जगदीश काबरे

अलीकडे दिवस घालण्याची प्रथा फारच रूढ झाली आहे. मातृ दिन, पितृ दिन, प्रेम दिन, मातृभाषा दिन, मराठी दिन, पत्रकार दिन आदी. एरवी आई-वडिलांकडे ढुंकूनही न पाहणारे मातृ-पितृ दिनांच्या निमित्ताने पालक-प्रेमाचे कढ काढतात आणि मराठीचे दैनंदिन मारेकरी उसने अवसान आणत मराठी भाषा गौरव दिवस ‘सेलिब्रेट’ करतात. विज्ञान दिनाची अवस्था तर याहूनही वाईट. अंधश्रद्धा पसरवण्यात आघाडीवर असणारे, आपल्या दैनंदिन व्यवहारांत आपल्या उत्पादन विक्रीसाठी देवादिकांच्या कुबड्या घेणारेही या एका दिवसापुरते विज्ञानवादी होतात. अशा दिनांच्या निमित्ताने बाजारपेठेत काही उलाढाल होते आणि संबंधित विषय चर्चीले जातात. तेव्हा यात आक्षेप घ्यावे असे काय, असेही अनेकांना वाटेल. मुद्दा आक्षेपांचा नाही, तर तो आहे या दिनांचे खरे माहात्म्य बाजूस पडून केवळ बाजारपेठीय झगमगाट उरला आहे, हा. ज्या समाजात अशा दिवसांमागचे उद्दीष्ट लक्षात घेऊन त्याचे दैनंदिन जीवनात अनुकरण करण्याविषयी जागरुकता नसते, अशा समाजात या दिनांचा ताबा अलगदपणे चतुर बाजारपेठेच्या हाती जातो आणि असे दिवस म्हणजे केवळ इव्हेंट होतात.

shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
ketu nakshatra parivartan 2024
१० नोव्हेंबरपासून ‘या’ ३ राशी कमावणार नुसता पैसा; केतूचे नक्षत्र परिवर्तन २०२५ पर्यंत करणार मालामाल
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Budh Nakshatra Gochar 2024
Budh Nakshatra Gochar 2024 : बुध ग्रहाच्या नक्षत्र गोचरमुळे चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा अन् धन
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
lucky rashi
गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे मालामाल होतील मिथुन, सिंहसह या पाच राशी, जाणून घ्या साप्ताहिक भाग्यशाली राशी

आज २१व्या शतकात वावरत असताना, मंगळग्रहावर यान सोडले असताना, विज्ञानाने दिलेली सर्व यंत्रे वापरत असताना, अत्याधुनिक तंत्रज्ञान हा आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला असताना, म्हणजेच विज्ञानाने दिलेली सर्व सृष्टी सभोवताली असताना भारतीय मनोवृत्ती मात्र वैज्ञानिक दिसत नाही. त्यामुळे समाजातील अंधश्रद्धा होण्याऐवजी दिवसेंदिवस कमी वाढताना दिसत आहे. ज्या समाजात अंधश्रद्धा असतात तो समाज प्रगती करू शकत नाही. वाढता जातीयवाद, धर्मांधता या सर्वांच्या मुळाशी गेले असता समाजामधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव हेच प्रमुख कारण दिसून येते. वाढती जातीय तेढ आणि धर्मांधता ही नव्या पिढीपुढची मोठी आव्हाने आहेत. जातीय, धार्मिक हिंसाचार वाढतो, कारण कोणीतरी ‘क्ष’ व्यक्ती समूहाचे डोके भडकावते आणि समूह डोके गहाण ठेवून त्याच्या आदेशाचे पालन करून कायदा हातात घेतो. ही ‘क्ष’ व्यक्ती स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी समूहाचे भविष्य टांगणीला लावतेय हे उघडपणे दिसत असतानादेखील तिच्या आदेशाचे पालन समूह का करतो? कारण समूहाने त्या आदेशाची, त्यामागील हेतूची, त्यातून होणाऱ्या परिणामांची चिकित्सा केलेली नसते. इतिहासाच्या ओघात भारतातील सर्व जातीधर्मांच्या समूहांनी चिकित्सा करण्याची परंपरा मोडून टाकली आहे. चिकित्सेचा अभाव हा मानसिक गुलामगिरीच्या प्रादुर्भावाला कारक असतो. म्हणून समाजमन विवेकी व्हायला हवे असेल तर आधी त्याला चिकित्सक बनवावे लागेल, त्याला प्रश्न विचारायला शिकवावे लागेल. वैज्ञानिक दृष्टिकोन जर समाजात खोलवर रुजला तर केवळ अंधश्रद्धांचे निर्मुलन होणार नाही, तर जातीय तेढ आणि धर्मांधतादेखील कमी होऊ शकेल.

