रशियाने सुरू केलेल्या युक्रेन-युद्धाला एक वर्ष पूर्ण होत असताना जगातील बहुतेक देशांची या संघर्षाबद्दलची मते स्पष्ट झालेली आहेत. रशियाकडून याच वर्षभरात अधिकाधिक तेल घेणाऱ्या भारताने कुणालाही जाहीर पाठिंबा दिलेला नाही, तर भारत ज्याच्याकडे संशयानेच पाहातो त्या चीनने रशियालाच मदत करण्याची भूमिका घेतली आहे आणि ही चिनी भूमिका अर्थातच युरोपपेक्षाही अमेरिकेच्या युक्रेनधार्जिण्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून आलेली आहे, हे सारेच आता उघड झालेले आहे. अमेरिका आणि युरोप यांच्यात युक्रेनबाबत दिसणारी एकवाक्यता पोखरण्याचे प्रयत्नही फारसे यशस्वी झालेले नाहीत. अशावेळी तटस्थ- शांततावादी भूमिका म्हणजे काय, हे दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबिया या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष युआन मॅन्युएल सान्तोस यांनी दाखवून दिले आहे. हे सान्तोस स्वत: २०१६ सालच्या ‘नोबेल शांतता पारितोषिका’चे मानकरी आहेत, हे लक्षात घेतल्यास त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे मूल्य अधिकच वाढते. सान्तोस यांच्या बोलण्यातून पाच महत्त्वाचे मुद्दे निघतात. ते आपण पाहू…
(१) जिंकण्यापेक्षा शांतता महत्त्वाची
‘युद्ध जिंकण्यापेक्षा युद्ध थांबवणे महत्त्वाचे असते’ आणि ‘या (युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्याच्या) प्रयत्नांमध्ये नेहमीच नैतिक झगडा उद्भवतो… हा नैतिक झगडा शांतता आणि न्याय यांमध्ये दिसून येणाऱ्या दुविधेचा असतो’ अशी सूत्रबद्ध, चिंतनशील विधाने सान्तोस यांनी ‘द न्यू यॉर्क टाइम्स’चे युरोपातील मुख्य राजनैतिक प्रतिनिधी स्टीव्हन जे एर्लांजर यांच्याशी बोलताना केली आहेत. अर्थात सान्तोस यांना जमिनीवरील परिस्थितीची जाण आहेच, हेही त्यांच्या बोलण्यातून पुढे स्पष्ट झाले.
(२) फटका जगभरच्या गरिबांना
युक्रेनयुद्धाला सहा महिने होत असताना, ऑगस्ट २०२२ मध्ये सान्तोस यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली होती. “ तुम्ही युरोपपेक्षा खरे तर दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका या खंडांतील देशांकडे मदतीसाठी पाहिले पाहिजे” असे सान्तोस यांनी झेलेन्स्की यांना त्या भेटीत सांगितले होते. ‘युक्रेनयुद्धाचा फटका जगभरातल्या गरिबांना बसेल‘ असेही ते म्हणाले होते. त्या विधानाचा विस्तार त्यांनी न्यू यॉर्क टाइम्सशी बोलताना केला.
जगभरात शंभरेक तरी झगडे सुरू आहेत, त्यामुळे लोक विपन्नावस्थेत गेले आहेत, जीव गमावत आहेत… पण सारे लक्ष युक्रेनकडेच लागले आहे. ‘‘युक्रेनने सारी ऊर्जा शोषून घेण्याची ही स्थिती सुसंगत म्हणता येणार नाही,’’ असे युआन मॅन्युएल सान्तोस यांचे मत आहे. ‘ग्लोबल साउथ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गरीब देशांकडील लक्ष युक्रेन युद्धामुळे कमी होते आहे, ते योग्य नव्हे, असा या विधानाचा अर्थ. जर्मनीच्या म्युनिच शहरात नुकत्याच पार पडलेल्या ‘म्युनिच सिक्युरिटी कॉन्फरन्स’साठी एक नोबेल-मानकरी म्हणून सान्तोस यांना निमंत्रण होते, त्या परिषदेदरम्यान त्यांनी ही मुलाखत न्यू यॉर्क टाइम्सला दिली.
