‘तुमचे म्हणणे लोकानुनय करणारे नसेल, ते भले प्रवाहाच्या विरुद्ध असल्याचे भासेल, त्याला सर्व पातळय़ांवरून कडाडून विरोध होत असेल.. पण त्याला विज्ञानाचा आधार असेल तर अशा मुद्दय़ाची कास धरलीच पाहिजे..’ हे तत्त्व अगदी अगदी बालपणापासून ते ऐन कोविड साथीच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) संशोधनप्रमुख म्हणून निगुतीने पाळणाऱ्या डॉ. सौम्या स्वामिनाथन. त्यांच्या या विज्ञाननिष्ठ प्रवासाची ओळख ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीदार अनुराधा मस्कॅरेनिस लिखित ‘अ‍ॅट द व्हील ऑफ रिसर्च’ या त्यांच्या चरित्राच्या अगदी पहिल्या पानापासून होते. हळूहळू त्या विज्ञाननिष्ठतेचे तत्त्व वाचकाच्याही अंगी रुजू लागते. विज्ञान आणि समाजाभिमुख संशोधन हाच आत्मा असणाऱ्या डॉ. सौम्या यांचे व्यक्तिमत्त्व मनावर अलगद ठसा उमटवते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बडबड गीते ऐकण्याच्या वयातच विज्ञान, संशोधन, प्रयोग, पीएच.डी., प्रबंध या शब्दांची ओळख डॉ. सौम्या यांना झाली. भारतातील हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन आणि बालशिक्षणासाठी झोकून दिलेल्या मीना स्वामिनाथन यांची ज्येष्ठ कन्या डॉ. सौम्या स्वामिनाथन. विज्ञानाचे आणि समाजाभिमुख संशोधनाचे बाळकडू मिळालेल्या डॉ. सौम्या यांनी डब्लूएचओमध्ये संशोधनप्रमुख म्हणून नोव्हेंबर २०२२ मध्ये कार्यकाळ पूर्ण केला आणि त्या भारतात परतल्या. त्यांच्या मातोश्री मीना स्वामिनाथन यांनी स्थापन केलेल्या एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्ष म्हणून त्या सध्या कार्यरत आहेत. एके काळी पशुवैद्य व्हायचे होते, परंतु प्राण्यांच्या कलेवराचे विच्छेदन करावे लागेल म्हणून त्यांनी बेत बदलला. पुण्याच्या आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमधील पदवी, नंतर संशोधन क्षेत्राची गवसलेली वाट, क्षयरोग, कुपोषण, एड्स यांवर केलेले काम, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संचालक, डब्लूएचओच्या संशोधनप्रमुख व या साऱ्याच्या जोडीला नाटय़, कविता, वाचन, गिर्यारोहण, सायकिलगची आवड असा बहुआयामी प्रवासपट  घटनानोंदीच्या पलीकडे नेणारा आहे. विज्ञानाचे बोट सोडायचे नाही, हे या प्रवासाचे भरतवाक्य.

हेही वाचा >>>बौद्ध-दलित ‘शहाणे’ आहेतच, हे श्रेय प्रकाश आंबेडकरांनीही मान्य करावे!

कोविड साथीच्या अत्यंत आव्हानात्मक काळात डॉ. सौम्या या डब्लूएचओमध्ये कार्यरत होत्या. रोज समोर येणाऱ्या नव्या कोडय़ांची उकल करण्याचा तणाव, अस्वस्थता, प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृतीच्या जागतिक परिणामांचा दबाव, त्यातून उद्भवणारे प्रश्न, जागतिक राजकारण अशा वेढय़ात कोविडबाबतचे गैरसमज टाळण्यासाठी, चुकीची वृत्ते, संदेश यांना अटकाव करण्यासाठी त्या कार्यरत होत्या. एखादे मत व्यक्त केल्यानंतर होणारा विरोध, टीका सर्वाना तोंड देत त्या कशा उभ्या राहिल्या याचे अनेक दाखले या पुस्तकात मिळतात. मात्र, त्यात व्यक्तिपूजा नाही की अवाजवी उदात्तीकरण नाही. डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांची कन्या म्हणून असलेल्या ओळखीचा दबाव, संशोधन क्षेत्राला मिळणारा प्रतिसाद, व्यवस्था, महिला संशोधकांकडे पाहण्याची वृत्ती अशा अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांना कोणतेही अवडंबर न माजवता हे पुस्तक स्पर्शून जाते. असे असतानाही प्रत्येक मुद्दा विचारप्रवृत्त करतो त्याचे गमक डॉ. सौम्या यांची वैचारिक बैठक आणि ती सक्षमपणे शब्दबद्ध करणाऱ्या अनुराधा या समीकरणात आहे. तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता करणाऱ्या अनुराधा आरोग्य, विज्ञान, संशोधन या विषयांवर सातत्याने लेखन करतात. क्लिष्ट वाटणारे हे विषय मूलभूत संकल्पना, वैज्ञानिक तत्त्व यांच्याशी कोणतीही तडजोड न करता अत्यंत सुलभपणे मांडण्यात त्यांची हातोटी आहे.

