डॉ. सुनीता सावरकर

आंबेडकरी चळवळ पुढे नेणाऱ्या त्या दोघी, आंबेडकर जयंती साजरी होताना प्रेरक ठरोत..

activists stage sit-in protest over removal of unauthorized statue of dr ambedkar
डॉ. आंबेडकरांचा विनापरवाना बसविलेला पुतळा हटवल्याने कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Tipeshwar sanctuary hunters noose stuck around neck of tigress named PC
वाघिणीच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास, वाघांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
Cowherd died , tiger attack, Chandrapur,
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…
Which animals are banned in India
भारतात ‘हे’ २० प्राणी पाळण्यावर बंदी; घरात आढळल्यास होऊ शकते कारवाई
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
Tiger dies after being hit by unknown vehicle in vardha
वाघाचा अपघातात मृत्यू, आईपासून दुरावला अन्…

इंग्रजांच्या आगमनानंतर भारतीय समाजव्यवस्थेत आमूलाग्र बदल होऊन शिक्षण घेण्याचा एका विशिष्ट वर्गासाठी असलेला अधिकार सर्वाना मिळाला. ख्रिश्चन मिशनरी, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज यांनी अस्पृश्य मुलांना शिकता यावे, यासाठी प्रयत्न केले. परिणामी अस्पृश्यांमध्ये एक अल्पशिक्षित पिढी निर्माण झाली. यामध्ये गोपाळबाबा वलंगकर, लहूजी उस्ताद साळवे, शिवराम जानबा कांबळे यांच्या समकालीन असणारे महादजी रामचंद्र पालवणकर, रामजी पांडू पालवणकर, संभू कृष्णाजी देवरुखकर, भागूजी रामजी विनेरकर या चर्मकार समाजातील सुधारकांनी जाती उन्नतीची चळवळ सुरू केली. अस्पृश्य समाजातील प्रत्येक जातीत परिवर्तनवादी विचारांचा एक वर्ग तयार झाला. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांसाठी संघर्ष करत असताना जात, धर्म, स्त्री-प्रश्न, भेदभाव, अस्पृश्यता, इ. अनेक विषय हाताळले गेले. स्वत:ला विकसित करण्याचे अधिकार परत मिळवून, पुन्हा नव्याने सन्मानाने जीवन जगण्याचा प्रयत्न भारतातील अस्पृश्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातील मानवमुक्ती लढय़ाचे स्वरूप व्यापक होते. हा संघर्ष नाकारल्या गेलेल्या प्रत्येक समूहासाठी, त्यांच्या अधिकारांसाठीचा हा लढा होता. त्यामुळे ज्यांना ज्यांना मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान समजले, त्या प्रत्येक घटकाने या संग्रामामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत योगदान दिले. या संघर्षांत अस्पृश्यांमधील विविध जातींतील स्त्री-पुरुषांचा समावेश कमी-अधिक प्रमाणात होता. त्यामध्ये अस्पृश्यांमधील ढोर-चांभार या समाजातील  दत्तोबा पवार, गंगाधर यशवंत पोळ, सीताराम शिवतरकर, पा. ना. राजभोज आदींचा समावेश महत्त्वपूर्ण आहे.

