विषयाला सुरुवात करण्याआधी एक बराच जुना किस्सा- हरियाणाचे चौधरी देवीलाल आणि आंध्र प्रदेशाचे एन. टी. रामाराव हयात होते, एकमेकांच्या गाठीभेटी होऊ शकत होत्या, तेव्हाच्या काळातला. देवीलाल एनटीआरना विचारतात, ‘आंध्रातले ‘कम्मा’ म्हणजे काय असतात हो?’ क्षणार्धात एनटीआर उत्तरतात, ‘आम्ही कम्मा समाजाचे लोक म्हणजे आंध्र प्रदेशातले जाट’! याचा मथितार्थ देवीलाल यांना चटकन कळला, जातीच्या उतरंडीत कम्मा कुठे बसतात, त्यांची स्थानिक राजकारणातली ताकद किती, वगैरे सारेच ‘इथले कम्मा- तिथले जाट’ समीकरणातून उमगले. प्रादेशिक नेते कितीही मोठे झाले तरी आपापल्या ‘समाजा’ला विसरत नाहीत, हे या दोघांबाबत तर खरेच होते. किंबहुना राजकारणाच्या या अशा ‘सामाजिक समीकरणां’मुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या ‘हिंदुत्वा’च्या एकात्म संकल्पनेला आणि भाजपच्या अखिल भारतीय स्वरूपाच्या राजकारणालाही आजवर बरेच चढउतार पाहावे लागलेले आहेत.
भारतात अनेक जाती आहेत आणि राज्याराज्यांत विखुरलेल्या या जातींना परस्परांची पुरती ओळखही नाही, हे खरेच. नरेंद्र मोदींनी या जातीय विखुरलेपणाचा फायदा उठवून, गेल्या तिन्ही लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये देशभरात स्वत:चा उल्लेख इतर मागास जातीचे (ओबीसी) राजकारणी असा सूचकपणे करणे आणि मुस्लिमांना शाब्दिक टीकेचे लक्ष्य करणे या दोन प्रकारे आपला पाठिंबा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, रा. स्व. संघ केवळ हिंदू एकतेवरच भर देत नाही तर हिंदुत्व आणि भारतीयता या संकल्पनांच्या आधारे अल्पसंख्याक समुदायांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो, यातून अल्पसंख्याकांना त्यांच्या पूर्वजांच्या हिंदू मुळांची आठवण करून दिली जाते. ही विचारसरणी आणि राष्ट्रीय एकात्मता यांबद्दलचा संकल्पनात्मक वाद जरा बाजूला ठेवून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अलीकडच्या विधानांकडे पाहिले पाहिजे. संघाच्या स्वयंसेवकांपुढे बोलताना भागवतांचा महत्त्वाचा संदेश असा होता की राजकीय सत्तेच्या शोधात जबाबदार राष्ट्रीय नेत्यांनी फुटीरतावादी घोषणा आणि अजेंडा टाळला पाहिजे आणि लोकशाहीमध्ये प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये जरी स्पर्धा असली तरी ते एकाच राष्ट्रीय नाण्याच्या दोन बाजू असतात. भागवत म्हणाले, “आमची परंपरा सहमतीने विकसित होण्याची आहे. म्हणूनच संसदेला दोन बाजू असतात जेणेकरून कोणत्याही समस्येच्या दोन्ही बाजूंचा विचार केला जातो. पण आपल्या संस्कृतीची प्रतिष्ठा, मूल्ये जपायला हवी होती. निवडणुकीचा प्रचार हा सन्मानरहित होता. त्यामुळे वातावरण विखारी बनले होते. खोटा प्रचार आणि खोटी कथानके पसरवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. हीच आपली संस्कृती आहे का?”
हेही वाचा… लेख : सत्ता होती तिथे हार…
मोदींची संयतपणे कानउघाडणी करणारे हे भाष्य भागवतांनी किमान पाच वर्षांपूर्वी केले असते तर बरे झाले असते. गेल्या पाच वर्षांत, रा. स्व. संघातील अनेकांना मोदींच्या फुटीरतावादी आणि स्वार्थी राजकारणाची चिंता वाटते आहे. मोदींनी स्वतःचा एक संपूर्ण भारतीय राजकीय आधार, ‘मोदी-का-परिवार’ तयार करून रा. स्व. संघापासून स्वतःला मुक्त करण्याची आशा केली असेल; परंतु हे असे राजकारण स्वत:च्या व्यक्तिमत्वाचेच देव्हारे माजवून सत्तेची वाढ करणारे आणि परिणामी स्वत:कडे विशेषाधिकार ठेवू पाहणारे, म्हणून स्वार्थी होते. भाजपचे बहुतांश मंत्री केवळ स्वतःच्या समर्थकांपासून दुरावलेलेच नाहीत तर ते या व्यक्तिमत्व-पंथाचे गुलाम बनले आहेत.
