विजया जांगळे
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर टीका करणारा मेसेज करून तो लगेच डिलीट करणारे पावेल अँटोव्ह आणि त्यांचे सहकारी व्लादिमीर बुडानोव्ह यांचा नुकताच ओदिशात संशयास्पद मृत्यू झाला. पण रशियन सरकारवर (अर्थात पुतिन यांच्यावर) टीका करणाऱ्यांचा अल्पावधीत संशयास्पद मृत्यू होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. असे योगायोग शोधल्यास एक लांबलचक जंत्रीच तयार होते. उंचावरून पडून, वा चहातून विषबाधा होऊन, वा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्युमुखी पडण्याचे असे योगायोग अनेकदा घडले आहेत.
हुकूमशाही वृत्तीच्या व्यक्तींना टीका सहन होत नाही आणि विरोधी सूर कायमचा शांत करण्याचा बंदोबस्त हमखास केला जातो. रशियात सरकारच्या ध्येयधोरणांना विरोध करणाऱ्यांचा असा संशयास्पद मृत्यू झाल्याचे अनेक दाखले आहेत. अशाच काही योगायोगांविषयी…
राविल मेगानोव्ह आणि इतर
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर काही दिवसांतच ‘ल्यूकऑईल’ कंपनीचे अध्यक्ष राविल मेगानोव्ह यांनी हा संघर्ष लवकरात लवकर संपावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या शोकांतिकेचे बळी ठरलेल्या व्यक्तींविषयी त्यांनी सहानुभूतीही व्यक्त केली होती. त्यानंतर काही काळातच सप्टेंबर २०२२ मध्ये मॉस्कोतील सेंट्रल क्लिनिकल हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला.
रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून रशियातील अनेक खनिजतेल आणि नैसर्गिक वायू कंपन्यांच्या उच्चपदस्थांचा असाच संशयास्पद मृत्यू झाला आहे. एप्रिलमध्ये ‘नोव्हाटेक’चे माजी व्यवस्थापक सर्गी प्रोटोसेनिया स्पेनमधील एका व्हिलामध्ये पत्नी व मुलीसह मृतावस्थेत आढळले. मे महिन्यात ‘गॅझप्रोमबँक’चे उपाध्यक्ष वादिस्लाव्ह अवायेव मॉस्कोमधील अपार्टमेंटमध्ये पत्नी आणि मुलीसह मृतावस्थेत आढळले. ल्युकऑइलचे माजी उच्चपदस्थ अलेक्झांडर सबॉटिन यांचा हृदयाच्या आजाराने मृत्यू झाल्याचे आढळले. या सर्वांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे पुतिन यांच्या धोरणांवर टीका केली होती, वा त्यांना विरोध दर्शवला होता.
डॅन रॅपोपोर्ट
रशियन उद्योजक डॅन रॅपोपोर्ट यांनी अनेकदा युक्रेन युद्धासंदर्भात समाजमाध्यमांवरून टीका केली होती. युद्धाआधीच्या काळातही ते सरकारच्या धोरणांवर टीका करत होते. १४ ऑगस्ट २०२२ रोजी ते वॉशिंग्टनमधील एका नऊ मजली लझ्युरी अपार्टमेंटसमोर मृतावस्थेत आढळले. त्यांनी इमारतीतून उडी मारून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला, मात्र त्यांच्या निकटवर्तीयांच्या मते त्यात तथ्य नाही.
बोरिस बेरेझोव्हस्की
पुतिन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असताना बोरिस बेरेझोव्हस्की यांनी त्यांच्या प्रचारासाठी एक महत्त्वाचे अभियान राबविले होते. त्याआधीचे अध्यक्ष येल्तसिन यांच्या अंतर्गत वर्तुळातील व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. मात्र पुतिन सत्तेत आल्यानंतर बेरेझोव्हस्की यांना अपेक्षित महत्त्वाचे स्थान मिळाले नाही. पुढे ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आणि त्यांनी तिथून पुतिन यांच्याविरोधात आघाडी उघडली. अलेक्झांडर लिटविनेन्को या रशियन गुप्तहेराच्या हत्येत (२००९) क्रेमलिनचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. बेरेझोव्हस्की २०१३ साली त्यांच्या इंग्लंडमधील घराच्या बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळले. त्यांच्या गळ्याभोवती फास होता, मात्र त्यांनी आत्महत्या केल्याचे सिद्ध होऊ शकले नाही.
