राज्यात, विशेषत: मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या हा न सुटलेला प्रश्न आहे. अशा आणि आर्थिक संकटांमध्ये सापडलेल्या इतर घरांमधील मुलांच्या मदतीसाठी संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्थेच्या संतोष पवार यांनी आधार माणुसकीचा हा उपक्रम आखला आहे. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत किमान साडेसातशे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात आली आहे. यापुढेही हे काम सुरू ठेवायचे आहे. विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी राहण्यासाठी जागा असावी यासाठी अंबेजोगाईमध्ये वसतीगृह बांधायचे आहे. त्यासाठी सबळ आर्थिक मदतीची गरज आहे.
●ज्या कुटुंबांना मदत केली अशा कुटुंबांमधील विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे एक संमेलन घेतले जाते. या वेळी पुढील वर्षी लागणारे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते.
●मोलमजुरी करणारे कुटुंब अगदी दिवाळीमध्येही कामास जातात. पाडव्याच्या दिवशीही शेतात मजुरीसाठी जाणाऱ्या कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी म्हणून हा उपक्रम सुरू केल्याचे संस्थेचे पदाधिकारी सांगतात.
●मुलांचे प्रश्न सुटावेत म्हणून शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून मदत घेऊन हा उपक्रम सुरू आहे. तालुक्याच्या पातळीवर शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांकडून मोठी मदत मिळते.
●गरीब मुलांना कमी शुल्कात किंव नि:शुल्क शिकवणारे शिक्षक आहेत. पण त्यांना विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती समजावून सांगण्याचे काम आधार माणुसकीच्या माध्यमातून केले जात आहे.
मिषा आणि अनुष्का सोनवणे यांचे वडील दिवसभर भंगार गोळा करायचे. त्या भंगारात कोरी पाने मिळाली की ती बाजूला काढून त्याची नवी वही करायची आणि अभ्यासासाठी वापरायची, अशा रितीने अभ्यास करत या बहिणी मोठ्या झाल्या. अंबाजोगाई शहरातील एका वस्तीत राहणाऱ्या दामोदर सोनवणे यांच्या या मुली अभ्यासात कमालीच्या हुशार होत्या. शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांचे महाविद्यालयाचे शुल्क भरताना अडचण आली तेव्हा ‘आधार माणुसकीचा’ हा उपक्रम राबविणाऱ्या संतोष पवार यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. त्यांनी एका स्थानिक बँकेत या मुलींच्या शिक्षणासाठीच्या मदतीसाठी धावपळ केली आणि त्यांना मदत मिळवून दिली. आता अमिषा डॉक्टर झाली आहे. ती अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात प्रशिक्षणार्थी वैद्याकीय अधिकारी म्हणून रुजू झाली आहे. तर धाकटी अनुष्का अभियंता होऊन दिल्लीतील नोएडा भागात नोकरी करत आहे.
हेही वाचा : जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्रीपद शोभेचे बाहुले!
अमिषा आणि अनुष्का या दोघींना वेळेवर महाविद्यालयीन शुल्क भरण्यासाठी मदत मिळाली नसती तर त्यांच्या शिक्षणाचे काय झाले असते कोणास ठाऊक? कदाचित थांबले असते. अशी शिकण्याची इच्छा असलेल्या, प्रगती करण्याची इच्छा असलेल्या अनेक मुलेमुलींना ‘संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्थे’च्या वतीने मदत केली जाते. शेतीप्रश्नामुळे मराठवाड्यात आठ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. घरात एखादे मोठे आजारपण असले की त्यांच्या मुलांचे प्रश्न कमालीचे गुंतागुंतीचे बनतात. त्यांना पुढे जाण्यासाठी आधाराची गरज असते. तो मार्ग शिक्षणातून पुढे जातो हे ओळखून संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्थेच्या संतोष पवार यांनी ‘आधार माणुसकीचा’ हा उपक्रम आखला आहे.
‘आधार माणुसकी’चा उपक्रम
आत्महत्येच्या प्रश्नाचे गांभीर्य दिवसेगणिक कमी न होता वाढतच आहे. कोणत्याही कारणाने आत्महत्या झाली तरी घरातील संगळी मंडळी हवालदिल होतात. पुढे काय करायचे असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर शोधताना नाना प्रकारे मार्ग शोधावे लागतात. घरातील कर्ती व्यक्ती, बहुतांश वेळी वडील, गेल्यानंतर काही जणी जिद्दीने मुलांना शिकवतात. कधी शहरी भागात धुणीभांडी करतात तर कधी शेतात मोलमजुरी करतात. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची मुले किंवा ज्यांच्या घरात कर्करोगामुळे किंवा ‘एचआयव्ही’ संसर्गासारख्या आजारामुळे आर्थिक परिस्थिती बिकट होत जाते अशा घरातील मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी हा उपक्रम आखण्यात आला आहे. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत ७५० विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. यातील ७० जण वैद्याकीय शिक्षण घेत आहेत. पाच विद्यार्थी आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत. काही मुले अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. हा उपक्रम विस्तारतो आहे.