एकूणच भारतीय इतिहास लेखनात स्त्री हा कायम दुर्लक्षित राहिलेला घटक आहे. अनेक स्त्रियांच्या भारतीय परिवर्तन चळवळीतील ऐतिहासिक योगदानाची नोंद घेणे गरजेचे आहे. यामध्ये ढोर-चांभार समाजातील महिलाही तत्कालीन सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत दिसून येतात. परंतु, त्यांच्या कार्य-कर्तृत्वाची नोंद घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे ढोर-चांभार समूहाला कोणत्याही प्रकारच्या सामाजिक परिवर्तनाचा असा इतिहासच नाही, असा समज होऊन बसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ‘‘जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज इतिहास घडवू शकत नाही.’’ आजच्या ढोर-चांभार समाजाला ही गोष्ट लागू होते. खरं तर बसवेश्वरांच्या अनुभव मंडपातील सदस्य असलेल्या कल्याणम्मा, हरळ्ळय्या, कक्कैय्या यांच्या काळापासून चर्मकार समाज सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय आहे. आंबेडकरी चळवळीतही ढोर-चांभार स्त्रियांनी सक्रिय योगदान दिलेले दिसून येते. ज्या काळात स्त्री शिक्षणाला हळूहळू सुरुवात झाली होती, त्या काळात शिकून, जातीची आणि पितृसत्तेची बंधने तोडून, आंबेडकरी चळवळीत भाग घेणे; नवीन विचार स्वीकारणे; परंपरेने मान्य असलेले विचार नाकारणे, हे सर्व करताना या स्त्रिया दिसतात. त्यादरम्यान होणारा त्रास, अवहेलना सहन करत नवीन मूल्ये रुजवण्यासाठी धडपड करणे, हे अतिशय कठीण काम असते. परंतु, यामुळेच एक नवा आदर्श निर्माण होत असतो; येणाऱ्या पिढीला चांगल्या संस्काराचा वारसा मिळत असतो. म्हणून परिवर्तनवादी मूल्ये स्वीकारणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या कार्याची नोंद होणे अत्यावश्यक असते.

आंबेडकरी चळवळीत भाग घेणाऱ्या ढोर-चांभार समाजातील अनेक स्त्रियांपैकी दोन अतिशय महत्त्वाच्या स्त्रिया म्हणजे ढोर समाजातील सावित्रीबाई बोराडे (१९०१), चांभार समाजातील गुणाबाई गाडेकर (१९०६-१९७५) या होत. त्यांचा डॉ. बाबासाहेब यांच्या परिवर्तन चळवळीतील सक्रिय सहभाग आणि ढोर-चांभार जात्योन्नतीच्या चळवळीतील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या दोघी जिवलग मैत्रिणी होत्या. पुण्याच्या सेवासदनमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना अनेक वेळा अस्पृश्यतेचे आणि जातिभेदाचे अनुभव आले होते. याविषयी गुणाबाई गाडेकर यांच्या आत्मचरित्रात उल्लेख आहे की या दोघी रस्त्याने जाताना टारगट मुले खडे टाकायची आणि म्हणायची, ‘आमच्या चपला शिवून देता का’? तेव्हा सावित्रीबाई कणखर भूमिका घेत.

बाबासाहेब एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आले असता त्यांनी चांभार, ढोर, महार, मांग वगैरे समाजातील मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था पाहण्यासाठी सेवासदनला भेट दिली होती. तेव्हा या दोघींचा त्यांच्याशी परिचय झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर सावित्रीबाई बोराडे यांनी मुंबईतील शाळेत नोकरी स्वीकारली. त्यामुळे त्यांचा संबंध सातत्याने आंबेडकरी चळवळीशी आला. गुणाबाई गाडेकर यांनी पुण्यातील मंगळवार पेठेत महारवाडा येथे मुलींच्या शाळेत नोकरी स्वीकारली. या दोघींनीही आयुष्यभर सामाजिक कार्य केले. पुण्यातील पर्वती मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहात गुणाबाई गाडेकर यांचा सक्रिय सहभाग होता. सत्याग्रहाच्या निमित्ताने भाषण देणे; प्रत्येक सभेला हजार राहणे; ठराव मांडणे; समाजात जाऊन कामे करणे इत्यादी विविध कामे त्यांनी केलेली दिसून येतात.