सेरेगी मॅग्निटस्की
पेशाने वकील असलेल्या मॅग्निटस्की एका मोठ्या करचुकवेगिरीच्या प्रकरणावरसंदर्भात काम करत होते. या घोटाळ्यात पोलीस अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे त्यांनी सिद्ध केल्यानंतर नोव्हेंबर २००८मध्ये त्यांना अटक करण्यात आली. मात्र त्यापुढील ११ महिने त्यांच्याविरोधात खटला चालवलाच गेला नाही. या काळात त्यांना गॉल ब्लॅडरमधील स्टोनचा त्रास उद्भवला मात्र त्यासाठी पुरेसे उपचार केले गेले नाहीत. त्यांना कुटुंबियांनाही भेटू दिले जात नव्हते. आणखी काही दिवस खटल्याची सुनावणी न झाल्यास कायद्यानुसार त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात येणार होते. मुक्ततेला अवघे आठ दिवस शिल्लक असताना १६ नोव्हेंबर २००९ रोजी त्यांचा कोठडीतच मृत्यू झाला.
बोरिस नेमत्सोव
येल्तसिन यांच्या कार्यकाळात उपराष्ट्राध्यक्ष असलेले बोरिस नेमत्सोव हे पुतिन यांचे कट्टर टीकाकार होते. मात्र या टीकेचा परिणाम असा झाला की २०१५च्या फेब्रुवारीमध्ये एका रेस्टॉरंटमधून परतत असताना क्रेमलिनपासून हाकेच्या अंतरावर त्यांची चार गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येच्या तीन आठवडे आधी त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना सांगितले होते की त्यांची हत्या होईल, अशी भीती त्यांच्या आईला वाटत आहे. त्यांच्याप्रमाणेच पुतिन यांच्या अन्य दोन टीकाकारांवरही अशीच मृत्यूची टांगती तलवार आहे, असेही त्यांच्या आईचे म्हणणे होते. या भीतीत काही प्रमाणात तथ्य आहे, असे नेमोत्सोव म्हणाले होते. अखेर त्यांची भीती खरी ठरली.
स्टॅनिस्लाव्ह मार्केलोव्ह आणि ॲनास्टासिया बाबूरोव्हा
पुतिन यांच्यावर टीका करणाऱ्या पत्रकारांची न्यायालयात बाजू मांडणारे वकील स्टॅनिस्लाव्ह मार्केलोव्ह यांच्यावर जानेवारी २००९मध्ये क्रेमलिनच्या परिसरातच गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांच्याबरोबर असलेल्या पत्रकार ॲनास्टासिया बाबूरोव्हा यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावरही गोळ्या झाडल्या गेल्या. यात दोघांचाही मृत्यू झाला.
खिडकीतून कोसळून मृत्यू, गोळ्या झाडून हत्या, याप्रमाणेच चहा प्यायल्यामुळे मृत्यूच्या घटनाही रशियन नागरिकांच्या संदर्भात वारंवार घडल्याचे दिसून आले आहे. ‘एकच प्याला चहाचा’ या ‘लोकसत्ता’मध्ये २९ ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखात त्याविषयी सविस्तर वाचता येईल.
हेही वाचा: एकच प्याला.. चहाचा!
रशियन सरकारच्या टीकाकारांचे होणारे संशयास्पद किंवा गुढ मृत्यू पाहता या सर्व घटना एखाद्या हेरकथेत शोभाव्यात अशा असल्याचे दिसते. पुतिन यांनी राजकारणात येण्यापूर्वी तब्बल १६ वर्षे रशियाची ‘इन्टेलिजन्स एजन्सी’ असलेल्या ‘केजीबी’मध्ये काम केले आहे. या साऱ्या योगायोगांची जंत्री पाहता, सरकारी धोरणांवर टीका करणे, त्यांना विरोध करणे म्हणजे मृत्यू ओढावून घेणे हे रशियनांच्या आजवर लक्षात आले नसेल, असे नाही. तरीही रशियातील विरोधाचे आवाज अद्याप बंद झालेले नाहीत. हुकूमशाही वृत्तीचा यापेक्षा मोठा पराभव तो काय असू शकेल?
संकलन : विजया जांगळे