प्रसन्न अंबादास देशपांडे
वैचारिक आणि कलेच्या माध्यमातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्या भारतीय संस्कृतीने आपल्याला स्वाभाविकपणे दिलेले आहे, त्याच भारतीय संस्कृतीने सौंदर्यशास्त्र आणि कलेमधील निर्मिती यासंदर्भात एक अप्रतिम तत्त्वसुद्धा दिलेले आहे. ते तत्त्व म्हणजे ‘औचित्य’. प्रबोधनकार ठाकरे जेव्हा ‘संगीत सीताशुद्धी’ या नाटकात सीता आणि त्रिजटा यांच्यातील संवादाचा वापर, भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी जनमानसाला पराधीन असणाऱ्या सीतामाई यांची उपमा देतात आणि स्वातंत्र्याच्या आग्रहाचा अन्वयार्थ सर्वांच्या मनापर्यंत पोहोचवतात, तेव्हा एका अप्रतिम कलाविष्काराचे औचित्यपूर्ण सौंदर्य ते साधतात. म्हणूनच, त्या १९०९ मधील कलाकृतीचा २०२३ मध्ये आपण संदर्भ देऊ शकण्या इतपत ती कलाकृती महत्त्वाची ठरते. अडीच हजाराहून अधिक वर्ष शाश्वत अशी भारतीय संस्कृती ‘वर्तमानाचे बंधन’ यापेक्षा ‘गतकाळातील कथानकांच्या चौकटीत नव्या आशयाचे रंग भरण्याची प्रयोगशीलता’ तेवढीच शाश्वत ठेवते कारण त्याच संस्कृतीतील कला आणि सौदर्यशास्त्र परंपरा, ‘औचित्य’ या तत्त्वाचा अवलंब करत आलेली असते. अशा कलेतील ‘प्रयोगशीलते’ला कोणत्याही विचारधारेच्या अपयशातून येणारे ‘वर्तमानाचे बंधन’ खरेच लागू नसते. पण कोणालातरी कोणत्यातरी कारणांनी खूप आनंद झाला आणि तो बघवत नाही म्हणून ‘रडीचा डाव’ म्हणून उधळलेली बेरंगी प्रयोगशीलता भरतमुनींच्या ‘नाट्यशास्त्रातील’ ‘औचित्य’ संकल्पनेचा भंग जेव्हा करते, तेंव्हा रसिक श्रोते ‘रसानुभव’ करण्यापेक्षा ‘रसभंगाचा’ अनुभव करतात. रसभंग झालेले श्रोते मग रंगमंचाची चवथी भिंत विसरतात आणि मग ‘अवघा रंग एक होतो’. ‘सभा-औचित्य’ सांभाळण्याचे दायित्व केवळ श्रोत्यांचे नसून, सादरकर्ते आणि श्रोते यांनी एकत्रितपणे ते पार पडायचे असते.
राहिला प्रश्न नेमके काय घडले याचा. २ फेब्रुवारीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात ‘रामलीला’ कलाकारांच्या ‘बॅकस्टेज लाइफ’वर आधारित नाटकाचे ‘शैक्षणिक बॅक-स्टेज लाइफ’ लक्षात घेतले तर ते प्रहसन बरेच आधी सुरु झाले आहे हे लक्षात येते. ललित कला केंद्र काही व्यायसायिक रंगमंच नाही. कलेचे शिक्षण घेण्याचा, देण्याचा आणि त्यांनी एकत्रितपणे काय दिले-घेतले आहे याचे सादरीकरण श्रोते आणि समाज यांच्यासमोर करण्याचा तो मंच आहे. ललित कला केंद्रातील नाट्यकला शिकणारे, ‘जब वुई मेट’ मधील ‘रामलीला’ प्रहसन सादर करणारे विद्यार्थी खरेच नाट्यभोळे आहेत असे मानले तरीही श्रोत्यांसमोर काय आणि कसे सादर करावे किंवा नाही हे त्यांना कळले नाही वगैरे हा मुद्दाच नाही. सादरीकरणाचा परिणाम हा प्रश्न नंतर उद्भवला. रस आणि औचित्य भंगण्याचा कयास त्यांना लावता आला नाही हे पण एकवेळ मान्य करू पण आया-बहिणी वरील अर्वाच्य शिव्या प्रहसनात घालून लोक भावनेप्रती त्यांनी साकारलेली असहिष्णुता आणि चिथावणीखोर भाषा याचे स्पष्टीकरण केवळ हेच कसे असू शकते की हा प्रयोगशीलतेचा नमुना होता? अशा ‘प्रयोगशिलतेची’ नशा थेट विशिष्ट विचारधारामूलक अभ्यासक्रमातून आणि संस्कृतीभंजक नाट्य प्रशिक्षणातून या भोळ्या विद्यार्थ्यांना करून दिली जाते याचे वाईट वाटते.
