वसई :देशभक्ती आणि मातृभक्ती यांचा योग्य मिलाफ झाला की त्याचे कसे अनुकरणीय परिणाम दिसून येतात ते निवृत्त सैनिक किसन लोखंडे यांच्या बाबतीत दिसून येते. मूळच्या सातारा जिल्ह्यातील लोखंडे वसईमधील एका गावामध्ये ‘मराठा लाइफ फाउंडेशन’ स्थापन करून अनाथांचा विनामूल्य सांभाळ करत आहेत. त्यामध्ये मनोरुग्ण, मतिमंद, गतिमंद अशा गरजू अनाथांचा समावेश आहे. गेल्या १७ वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाचा पसारा वाढला आहे. हे काम तसेच जोमाने होत राहावे यासाठी समाजाने सढळ हाताने आर्थिक मदत करण्याची गरज आहे.
देशाची सेवा केलीस आता उर्वरित आयुष्य अनाथांच्या सेवेत घालवङ्घ’ सातारा जिल्ह्यातील फलटण, तालुक्यातील येथील ढवळ या छोट्या गावात राहणाऱ्या वयोवृद्ध वंचलाबाई लोखंडे यांनी आपला मुलगा किसन याला भारतीय लष्करात निवृत्त झाल्यावर सांगितले. त्यांना समाजसेवेचे बाळकडू लहानपणापासून आई-वडिलांकडून मिळाले होते. आईने व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले पुढील आयुष्य अनाथांच्या सेवेत झोकून देण्याचा निर्णय घेतला.
निव्वळ अनाथ, मनोरुग्णांची सेवा करावी या भावनेतून रोवलेल्या समाजसेवेच्या बीजाचा बघता बघता वटवृक्ष झाला आहे. या कामासाठी लोखंडे यांनी वसईच्या भाताणे येथे ‘मराठा लाइफ फाउंडेशन’ नावाची संस्था स्थापन केली. मागील १७ वर्षांपासून शेकडो मतिमंद, गतिमंद, वृद्ध यांच्यासाठी ही संस्था आधारवड झाली आहे. अनाथांचा कुणी वाली नसतो, तरीही ते धडपडून आपले आयुष्य जगतात. पण जे गतिमंद, मतिमंद आहेत, वृद्ध आणि आजारी आहेत, त्यांचे काय? रस्त्यावर एकाकी अवस्थेत निष्प्राण होणे ही अनेकांच्या आयुष्याची शोकांतिका असते. कुटुंबीयांचा आधार तुटलेले, बेघर झालेले मनोरुग्ण रस्त्यांवर दिशाहीन भटकताना आढळतात. उघड्यावरचे किंवा फेकलेले अन्न खाऊन गुजराण करतात. अशा गतिमंद, मतिमंद, अनाथांचे दु:ख पुसून त्यांना आधार देण्यासाठी ‘मराठा लाइफ फाउंडेशन’ संस्था कार्यरत आहे.
हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : वेशीबाहेरील मुलांची शाळा
देशसेवा ते समाजसेवा
किसन लोखंडे हे मूळ शेतकरी व मेंढपाळ कुटुंबातील. त्यांच्या आई-वडिलांनी लहानपणापासून मुलांमध्ये सेवेचे संस्कार रुजवले. त्यामुळे किसन लोखंडे देशसेवेसाठी भारतीय लष्करात (आर्मी इंटेलिजेन्स) भरती झाले होते. कारगिल युद्धात ते जखमी झाले होते. निवृत्तीनंतर त्यांच्या आईने त्यांना अनाथांसाठी काम करण्याचा सल्ला दिला. त्यादृष्टीने ते २००६मध्ये कामाला लागले. ज्यांचे कोणीही नाही अशा अनाथ गतिमंद, मतिमंदांसाठी आणि मनोरुग्णांसाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले. दोन वर्षे त्यांनी खासगी कंपन्यांमध्ये काम करून काही पैसे जमा केले. त्यामध्ये लष्करी सेवेतून मिळालेल्या निवृत्ती वेतनातील रक्कम टाकून वसई पूर्वेला भाताणे येथे ६० लाखांना १ एकर जागा घेतली. तेथे अनाथांसाठी आश्रम उभारला. संस्थेला नाव काय द्यायचे हा प्रश्न होता. लोखंडे स्वत:ला शिवरायांचे मावळे मानतात. शिवरायांच्या तत्त्वांवर चालतात. त्यामुळे त्यांनी संस्थेला ‘मराठा लाइफ फाउंडेशन’ हे नाव दिले. किसन लोखंडे यांच्या पत्नी कल्पना या मुंबई पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. पहिल्या आठवड्यात वसईतील पोलिसांना सापडलेले दोन मतिमंद रुग्ण आले. त्यांचा सांभाळ आणि शुश्रूषा लोखंडे कुटुंबीय करू लागले. त्यानंतर अनाथांच्या सेवेसाठी किसन लोखंडे कुटुंबासह वसईतच स्थायिक झाले. बघता बघता संस्थेची व्याप्ती वाढू लागली. पोलिसांना रस्त्यावर जे जे बेघर गतिमंद, मतिमंद, मनोरुग्ण, वृद्ध आजारी व्यक्ती आढळायच्या त्यांना संस्थेत आणले जाऊ लागले. त्यांच्या कुटुंबीयांचा शोध लागेपर्यंत त्यांना येथे ठेवले जाते. त्यांना उपचार आणि निगा पुरवली जाते. आतापर्यंत संस्थेकडे आलेल्या १३००हून अधिक व्यक्तींना उपचारानंतर त्यांच्या कुटुंबांचा शोध लावून सुखरूप पाठवण्यात आले आहे. भटक्या गायी, जखमी कुत्री यांचीदेखील संस्थेत आणून देखभाल केली जाते.