मोदी हे ५० वर्षांपूर्वीच्या माओप्रमाणेच आपले प्रस्थ वाढवण्यासाठी प्रसारमाध्यमांना मुठीत ठेवत आहेत आणि पक्षापेक्षाही स्वत:ला मोठे करू पाहात आहेत, असे निरीक्षण मी २०२१ मधल्या माझ्या पुस्तकातही (‘इंडियाज पॉवर एलीट : कास्ट, क्लास ॲण्ड अ कल्चरल रिव्होल्यूशन) नोंदवलेले आहे. भागवत यांनी मोदींचे नावही न घेता, मोदी हेसुद्धा संघ परिवारातील एक सदस्य असल्याची आठवण जाहीरपणे करून दिली. ‘संघ परिवार’ ही संकल्पना व्यवहारातही रुजलेली असताना ‘मोदी का परिवार’ असा उल्लेख केंद्रीय मंत्र्यांनीसुद्धा बिनदिक्कत आपापल्या समाजमाध्यम-खात्यांवर आपल्या नावांमध्येच करणे, हे संघ परिवाराशी विपरीतच आहे. संघ परिवार राष्ट्रउभारणीसाठी काम करतो… मोदी का परिवार मोदींसाठीच काम करत होता ना?
हेही वाचा…विद्यापीठ अनुदान आयोगाला झाले तरी काय?
भागवत यांनी योग्य वेळी, अगदी कमी शब्दांत आणि संयतपणेच केलेल्या विधानांतून केवळ भाजपच्या बहकलेल्या नेतृत्वापासून अंतर राखले गेले आणि यातून रा. स्व. संघाची प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न झाला, एवढेच नव्हे. राष्ट्रीय एकात्मतेबद्दल भागवत औचित्याने बोलले आहेत आणि वैचारिकदृष्ट्या संघ आणि संघ-परिवार हे मोदींपेक्षा वर आहेत हेही त्यांनी दाखवून दिलेले आहे. भारत आणि जग मोदींच्या अपुऱ्या विजयानंतर त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची धोरणे आणि राजकीय परिणाम तपासत असताना भागवत यांनी हे केले आहे.
वाजपेयींनीही रा. स्व. संघाच्या सावलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याचे काहीजणांना आठवत असेल. तत्कालीन सरसंघचालक के एस सुदर्शन यांच्याशी वाजपेयींचे कधीही मैत्रीपूर्ण समीकरण नव्हते. पण वाजपेयी हे सर्वसमावेशक राजकारणाच्या आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर सुदर्शन यांच्या वर पोहोचू शकले. २००४ च्या निवडणुकीत आपला पाठिंबा काढून घेत शेवटी रा. स्व. संघाने वाजपेयींना राजकीयदृष्ट्या दुखावले असले तरी राष्ट्रीय एकात्मतेच्या बाबतीत वाजपेयी हे नेहमीच कोणत्याही वादांच्या पलीकडे राहिले.
हेही वाचा…ओरिसाच्या राजकारणात सबळ विरोधी पक्षाला वाव…
हे असे निर्विवाद राष्ट्रीय चारित्र्य जोपासण्याचे प्रयत्न मोदींनाही करता आले असतेच, पण स्वत:च्या राजकीय, वैचारिक विरोधकांना देशविरोधीच समजणारा अहंकार आणि त्यातून येणारा तिरस्कार यांपासून ते नेहमी लांब राहिले असते, तर! तसे खरोखरच झाले असते तर, भागवतांकडून ही विधाने ऐकण्याची (आणि मग पश्चातबुद्धीने ‘आता ‘मोदी का परिवार’ लिहू नका’ असे लोकांना सांगण्याची) वेळ मोदींवर आली नसती.
हे केवळ भागवतांच्या एका भाषणातील काही विधानांपुरते मर्यादित नसावे, असेही दिसून येते. अयोध्या-फैजाबाद इथला भाजपचा पराभव आणि वाराणसीत मोदींच्या मताधिक्यातली हवाच निघून जाणे ही दोन्ही लक्षणे, संघ परिवारामधील अस्वस्थतेची निदर्शक आहेत. राजकीय पंडितांनी या दोन बाबींसाठी किंवा एकंदर २४० जागाच मिळवता आल्या यासाठी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासून समाजवादी पक्ष- काँग्रेस यांची यंदा मजबूत झालेली आघाडी, किंवा एकंदरच प्रादेशिक पक्ष बलवत्तर ठरणे वगैरे बाह्य कारणे शोधलेली आहेत. परंतु संघ परिवारातल्या आणि भाजपमधल्याही अस्वस्थतेने मोदींना संदेश देण्याचे काम शांतपणे केले, हे कसे नाकारता येईल.
हेही वाचा…महाराष्ट्राचा मिंधेपणा आता तरी मावळेल?
भाजप हा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे, तो जनसंघासारखासुद्धा नाही, भाजपने यापूर्वीही संघविचाराला न पटणाऱ्या अशा पक्षांशी वा नेत्यांशी राजकीय सहकार्य केलेले आहे, भाजपची आर्थिक धोरणेही निराळी आहेत… असे कितीही युक्तिवाद केले तरी मुळात राष्ट्रीय एकात्मतेची रा. स्व. संघाची संकल्पना आणि त्यासाठी अभिप्रेत असलेले राष्ट्रीय चारित्र्य यांना भाजपने ‘मोदी-पर्वा’ पर्यंत तरी कधीही तिलांजली दिलेली नव्हती. राजकीय सत्ता हे साधन आहे, साध्य नव्हे हाच संघाचा आणि संघ-परिवाराचा मंत्र आहे. मोदींना सत्ता हेच साध्य वाटत असेल, तर भागवतांचा संदेश ते ऐकणार नाहीत.
(समाप्त)