डॉ. अनिल कुलकर्णी
फिनलँड हा देश गेली काही वर्षं आनंदी देश म्हणून सर्वोच्च स्थानावर आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, इथली शिक्षण पद्धती सद्य परिस्थितीत सर्वोत्तम शिक्षण पद्धती आहे. या शिक्षणपद्धतीचा विश्वास असा की, अगदी लहान वयाच्या मुलांना पुस्तकांच्या पलीकडचं जग प्रत्यक्ष दाखवायला हवं. पुस्तकांच्या पानांपेक्षा झाडावरच्या पानांचं निरीक्षण, फुलांचं निरीक्षण, फुलांचा सुगंध यांच्या जाणिवेत त्यांना रमू द्यावं. भवताल ओळखीचा झाला की शिकणं सुलभ होतं. पुस्तकांतल्या रुक्ष शब्दांचा अर्थ निसर्गात शोधता यायला हवा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशाच प्रकारे फिनलंड मध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचा विचार करताना पुस्तकांच्या पलीकडे जे आहे त्याचा परिचय अधिक करून दिला जातो. फिनलँड मध्ये ‘प्री स्कूल’च्या रचनेचा मूळ उद्देशच विद्यार्थ्यांना शाळेसाठी तयार करणं हा असतो. शाळेत जाण्याआधी मुलं शाळेत आवश्यक कौशल्यानं युक्त असावीत असं अपेक्षित असल्यामुळे काही सवयी मुलांना इथं लावल्या जातात!

मुलं शाळेसाठी वयाच्या सहाव्या वर्षाच्या आत तयार झाली तर नंतरची प्रक्रिया सोपी जाते, हे आता जगभरच मान्य झालं आहे, होत आहे. या वयात कोणत्याही प्रकारचं पुस्तकी शिक्षण न देता खेळामधून त्यांना सामान्य ज्ञान दिलं जातं कारण या वयात मेंदूचा सर्वार्थाने विकास होत असतो. पण फिनलँडमध्ये या लहानग्यांना समूहजीवनही शिकवलं जातं! वर्गामध्ये गटात काम करता येणं ही मुलासाठी महत्त्वाची गोष्ट असते. मुलांना ही सवय लागावी म्हणून या एक वर्षाच्या काळात त्यांना गटागटांनी काम करण्यास सांगितलं जातं आणि आवश्यक त्या ठिकाणी मदत केली जाते. शाळेमध्ये व्यवस्थित वागता यावं यासाठी स्वतःची कामं स्वतः करणं, गटात चांगल्या प्रकारे काम करता येणं यासाठी मुलांना तयार केलं जातं.

आणखी वाचा-अमोल शिंदे, जरांगे पाटील आणि शहामृग..

मुलांना वाचता यावं आणि लिहिण्यासाठी त्यांना उत्सुकता निर्माण व्हावी, या गोष्टीवर इथं काम केलं जातं. पण केवळ वाचन-लिखाण म्हणजे शिक्षण नव्हे. बालकाचा विकास हा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भाषिक अशा विविध टप्प्यावर होताना दिसून येतो. इथल्या शाळेच्या शिक्षिका जिम हॉलमध्ये शारीरिक शिक्षणाचे धडे देत असताना त्रिकोनी, वर्तुळाकार, चौकोनी अशा विविध आकाराच्या चकत्यांवर विद्यार्थ्यांना उभं करण्यासारखे साधे खेळ घेतात. त्यातून बालकांना विविध गणितीय आकाराची ओळख होते, त्याचप्रमाणे खेळातून शिक्षण या संकल्पनेद्वारे विविध रंग व त्यांचे ज्ञान विद्यार्थ्यांना होताना दिसतं. स्वतःच्या नावाचं आद्याक्षर जिथे असेल त्याच भागात किंवा त्याच चकतीवर उभं राहायचं, यासारख्या खेळांमधून मित्र-मैत्रिणीची नावं कुठल्या आद्याक्षरापासून सुरू होतात याची माहिती विद्यार्थ्याला होते, त्यामुळे भाषेचा अभ्यासही होतो.

भाषिक विकास पर्यावरण, निरीक्षण, माझा समाज, कुटुंब, माझी शाळा आणि मी, तसंच शारीरिक क्षमतांचा विकास आणि अभिव्यक्ती विकास अशा बाबींचा विचार इथं केला जातो.मुलांना कोरे कागद आणि खडू इत्यादी रंग साहित्य देऊन कोणतंही चित्र काढायला, रेघोट्या मारायला सांगितलं जातं, मुलं मनसोक्त त्याचा आनंद घेतात. रेषेला वळणच हवं, रंग चित्राच्या बाहेर जाऊ नये इत्यादी बंधन त्याला यावेळी घातली जात नाहीत… चित्रकलेची आवड निर्माण होणं, त्याहीपेक्षा ‘स्वतः काहीतरी केल्याचा आनंद मुलाला मिळणं’ हा त्यामागचा हेतू असतो.