अशी केली जाते सेवा
‘मराठा लाइफ फाउंडेशन’ हे पूर्णपणे नि:शुल्क सेवा करणारी संस्था आहे. येथील ९० टक्के रुग्ण पोलिसांनी आणलेले असतात. येथे दाखल झालेल्या रुग्णांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांची वैद्याकीय तपासणी केली जाते. ते आजारी असल्यास त्यांच्यावर उपचार केले जातात. गरजेप्रमाणे काहींना रुग्णालयात दाखल केले जाते. त्यांचे छोट्या समारंभात नामकरण केले जाते. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा गतिमंद, मतिमंद, मनोरुग्ण यांना स्वत:च्या कुटुंबाची माहिती देता येत नाही. तर अनेकांना कुटुंबीयांनीच टाकून दिलेले असते. अशा कुटुंबांचा शोध लागला तरी ते या रुग्णांना परत घेण्यास तयार नसतात. मग अशांना संस्था आपल्या कुटुंबाचा भाग म्हणून सांभाळते. सध्या संस्थेकडे असे २३५ रुग्ण आहेत. त्यात ९० महिला आणि १७ मुलांचा समावेश आहे. अनेक रुग्ण हे अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यांच्यासाठी वेगळा कक्ष उभारण्यात आला आहे. २० मनोरुग्ण असून त्यांच्यासाठी स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. सकाळी न्याहारी, दिवसभर करमणुकीचे कार्यक्रम, दुपारी जेवण, संध्याकाळी अल्पोपाहार आणि रात्री जेवण, फळे रुग्णांना दिले जातात.
हेही वाचा >>> ग्रंथसंपदेचे राखणदार: आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास
संपूर्ण कुटुंबाचा सहभाग
किसन लोखंडे यांच्याबरोबरच त्यांचे बंधू बाबूराव लोखंडे हेदेखील या कामात पूर्ण वेळ सक्रिय आहेत. किसन यांचा मुलगा शुभम एमबीए झाला असून तोदेखील सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी (एमएसडब्ल्यू) घेऊन पूर्ण वेळ संस्थेसाठी काम करत आहे. दुसरा मुलगा साहिल हाही महाविद्यालयाच्या शिक्षणाबरोबर आश्रमात सेवा करीत असतो. किसन लोखंडे यांच्या आई वंचलाबाई आणि वडील मल्हारी लोखंडे शेवटपर्यंत संस्थेत सेवा करत होते.
सर्वाधिक खर्च उपचारांवर
संस्थेत येणारे गतिमंत, मतिमंद, वृद्ध आणि मनोरुग्ण असतात. त्यांना विविध आजार असतात. त्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरविण्याबरोबरच त्यांच्यावर उपचारदेखील आवश्यक आहेत. यासाठी २१ जणांचे पथक कार्यरत आहेत. त्यात ३ परिचारिका आहेत. सामाजिक जाणिवेतून काही डॉक्टर सेवा देत असतात. दररोज सकाळी योग शिक्षिका योग शिकवतात. यात संस्थेचा सर्वाधिक खर्च औषधोपचारांवर होतो. कधीकधी रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागते. तो संपूर्ण खर्च संस्था करत असते.
मासिक खर्च भागवण्याचे आव्हान
संस्थेतील लोकांना जेवण, औषधोपचार, साहित्य, कर्मर्चा़यांचा पगार यासाठी महिन्याला ४ लाखांचा खर्च होतो. लोखंडे कुटुंबीय, संस्थेचे विश्वस्त मदतीचे आवाहन करून महिन्याला दीड लाखांपर्यंत पैसे जमा करतात. मात्र उर्वरित रकमेसाठी त्यांना पदरमोड करावी लागते. त्याशिवाय विविध साहित्यांची सतत गरज असते. २०२१ साली आलेल्या वादळात संस्थेचे नुकसान झाले. पत्रे उडून गेले होते. त्यावेळी मुंबईच्या जीवन ज्योत ड्रग बँकेने मदतीचा हात देऊन इमारत तयार करून दिली.
विस्तार करण्याचे उद्दिष्ट
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे त्यांच्या दुसऱ्या बंधूंनी अनाथांसाठी सेवा सुरू केली आहे. मुलगा शुभम याने भाईंदरच्या उत्तन येथे ‘मराठा लाइफ फाउंडेशन’ची आणखी एका शाखा उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक जण नाशिकजवळील त्रंब्यकेश्वर या धार्मिक ठिकाणी आपल्या वृद्ध आई-वडिलांना घेऊन येतात आणि तेथेच सोडून जातात. त्या परिसरात अनाथ वृद्धांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे शाखा सुरू करण्याचा मानस आहे. त्या ठिकाणी सर्वाधिक गरज असल्याचे किसन लोखंडे यांनी सांगितले. मुलांची संख्या वाढत असून त्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी उत्तम दर्जाची गुरुकुल शाळा सुरू करायची आहे. आजारी रुग्णांसाठी रुग्णालय आणि वाढत्या संख्येमुळे आणखी इमारत तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संस्थेला आर्थिक निधीची गरज आहे.
मराठा लाइफ फाउंडेशन
MARATHA LIFE FOUNDATION
या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.
ऑनलाईन देणगीसाठी तपशील
●बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, वसई रोड शाखा
●खाते क्रमांक : ११६१००१०६०१९
●आयएफएससी कोड : सीओएसबी००००११६
धनादेश येथे पाठवा…
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०
पुणे कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५
नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१
ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मेनशन, तनिष्क शोरूमच्या वरती, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. दूरध्वनी क्रमांक – २५३८५१३२
दिल्ली कार्यालयसंपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००