निखिलेश चित्रे

रशियानं युक्रेनवर हल्ला केला तेव्हा आपण रशियाच्या ‘हिटलिस्ट’वर आहोत, अशी खबर क्यिवमध्ये राहणाऱ्या कुर्कोवला मिळाली. ती मिळाल्यावर तो अध्र्या ताटावरून उठला. युक्रेनच्या पश्चिमेला असलेल्या एका छोटय़ा गावात आश्रय घेतला. तेव्हापासून तो जगभरातल्या प्रसारमाध्यमांमधून या युद्धाविषयी अविरत लिहीत-बोलत आला आहे..

Vallari Viraj
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीने शेअर केले बालपणीचे गोंडस फोटो; नेटकरी म्हणाले, “अशीच आयुष्यभर…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही

रशियानं युक्रेनवर केलेलं आक्रमण आणि त्यानंतरचं युद्ध ही उभय देशांच्या आधीपासून ताणलेल्या संबंधांवर निर्णायक प्रहार करणारी घटना. या घटनेचे खोल पडसाद दोन्ही देशांच्या सांस्कृतिक पटलावरही उमटणं अपरिहार्य होतं. या युद्धाविषयी दोन्ही देशांतल्या लेखकांनी आपली मतं वेळोवेळी व्यक्त केली. यांत सगळय़ांत आघाडीवर होता युक्रेनमध्ये राहून रशियन भाषेत लिहिणारा लेखक आन्द्रे कुर्कोव. १९९६ सालच्या ‘डेथ अँड पेन्ग्विन’ या कादंबरीमुळे जगभर विख्यात झालेला कुर्कोव आज जागतिक साहित्यातला महत्त्वाचा लेखक मानला जातो. त्याच्या ‘जिमी हेन्ड्रिक्स लाइव्ह इन ल्यिव’ या कादंबरीचा गेल्या वर्षी बुकर नामांकनात समावेश होता. सोव्हिएत काळानंतरच्या ल्यिव शहराच्या पटावर ही कादंबरी घडते. ल्यिवमधलं राखाडी, ढगाळ हवामान, गुंतागुंतीच्या गल्ल्या, रस्त्यावर सतत दरवळणारा कॉफीचा गंध- हे सगळं कुर्कोव -जिवंत करतो.

हेही वाचा >>>जर्मनीत लोकशाहीवादी विरुद्ध फासिस्ट शक्ती!

कुर्कोव जगण्याच्या मुळाशी असलेल्या दैनंदिन निकडीच्या प्रश्नांना अतिवास्तववादी प्रतलावर साकारतो. त्याच्या कथा-कादंबऱ्यांचा आशय गंभीर असला तरी तो निवेदनात उपरोधयुक्त विनोदाचा कल्पक वापर करतो. त्याच्या कथानकाची वीण घट्ट असते. ती उत्कंठावर्धक आणि गुंतवणारी असतात. कुर्कोवचा सतत लिहीत असतो. तो प्रवासात असला तरी लेखन सुरू असतं. वर उल्लेख केलेल्या ‘जिमी हेन्ड्रिक्स..’ या कादंबरीची दोन प्रकरणं त्यानं एका दीर्घ विमानप्रवासात लिहून पूर्ण केली, तर काही पानं क्यिव ते ल्यिव या ट्रेनप्रवासात लिहून झाली. रशियानं युक्रेनवर हल्ला केला तेव्हा आपण रशियाच्या ‘हिटलिस्ट’वर आहोत अशी खबर क्यिव (Kyiev) मध्ये राहणाऱ्या कुर्कोवला मिळाली. ती मिळाल्यावर तो अध्र्या ताटावरून उठला आणि कुटुंबासह गाशा गुंडाळून त्यानं युक्रेनच्या पश्चिमेला असलेल्या एका छोटय़ा गावात आश्रय घेतला. तेव्हापासून तो जगभरातल्या प्रसारमाध्यमांमधून या युद्धाविषयी अविरत लिहीत-बोलत आला आहे. त्यानं या युद्धाविषयी केलेल्या लेखनाचं ‘डायरी ऑफ अ‍ॅन इनव्हेजन’ हे पुस्तक दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालं. यातले लेख त्याआधी ऑनलाइन प्रसिद्ध होत होते.