हेही वाचा : कोचिंग क्लासेस हवेत कशाला?
माझ्या माहितीप्रमाणे, अमेरिकेतील रशियन साम्यवादी राजवटीच्या काळातील नाट्य परंपरेतील कॉन्स्टॅँटिन स्तानिस्लावस्कीने प्रस्थापित केलेली आणि अमेरिकेतील ब्रॉडवे थिएटर संबंधित नाटककारांनी प्रसारित केलेली ‘मेथड ॲक्टिंग’ पद्धतीची नाट्यसराव आणि सादरीकरणाची शैली ही अभ्यासक्रमातून शिकवली जाते. पुन्हा माझ्या माहितीप्रमाणे नाट्य कलावंतांच्या भावविश्वाचा मनोविकास हाच अशा नाटकांचा आशय असतो आणि त्यासाठी या कलाकरांच्या ‘बॅकस्टेज लाइफ’मधील प्रसंग हेच प्रत्यक्ष नाटकात सादर केले जातात. अशा या गुंतागुंतीच्या नाट्य-प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देतांना लोकमान्यता पावलेले महापुरुष, श्रद्धास्थान, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भात वंदनीय मानले जाणारे समकालिक अथवा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व यांच्याबद्दल प्रहसनात्मक मांडणी करताना ‘बॅड टेस्ट’ आणि रसभंग होणे या नाट्यानुभावाशी अत्यंत महत्त्वाच्या पैलूचे प्रशिक्षण नेमके कसे राहून गेले? आणि, या अन्य सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये उपजलेल्या कला-परंपरेच्या आधारे भारतीय सांस्कृतिक आणि ललित-कला प्रभावित करण्याच्या प्रयत्नात ‘औचित्य’ नावाचे काहीतरी असते हेच नेमके शिकवायचे राहून गेले?
जगभरातून येणाऱ्या विचारांना आणि परंपरांना भारतीय लोक केवळ ते ‘बाहेरून’ आले आहेत म्हणून कधीच नाकारत नाही. असे विचार नाकारणे म्हणजे अभारतीय वागणे होईल, परंतु, ते स्वीकारताना आणि कालाविष्कारातून ते मांडतांना निदान संस्कृती आणि समाज यांच्या दृष्टीतून सादरीकरणाचा आशय, विषय, शैली आणि रसनिर्मिती साधक-बाधक आहे की नाही याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली जात नसेल तर काय फक्त अशा परंपरांचे अपरिपक्व आणि औचित्यहीन अनुकरण एवढेच फक्त या विद्यार्थ्यांना शिकवले जाते? व्हायोलीन हे वाद्य असेच ‘बाहेरून’ आलेले असतांना दाक्षिणात्य किंवा कर्नाटकी शास्त्रीय संगीतात ते इतके चपखलपणे स्वीकारल्या गेले कारण त्या वाद्यावर कर्नाटकी शास्त्रीय संगीताच्या उज्ज्वल परंपरेचे संस्कार केले गेले. असे अनेक उदाहरण देता येतील. केवळ ‘परकीय’ संदर्भ आहेत म्हणून काही विशिष्ट विचार, आचार भारतीय समाज नाकारत नाही. त्यांच्या विचारासाहित परकीयांना देखील भारतात सामावून घेतले जाते. हे स्वाभाविकपणे घडते. यांत कोणताही अभिनिवेष भारतीय लोक सहसा बाळगत नाहीत. परंतु, भारतीय जनमानसाला कलाविष्काराच्या माध्यमातून विशिष्ट विचारधारेचे सांस्कृतिक धक्के देऊन ‘नाट्य कलाकारांच्या अभिनय संपन्नतेचा मनोविकास’ टिपणाऱ्या या नाट्यसराव आणि सादरीकारणाच्या नाट्य आविष्काराचे असे टवाळखोर सादरीकरण करण्याऐवजी नाटककार अतुल पेठे यांनी, महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्याच्या आधारे साकारलेल्या प्रगल्भ आणि औचित्यपूर्ण अशा ‘सत्यशोधक’ नाट्य कलाकृतीचे अनुकरण करून विधायक नाट्य अविष्कार साकारणे याचे प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना दिले असते, तर सादरकर्ते, श्रोते आणि समाज यांच्या रसभंगाचा परिणाम निश्चितच टाळता आला असता.
