प्रा. संजीव सोनवणे
ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान,
पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान
हे मंगेश पाडगावकर यांनी शब्दबद्ध केलेले आणि संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेले गीत २६ मार्च १९९१ रोजी पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात प्रथम गायले गेले. ती परंपरा आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानंतरही जोपासली जात आहे. १० फेब्रुवारी १९४९ रोजी ।।य: क्रियावान् स पण्डितः।। हे ब्रीद घेऊन बॅ. मु. रा. तथा बाबासाहेब जयकरांच्या नेतृत्वाखाली प्रथम स्थापन झालेले पुणे विद्यापीठ व आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतातच नव्हे तर जगभर एक उत्तम विद्यापीठ म्हणून गौरविले जाते. विद्यापीठाने १० फेब्रुवारी २०२३ रोजी ७४ वर्षे पूर्ण करून अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.
उत्तर, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्र कार्यक्षेत्रात असलेले व मराठी भाषेतून ज्ञानप्राप्तीची सुविधा देणारे विद्यापीठ म्हणून स्थापन झालेल्या या विद्यापीठातून १९६२ साली शिवाजी विद्यापीठाची व १९८० साली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची निर्मिती झाली. आज विद्यापीठाअंतर्गत पुणे, नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यांत ५२ विभाग, ७७०५ महाविद्यालये, २३४ संस्था व ३१२ संशोधन केंद्रे, तसेच ७१ संशोधन संस्थांमध्ये ७ लाख ३५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाच्या ४११ एकरांच्या विस्तीर्ण आवारात आजमितीस ५२ विविध शैक्षणिक विभाग पूर्ण क्षमतेने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. गेल्या ७४ वर्षांतील विद्यापीठाची ही उल्लेखनीय कामगिरी म्हणता येईल. बॅ. जयकर, रँग्लर परांजपे, दत्तो वामन पोतदार, प्रा. आपटे, प्रा. कर्वे, प्रा. गाडगीळ, प्राचार्य दाभोळकर, प्रा. राम ताकवले, प्रा. गुप्ते, डॉ. गोवारीकर, प्रा. निगवेकर, प्रा. कोळस्कर, प्रा. शेवगांवकर, डॉ. नरेंद्र जाधव, प्रा. करमळकर अशा व इतर मान्यवर शिक्षणतज्ज्ञांनी विद्यापीठाचे समर्थ नेतृत्व केले. गुणवत्तेच्या निकषावर विद्यापीठाला सामाजिक शास्त्रे, मानव्यशास्त्रे, भाषा, पत्रकारिता व माध्यमशास्त्र, शिक्षणशास्त्र व क्रीडा, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रात जगभरातून विद्यार्थी संशोधन व अध्ययनासाठी प्राधान्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची निवड करतात. विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेतील विभागांचा संशोधन दर्जा जागतिक स्तराचा असून या विभागातील संशोधकांनी जागतिक क्रमवारीत उच्च स्थान प्राप्त केले आहे. डॉ. निगवेकर, डॉ. राम ताकवले, डॉ. भूषण पटवर्धन, डॉ. कोळस्कर, डॉ. नरेंद्र जाधव यांसारख्या मातब्बर व्यक्तिमत्त्वांनी देशाच्या यूजीसी, नॅक, नीति आयोग तसेच इतर राष्ट्रीय वैज्ञानिक संस्थांमध्ये बहुमूल्य नेतृत्व केले आहे. आयुका, राष्ट्रीय कोशिका केंद्र, टीएफआयआर तसेच पहिला महासंगणक तयार करणाऱ्या सी-डॅक सारख्या संस्था विद्यापीठाच्या आवारात आहेत. विद्यापीठाच्या ईएमआरसी, आयबीबी, पुम्बा, एसपीपीयू-मेलबॉर्न विद्यापीठ अकादमी, सायन्स पार्क, सेंट्रल इन्स्ट्रूमेंटेशन केंद्र, लोकशाही अध्ययन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्र, प्रगततंत्र दिव्यांग विद्यार्थी अध्ययन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, यूजीसी मानक संसाधन केंद्र, डिझाइन इनोव्हेशन केंद्र, प्रगत संस्कृत अध्ययन केंद्र, ललित कला केंद्र इत्यादी अनेक वैशिष्ट्यपूर्ण केंद्र व कलम ८ अंतर्गत एसपीपीयू एज्युटेक, माजी विद्यार्थ्यांचे एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन या ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून उद्योग, समाज, जगातील नामवंत विद्यापीठांशी सामंजस्य करारांतून संशोधन, अध्ययन, अध्यापनात योगदान देत असताना नवे रेणू, अपारंपरिक ऊर्जा, जैवतंत्रज्ञान, संरक्षण, भाषा, सामाजिक, आरोग्य अवकाशशास्त्र, तंत्रज्ञान विकास व त्यातून८ बौद्धिक स्वामित्व हक्क मिळविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. संगणकशास्त्र विभाग, जैवमाहितीशास्त्र असे त्या त्या क्षेत्रातील भारतातील पहिले विभाग विद्यापीठात स्थापन झाले. औद्योगिक क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकास केंद्र, तंत्रज्ञान विभाग, एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन अग्रेसर असून २२ नव्या स्टार्टअप कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
विद्यापीठाच्या प्रयोगशाळा अत्यंत अद्ययावत असून जागतिक पातळीचे संशोधन प्रकल्प तसेच उद्योगक्षेत्राच्या गरजांनुरूप विविध प्रयोग येथे केले जातात. जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल, द-आशय निर्मितीचे स्टुडिओ, प्रत्येक विभागात संगणक प्रयोगशाळांसह संशोधनाच्या विश्लेषणासाठी अद्ययावत आज्ञावल्या, स्मार्ट क्लासरूम, जयकर ग्रंथालयासारखे अद्ययावत व दुर्मीळ ग्रंथाची खाण असलेले आधुनिक तंत्रज्ञानाधारित ज्ञानस्रोत केंद्र, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सॉफ्ट स्किल विकासासाठी प्लेसमेंट कक्ष इत्यादी सुविधा आहेत. त्याशिवाय कमवा शिका योजना, सावित्रीबाई फुले व शाहू महाराज छात्रवृत्ती योजना राबविल्या जातात.
