काँगोच्या पूर्व भागात सोने, तांबे आणि मोबाइल फोनसाठी आवश्यक असलेले धातू मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हा भाग खनिज संपत्तीने समृद्ध आहे. त्यामुळेच शेजारच्या रवांडातील एम २३ या बंडखोर गटाने काँगोवर हल्ला केला आहे.
मध्य आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाच्या पूर्वेला असलेल्या खनिजसंपन्न गोमा शहरावर गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेजारील रवांडा या देशाची मदत असलेल्या एम २३ (मूव्हमेंट २३) नावाच्या बंडखोर संघटनेने कब्जा मिळवला आहे. एम २३ सोबत झालेल्या लढाईत जवळपास ९०० लोक मारले गेले आणि तीन हजारहून अधिक जखमी झाले आहेत. नंतर बुकावू शहरावर ताबा मिळवण्यासाठी बंडखोर पुढे निघाले. दक्षिण किवू या प्रांताची राजधानी असलेल्या बुकावू शहरात अनेक भारतीय राहतात. त्यांना बुकावू सोडून इतर सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला राजधानी किन्शासा येथील भारतीय दूतावासाने दिला आहे. आता अचानक ४ फेब्रुवारीपासून ‘मानवतेच्या कारणा’साठी एम २३ आणि अन्य बंडखोर संघटनांनी युद्धविराम जाहीर केला आहे. आंतरराष्ट्रीय दबावामुळे रवांडाने युद्धविराम घ्यायला एम २३ ला सांगितले असण्याची शक्यता आहे. युद्धविराम ही नेहमी चांगली गोष्ट असते. बुकावू ताब्यात घेण्याचा आपला विचार नसल्याचेदेखील एम २३ ने जाहीर केलं आहे. १,२०० हून अधिक भारतीय जवान काँगो येथे संयुक्त राष्ट्राच्या शांतता फौजेत कार्यरत आहे. काँगो येथे २०१० पासून आतापर्यंत २१ भारतीय जवान मारले गेले आहेत. या संपूर्ण भागात तुत्सी आणि हुतू या वांशिक जमातीतील वादामुळे अस्वस्थता आहे. १९९४ मध्ये रवांडा येथे झालेल्या यादवी युद्धात आठ लाखांहून अधिक लोक मारले गेले होते. त्यात तुत्सी समाजातील लोकांची मोठ्या प्रमाणात हत्या करण्यात आली होती.
गोमावर नियंत्रण
काँगोच्या पूर्व भागात सोने, तांबे आणि मोबाइल फोनसाठी आवश्यक असलेले धातू मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हा भाग खनिज संपत्तीने समृद्ध आहे आणि लोक अतिशय गरीब. गोमा शहराची वस्ती सुमारे ३० लाख आहे. बुकावूची वस्ती नऊ लाखांहून अधिक आहे. काँगो येथे संघर्ष, युद्धे सुरूच असतात. त्यामुळे हे युद्ध काँगोच्या लोकांसाठी नवीन नाही. ३० जून १९६० ला काँगोला बेल्जियमकडून स्वातंत्र्य मिळाले, तर रवांडाला बेल्जियमकडून १९६२ मध्ये. पेट्रिस लुमुम्बा हे काँगोचे सर्वात लोकप्रिय नेते आणि पहिले पंतप्रधान होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही महिन्यांत १७ जून १९६१ रोजी त्यांची हत्या करण्यात आली. काँगोच्याच काही लोकांनी त्यांची हत्या केली, असे सांगितले जाते. पण त्यांना बेल्जियमची मदत होती. गोमा शहरावर एम २३ ने सहज कब्जा मिळवला. काँगोच्या लष्कराने त्यांचा प्रतिकार केला पण तो फार काळ टिकला नाही. राजधानी किन्शासा ताब्यात घेण्याची एम २३ ची योजना होती. पण आता त्यांनी ती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एक गोष्ट नक्की की एम २३ साठी किन्शासापर्यंत जाणे सोपे नव्हते. गोमापासून किन्शासा अंदाजे १,६०० कि.मी. अंतरावर आहे. काँगोला कुठल्याही परिस्थितीत गोमा शहरावर पुन्हा एकदा नियंत्रण मिळवायचे आहे. त्यांच्यासाठी हा मुद्दा अतिशय प्रतिष्ठेचा झालेला आहे. बुरुन्डी या देशाची काही प्रमाणात काँगोला मदत होत आहे.
एम २३ कोणाची आहे?
एम २३ ही तुत्सी या वांशिक समाजातील लोकांची बंडखोर संघटना आहे. तुत्सी समाजाच्या अधिकारासाठी आपण शस्त्रे उचलली असे त्यांचे म्हणणे आहे. २०१२ मध्ये एम २३ ची स्थापना करण्यात आलेली. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा २० नोव्हेंबर २०१२ ला गोमा शहरावर ताबा मिळवला होता. तेव्हा एम २३ च्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर वातावरण निर्माण झाले. २०१२ च्या नोव्हेंबरच्या शेवटी युगांडाची राजधानी कंपाला येथे एम २३ चे नेते आणि काँगोला लागून असलेल्या देशांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या समजुतीनंतर एक डिसेंबरला एम २३ नी माघार घ्यायला सुरुवात केलेली. त्या वेळी इतरही काही ठिकाणांहून एम २३ ला माघार घ्यावी लागली होती.