कोविड साथीच्या काळात नेमके काय घडत होते त्याबाबतची उत्सुकता, कटकारस्थाने, अर्थकारण, व्यावसायिक हितसंबंध यांचे सिद्धांत असे अनेक मुद्दे असणाऱ्या कालावधीत निर्णयक्षमता असणाऱ्या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीचे चरित्र असूनही ते अतिरंजित नाही किंवा त्यात कुठेही सनसनाटी नाही. ही एका व्यक्तिमत्त्वाची, विचारनिष्ठेची ऊर्जादायी मांडणी आहे. पुस्तकाची आश्वासक, संयत मांडणी हीच डॉ. सौम्या यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. त्यात काय काय टिपायचे हा वाचक स्वातंत्र्याचा मुद्दा.

हेही वाचा >>>इब्राहिम अल्काझी : एक महानाटय़

‘अ‍ॅट द व्हील ऑफ रिसर्च’,

लेखिका अनुराधा मस्कॅरेनिस, प्रकाशक- ब्लूम्सबरी इंडिया, मूल्य- ५९९, पृष्ठे झ्र् १४२

हेही वाचा..

फ्रान्सीन प्रोज या अमेरिकेतील ‘लेखनतगडय़ा’ व्यक्तिमत्त्वांपैकी एक. या लेखिकेच्या कादंबऱ्यांची, कथासंग्रहांची आणि अकथनात्मक पुस्तकांची संख्या पाहता त्यांच्याबाबत मल्लासम उपमा वापरणेच योग्य. चार दिवसांपूर्वी त्यांच्या ‘नाईण्टीन सेव्हण्टी फोर : अ पर्सनल हिस्ट्री’ या ताज्या पुस्तकाचा परिचय लोकप्रिय झालेला दिसतो; तर गेल्या आठवडय़ात न्यू यॉर्क टाइम्समध्ये याच पुस्तकावर समीक्षणही आलं आहे. या नव्या पुस्तकाबद्दल आणि या लेखिकेबद्दल अधिक जाणून देणारे दोन दुवे.

rb. gy/ shtp1 y

rb. gy/ t53 n6 p

जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या ‘ब्लाइंड विलो, स्लिपिंग वूमन’ या कथासंग्रहातील काही कथांचा वापर करून अमेरिकी दिग्दर्शकाचा अ‍ॅनिमेटेड चित्रपट काही महिन्यांपूर्वी आला. सध्या तो महोत्सवांमध्ये पारितोषिकांसाठी नामांकनपात्र ठरत असून यंदाच्या ऑस्करच्या स्पर्धेतही तो जाण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे ट्रेलर युूटय़ूबवर पाहता येतेच. पण नुकताच मुराकामीने हा चित्रपट पाहिला. त्याविषयी असोसिएट प्रेसच्या टोकिओ प्रतिनिधीने दिलेले विस्तृत वृत्त. 

rb. gy/8 fi5 b7

पोकेमॉन ही जगप्रसिद्ध अ‍ॅनिमेटेड मालिका. दोन-तीन पिढय़ा या पॉकेट मॉन्स्टर्सच्या दिवाण्या. पॅरिस रिव्ह्यूच्या दैनंदिन ब्लॉगवर याविषयी मांडलेला वेगळा दृष्टिकोन. 

rb. gy/ qdek32

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science world health organization at the wheel of research amy
Show comments