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील महाविद्यालये व संस्थांसाठी गुणवत्ता विकास योजना राबविणारे महाराष्ट्रातील हे एकमेव विद्यापीठ आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील ‘नॅक’ दर्जा प्राप्त केलेली सर्वात जास्त ४२६ महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आहेत. विद्यापीठ राष्ट्रीय पातळीवर एनआरआयएफ श्रेणीत राज्य विद्यापीठांमध्ये दुसऱ्या स्थानी असून क्यू एस वर्ल्ड विद्यापीठ श्रेणीत जगात ५४० ते ५५० क्रमवारीत आहे. टाइम्स हायर एज्युकेशन जागतिक विद्यापीठ श्रेणीत ६०१ ते ८०० मधील स्थानावर आहे.
जागतिक पातळीवर स्थान प्राप्त करण्याच्या प्रवासात विद्यापीठाचे त्या-त्या काळातील कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, विकास मंडळाचे संचालक, अधिष्ठाते, परीक्षा नियंत्रक, व्यवस्थापन विद्या परिषद, अधिसभा, अभ्यासमंडळे यांचे सदस्य तसेच संशोधक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक, आजी-माजी विद्यार्थी यांचे योगदान मोलाचे आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी विद्यापीठास भारतातील सर्वात अधिक पसंतीचे मानल्याने १०२ देशांतील १२ हजार परदेशी विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेत आहेत, संशोधन करीत आहेत. विद्यापीठाची दोहा, कतार ही परदेशातील केंद्रे यशस्वीरीत्या कार्य करीत असून सुमारे २०० विद्यार्थ्यांनी यास पसंती दिली आहे.
विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षात पुढील २५ वर्षांच्या वाटचालीचे पथदर्शी नियोजन करताना अहमदनगर व नाशिक उपकेंद्रांमध्ये स्वतःची वास्तू उभारण्याचे काम पूर्णत्वास नेण्यात येईल. भविष्यात या केंद्रांनी विद्यापीठ म्हणून कार्य करावे, यासाठी प्रयत्न केले जातील. विद्यापीठांचा नॅक दर्जा उंचावण्याबरोबर जागतिक क्रमवारीत पुढील पाच वर्षांत पहिल्या ५०० क्रमांकांत व त्यानंतर ३०० क्रमांकापर्यंत झेप घेण्यासाठीचे नियोजन व कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे.
नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यशस्वीपणे करणारे आदर्श विद्यापीठ म्हणून नियोजन व कृती करण्यात येणार आहे. सर्व अभ्यासक्रम उद्योग व रोजगाराभिमुख केले जातील. परदेशी विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट व्हावी, यासाठी पावले उचलली जातील. तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ५० टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. दूरस्थ शिक्षण प्रशाला जेथे आज २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ती संख्या चौपट व्हावी म्हणून प्रयत्न केले जातील. ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यापीठाच्या लर्निंग मॅनेजमेंट विस्तारित केंद्राद्वारे उपलब्ध करून देणे, भारताच्या प्राधान्य गरजा असलेली क्षेत्रे, देश आत्मनिर्भर होण्यासाठी आयात पर्यायी उत्पादने, आरोग्य क्षेत्र, लोककला व स्थानिक ज्ञान, भारतीय परंपरेच्या समृद्ध ज्ञानव्यवस्थेचा, इतर भाषांतील ग्रंथांचे अनुवाद, योग व आयुर्वेद, मराठी भाषा विकास, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडस्ट्री ४.० व येऊ घातलेल्या इंडस्ट्री ५.० या सर्व क्षेत्रांमध्ये व नव्याने उदयास येणाऱ्या क्षेत्रांमध्ये संशोधनातून ज्ञाननिर्मिती तसेच अध्ययन व अध्यापनाची सोय करून देश व समाजाचे प्रश्न सोडविताना जागतिक समस्या सोडविण्याचे नियोजन अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आले आहे. त्यासाठी कृतिशील उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यापीठाचे वैभव जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी व तशी आव्हाने पेलण्यासाठी अमृतमहोत्सवी वर्ष एक उत्तम संधी आहे. या संधीतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मोठी भरारी घेण्यास सज्ज होत आहे. हीच खरी आनंदाची बाब आहे.
लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत.