सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या स्नुषा अशी एक ओळख असलेल्या बहुआयामी कमलताई विचारे (वय ९५) यांचे ७ फेब्रुवारी रोजी निधन झाले. कमलताईचे सामाजिक, शैक्षणिक, महिला सबलीकरण आणि राजकीय क्षेत्रातील योगदान राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनन्यसाधारण आहे. अशा व्यक्तिमत्त्वाचे महाराष्ट्रातील नेत्यांना विस्मरण होणे ही मोठी शोकांतिका आहे.
सामाजिक आणि राजकीय पटलावर चमकदार कामगिरी करणाऱ्या कमलताईना सुमारे ४० वर्षापूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. त्या कुर्ला येथील रुग्णालयात उपचार घेत होत्या. तिथे त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार येणार होते. त्यामुळे कमलताईंचा वाॅर्ड स्वच्छ करण्याची गडबड सुरू होती. ती पाहून कमलाताईंनी संबंधितांना कसली गडबड सुरू आहे, असे विचारले. तेव्हा ते कर्मचारी म्हणाले ‘येथे कमलताईना भेटायला मुख्यमंत्री येणार आहेत.’ परंतु कमलताईनी या कर्मचाऱ्यांना सांगितले नाही की ती कमलताई मीच आहे! ही एकच घटना कमलताईच्या अथांगतेची कल्पना देऊन जाते.
हेही वाचा : कॉस्मोपॉलिटन युरोप हे मिथक!
१९६० पासून काँग्रेसच्या क्रियाशील सदस्य राहिलेल्या कमलताई अखिल भारतीय काँग्रेस महिला फ्रंटच्या सरचिटणीस होत्या. त्यांनी विविध विभागात केलेल्या नेत्रदीपक कार्याची दखल घेऊन दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनी १८ एप्रिल १९७४ रोजी कमलताईंना झाशीच्या राणीच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्वरूपातील चांदीची ढाल देऊन सन्मानित केले होते. लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘लूप’चा शोध लागल्यावर कमलताईनी भारतातील पहिले लूप शिबीर १९६५ साली अडूर या कोकणातल्या गावी मोठ्या कल्पकतेने यशस्वी करून दाखवले. इतकेच नव्हे तर ‘लूप’ची भारतातील पहिली पाच शिबिरे याच महाराष्ट्रातील भूमीवर संपन्न करून एक आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला! मागासवर्गीय भागात पाच पूर्वप्राथमिक आणि माध्यमिक शाळा स्थापून मुलांचे आयुष्य घडवण्याचे कार्य केले.
१२ एप्रिल १९२९ रोजी जन्मलेल्या कमलताईचे बालपण पुण्यात गेले. तिथेच त्यांची जडणघडण झाली. १९७५ साली आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त एका शिष्टमंडळातून त्या बर्लिनला गेल्या. त्यानंतर त्यांनी युरोपचा दौरा केला. ऑल इंडिया पीस ऑर्गनायझेशनतर्फे १९८५ साली रशिया, बल्गेरिया, हंगेरी, आणि झेकोस्लोव्हाकिया या देशांना त्यांनी भेटी दिल्या आणि अफाट जग पाहून स्वतःच्या अनुभवाचे क्षितिज विस्तारले. आपल्या राजकीय, आर्थिक, बौद्धिक अशा सर्व क्षमतांचा वापर महिला, वंचित आणि बहुजनांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी केला.