हेही वाचा : पंतप्रधान मोदी यांचे उत्कट ‘नेहरूप्रेम’!
शिव्या या भाषेची अभिव्यक्ती आहेतच पण कला, नाट्य सौंदर्य आणि रसास्वाद यांचा अनुभव घेण्यास आतुर असलेल्या श्रोत्यांना एवढे कळते की घरात शौचाच्या जागेला संडास म्हणतात आणि तो शहरात आपल्या घरातच असतो म्हणून कोणी बाहेरून घरी जाताना संडासमध्ये जातो असे म्हणत नाही. घर म्हणजे घर आणि भाषा म्हणजे भाषा. संडास घरात असला तरी त्याला घर म्हणायचे नसते आणि शिव्या भाषेत असतील तर फक्त शिव्यांना फक्त भाषेची अभिव्यक्ती म्हणायचे नसते हे लोकांना कळते. गायन मैफिलीत सुद्धा हरकतींची ‘जागा’ फार जपली जाते ती यासाठीच.
“शिक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण समाजाची सेवा करण्याची इच्छा निर्माण करणे तसेच शिक्षणातून प्राप्त ज्ञानाच्या आधारे केवळ स्वकल्याण नव्हे तर जनकल्याण साधणे हे शिक्षण व्यवस्थेचे ध्येय आहे.” स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना (प. जवाहरलाल नेहरू यांना) असे सांगावे वाटले कारण विद्यापीठीय शिक्षण व्यवस्था आणि समाज जीवन हे एकमेकांत प्रवाहित राहावे आणि त्यायोगे उच्च शिक्षण समाजाभिमुख व्हावे हे त्यांना जाणवले. समाज शिक्षणाभिमुख तेंव्हाच होईल जेव्हा केवळ समाजविन्मुख असणे म्हणजे म्हणजे ‘नवा विचार’ मांडणे असा शिक्षणाचा अनुचित विचार उच्च शिक्षणातून पसरविणे बंद होईल. वेगळा विचार मांडणे म्हणजे जाणूनबुजून बीभत्स अंगविक्षेप, अश्लील संवाद आणि अश्लाघ्य शिव्या यांचा वापर नाट्य प्रयोगशीलता म्हणून जोपासणे याला कलेचे, इतिहासाचे, शिक्षणाचे प्रगतीशील असणे असे कसे बरे म्हणता येईल? वैचारिक धाडस करताना आपले धाडस अन्य कोणासाठी मनस्ताप ठरत असेल आणि असे धाडस करून नवे जग साकारायचे असेल तर आपण नवतेच्या या औचित्यहीन अविष्कारांनी समाज जोडतो आहोत की तोडतो आहोत? आणि, घडलेल्या एकूणच प्रसंगाला केवळ केंद्रातील विद्यार्थ्यांनी केलेले वैचारिक धाडस असे म्हणणे म्हणजे खरी समस्या दडपवणे असाच प्रकार आहे. या विद्यार्थ्यांना सामाजिक विघटनवादी अशा स्वघातकी आणि अशैक्षणिक अशा सांस्कृतिक राजकारणासाठी केवळ एक प्रक्षोभक माध्यम म्हणून वापरले जाणे म्हणजे राजकीय विचारधारेच्या आधारे साधल्या जाणाऱ्या सांस्कृतिक राजकारणासाठी विद्यापीठीय उच्चशिक्षणाचे केवळ एक माध्यम असा वापर करण्यासारखे आहे. भारत देशाला आत्यंतिक गरजेची असलेली शैक्षणिक गुणवत्ता आणि विकास अशा वैचारिक धाडसातून कसा साधला जाऊ शकतो? याचा निषेध करावा तेवढा थोडाच.
