सैफ अली खानवर मुंबईत त्याच्या राहत्या घरात हल्ला झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर वृत्तवाहिन्या तसेच समाज माध्यमे यांच्यावर जे काही सुरू आहे, त्याला चेव या खेरीज दुसरा शब्द नाही. एकतर कोणतीही लहानमोठी घटना घडली की तिच्याबद्दल मलाच कसं जास्तीत जास्त माहीत आहे, हे सांगण्याची, दाखवण्याची स्पर्धा सुरू होते आणि मग त्या घटनेचं उसासारखं चिपाड केल्याशिवाय मंडळी थांबत नाहीत. त्यामुळेच सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा त्याची पत्नी करिना कपूर कशी घरात नव्हती, तिने केलेल्या इन्स्टा रीलवरून ती कशी पार्टी करण्यात मग्न होती, सैफ अली खानला इब्राहिम या त्याच्या मोठ्या मुलाने नाही, तर तैमूर या आठ वर्षांच्या मुलाने कसं रुग्णालयात आणलं, सैफ अली खानच्या विशिष्ट धर्मामुळेच कसा त्याच्यावर हा हल्ला झाला आहे अशा सगळ्या चर्चा या माध्यमांमधून सतत सुरू आहेत. अशी एखादी घटना घडते तेव्हा तिच्यामुळे बसलेला धक्का, निर्माण झालेलं वातावरण सगळ्यांनाच चर्चा करायला उद्युक्त करतं, त्यामुळे ती होणं हे अगदी स्वाभाविक आहे, पण अशा कोणत्याही घटनेमुळे होणाऱ्या चर्चेचा दर्जा ही खरोखरच चिंतेची बाब आहे. मध्यरात्रीच्या वेळी स्वतच्या घरात झोपलेल्या एखाद्या माणसाच्या घरात शिरून कोणी त्याच्यावर हल्ला करत असेल तर त्याचा धर्म, त्याची बायको काय करत होती हे चर्चेचे विषय कसे होऊ शकतात? याच समाजात एकेकाळी आवडत्या अभिनेत्यावर काही संकट आलं तर प्रार्थना व्हायच्या, देवाला साकडं घातलं जायचं यावर आज तरी विश्वास ठेवणं कठीण आहे. सैफ अली खान तेवढा लोकप्रिय नसेलही कदाचित, पण मुंबई आता कुणासाठीही सुरक्षित नाही या विषयावर आपण का बोलत नाही? दुसऱ्याच्या घरात शिरून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याइतकी माणसांची मनं का भडकली आहेत, याचा विचार केव्हा होणार? समाजामधल्या आर्थिक असमानतेविरोधात जो भडका आहे, त्याचं काय करणार? सैफ अली खानने त्या चोराचं कधीच काही वाकडं केलं नसेल, पण आज तो ‘आहे रे’ वर्गाविरोधातील असंतोषाचा चेहरा अथवा बळी ठरला आहे, याचं काय करायचं?
गेल्या काही वर्षांमधला राजकीय आणि सामाजिक अवकाश कमालीचा अस्वस्थ करणारा आहे. एकाच वेळी धर्माधर्मांमध्ये, जातीजातींमध्ये भांडणं लावून दिली जात आहेत. हाताला काम नाही, जगण्यापुरते पैसे कमवण्यासाठीची आवश्यक कौशल्ये नाहीत, फारसं शिक्षण नाही, डोक्यात जात-वर्णवर्चस्वाबद्दल संताप असलेला तरूण हा डोकी भडकावणाऱ्यांचं भांडवल. त्यात हे भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, हे वेगवेगळ्या प्रसंगांमधून दिसतंच आहे. कधीतरी सामाजिक राजकीय प्रश्न निर्माण होतो तेव्हा ‘वापरलं’ जाणारं हे भांडवल एरवी आपली भडास कुठे काढणार? त्याचा उद्रेक असा कुठेतरी कधीतरी होतो. एरवीही लहानसहान प्रमाणात होतच असणार, पण या मोठ्या प्रकरणात तो ठळकपणे अधोरेखित झाला.
हेही वाचा >>>सैन्य दलांत सुधारणांचे वारे!