हेही वाचा >>>निवडणुकीआधीच तरारलेले ‘ऑपरेशन कमळ’ 

हे पुस्तक केवळ युद्धकाळातल्या नोंदींपुरतं मर्यादित नाही. त्यात कुर्कोवच्या खास शैलीतली अनेक रोचक व्यक्तिचित्रं आहेत. त्याच्या फिक्शनची आठवण करून देणाऱ्या घटना आणि हकिकती आहेत. महत्त्वाचं म्हणजे अस्सल लेखकामध्ये आढळणारी संवेदनशीलता आणि सहानुभावही आहे. त्यातलं लेखकाच्या स्वेतलाना नावाच्या मैत्रिणीचं व्यक्तिचित्र युक्रेनियन वास्तवाची चरचरीत जाणीव करून देतं. स्वेतलाना क्यिव सोडू इच्छित नाही. ती लेखकाला मेसेज करते, ‘‘मी तुझा निरोप घ्यायला हा मेसेज करतेय. क्यिववर जोरदार बॉम्बहल्ला होणार असा धोक्याचा इशारा आहे. पण मी कुठेही जाणार नाहीये. मला बेसमेन्टसमधून लपून जगायचा कंटाळा आलाय. जर काही झालं तर माझी आठवण काढताना ओठावर स्मित असू दे.’’ या लेखांमधून कुर्कोवच्या शैलीचं वैशिष्टय़ असलेला उपरोधही चमकून जातो.

ए. जे. क्रोनिन या लेखकाविषयीची पुढील नोंद पाहा : ‘या कठीण काळात माझा देश संकटात असताना आर्चिबाल्ड बिशप क्रोनिन या स्कॉटिश लेखकाच्या साहित्याचा मला फार उपयोग झाला. त्याच्या साहित्याचे मॉस्कोमधून १९९४ साली प्रकाशित झालेले पाचही खंड माझ्यासाठी उपयोगी ठरले. त्यात काय आहे, याच्याशी मला काही देणंघेणं नाही, कारण मी आता फिक्शन वाचत नाही. त्या पाच खंडांचा वापर मी माझा लॅपटॉप ठेवण्यासाठी करतो, त्यामुळे व्हिडीओ कॉल करताना लॅपटॉपचा कॅमेरा माझ्या चेहऱ्याच्या पातळीवर येतो.’ पुस्तकातले काही परिच्छेद युद्धाची भेदकता थेट जाणवून देतात. हे एक उदाहरण: ‘‘माझे ल्यिवमधले मित्र आता बाँबच्या इशाऱ्यांकडे लक्ष देत नाहीत किंवा आसरा शोधण्यासाठी धावपळ करत नाहीत. त्यांना घाबरायचा कंटाळा आलाय. भीतीचा लोप ही युद्धकाळातली विचित्र स्थिती आहे. अशा वेळी भवितव्याबद्दल बेफिकिरी निर्माण होते आणि काय व्हायचं ते होवो, असं म्हणून आपण मोकळे होतो. तरीही शहरात बॉम्ब वर्षांव होत असताना आईवडील मुलांना खेळायला कसं पाठवू शकतात हे मला समजत नाही. ‘काय व्हायचं ते होईल’ ही वृत्ती मुलांबद्दलसुद्धा बाळगता येते का?’’

या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ते भाषांतरित नसून मूळ इंग्रजीतच लिहिलेलं आहे. याची कारणंही युद्धातच आहेत. कुर्कोव युक्रेनमध्ये राहात असला तरी त्याच्या लेखनाची भाषा रशियन आहे. तो फक्त कल्पितेतर साहित्य (नॉन- फिक्शन) युक्रेनियन भाषेत लिहितो. युद्धानंतर युक्रेनमध्ये रशियन भाषेविरुद्ध मोहीमच सुरू झालेली आहे. देशभक्ती व्यक्त करण्यासाठी आणि रशियाचा निषेध करण्यासाठी रशियन भाषेवर बहिष्कार घालण्याचे वारे वाहात आहेत. याशिवाय रशियाच्या हल्ल्यात अनेक रशियन-भाषक युक्रेनियन लोक मारले गेले. आधी युक्रेनमध्ये सुमारे ४५ टक्के रशियन भाषक होते, ती संख्या आता जेमतेम अर्धी, म्हणजे २० टक्के उरली आहे. त्यामुळे युक्रेनमधला कुर्कोवचा वाचक मोठय़ा प्रमाणात कमी झालाय. रशियामध्ये तर गेल्या दहा वर्षांपासून कुर्कोवच्या साहित्यावर बंदीच आहे. पण गंमत म्हणजे युद्धानंतर कुर्कोव ज्या प्रमाणात जगभरातल्या प्रसारमाध्यमांमधून जगासमोर आला, त्यामुळे जगात इतरत्र त्याच्या वाचकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. याचा अर्थ तो यापुढे इंग्रजीत लिहिणार आहे, असा मात्र नाही.