थोडक्यात, फिनलँडमधल्या शाळांत ‘पाठ्यक्रमा’पेक्षा जास्त महत्त्व ‘अभ्यास’क्रमाला दिलं जातं. हा अभ्यास पुढल्या आयुष्यात उपयोगी ठरणाऱ्या कौशल्यांचा असतो. फिनलँडमधील शिक्षकाला स्वायत्तता असते. त्यामुळे वर्गशिक्षकच प्रत्येक विद्यार्थ्यांची बलस्थानं समजून घेऊन, त्याच्यासाठी योग्य नोकरी व्यवसायाच्या संधी ओळखून त्या दिशेनं त्याला शिक्षण दिलं जाईल याची काळजी घेतात, शिकण्यातल्या अडचणींवर केली जाणारी उपाययोजना आणि मात यांचे अनेक मार्ग इथं शोधले- स्वीकारले जातात, स्पर्धेचं रूप घेतलेल्या परीक्षांना बगल देऊन विषयाच्या आकलनावर भर दिला जातो.

आणखी वाचा-जम्मू विभागातल्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये स्थानिकांचा विश्वास गमावणे घातकच…

ही सगळी वैशिष्ट्यं फिनलँडमध्ये १७ वर्षं राहून, फिनलंडचा इतिहास, शिक्षण पद्धतीचं सरकारशी नातं हे समजून घेऊन, कंटाळवाणी न होता रंजक वाटणारी परीक्षा पद्धती, व्यावसायिक शिक्षण, अध्ययन अध्यापनाच्या पद्धती यांचं निरीक्षण करून हेरंब व शिरीन कुलकर्णी यांनी अभ्यासली, आत्मसात केली. हेरंब हे युरोपमधल्या ‘सेवा इंटरनॅशनल’चे अध्यक्ष. त्यांनी फिनलँडमध्ये ‘कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन- फिनलँड’ची स्थापना केली. ‘कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन- फिनलँड’च्या अनेक ध्येयांपैकी एक ध्येय भारतातल्या शाळांचा विकसन हे होतं, त्यामुळे भारतातल्या शाळांमध्ये फिनिश पद्धतीने शिकवता येईल व त्या मधून विद्यार्थ्यांचे हित होईल हे लक्षात घेऊन या संस्थेमार्फत काही राज्यांच्या सरकारांच्या मदतीने त्यांनी आपलं शैक्षणिक कार्य छत्तीसगड, गोवा, दिल्ली, महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू केलं. सुरुवातीला या संस्थेतर्फे महाराष्ट्रासह भारतात २० कार्यशाळा घेऊन फिनलँडच्या शिक्षणाची वैशिष्ट्यं इथल्या शिक्षकांपर्यंत पोहोचवली. फिनलँड मध्ये असं काय आहे ज्याच्यामुळे तेथील शिक्षण पद्धती यशस्वी मानली जाते, याची चर्चा महाराष्ट्रातल्या शिक्षकांमध्येही होऊ लागली.

फिनलँडच्या शिक्षण पद्धतीची माहिती भारतीय शिक्षकांना देत असताना, फक्त व्याख्यानं न देता शिक्षकांनाही सहभागी करून घेण्यात आलं. यातून जे अनुभव व माहिती मिळाली त्याचा उपयोग करून भारतात आपण कशाप्रकारे यशस्वी पद्धत राबवू शकतो, यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत. भारतात या प्रकारच्या दोन शाळाही प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाल्या आहेत आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.पुण्यातली द अकॅडमी स्कूल व बेंगळूरु इथली सिलिकॉन व्हॅली ‌शाळा याच धर्तीवर वेगवेगळे प्रयोग करत पालकांसठी कुतूहलाचा विषय बनल्या आहेत. त्यांची पुढली कार्यशाळा १३ आणि १४ जानेवारीला बारामती इथं होत आहे, त्यासंदर्भात ‘नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना अनेक गोष्टी मुळे सकारात्मक फरक पडेल, फिनलँडने वापरलेले तंत्रही आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेत वापरून शिक्षण व प्रशिक्षण यात बदल घडवून आणू शकतो’ असा विश्वास हेरंब यांनी व्यक्त केला.

anilkulkarni666@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Schools in finland that also teach children about social life mrj