हेही वाचा : बंदी कसली… कोचिंग क्लासेसना ‘स्टार्टअप’ दर्जा द्या
सत्यशोधक कमलताई विचारे यांचे मित्र आणि अनेकार्थांनी मार्गदर्शक असलेले बॅरिस्टर शरद पालव सध्या इंग्लंडमध्ये आहेत. तेही नव्वदीत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ‘कोकण विकास समिती’चे अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांच्यानंतर ‘राष्ट्रीय एकात्मता समिती’ची धुरा सांभाळणारे, ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’च्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान असणारे आणि ‘संपन्न कोकण: संकल्प आणि प्रकल्प’ या ग्रंथाचे लेखक बॅरिस्टर शरद पालवांना कमलताईच्या निधनाची बातमी समजली. तेव्हा मला पाठवलेल्या पत्रात ते कमलताईविषयी लिहितात, ‘कमलताई एक ध्यासमूर्ती होत्या. स्त्री मुक्ती, स्त्री उद्धार, स्त्री विकास हा त्यांच्या जीवनाचा ध्यास होता आणि जणू या ध्यासासाठी त्यांचा श्वास होता. स्त्री सर्व प्रकारच्या जाचातून आणि काचातून मुक्त व्हावी यासाठी अनेकांनी आजवर प्रयत्न केले आणि गंमत अशी की अशा कार्यकर्त्यांमध्ये अधिक संख्येने पुरूषच आहेत. स्त्री उद्धाराच्या कार्यात स्रियांचा सहभाग तसा कमीच आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील कमलताईचे कार्य आणि नेतृत्व हे आगळेवेगळे होते. स्वतः स्थापन केलेल्या ‘स्त्रीहितवर्धिनी’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्त्री विकासाचे प्रयोग आणि प्रकल्प राबविले. त्यांचे हे कार्य अनेकांना पथदर्शक ठरले आहे. प्रत्येक स्त्रीने आचार विचारात स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि स्वत्व सदैव जपले पाहिजे. तिने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायला हवे, समाजकारण व राजकारण यामध्ये धडाडीने आपला सहभाग देत देत नेतृत्वाची धुराही समर्थपणे सांभाळायला हवी आणि यासाठी तिला योग्य शिक्षण, प्रशिक्षण, मार्गदर्शन व पुरेशी संधी सर्व सामाजिक व राजकीय घटकांकडून मिळायला हवी हा कमलताईचा केवळ आग्रह नव्हे तर ध्यास होता. यासाठी शक्य ते ते करण्यासाठी त्या शेवटपर्यंत कार्यरत होत्या. स्त्रियांना विविध उद्योगांचे शिक्षण, प्रशिक्षण मिळवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी संस्थेच्या माध्यमातून आणि त्यांना लाभलेल्या सामाजिक व राजकीय संस्थेच्या साहाय्याने केलेच शिवाय अशा प्रकारचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनाही त्या नेहमीच आधार देत राहिल्या. स्त्री विकासाचे काम कुठे चालले आहे याचा शोध त्या नेहमी घेत, तेथे प्रत्यक्ष जात असत आणि कामाची प्रसंशा करत. या कामासाठी त्यांनी ‘मुक्ताई’ ही स्वतंत्र विश्वस्त संस्था स्थापन केली आणि या माध्यमातून आपले काम शेवटपर्यंत सुरू ठेवले. त्यांच्या ध्यासाचे एक वेगळेपण असे की प्रत्येक गोष्टीमध्ये त्या स्त्री विकासाचा संदर्भ घेत असत. ज्या गोष्टींना स्त्री विकासाचा संदर्भ नाही अशा गोष्टीबद्दल कमलताईना कधी फारशी ओढ वाटली नाही. हे जसे वेगळेपण आहे तसे वेगळेपण आणखी एका गोष्टीचे आहे. एखाद्या मुलीने, महिलेने काही विशेष गोष्ट केली, काही पराक्रम केला, काही अलौकिक केले तर कमलताई त्यांची आवर्जून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दखल घेत. केवळ ध्यास असणं वेगळं आणि ध्यास जपणं वेगळं. कमलताईनी हा ध्यास मनापासून जपला होता. कमलताई आपल्या भवती वावरत होत्या त्यामुळे ते लक्षात येण्यापूर्वी त्या जगाचा, सर्वांचा प्रेमळ निरोप घेऊन हसत खेळत गेल्या.’ बॅरिस्टर पालवांच्या या निरीक्षणाची अनुभूती मला अनेकदा आली.
हेही वाचा : वाघापर्यंत प्लास्टिक पोहोचणे चुकीचेच, पण ती एकट्या वनविभागाचीच जबाबदारी कशी?