हेही वाचा >>>चाहे हंजूगॅस बरसाओ, या गोळीया… शेतकरी आंदोलनात ‘जट्ट दा जुगाड’

अर्थात, युद्धकाळात आपल्याला फिक्शन लिहिणं अशक्य झाल्याचं त्यानं ‘द गार्डियन’ला दिलेल्या ताज्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्यानं नव्या कादंबरीची ७० पानं लिहिली होती. त्या वेळी रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं. त्या काळात आपण लेख, रिपोर्ताज आदी लिहीत होतो, पण फिक्शन लिहिणं शक्य होत नव्हतं असं कुर्कोव या मुलाखतीत म्हणतो. त्याच्याच शब्दांत, ‘‘मी गेल्या वर्षी कादंबरीची आणखी ३० पानं लिहिली खरी, पण नंतर पुढे लिहिणं जमेना. युद्ध सुरू असताना फिक्शन लिहिणं मला अपराध्यासारखं वाटलं. जणू मी पाप करतोय अशी भावना झाली.’’ अर्थात, ही एका संवेदनशील लेखकाची परिस्थितीला दिलेली तात्कालिक उत्कट प्रतिक्रिया होती.

कुर्कोवचं फिक्शन लेखन थांबलेलं नाही. त्याची युद्धाच्या काही काळ आधी लिहिलेली ‘सॅमसंग अँड नादेझ्दा’ (Samsung and Nadezda) ही रहस्य कादंबरी पुढच्या महिन्यात ‘द सिल्व्हर बोन’ या नावानं इंग्रजीत प्रकाशित होतेय. ही रहस्यकथा असली तरी तिला १०० वर्षांपूर्वीच्या रशिया-युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी आहे. कुर्कोवची वाचक असलेली माजी केजीबी अधिकाऱ्याची मुलगी एके दिवशी त्याच्याकडे एक फाइल सुपूर्द करून गेली. त्यात १०० वर्षांपूर्वी रशियन अमलाखाली असलेल्या युक्रेनमधल्या दैनंदिन जगण्याचे विलक्षण तपशील होते. त्या काळी रशियानं युक्रेनवर अनेक अतक्र्य कर लादले होते. फर्निचरवरचा कर हा त्यापैकी एक. एका घरात जेवढी माणसं असतील तेवढय़ाच खुच्र्या असल्या पाहिजेत, पाहुण्यासाठी एक खुर्ची जास्त ठेवता येईल. मात्र त्यापेक्षा जास्त खुच्र्या असतील तर त्या सरकारजमा कराव्या लागतील असा नियम होता. या सामग्रीचा उपयोग कुर्कोवनं ‘द सिल्व्हर बोन’मध्ये केला आहे. क्यिव शहराच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या रहस्य-कादंबऱ्यांमधली ही तिसरी कादंबरी. पहिल्या दोन अद्याप इंग्रजीत यायच्या आहेत. शिवाय युद्धकाळात लिहायला घेतलेली ‘मेरीज् कीज’ (Mary’s Keys) ही कादंबरी याच वर्षी ७ फेब्रुवारीला रशियन भाषेत प्रकाशित झाली आहे. ती इंग्रजीत यायला अद्याप वेळ लागेल.

दरम्यान, टोरोन्टोमध्ये एका साहित्य संमेलनात रशियन वंशाची अमेरिकन लेखिका माशा गेसेन हिच्यासह चर्चेत सहभागी झाल्याबद्दल कुर्कोववर कर्मठ युक्रेनियन साहित्यविश्वानं बहिष्कार टाकला. काही लेखकांनी फेसबुकवर तशी मोहीमच उघडली. कुर्कोवनं रशियन भाषेत लिहिलेली पुस्तकं विकायला युक्रेनमधल्या पुस्तकविक्रेत्यांनी नकार दिला आहे. मात्र या सगळय़ामुळे कुर्कोवमध्ये अजिबात कटुता आलेली नाही. रशियाबद्दल युक्रेनियन जनतेच्या मनात धुमसणाऱ्या रागाचं हे प्रतिबिंब असल्याचं त्याचं म्हणणं आहे. युद्ध आणि भाषा यांचा संबंध अत्यंत गुंतागुंतीचा आहे. भाषा युद्धाला अवकाश पुरवते. भाषेचा हत्यार म्हणून वापर होतो. युद्धकाळात भाषिक संदर्भामध्ये कळत-नकळत सूक्ष्म बदल होतात. ते भाषेच्या चलनावर कायमचा ठसा उमटवतात. युद्धकाळात भाषा हिरावून घेतली जाण्याचा धोका सतत भिरभिरत असतो. भाषिक वनवास हा तुरुंगवासाएवढाच भयाण असतो. युक्रेनमध्ये राहात असलेल्या रशियन भाषकांसाठी मातृभाषेचा त्याग हा व्यक्तिमत्त्वाचा गाभाच गमावण्यासारखं आहे.

