अरविंद म्हेत्रे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अजातशत्रू ग्लोबल सिटीझन’ या नात्याने अतिशय चिकित्सक पद्धतीने समतोल आणि विधायक भूमिका मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आज आपल्या सभोवतालची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता फार पूर्वीपासून चालत आलेल्या विविध विचारांचे वेगवेगळे विचार प्रवाह आपल्याला पाहायला मिळतात. वास्तविक पाहता या सगळ्या विचारांचे अंतिम स्वरूप हे जनहित, समाजहित आणि देशहितासाठीच आहे किंबहुना ते असायला हवे. आपण कोणत्या विचार प्रवाहांसोबत पुढे जात राहायचे हाच एक मोठा विषय आहे. सभोवतालच्या विविध विचारांचा संपूर्ण, सर्वसमावेशक आणि चिकित्सक पद्धतीने अभ्यास केल्यानंतरच आपल्याला अंतिम सत्याचा शोध लागणार आहे, हे मात्र नक्की!

सामाजिक विषयांमध्ये धर्मनिरपेक्षता, बुद्धिप्रामाण्यवाद, विवेक विचार, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, सार्वजनिक स्वच्छता, सर्वसमावेशकता, पर्यावरण संवर्धन या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि या गोष्टींसाठी प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने पुढे येणे आवश्यक आहे. या विषयांवरची लोकचळवळ अत्यंत गरजेची आहे आणि यासाठी अविरत कार्य समाजाच्या सर्व स्तरांतून होणे हेही आवश्यक आहे. आपले विचार मांडणे, लोकांना ते समजावून सांगणे, लोकांना जोडत राहणे… या गोष्टींचा अधिकार सर्वांना आहे, त्यामुळे आज विविध विचार-प्रवाह समाजामध्ये अस्तित्वात आहेत आणि ते त्यांच्या परीने कार्य करत आहेत. आपले विचार मांडण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येकालाच दिला आहे. हे विचार स्वीकारणाऱ्यांनी ते तपासून पाहावेत, विवेक बुद्धी जागृत ठेवून योग्य-अयोग्याची पहाणी करावी, केवळ तर्काच्या आधारे – अंधानुकरण न करता आपल्या बुद्धीच्या जोरावर चिकित्सक पद्धतीने त्याची पडताळणी करावी, हे अपेक्षित आहे. कट्टरता मग ती कोणतीही असो, तिचे समर्थन करता येणार नाही. टोकाची भूमिका मग ती कोणतीही असो, ती स्वीकारणे योग्य नाही. केवळ विरोधाला विरोध हेही विवेकी विचारांना शोभणारे नाही. विरोध दर्शवतानादेखील तो अतिशय योग्य पद्धतीने, चिकित्सकपणे अभ्यास करूनच दर्शविणे आवश्यक आहे. याबरोबरच एखाद्या चुकीच्या गोष्टीला विरोध करत असतानाच ती गोष्ट किती आणि कशी चुकीची आहे, हे समोरच्या व्यक्तीला, समूहाला सांगता आले पाहिजे, त्यांना पटवून देता आले पाहिजे अन्यथा आपल्याला पिढ्यान-पिढ्या केवळ विरोध दर्शवत राहावे लागेल. मग विधायक बदल कसा साध्य करणार?

हेही वाचा : मालदीवच्या ठिणगीने भडका उडाला की प्रकाशाची निर्मिती झाली?

राजकीय विषयामध्ये सत्ताधाऱ्यांसमोर सक्षम विरोधक हे असायलाच हवेत. जनतेचे प्रतिनिधी या महत्वाच्या भूमिकेतून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची मोठी जबाबदारी विरोधकांकडे आहे. सत्ताधारी कोणीही असोत ते संविधानाच्या मार्गाने लोकांमध्ये जाऊन लोकशाही पद्धतीने निवडून आलेले असावेत. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सत्ताधाऱ्यांचा सन्मान राखला पाहिजेच, मात्र आवश्यक असेल तेव्हा त्यांच्या चुकांचाही संविधानिक पद्धतीने समाचार घेतला पाहिजे. उदाहरणच घ्यायचे असेल तर पंतप्रधान पदाचे घेऊया. या पदावर असलेली व्यक्ती जनतेच्या माध्यमातून निवडून आलेली असते. लोकशाहीने दिलेल्या या पदाचा कायम आदर राखणे हे प्रत्यकाचे कर्तव्य असतानाच पंतप्रधानांच्या चुकीच्या वाटचालीवर, निर्णयावर बोलण्याचा अधिकार विरोधकांना आहे आणि सर्वसामान्य नागरिकांनाही आहे. चुकीच्या गोष्टींवर कायम प्रहार आणि चांगल्या गोष्टींचे कायम कौतुक हे तर विवेक-विचारी नागरिकांचे सूत्र आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामांचे कौतुक करणारे विरोधक आपल्याला हवे आहेत आणि विरोधकांचा सन्मान करणारे सत्ताधारी आपल्याला अपेक्षित आहेत. परंतु या दोघांनी कायम एकमेकांविरोधात म्यानातून तलवारी बाहेर काढून फिरायचे, हे कशाचे प्रतीक आहे? ज्यांनी या दोघांना निवडून दिले त्या जनतेचा काही विचार ते करणार आहेत का?