त्यापूर्वी २३ मार्च २००९ मध्ये काँगो सरकार आणि तुत्सी यांच्या सीएनडीपी नावाच्या बंडखोर संघटनेत समझोता झाला होता. सीएनडीपीचाही उद्देश काँगो येथील तुत्सी समाजाचे संरक्षण करणे आणि रवांडा येथील पोल कगामे यांच्या विरोधात लढणाऱ्या हुतू समाजाच्या एफडीएलआर यांचा पराभव करणे हा होता. तेव्हा काँगोचे अध्यक्ष जोसेफ कबिला होते.
संघर्षाचा इतिहास
१९९४ मध्ये रवांडा येथे अतिशय भयानक नरसंहार झाला. ८ ते १० लाख लोक त्यात मारले गेले. त्यात तुत्सी समाजातील लोक मोठ्या प्रमाणात होते. तेव्हा हुतू समाजातील कट्टरवाद्यांनी उदारमतवादी हुतू लोकांनादेखील मोठ्या संख्येने ठार मारले होते. जवळपास १०० दिवस हे हत्याकांड सुरू होते. या नरसंहाराला एक निमित्त होते. ते म्हणजे ६ एप्रिल १९९४ ला रवांडाचे प्रमुख जुवेनल हेबिआरिमाना आणि बुरुन्डीचे अध्यक्ष सार्याप्रअन एन्टायामिरा यांना घेऊन येणाऱ्या विमानावर रवांडाची राजधानी किगालीच्या विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ते दोघेही हुतू समाजातील होते. दुसऱ्याच दिवशी रवांडाच्या मवाळ पंतप्रधानांची हत्या करण्यात आली. त्याही हुतू समाजातील होत्या. त्यापूर्वी १९९० मध्ये शेजारील युगांडातून रवांडन पेट्रियोटिक फ्रंट नावाच्या तुत्सी बंडखोर गटाने रवांडावर आक्रमण केले. त्यांचा उद्देश हुतूंच्या नेतृत्वाखालील सरकार हटवणे हा होता. त्याचे नेतृत्व रवांडाचे वर्तमान अध्यक्ष पोल कगामे यांनी केले होते. १९९३ मध्ये टान्झानियात शांतता करार झाला होता. कगामे यांनी फ्रन्टचे नेतृत्व करत किगाली शहरावर कब्जा मिळवला. फ्रन्टने नवीन सरकार बनवले आणि एका हुतूला अध्यक्ष बनवले. ३७ वर्षांचे कगामे उपाध्यक्ष आणि संरक्षणमंत्री झाले. नंतर २००० मध्ये ते राष्ट्राध्यक्ष झाले आणि तेव्हापासून सत्ता त्यांच्याकडे आहे.
रवांडाची दादागिरी
त्यानंतर हजारो हुतू शेजारच्या झैरे (आताचे काँगो) येथे पळून गेले. तिथून ते रवांडावर हल्ले करायला लागले. झैरे हल्ले थांबवत नसल्याने रवांडाने १९९६ मध्ये झैरेत लष्कर घुसवले. कगामे यांच्या भूमिकेवर सर्वत्र टीका होत असे. झैरेचे अध्यक्ष मोबुटू सेसे सेको यांना सत्तेतून हटविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लॉरेंट कबिला यांना रवांडाच्या लष्कराने मदत केली. मे १९९७ मध्ये सेसे सेको यांना सत्तेतून हटविण्यात यश मिळाले आणि लॉरेंट अध्यक्ष झाले. देशाचे नाव बदलून पूर्वीचे कोंगो ठेवले. २००२ मध्ये काँगोतून लष्कर परत बोलवण्यास कगामे तयार झाले. कगामे यांनी मोठ्या प्रमाणात सत्तेचा दुरुपयोग केला. मात्र त्यांनी राष्ट्र उभारणीचे कामही केले. रवांडात सामाजिक सौहार्दाचे वातावरण निर्माण केले. त्याबद्दल त्यांचे कौतुकही करण्यात आले. त्यांनी पाश्चात्त्य देशाशी संबंध सुधारले. मात्र शेजारील देशात हस्तक्षेप करणे सुरूच राहिले.
रवांडाने एम २३ च्या मदतीसाठी गोमा येथे त्यांच्या लष्कराचे जवान पाठवले होते, असा आरोप काँगो सरकारने केला आहे. गोमा परत मिळवण्याचा कोंगोचा निर्धार आहे. आपण एम २३ ला मदत करत असल्याचा आरोप कगामे यांनी सातत्याने नाकारला आहे. एम २३ रवांडाची ‘कठपुतळी’ आहे, आहे, असे काँगोचे म्हणणे आहे. एम २३ च्या नेत्यांचे म्हणणे आहे की द्वेष पसरवणाऱ्या आणि भेदभाव करणाऱ्या काँगो सरकारच्या विरोधात वांशिक अल्पसंख्याकांना सुरक्षा मिळावी यासाठी आम्ही लढत आहोत. युगांडा आणि रवांडा येथे निर्वासित म्हणून राहणाऱ्या काँगोच्या तुत्सी यांना परत आणण्याचीही त्यांची मागणी आहे. रवांडाचे जवान काँगोत आहेत, असे संयुक्त राष्ट्र आणि अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनचेही म्हणणे आहे. पण रवांडाने हे कधीच मान्य केलेले नाही. गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या तज्ज्ञांचे म्हणणे होते की पूर्व काँगोत एम २३ च्या सोबत रवांडाचे तीन ते चार हजार जवान आहेत.
हा प्रश्न एका देशाचा नाही, तो विभागीय आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने दोन्ही देशांवर दबाव आणून तो मिटवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
jatindesai123@gmail.com
वरिष्ठ पत्रकार आणि शांततावादी कार्यकर्ते