दुसरीकडे युद्धामुळे शोषकाच्या भाषेवर शोषितांनी स्वत:हून बहिष्कार टाकला असंही दिसून येतं. दुसऱ्या महायुद्धात काही जर्मनभाषक ज्यू स्थलांतरितांना जर्मन भाषेबद्दल तिटकारा निर्माण झाल्याची उदाहरणं आहेत. युक्रेनमधल्या काही रशियन भाषकांनी देशप्रेमाची अभिव्यक्ती म्हणून रशियन भाषा न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. कुर्कोवनं या निर्णयाचं समर्थन केलं असलं तरी त्यानं रशियन भाषेतलं लेखन थांबवलेलं नाही. तो आता सार्वजनिक ठिकाणी रशियाऐवजी युक्रेनियन भाषेत बोलतो. युक्रेनमध्ये रशियन पुस्तकांवर बहिष्कार असल्यामुळे रशियन पुस्तकांचे युक्रेनियन भाषेतले अनुवाद मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. त्यात कुर्कोवच्या पुस्तकांचाही समावेश आहे. कुर्कोवनं डॉईशं वेल्ट या जर्मन वृत्तपत्रसमूहाला दिलेल्या मुलाखतीत युक्रेनियन जनतेच्या आशावादाबद्दल मार्मिक भाष्य केलं आहे. तो म्हणतो, ‘‘रशियन आणि युक्रेनियन माणसाच्या वृत्तीत मूलभूत फरक आहे. रशियन माणसाची मनोवृत्ती अधिक सामुदायिक, झारच्या कालखंडाला साजेशी, तर युक्रेनियन माणूस व्यक्तिकेंद्री, स्वत:चं कुटुंब, आप्त, गाव किंवा शहर यांचा विचार करणारा. या स्वतंत्र मनोवृत्तीतून आलेली ऊर्जा युक्रेनियन माणसाला हे स्वातंत्र्य अबाधित राखण्याची शक्तीही देत असते. सत्तेला विरोध करण्याचं आणि तिच्या चुका निर्भयपणे दाखवण्याचं बळ तिथूनच येत असावं.’’

हेही वाचा

‘एका लेखकाचे युद्धसंदर्भ’ या लेखात उल्लेख झालेला ‘गार्डियन’मधील गेल्या आठवडय़ातील मुलाखत-लेख वाचण्यासाठी.. आन्द्रे कुर्कोव हा लेखक या युद्धवर्षांत (रशिया-युक्रेन, इस्रायल- पॅलेस्टाइन) साहित्यिक म्हणून न जगता पत्रकार म्हणून कसा लिहिता राहिला, याचा तपशील यातून मिळेल.

 https:// shorturl. at/ ilBVZ

युक्रेनमध्ये लिहिणारे समकालीन लेखक आणि त्यांचे साहित्य यांवर युद्धानिमित्ताने गेल्या दोन वर्षांत बरीच चर्चा झाली आहे. न्यू यॉर्करने युद्ध सुरू झाल्याच्या पहिल्याच आठवडय़ात तेथील एका लेखकाची कथा अनुवादित करून जगासमोर आणली होती. ‘वर्डस विदाउट बॉर्डर’ या साहित्यिक संकेतस्थळाने दिलेल्या शिफारसी. यात कथा, काव्य आणि चित्रकथांचाही समावेश आहे.

  https:// shorturl. at/ lBRSW

न्यू यॉर्करने दोन वर्षांपूर्वी मार्च महिन्याच्या एका सप्ताहात युक्रेनमधील लेखकाची कथा इंग्रजीत अनुवाद करून छापली होती. ऑगस्ट २२ मध्ये याच साप्ताहिकाने पुन्हा आणखी एका युक्रेनी लेखकाची लघुतम कथा छापली. ती येथे वाचता येईल.

https:// shorturl. at/ buDLN