आणखी वाचा- मराठी भाषा गौरव दिनाचे मर्म

वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारल्याने व्यक्ती विवेकी होते, चांगले काय आणि वाईट काय, आपल्या हिताचे काय आणि नुकसान कशात आहे, याचे त्याला भान येते. राजहंसाला नीरक्षीर विवेकी म्हटले जाते, कारण त्याला दुधात पाणी मिसळून दिले तरी तो त्यातले फक्त दूध पितो असा समज आहे. याचप्रमाणे विवेकी व्यक्ती समाजात प्रचलित असलेल्या चांगल्या मूल्यांचा अंगीकार करते आणि अनिष्ठ रुढींचा त्याग करते. जगभरातल्या सर्व मानवांची गुणसूत्रे ९९ टक्के समान आहेत, असे विज्ञान सांगते. म्हणजेच जाती श्रेष्ठत्वाच्या, वंश श्रेष्ठत्वाच्या किंवा धर्म श्रेष्ठत्वाच्या अस्मितेचे डोलारे पोकळ आहेत. कुणी श्रेष्ठ नाही, कुणी एक अस्सल बीजाचा नाही, त्याचप्रमाणे कुणी शुद्र नाही, कमअस्सल नाही हे विज्ञान सिद्ध करते. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जास्त प्रसार झाला तर अंधश्रद्धेच्या बेड्या तुटायला मदत होईल त्याचबरोबर समाजमनातली जातीची अढी सुटायलाही पण मदत होईल. जातीयता कमी करायची असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, प्रचार आणि अंगीकार अनिवार्य आहे.

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानास पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे. राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी कोणती तारीख निवडावी यावर तेव्हा खूप मोठा खल झाला. २ ऑक्टोबर ही गांधी जयंती घ्यावी की १४ नोव्हेंबर ही नेहरू जयंती घ्यावी असा एकूण चर्चेचा सूर असताना एकदम डॉ. वसंतराव गोवारीकर यांनी विज्ञान दिवस हा भारतात विज्ञानाचे एकमेव नोबेल पारितोषिक मिळविणारे डॉ. सी. व्ही. रामण यांच्याशी संबंधित असावा, अशी सूचना केली. शिवाय त्यासाठी त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकात प्रसिद्ध झाला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले, ती तारीख का निवडू नये, असेही त्यांचे म्हणणे होते. ती तारीख होती २८ फेब्रुवारी… तीच मुक्रर झाली. तोच हा राष्ट्रीय विज्ञान दिन.

आणखी वाचा-उद्योगांवर कृपादृष्टी… सामान्यांवर वक्रदृष्टी! 

डॉ. सी. व्ही. रामण यांचा हा निबंध होता प्रकाशाच्या विकरणाच्या नियमांविषयी. झाले असे की, परदेश प्रवासाला निघालेले रामण, जहाजाच्या डेकवर उभे होते. वर निरभ्र, निळे आकाश होते तर सभोवती अथांग निळे पाणी. त्यांच्या जागरूक मनात एकदम प्रश्न उमटला, की हवा आणि पाणी ही दोन वेगळी माध्यमं, त्यांची अंतरंही वेगळी, तरीही रंग निळाच का दिसतो? या छोट्या कुतूहलाच्या समाधानार्थ त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं! निरीक्षणातून विचार पुढे जातो तो असा.

थोडक्यात विज्ञान म्हणजे काय तर निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेली, पद्धतशीर आणि तर्कसुसंगत माहिती. वेगळया शब्दात सांगायचं म्हणजे, तर्कसुंसगत कार्यकारणभाव शोधण्याच्या प्रक्रियेतून विज्ञान वाढीला लागतं. आपल्याला ज्याचं कारण चटकन सांगता येत नाही, ती गोष्ट दैवी किंवा अतिमानवी मानणं चुकीचं आहे. निरीक्षण करून, उपलब्ध ज्ञान वापरून, तर्कानं त्या घटनेमागचं कारण शोधायला हवं, ते योग्य आहे की नाही हे पडताळण्यासाठी पुरावे मिळवायला हवेत आणि ते पुरावेही तपासून बघायला हवेत. ‘पुरावा तेवढा विश्वासॅ’या पद्धतीनं विचार केला, तर जगात चमत्कार शिल्लकच उरत नाहीत. उरतात ती, कदाचित सोडवायला कठीण, अशी कोडी! एखादी घटना त्याच पद्धतीनं का घडते हे शोधून काढण्याची, सत्यशोधनाची वृत्ती म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही वैज्ञानिक विचारशृंखला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धत!

आणखी वाचा-जर्मनीत लोकशाहीवादी विरुद्ध फासिस्ट शक्ती! 

बहुधा सर्वच सुजाण नागरिकांना, भारत या राष्ट्राचे नागरिक म्हणून त्यांचे हक्क माहीत असतात; पण फारसं कुणालाच हे माहीत नसतं, की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं, हे भारतीय संविधानाच्या, विभाग ४ अ, कलम ५१ अ प्रमाणे, प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर नव्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीतील ते एक महत्त्वाचं मूल्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव राज्यघटनेत कर्तव्य म्हणून आणि शिक्षणपद्धतीत मूल्य म्हणून का केला गेला, याचा विचार आपण वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात केला पाहिजे. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे, त्यांना प्रेरित करणे आणि विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीबद्दल लोकांना जागरुक करणे हा आहे. विज्ञानाशिवाय विकासाचा मार्ग वेगाने पुढे जाऊ शकत नाही. विज्ञान गैरसमज आणि अंधश्रद्धा नष्ट करते.

देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक विचारांचा प्रसार आवश्यक आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनासारखे कार्यक्रम वैज्ञानिक वृत्तीचा प्रसार करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकतात. विज्ञानाच्या माध्यमातूनच आपण समाजातील लोकांचे जीवनमान अधिकाधिक सुखी करू शकतो. प्रत्येक विशेष दिवशी उत्साहाने शुभेच्छा संदेश पाठवणारे बहुतेकजण विज्ञानदिनाकडे पाठच फिरवतात, हे कशाचे लक्षण समजायचे? कारण बऱ्याच लोकांना विज्ञान दिन का साजरा करायचा हेच माहीत नाही, म्हणून हा लेख प्रपंच.

jetjagdish@gmail.com