सामाजिक कार्याला सुरुवात
२०१८ मध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. लातूर तालुक्यातील सारसा गावात भुजंग पवार यांचा ऊस गाळपाविना वाळून गेला. याच वर्षी त्यांच्या मुलीचे लग्न जमले. आता पैसे आणायचे कोठून या विवंचनेत भुजंगरावांनी आत्महत्या केली. ही बाब अंबाजोगाईमधील वकील संतोष पवार यांना कळाली. त्यांनी पवार यांच्या घरी जाऊन परिस्थिती समजावून घेतली. त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की, ठरलेले लग्न लावून द्यायचे. लग्नासाठी लागणारे सामानाची यादी करण्यात आली. आवश्यक वस्तू मिळवण्यासाठी तीन-चार मित्रांनी लातूरच्या व्यापारी मित्रांना मदतीचे आवाहन केले. कोणी संसारोपयोगी भांडीकुंडी दिली. कोणी नवरा-नवरीचे कपडे घेऊन दिले. मदतीचे हात पुढे येत होते. गावकऱ्यांनाही कळाले की आपल्या गावातील मुलीच्या लग्नासाठी अशी मदत गोळा केली जात आहे. त्यांनी जेवणाचा खर्च उचलण्याचे ठरवले. मुलीच्या अंगावर घालायला दागिने नव्हते. त्यासाठी लातुरातील तातोडे ज्वेलर्स यांना मुलीच्या पायातील जोडवे द्यावेत अशी विनंती केली. त्यांनी मंगळसूत्र दिले. लोकांनी या लग्नात आवर्जून आहेर केले. ती रक्कम झाली एक लाख ७८ हजार रुपये. खर्च वजा जाता शिल्लक राहिलेली रक्कम भुजंगरावांच्या दुसऱ्या मुलीच्या शिक्षणासाठी तिच्या नावावर ठेवण्यात आली. समाजाने ठरवले तर अनेक प्रश्न असे सहज सुटतात हे त्यातून लक्षात आले.
संतोष तेव्हा त्यांच्या मूळ गाव असलेल्या जोगाईवाडीचे सरपंच होते. गावातील विकास योजनांचे अनेक खाचखळगे त्यांना माहीत होते. आपल्या आणि शेजारील गावांमधील गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ते पुढाकार घेत होते. अंबाजोगाई परिसरात समाजवादी विचारांचे नेते द्वारकादास लोहिया यांचेही काम चाले. त्यांच्या कामातून प्ररेणा घेऊन संतोष पवार व त्यांच्या मित्रांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या भेटी घेतल्या. अनेक मुलांच्या घरातील समस्यांमुळे ते हेलावून गेले. अनेक मुलांचा संघर्ष बघताना संतोष पवार यांची दृष्टी व्यापक होत होती. याच काळात सिंधुताई सपकाळ यांचे काम पाहून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यातून काम वेगाने सुरू झाले.
गावगावांतील गरजू मुलांना जमेल तेवढी शिक्षणात मदत करण्यासाठी पवार यांनी निधी गोळा करायला सुरुवात केली. मुलांना किमान शैक्षणिक साहित्य द्यायचे म्हटले तरी त्यांना दरवर्षी आठ ते दहा लाख रुपये लागतात. ही रक्कम ते दानशूर व्यक्तींकडून मिळवतात. दरवर्षी जूनच्या आधी अशा मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. त्या कार्यक्रमांमध्ये आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवा चिवटपणे मुलांना शिकवतात हे समोर येते. बरीच मुले कसेबसे पदवीपर्यंत शिकतात. पण काही जणांना कौशल्यांची गरज असते. आयटीआयच्या अभ्यासक्रमांपासून ते गावातील गॅरेजवर किमान कौशल्य मिळावे यासाठी आधार माणुसकीचा उपक्रम घेऊन संतोष पवार आणि त्यांचे सहकारी पोहचतात. आता ७० हून अधिक वैद्याकीय शिक्षण घेणारी मुले, तेवढेच अभियंते आणि विविध क्षेत्रात शिकणाऱ्या, स्वत:च्या पायावर उभे राहिलेल्या मुलांनी इतर गरजू मुलामुलींसाठी काम उभे करावे असे प्रयत्न केले जात आहेत. मुलींचे शिक्षण मोफत व्हावे, शिक्षणातील सुविधा वाढाव्यात म्हणून संस्थेच्या वतीने अनेक कार्यक्रम हाती घेतले जातात. मुलामुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह असावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकी १०० मुले आणि मुलींच्या राहण्याची सोय करण्यासाठी संस्थेला मदतीची गरज आहे.
हेही वाचा : सर्वकार्येषु सर्वदा : हुशार, गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यादानाचा निरंतर यज्ञ
करोनाचे आव्हान
करोनाकाळात या उपक्रमासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. अनेक मुलांना शिक्षण सोडावे लागण्याची भीती होती. ऑनलाइन वर्गांमुळे पुन्हा एक संधी उपलब्ध झाली. गरीब घरातील मुलांना ऑनलाइनवर शिकवणीसाठी मुलांना मदतीची गरज होती. एव्हाना हा उपक्रम अनेक शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहचला होता. त्यामुळे अनेकांनी पुन्हा मदत केली. शेतकऱ्यांना भाजीपाला बाजारात नेता येत नव्हता. तो भाजीपाला या विद्यार्थ्यांना दिला जात होता. अशी अनेक प्रकारे मदत विद्यार्थ्यांना मिळाली. दिल्ली-मुंबईसारख्या दूरच्या शहरांमधून ऑनलाइन शिकवणाऱ्या शिक्षकांमुळे अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती करता आली.
संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्था बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे आहे. अंबाजोगाई शहरातच संस्थेचे कार्यालय आहे. राजीव गांधी चौकात गेल्यानंतर संस्थेपर्यंत पोहचता येते. हा परिसर शहराला लागूनच आहे.
ऑनलाईन देणगीसाठी तपशील
●बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, शाखा औरंगाबाद</p>
●खाते क्रमांक : 9051001016506
●आयएफएससी कोड : COSB0000905
संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था
SANT GADGEBABA SEVABHAVI SANSTHA
या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.
बँकिंग पार्टनर
दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि.