‘रॉकेट्री- द नम्बी इफेक्ट’ या चित्रपटानं ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये स्थान मिळवलं तेव्हा या पुस्तकाची आठवण अनेकांना झाली असेल.. ते पुस्तक जरी आत्मचरित्रपर असलं तरीही एखाद्या रहस्यकथेसारखं उलगडत जातं!
‘इस्रो’मधले शास्त्रज्ञ नम्बी नारायणन यांच्यावर हेरगिरीचा आरोप झाला होता, त्यातून ते निर्दोष ठरल्यानंतरचं हे पुस्तक. हुषारीमुळे अमेरिकेच्या प्रिन्सेटन विद्यापीठात शिकण्याची संधी मिळालेले नम्बी ‘इस्रो’च्या अगदी स्थापनेपासून त्या संस्थेत होते. म्हणजे विक्रम साराभाई, सतीश धवन अशा दिग्गज शास्त्रज्ञांसह त्यांनी काम केलं. यात वसंत गोवारीकर होते, एपीजे अब्दुल कलामही होते. मात्र तरीही, १९९४ मध्ये नम्बी यांच्यावर तो आरोप झाला.. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा. मालदीवच्या दोन तरुणीमार्फत इस्रोच्या रॉकेटचं संकल्पचित्र पाकिस्तानला पाठवण्यात आलं, अशा अर्थाचा तो आरोप होता. न्यायालयीन प्रक्रिया तुलनेनं जलदच झाली आणि नम्बी हे १९९८ मध्ये सर्वोच्च न्यायालयातही निर्दोष ठरले. इतकंच नव्हे तर त्यांना १.३ कोटी रुपये सरकारनं भरपाई म्हणून द्यावेत, असा आदेशही न्यायालयानं दिला.
या नम्बी नारायणन यांचं योगदान प्रगत रॉकेटचा वापर होण्यात महत्त्वाचं होतं. सहकाऱ्यांना त्यांनी धरलेले काही आग्रह पटत नसूनही मान्य करावे लागले, त्यातून भलंच झालं. हा भाग पुस्तकात येतोच. पण पुस्तकाचं शब्दांकन जरी पत्रकार अरुण राम यांनी केलं असलं तरी त्याला एक शैली आहे, त्यात काहीसा फणकारा आहे. त्यातून असं लक्षात येतं की, नारायण हे काहीशा तापट स्वभावाचे असावेत आणि सहकाऱ्यांशीही ते तसेच वागत असावेत. लोकप्रियतेचा सोस शास्त्रज्ञांना एकंदरीतच कमी असणं ठीक, पण ज्यांच्यासह काम करायचंच आहे त्यांच्यामध्ये काहीएक मान्यता मिळवणं हे व्यक्तिमत्वावरही अवलंबून असतं, हेसुद्धा नम्बी नारायणन यांना नाकबूल असेल का? ते म्हणतात की माझ्याविरुद्ध हा कट रचला गेला.
तसा कट रचणारे जवळपासचे सहकारीच असतील, तर नम्बींविरुद्धच त्यांनी कट का रचला याची उकल कशी होणार? कामावर त्यांची अतोनात निष्ठा होती, हेही या पुस्तकातून दिसतं. फ्रान्सच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या पथकातल्या एका कनिष्ठ अभियंत्याचा मुलगा वारल्याचा दूरध्वनी आला आणि तो नेमका नम्बी यांनी घेतला. त्या क्षणी त्यांनी ठरवलं की, ही बातमी दौऱ्यातली महत्त्वाची कामं पूर्ण होईपर्यंत संबंधित अभियंत्याला- त्या बापाला- द्यायचीच नाही. आणि हा निश्चय नम्बी यांनी तडीस नेला! विद्यमान सरकारनं नम्बी यांना २०१९ मध्ये ‘पद्मश्री’ दिली, तेव्हा तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर यांनीच त्यांचं नाव सुचवल्याचा गाजावाजा करण्यात आला होता. हा भाग अर्थातच पुस्तकात नाही. शिवाय, मध्यंतरी अशीही बातमी आली होती की नम्बी यांच्यावरल्या त्या आरोपामागे खरोखरच कट होता काय, असल्यास कोणाचा, याची छाननी आता होणार आहे.. तसं झालं तर दुसरं पुस्तक कदाचित येणार नाही, पण दुसरा चित्रपट मात्र निघू शकेल!