(३) अन्न, इंधन फक्त युरोपसाठीच महत्त्वाचे?
‘काही युरोपीय देशांना युक्रेनयुद्ध अधिक महत्त्वाचे वाटते, तेही ठीकच आहे, कारण त्यांच्या लेखी हा प्रश्न अन्नाचा आणि इंधनाचा आहे. वास्तवाचे चटके बसल्यानंतर परिस्थितीची जाणीव तीव्र होणे स्वाभाविकच म्हणायचे. पण अशाच प्रकारचे प्रश्न, समजा ब्राझीलने कोलंबियावर आक्रमण केले तरीही उद्भवू शकतात… मी तसे बोलून दाखवले, तर ते हसण्यावारी नेले जाते… याचा मथितार्थ इतकाच की, युरोपला केवळ त्यांच्यापुरत्याच अन्नाची चिंता आहे’ – असेही सान्तोस म्हणाले.
(४) अन्य संघर्षांकडे दुर्लक्ष का?
जगात आणखीही अनेक संघर्ष सुरू आहेत. युक्रेनबद्दल अमेरिकेला ऊठसूट ‘संयुक्त राष्ट्रांच्या सनदे’ची आठवण येते, पण मग इस्रायल- पॅलेस्टाइन संघर्षाचे काय? इस्रायलने वाटेल तेवढी भूमी बळकावत जाणे हेदेखील आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघनच आहे, असे म्हणणे सान्तोस यांनी मांडले.
(५) युक्रेनच्या विजयासाठी थांबू नका
कोलंबियातील ‘एफएआरसी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सशस्त्र बंडखोरांना आधी शस्त्रबळाने जेरीस आणून, त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे श्रेय युआन मॅन्युअल सान्तोस यांना जाते. याच कामगिरीसाठी त्यांना शांततेचे ‘नोबेल’ मिळाले होते. रशिया-युक्रेन युद्ध थांबवणे अधिक महत्त्वाचे आहे, असे सांगताना त्यांनी ‘युक्रेनचा या युद्धत विजय होण्याची शक्यता कमी… हे युद्ध युक्रेनच्या विजयामुळे थांबू शकत नाही’ अशीही स्पष्टोक्ती केली. शांतता प्रक्रियेत युक्रेनलाही काही नुकसान सोसावेच लागेल, असे स्पष्ट न सांगता त्यांनी ‘शांतता आणि न्याय यांच्यादरम्यानचा नैतिक झगडा हा शांतता प्रस्थापित करताना सहन करावाच लागतो’ असे विधान केले.
अमेरिकेने युक्रेनला जाहीर केलेली वाढीव मदत, युरोपीय देशांनी -तूर्तास प्रसारमाध्यमांनीही त्या घोषणेचे केलेले उत्साही स्वागत, पुतिन यांनी आमच्यावरच संघर्ष लादला गेल्याचा घेतलेला पवित्रा आणि त्यापायी थेट अण्वस्त्रबंदी करारच गोठवण्याची केलेली घोषणा… हे सारे पाहाता सान्तोस यांची ही मते जगाला ऐकूच जाणार नाहीत कदाचित, पण तरीही त्यांनी ती मांडली आणि जगाच्या घडत्या इतिहासात अशाही वेळी काही शहाणे सूर शाबूत असल्याची नोंद केली, एवढे मात्र नक्की.
(‘द न्यू यॉर्क टाइम्स’शी ‘दि इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहा’च्या करारानुसार हा मजकूर संकलित/ संपादित करण्यात आला आहे. संकलन : के. चंद्रकांत)