हेही वाचा : लेख : साहित्य वजा संमेलन?

भारत विविधतेने नटलेला आहे. अनेक जाती, पंथ, धर्म गुण्यागोविंदाने राहतात, हे आपले मोठे बलस्थान आहे. आपल्याकडे विविध रंग आहेत, प्रत्येकाचा एक विशिष्ट रंग आहे. अशा परिस्थितीत निसर्गाने बहाल केलेले सप्तरंगी इंद्रधनुष्य कोणी पाहणार आहे की नाही? प्रत्येकजण आपल्यापरीने नेम धरतो आहे, आपली बाजू मांडतो आहे… पण अंतिम सत्याचा सुवर्णमध्य कोण साधणार? एकूण परिस्थितीकडे त्रयस्थपणे कोणी पाहणार आहे का, असे प्रश्न उद्भवणे साहजिकच आहे. जातीभेद, वर्णभेद, पुरुषांचे अकारण वर्चस्व, धर्मकाण्ड या गोष्टी फार पूर्वी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होत्या. अनेक थोर व्यक्तिमत्त्वांच्या परिश्रमाने समाजात सुधारणा घडल्या. खूप मोठी सामाजिक क्रांती होत गेली. आज आपण काय पाहत आहोत? आपल्या दबक्या आवाजातील बोलण्यातून जातीयवाद प्रकर्षाने दिसतो. आरक्षणाच्या नावाखाली पुन्हा एकदा धर्म-जाती खूप खोलवर तपासल्या जात आहेत. या पृथ्वीतलावर केवळ माणूस नावाची खरीखुरी जात, खरा धर्म असे म्हणत असताना आतून मांडली जाणारी जातीनिहाय, धर्मनिहाय समीकरणे आपल्याला कुठे घेऊन जाणार हे काही सांगता येणार नाही.

हेही वाचा : जातीयवाद-मागासपण परस्परपूरक!

आज स्त्री-पुरुष समानता, धर्मनिरपेक्षता आणि सर्वसमावेशकता या गोष्टी पुन्हा खोलवर रुजविण्याची आणि बिंबविण्याची गरज निर्माण झाली आहे. या मुद्द्यांवर बोलणारे बोलत राहतात, ऐकणारे ऐकून सोडून देतात आणि परिस्थिती मात्र जैसे-थे! हे कसे चालेल? किंवा हे असे का होते? याचे कारण आपल्या भूमिकेमध्ये दडलेले आहे का? आपल्या विचारांची एक विशिष्ट चौकट, हे याचे नेमके कारण आहे का?

माणूस हा निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येक व्यक्ती ही जन्माला येताना सारखीच असते… पुढे बदल होत जातात ते सभोवतालच्या परिस्थितीमुळे, संस्कारामुळे आणि विचारांमुळे! आपण प्रत्येक व्यक्तीकडे, व्यक्ती समूहाकडे सारख्याच दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. जाती, पंथ, धर्म या गोष्टी पाळल्या जाव्यात त्या घरातल्या उंबरठ्याच्या आत! परंतु कोणत्याही कर्म, धर्मकांडात अंधानुकरणाच्या माध्यमातून अडकणे कितपत योग्य आहे, हे प्रत्येकाने शोधणे आवश्यक आहे. इतरांना कायम दोष देत राहणे, चुका काढणे कितपत योग्य आहे? योग्य-अयोग्य, चूक-बरोबर, चांगले-वाईट आपल्या विवेकबुद्धीच्या माध्यमातून ठरवून या गोष्टी योग्य पद्धतीने, योग्य मार्गाने इतरांना सांगत राहणे, त्यांना पटवून देत राहणे, हे एका सत्यशोधकाचे महत्कार्य आहे. आपलीच भूमिका योग्य आहे किंवा ‘त्यांची’ भूमिका नेहमीच चुकीची असते, अशी टोकाची भूमिका सर्वसमावेशक विचारवंतांना अशोभनीय आहे. सुवर्णमध्य साधण्याचे कसब अंगी बाणवणे हीच आजच्या काळाची गरज आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruling party should respect the opposition parties css