गोविंद प्रकाशराव देशपांडे
दिल्लीत ‘केशवकुंज’ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय उभारण्यासाठीची रक्कम कोणत्याही सरकारच्या भरवशावर उभी राहिलेली नाही. प्रत्येक स्वयंसेवकाच्या गंगाजळीतून ती उभारण्यात आली आहे, असा दावा करणारे आणि ‘संघाची मालमत्ता!’ या लेखाला (लोकसत्ता- २३ फेब्रुवारी) प्रत्युत्तर देणारे टिपण…
दिल्लीत केशवकुंजच्या निर्मितीवर माध्यमांमध्ये अनेक चर्चा झाल्या. नागपूरच्या रेशीम बागेनंतर केशवकुंज हे संघाचे दुसरे ‘पॉवर सेंटर’ असल्याची चर्चाही माध्यमांत झाली. संघाला अशा भव्य कार्यालयाची गरज आहे का, संघ साधेपणा सोडत आहे का, संघ बदलतोय का, असे अनेक प्रश्न प्रसार माध्यमांमध्ये उपस्थित करण्यात आले.
होय संघ बदलतोय, संघ आताच बदलत नाही, तर १९२५ पासूनच बदलत आहे. कालानुरूप जे बदल करणे गरजेचे आहे ते संघ चर्चा, सर्वसहमतीने करत आहे. संघाचा एक मूलगामी विचार आहे. त्याच्याशी तडजोड न करता संघ बदलत आहे. संघ गणवेशात करावयाच्या बदलाचा निर्णय असेल, संघ प्रशिक्षण वर्गांचा कालावधी व प्रशिक्षणाचे स्वरूप यामध्ये केलेले बदल असतील, बदलांची अशी अनेक उदाहरणे देता येतील.
दिल्ली येथील केशवकुंज निर्मितीसाठी सुमारे दीडशे कोटी रुपये लागल्याची माहिती आहे. ही रक्कम कुठल्याही सरकारच्या भरवशावर उभी राहिलेली नाही, तर हजारो स्वयंसेवकाच्या गंगाजळीतून ही उभी राहिली. देशभरात गरजेनुसार अनेक ठिकाणी संघाच्या कार्यालयांची निर्मिती केली जात आहे. ही सर्व निर्मिती स्वयंसेवकांच्या समर्पणातून होत आहे. म्हणूनच स्वयंसेवकच संघाची मालमत्ता आहे. स्वकष्टाने जमवलेली काही रक्कम आपल्या विचारधारेसाठी देणे ही स्वयंसेवकांची वृत्तीच संघाला श्रीमंत करते. समाजाच्या सर्व घटकांमध्ये नेतृत्व करत समाज उन्नतीसाठी काम करणारा, प्रसिद्धी न मिळवता समाजातील शेवटच्या घटकाची प्रगती व्हावी यासाठी जीवन समर्पित करणारा स्वयंसेवकच संघाची मालमत्ता आहे.
बदलत्या परिवहन सुविधांमुळे संघाचे वरिष्ठ अधिकारी विमान प्रवास करत असतील, तरी त्या संघ अधिकाऱ्यांमधील साधेपणा तिळमात्र बदलला नाही. वाढत्या कार्याच्या व्यापकतेमुळे जलद प्रवास आवश्यक आहे, परंतु विमानाने प्रवास करूनसुद्धा जमिनीवरच पाय असणारा प्रचारक सर्व स्वयंसेवकांसाठी वंदनीय आहे. या सुबत्तेमुळे आपल्या कार्यपद्धतीवर व आपल्या विचारांवर परिणाम होणार नाही याची योग्य ती काळजी संघ घेतो. सुरक्षिततेच्या कारणामुळे सरसंघचालक सुरक्षा रक्षकांच्या वेढ्यात जरी असले तरी एखादा सामान्य स्वयंसेवक सरसंघचालकांशी अगदी सहजतेने बोलू शकतो, हितगूज करू शकतो, आपल्या मनातील प्रश्न विचारू शकतो, ही सत्यता संघात आल्यावरच कळते. हे जर जाणून घ्यायचे असेल तर संघात जावे लागेल, संघात नेहमी बोलले जाते इथे असणारी प्रत्येक व्यक्ती एक तर आज स्वयंसेवक आहे, किंवा उद्या स्वयंसेवक होईल. त्यामुळे सर्वांचे संघात स्वागतच असते.
प्रतिकूल काळातही संघाने स्वयंसेवकाच्या बळावर कार्य वाढवले. आपल्या प्रेमळ स्वभावाने स्वयंसेवक विरोध असलेल्या ठिकाणीही संघकार्य उभे करतो. याची कित्येक उदाहरणे देता येतील. प्रतिकूलतेच्या काळात वाढलेल्या संघाची वाटचाल अनुकूलतेच्या काळात कशी असावी, अनुकूलतेचा चुकीचा प्रभाव कामावर पडू नये, त्या अनुकूलतेमुळे संघ कार्यात शिथिलता येऊ नये. याकरिता अनेक स्तरांवर काळजी घेतली जाते. दीर्घ काळापासून परिणामकारक व अचूक असलेली संघाची कार्यपद्धती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अनुकूलतेच्या काळातही वर्धिष्णू करेल याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही.
abvpgovinddeshpande@gmail.com