हेही वाचा : वेदांमधून बुद्धिप्रामाण्याकडे नेणारे महर्षी दयानंद!
चर्चा होईल, पण कशी?
‘मर्यादा’ पाळणे हा पुरषोत्तम होण्याचा एक निकष प्रस्थापित करणाऱ्या श्री राम या देवत्त्वाला पोचलेल्या रामायण महाकाव्यातील महानायकाचे, अयोध्येतील श्रीराम या ऐतिहासिक आणि देवत्त्व बहाल केलेल्या महापुरुषाच्या, पुनर्स्थापित झालेल्या अयोध्येतील मंदिराचा याच भारतीय समाजातील सर्व स्तरातील लोकांनी व्यक्त केलेला आनंद या वास्तवाला सपशेल नाकारून एका विशिष्ट नाट्य प्रयोगाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देऊन अभ्यासक्रमातील कोण्या एका ज्ञान घटकाचे आणि अशा या प्रयोगाचे सार्वजनिक सादरीकरण म्हणजे एक सांस्कृतिक क्रांती करण्याचा नव-अविष्कार आहे असे त्या कोवळ्या मनाच्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवून नेमके कोणते ‘नवे जग’ आपण साकारतोय असा प्रश्न सामान्य माणसाला पडणारच, असा माझा कयास आहे. चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न निश्चितच सोडवला जाऊ शकतो. फक्त, सादरीकरणात, लोकांनी आपापल्या फोनवर बघितलेल्या, ऐकलेल्या आया-बहिणींच्या नावाने दिलेल्या शिव्या, या प्रकाराला ‘विद्यापीठीय शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या नवीन जगाच्या निर्मिती करण्यासाठी केलेल्या सांस्कृतिक क्रांतीच्या, वैचारिक धाडसाच्या अंगाने केलेला निरागस असा रसिकता जोपासणारा नाट्य अविष्कार’ असे धडधडीत समर्थन चर्चेच्या प्रयत्नात बाधाच निर्माण करेल. औचित्यपूर्ण कला नाट्य आविष्कार याला केवळ विकल्प देण्यासाठी म्हणून ‘औचित्यभंग करणे’ हा विकल्प देण्याचा प्रयत्न होत असेल तर ‘औचित्य-आग्रह’ हा विकल्प समाज स्वीकारेल. राजकीय सत्ता जशी समाजमन संस्कारित करण्याचे एकमेव माध्यम असू शकत नाही तसेच उच्चशिक्षणाधारित स्वघोषित वैचारिक सत्ता सुद्धा समाज मनाचा अनादर करून ‘जो जे वांछील तो ते लाहो’ हे सूत्र जपणारे आणि जगणारे नवे जग निर्माण करू शकणार नाही.
हेही वाचा : महाराष्ट्र हेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी!
गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांच्या सुप्रसिद्ध ‘चित्त जेथा भयशून्य’ या कवितेतील तिसऱ्या कडव्यातील या ओळी इथे खूप समर्पक वाटतात (शुद्धलेखन माझे).
जेथा तुच्छ आचारेर मरुबालुराशि
बिचारेर स्रोतःपथे फेले नाइ ग्रासि
‘जेथे चित्त भयमुक्त असेल, शिर उंच असेल, ज्ञान मुक्त असेल अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात माझ्या देशाला जाग येऊ दे’, अशा उदात्त अर्थ असलेल्या कवितेत टागोर पुढे म्हणतात, ‘जेथे विचारांची सरिता तुच्छ आचरणाच्या वाळवंटात स्वतःचा प्रवाह हरवून बसणार नाही, अशाही स्वातंत्र्याच्या आणि स्वराज्याच्या स्वर्गात, हे विधात्या, माझ्या देशाला जाग येऊ दे’.
लेखक फर्ग्युसन महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत.
shabda11177@gmail.com