सत्यशोधक केशवराव विचारे यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक विद्यार्थी संघाच्या त्या प्रथम विद्यार्थिनी झाल्या. शिक्षिका या नात्याने मुंबईच्या कामगार विभागात स्त्री पुरूषांसाठी त्यांनी अनेक अभ्यास वर्ग चालविले. महाराष्ट्र राज्य समाजकल्याण सल्लागार मंडळाच्या सदस्य, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या सिनेट सदस्य, महाराष्ट्र राज्याच्या महात्मा फुले पुण्यतिथी शताब्दी समितीच्या उपाध्यक्ष याबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या अनेक उपक्रमात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. कमलताई विचारेंनी महिलांसाठी संसारशास्र अभ्यासक्रम बनवला होता जो स्वीकारून महाराष्ट्र शासनाने महिला विकास शाळा काढल्या. हा अभ्यासक्रम ग्रामीण भागात नेण्यासाठी महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यात ५०-५० महिलांची ५-५ दिवसांची शिबिरे आयोजित केली. ‘गृहिणी’ नावाचे उपयुक्त पुस्तकही लिहिले. १२ आगस्ट १९८६ रोजी ‘घरोबा’ नावाचे एक ग्राहक सहकारी भांडार सुरू केले. स्त्रियांचे, स्त्रियांनी चालवलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच भांडार आहे. १ जानेवारी १९७३ रोजी कमलताईंनी ‘स्त्रीसेवा सहकार संघ’ या नावाने एक मध्यवर्ती संस्था स्थापन केली. महाराष्ट्रातील २५ हून अधिक महिला औद्योगिक सहकारी संस्था या संघाच्या संलग्न सभासद आहेत. संपूर्ण देशात अशा प्रकारची ही पहिलीच संस्था आहे. महिला आणि एकूणच समाजाच्या कल्याणासाठी केलेल्या कामाची ही यादी खूप मोठी आहे.
कमलताईंचे समाज वर्तुळ खूप मोठे होते. भारतरत्न लता मंगेशकर, कवयित्री शांता शेळके, हमीद दलवाई, शरद पवार यांच्यासारख्या कला, साहित्य, समाज, राजकारण क्षेत्रातील दिग्गजांशी त्यांची वैचारिक आणि भावनिक जवळीक होती. महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक, सत्यशोधकी – संविधानवादी संघटना आणि संस्थांशी जवळचा संबंध होता. अशा व्यक्ती आणि संघटनांना त्यांनी भरीव आर्थिक आधार दिला. संस्थांना आर्थिक पाठबळ देण्याचे कार्य त्यांनी शेवटपर्यंत चालवले. एकदा त्या म्हणाल्या, ‘आता वय झाले, विस्मरण होतेय, शरीर थकलेय, पण जाण्यापूर्वी माझ्या जवळ जे आहे ते समाजाला परत देऊन जायचंय. ते न करता मी वर गेले तर “तो” पुन्हा खाली ढकलून देईन आणि म्हणेल, ‘जा, तुझे राहिलेले काम पूर्ण करून ये.’’ आजची राजकीय परिस्थिती, धर्मवादी राजकारण याबद्दल त्या अनेकवेळा बेचैनी व्यक्त करत. ‘भारतातले सर्व सेक्युलर, पुरोगामी भारताबाहेर गेलेत का? कोणी आवाज का उठवत नाही? का बोलत नाहीत?’ ही अस्वस्थता व्यक्त करीत.
डॉ. बाबा आढाव यांनी जेव्हा ‘एक गाव – एक पाणवठा’ मोहीम राबविली तेव्हा त्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष होत्या. विदर्भातील पांगरी येथे कमलताई आणि प्रा. ग. प्र प्रधान यांनी या अभियानात सहभाग घेतला. ज्यामुळे त्यांना एक दिवसाचा तुरुंगवास झाला होता. गेल्या ३ जानेवारी रोजी त्यांनी महात्मा फुले वाड्यात जाऊन सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केले आणि डॉ. बाबा आढाव, उल्हासदादा पवार आणि उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद केला.
हेही वाचा : म्यानमारच्या सीमेवरले संभाव्य कुंपण कुणाला टोचणार?
वयाच्या ९५ व्या वर्षातही त्यांचे वाचन अफाट होते. शरीर थकलेले असले तरी तल्लख बुध्दी, विनोदी स्वभाव, चिमटे काढणे, अगदी निरागस हसणे शेवटपर्यंत कायम राहिले. आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या कमलताईंनी कधीही कोणाविषयी तक्रार केली नाही. समर्थ, संपन्न आणि समर्पित आयुष्य जगलेल्या परंतु शेवटच्या काळात अस्वस्थ आणि एकाकी झालेल्या कमलताईच्या चेहऱ्यावर प्रसन्नता मात्र आत ज्वालामुखी असल्याचे जाणवत होते.
कविवर्य बा. भ. बोरकरांच्या शब्दात मी कमलताईना अभिवादन करतो!
‘देखणा देहान्त तो, जो सागरी सूर्यास्तसा!
अग्निचा पेरून जातो, रात्रगर्भी वारसा!!’
tambolimm@rediffmail.com