१० ऑगस्ट, १९३० रोजी नागपूर येथे घेण्यात आलेल्या अखिल भारतीय डिप्रेस्ड क्लासच्या पहिल्या अधिवेशनात महिलांचेही अधिवेशन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या पहिल्या महिला अधिवेशनाचे अध्यक्ष गुणाबाई गाडेकर यांना केले होते. १९३६ ला नागपूर येथील सभेसाठीसुद्धा त्यांना आमंत्रित केले गेले होते. सावित्रीबाई बोराडे ‘जनता’ वृत्तपत्राच्या संपादकीय मंडळावर होत्या. मुंबईतील स्त्रियांच्या अनेक सभांमध्ये त्यांचा सहभाग असे. रमाई आंबेडकर, वेणूताई शिवतरकर, कु. अनसूया शिवतरकर, जानकीबाई चांदोरकर यांच्या उपस्थितीतील काही कार्यक्रमांना सावित्रीबाई अध्यक्ष होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राउंड टेबल कॉन्फरन्समधील कामगिरीला पाठिंबा देणे; बहिष्कृत समाज महिला मंडळाची स्थापना; नाशिक सत्याग्रहास पाठिंबा, इ. विषय त्यांच्या अध्यक्षतेखालील सभेमध्ये घेतले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाच्या निमिताने १९३३ मध्ये घेतलेल्या मुंबईतील परळ येथील सभेच्या सावित्रीबाई अध्यक्ष होत्या. त्या सभेत त्यांनी डॉ. बाबासाहेबांचे यांचे चरित्र वर्णन केले आहे. ढोर आणि चांभार समाजाच्या सामाजिक सुधारणा कार्यक्रमांमध्येही या दोघींचे महत्त्वाचे योगदान आहे. सुरुवातीला संयुक्तपणे झालेल्या ढोर-चांभार जातीच्या सभांना त्या हजर राहात आणि वेगवेगळे ठरावही मांडत. ‘बॉम्बे क्रॉनिक’ वृत्तपत्राने सावित्रीबाई बोराडे यांचा उल्लेख ‘सोशल रिफॉर्मर’ असा केला आहे. डॉ. बाबासाहेब यांनी अस्पृश्यांमधील सर्व जातींतील लोकांना एकत्र करून, त्यांच्यात एकीची भावना निर्माण करण्याचा सतत प्रयत्न केला. कारण या जाती वेगवेगळय़ा असल्या तरी त्यांचे इतरांच्या दृष्टीत सामाजिक मूल्य सारखेच होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्त्रियांच्या कर्तृत्वावर खूप विश्वास होता. त्यांनी सभेच्या आयोजनापासून ते समाजाला मार्गदर्शन करण्यापर्यंतची मोकळीक आंबेडकरी चळवळीत स्त्रियांना नेहमीच दिलेली दिसते. इतर समकालीन चळवळींच्या तुलनेत आंबेडकरी चळवळीच्या या भूमिकेचे वेगळेपण ठळकपणे दिसून येते. आंबेडकरी चळवळीत सहभागी असलेल्या इतर ढोर-चांभार स्त्रिया आणि या दोघींमध्ये फरक आहे. सावित्रीबाई आणि गुणाबाई या दोघींना चळवळीचीच नाही, तर शिक्षणाचीही पार्श्वभूमी नव्हती, तरीसुद्धा शिक्षण घेऊन; सुसंस्कृत होऊन; मानवमुक्तीच्या विचाराला प्राथमिकता देऊन वैचारिक आधारावर त्यांनी आंबेडकरी चळवळीत सक्रिय योगदान दिले. जातीतील सभांमध्ये सहभाग घेणे हे जेवढे सोपे होते, तेवढेच जातीची बंधने तोडून आंबेडकरी चळवळीत काम कठीण करणे होते. चळवळीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही या दोघींनी जातीव्यवस्था मोडून, मानवी अस्मिता जपत सामाजिक क्रांतीच्या मार्गावर वाटचाल केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना चळवळीचा भाग बनवले ही खूप मोठी गोष्ट आहे. या दोघींचेही त्या काळातील सामाजिक क्षेत्रातील योगदान अनन्यसाधारण आहे. परंतु, त्यांच्यावर अजूनही संशोधन झालेले नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील या महानायिका आजही अभ्यासकांच्या नजरेतून दुर्लक्षित राहिल्या आहेत. 

लेखिका औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभागात साहाय्यक प्राध्यापक आहेत.

sunitsawarkar@gmail.com

Story img Loader