाची आवश्यकता आहे, तसेच या गोष्टी मिळवण्यासाठी रस्त्याची आवश्यकता असते. खरे तर रस्ता सर्वांचा आणि सर्वांसाठी असतो. पण अनेकदा अपवाद म्हणून प्राधान्यक्रम बदलले जाऊ शकतात. रस्त्यावर असणारे आणि रस्त्याचा वापर करणारे घटक या सर्वासाठी रस्ता महत्वाचा आहे. अनेकदा रस्त्यावरील या घटकांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात, एवढेच नव्हे तर कित्येकदा त्या एकमेकांच्या हिताविरुद्धसुद्धा असू शकतात. या बाबींचा विचार करून रस्त्याचा उपयोग करण्यासाठी अनेकदा प्राधान्यक्रम ठरवावे लागतात. त्यामुळे रस्ता सर्वांचा आणि सर्वांसाठी असे गृहीत धरले तरी परिस्थितीनुसार काही काळ काही भाग, काही घटकांसाठी किंवा विशेष घटकांसाठी सुरक्षित किंवा आरक्षित करावा लागतो.
थोडक्यात रस्ता सर्वांच्या सोयीसाठी असे गृहीत धरून चालणार नाही. कारण अनेकदा रस्त्यावरील परिस्थितीचा विचार करता, काही घटकांसाठी प्राधान्याने रस्त्याचा विचार करावा लागतो. अशा वेळेस इतर घटकांना, त्यांच्या सोयींना मुरड घालून जे काही अग्रक्रम ठरवले आहेत त्याचा अवलंब करावा लागतो. दुर्दैवाने याबाबतची स्पष्ट कल्पना रस्ता वापरणाऱ्या घटकांना नसल्यामुळे, किंवा केवळ आपलीच सोय महत्त्वाची, अशी धारणा असल्यामुळे रस्त्यावरती अडचणी निर्माण होतात. म्हणून प्रथमतः रस्ता काय सांगतो आहे, त्याच्या अपेक्षा काय आणि रस्ता वापरणारांचा प्रतिसाद कसा असावा, यावर जागरूकता असणे आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होणे ही मुख्य गरज आहे.
भविष्यामध्ये क्षमाशील रस्ते ही संकल्पना वाढीस लागणार आहे. कदाचित ज्या देशांमधील नागरिकांमध्ये नागरी कर्तव्यांची व्यवस्थित जाणीव आहे आणि आपल्या कर्तव्यांचे व्यवस्थित पालन केले जाते तिथे अशा प्रकारच्या संकल्पना राबविणे सोपे आणि सोयीचे असते. परंतु जिथे स्वतःची सोय यालाच मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते त्या ठिकाणी अशा प्रकारच्या संकल्पना राबविणे अत्यंत कठीण व अडचणीचे असते. आणि म्हणूनच रस्त्याचा वापर करताना प्रथम आपल्या कर्तव्याची जाणीव रस्ता वापरणाऱ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचविणे, त्यांची जागरुकता करणे आणि उत्तम प्रबोधन करणे ही खरी पहिली पायरी ठरते.
रस्ते वाहतुकीमध्ये रस्ता, वाहने, रस्ता वापरणारे घटक आणि अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा यांचा सहभाग असतो. परंतु सद्यस्थितीमध्ये यांचा एकमेकांशी कुठेही मेळ असल्याचे दिसून येत नाही. यामुळे रस्त्यावरील परिस्थिती आणखीनच विदारक होत जाते. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आपल्या देशामध्ये रस्ते किंवा रस्ते वाहतूक यांची अवस्था बेवारस व्यक्तींसारखी आहे.
रस्त्यावर सातत्याने नियमांचे उल्लंघन का होते? याचा विचार केल्यास अपुऱ्या आणि अयोग्य मूलभूत सोयी आणि सुविधा, खराब आणि कुचकामी अंमलबजावणी, नियमांबाबत अनभिज्ञता, सामान्य व्यवहार ज्ञानाचा अभाव, हयगय, घमेंड, उद्धटपणा, निष्काळजी वृत्ती, गैरसमज आणि परिस्थितीमुळे निर्माण झालेला मनातील गोंधळ ही कारणे दिसून येतात.
रस्त्यांवरील चिन्हे, रस्त्यांच्या खुणा, रस्त्यांचे नियम, रस्त्यांवरील वापरकर्त्यांची वर्तणूक, मुलांकडून अपेक्षा, विद्यार्थ्यांकडून अपेक्षा, तरुणांकडून अपेक्षा, सामाजिक कार्यकर्त्यांकडून अपेक्षा, व्यावसायिकांकडून अपेक्षा, वाहन तंत्रज्ञान आणि चालकाची भूमिका, रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण, वाहतूक गुन्हे, शिक्षा आणि दंड, क्षमाशील रस्ते याबाबत सखोल जागरुकता करणे आणि प्रभावी अंमलबजावणी करणे यासाठी सर्व यंत्रणांनी सामंजस्याने, सहयोगाने आणि संयुक्तपणे कार्यवाही करणे ही आजची गरज आहे. या सर्व घटकांना एकत्र आणून किंवा एकत्र येण्यास भाग पाडून रस्त्यावरची सुरक्षितता निश्चितच वाढविता येईल. यासाठी ‘आम्ही लोक’, ‘सत्यमेव जयते’ आणि ‘सविनय कायदे पालना’चा आग्रह या मार्गाचा अवलंब करावा लागेल.
मग रस्त्याशी संबंधित असणाऱ्या यंत्रणांकडून नेमक्या अपेक्षा काय आहेत? तर यंत्रणांनी कायदा समजून घ्यावा, त्या कायद्याचे पालन करावं, त्या कायद्याचा आदर करावा आणि त्या कायद्याचा पूर्ण वापर करावा. थोडक्यात कायदा पाळा, कायदा चुकीचा वाटत असेल तर तो बदलायला भाग पाडा, अन्यथा पदमुक्त व्हा. कायदा पालन न करणाऱ्यांमुळे परिस्थिती बिकट होते. यामुळेच सविनय कायदे पालनाचा आग्रह सातत्याने धरला पाहिजे. सत्याचा पाठपुरावा केला जातो एवढेच नव्हे तर केवळ सत्याचाच विजय होतो हे सातत्याने दिसले पाहिजे, यासाठी आता ‘आम्ही लोक’ ठामपणे सत्याच्या कायद्याच्या बाजूने उभे असतो हे प्रत्येक सुजाण नागरिकांनी दाखवले पाहिजे. मुठभर कायदे तोडणाऱ्यांमुळे संपूर्ण समाज वेठीस धरला जातो हे चित्र आता दूर करावेच लागेल.
लेखक माजी परिवहन अधिकारी, रोड सेफ्टी ऑडिटर तसेच ‘यशदा’चे माजी संचालक आहेत
drdhaptesunil@gmail.com