दुसरा मुद्दा आहे आर्थिक असमानतेचा. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत गरीब अधिक गरीब होत जातील आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातील असे एकेकाळी वर्तवले गेले होते. ती परिस्थिती आता समोर दिसते आहे. अधिकाधिक तंत्राधिष्ठित असलेल्या आजच्या रोजगारांच्या बाजारपेठेला नेमकी कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची गरज आहे. आर्थिक दृष्ट्या सबल आणि शिक्षणाच्या क्षेत्रात वरचष्मा असलेल्यांनी ते समाजाच्या चार पावले पुढे असल्याचा फायदा मिळवत ती बाजारपेठ काबीज केली आहे (त्यात त्यांचे काही चुकीचे आहे, असे अर्थातच म्हणायचे नाही). पण मागे असलेल्यांच्या, तळागाळातल्यांच्या अस्मिता जाग्या होत आहेत आणि ‘आपली बस कुणी तरी आपल्या पुढे असल्यामुळे चुकली’ हे त्यांना जाणवत आहे. यातून निर्माण होणाऱ्या संतापाला वाट करून देणारी राजकीय भट्टी तयारच आहे.
शिवाय ही आर्थिक असमानता किती दृश्य असावी? भारतात सर्वात श्रीमंत लोकांची संख्या एक टक्का आहे आणि त्यांच्याकडे देशातील एकूण संपत्तीपैकी ४०% संपत्ती आहे. तर तळच्या ५० टक्के लोकांकडे देशातील एकूण साधनसंपत्तीपैकी फक्त तीन टक्के संपत्ती आहे. समाज माध्यमांची चलती असण्याच्या आजच्या काळात अमक्या स्टारकडे इतक्या आलिशान गाड्या, तमक्या क्रिकेटपटूकडे इतके बंगले, अमक्यातमक्यांची इतकी नेटवर्थ अशा गोष्टी समाज माध्यमांवरून सचित्र पहायला मिळतात. अनेक यूट्यूबर्स नेते, तारे, क्रिकेटपटू यांच्या श्रीमंती रिसॉर्टची व्हर्च्युअल टूर घडवून आणतात. यूट्यूबवर नुकतेच आपले चॅनल सुरू केलेल्या एका अभिनेत्रीने कुटुंबासहित केलेल्या तिच्या आठ दिवसांच्या शाही लंडनवारीचा व्ल्हॉग तिच्या चॅनलवर दाखवला. काही माणसं इतकं खर्चिक, आरामदायी आयुष्य जगतात, हे आता कधी नव्हे इतके सहजपणे अगदी तळागाळातल्या माणसालाही पहायला मिळतं आहे. आपले प्रेक्षक वाढवण्याच्या नादात आपलं जगणं सगळ्याच लोकांसमोर मांडताना त्यांच्या मनात हे सगळं बघून नेमकं काय येत असेल याचा विचार होत असेलच असं नाही. श्रीमंती ही दडवण्याची गोष्ट नाही, पण तिचं प्रदर्शन आर्थिक असमानता अधिक अधोरेखित करतं आणि त्यातून येणाऱ्या अस्वस्थतेची बीजं कुठे ना कुठं तरी पेरली जातात, हे नाकारता येत नाही.
हेही वाचा >>>गोवा खरंच ओस पडू लागलं आहे का? एका एक्स पोस्टवरून सरकार का बिथरलंय?
एकेकाळी अतिश्रीमंत, उच्चभ्रू आणि गरीब यांच्यामध्ये बफर म्हणून मध्यमवर्ग होता. प्यु रीसर्च सेंटरच्या अभ्यासानुसार कोविडच्या महासाथीनंतर भारतातला मध्यमवर्ग आकुंचन पावला आहे. म्हणजेच गरिबांची संख्या वाढली आहे. १.२ अब्ज लोक हे अल्प उत्पन्न गटात आहेत. तर मध्यमवर्गाचं प्रमाण ३१ टक्के आहे. हा बफर कमी होत जाईल तसतसा असंतोष आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा आकडेवारीचा खेळ बाजूला ठेवला तरी दिसतं ते असं की संख्येने थोडा असलेला एक वर्ग त्याच्या नशिबाने त्याच्याकडे असलेल्या संपत्तीच्या जोरावर आलिशान, सुखासीन आयुष्य जगतो. तर दुसऱ्या संख्येने प्रचंड असलेल्या वर्गाला रोजच्या भाजीभाकरीसाठी झगडावं लागतं. ही वाढणारी दरी त्याच्या मनात असंतोष निर्माण करते आणि राजकीय- सामाजिक व्यवस्था त्या असंतोषाला खतपाणी घालते. त्या असंतोषाला टोक येऊन एखादा कुणी भडकून माथेफिरूपणा करतो किंवा एखादा कुणी थंड डोक्याने आपल्याला हवं ते करतो. पण हे असंतोषाचं टोक हिमनगाचं टोक आहे, हे आपण केव्हा लक्षात घेणार?
vaishali.chitnis@expressmail.com