– प्रवीण कारखानीस
आजच्या घडीला आपल्या भारतात वयाने ज्येष्ठ असलेले कसोटी क्रिकेटपटू म्हणून मुंबई – निवासी डॉ. चंद्रकांत त्रिंबक पाटणकर अर्थात चंदू पाटणकर यांचेच नाव डोळ्यांसमोर येते ! रविवार २४ नोव्हेंबर २०२४ रोजी ते वयाची ९४ वर्षे पूर्ण करून ९५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त मी आणि माझा मित्र किशोर देसाई यांनी त्यांची भेट घेतली.
चंदू पाटणकर हे १९५५ साली भारताचे यष्टिरक्षक म्हणून कलकत्त्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्धचा चौथा कसोटी सामना खेळले होते, त्या वेळी त्यांनी न्यूझीलंडच्या गॉर्डन लेगाट आणि बर्ट सटक्लिफ् या दोन्ही सलामीच्या फलंदाजांचे झेल यष्टीमागे लीलया पकडून त्यांना बाद केले होते. तसेच टोनी मॅकगिबन् या मातब्बर फलंदाजाला यष्टिचीत केले होते. त्याच सामन्यात ते भारतातर्फे आठव्या क्रमांकावर फलंदाजी करायला मैदानात उतरले होते तेव्हा भारताची धावसंख्या ७ बाद ८८ इतकी शोचनीय होती. अश्याही परिस्थितीत चंदू पाटणकर यांनी जे. एम. घोरपडे यांना उत्तम साथ देत अर्धशतकाची भागीदारी केली आणि स्वतः १३ धावा काढल्या. दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना त्यांनी अवघी एकच धाव काढलेली असताना भारताने डाव घोषित केल्याने ते नाबाद राहिले. दुसऱ्या डावात यष्टिरक्षक म्हणून खेळत असताना त्यांनी न्यूझीलंडचा फलंदाज जॅक अलबस्टर याचा यष्टीमागे झेल घेतला. एकंदरीत त्यांची कामगिरी समाधानकारकच झाली. मात्र तरीही चंदू पाटणकर यांच्या नावाचा विचार कसोटी सामन्यांसाठी पुढे कधी केला गेलाच नाही. नरेन ताह्मणे आणि नाना जोशी यांनाच भारताचे यष्टिरक्षक म्हणून पुढे अनेक वर्षे संधी मिळत गेली आणि चंदू पाटणकर यांची कसोटी कारकीर्द, कलकत्यातल्या त्या एकमेव कसोटी सामन्यानंतर समाप्तच झाली. प्रथम दर्जाच्या २६ सामन्यात त्यांनी ३८ फलंदाजांना यष्टीमागे क्षेत्ररक्षण करताना बाद केले होते आणि स्वतः फलंदाजी करत असताना पाचशेहून अधिक धावा रचल्या होत्या.
हेही वाचा – ‘योग्य तेच खा’ सांगणारे धोरण अपुरे…
चंदू पाटणकर यांची दृष्टी आणि स्मृती याही वयात उत्तम आहे. ते आजही दूरदर्शनवर क्रिकेटचे सामने पाहत असतात. क्रिकेटविषयक मराठी – इंग्रजी पुस्तके वाचत असतात. मी २००४ साली भारत – पाकिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामने पाहण्यासाठी पाकिस्तानला गेलो होतो. त्यासंदर्भातील माझे पुस्तक दोनदा वाचल्याचे त्यांनी सांगितले. क्रिकेटपटू संदीप पाटील याने त्यांना भेट दिलेल्या ‘बियॉण्ड द बाउंडरीज्’ या आत्मचरित्राची प्रत त्यांनी आम्हाला दाखवली. त्यांनी त्यांचे एक विशेष आवडते पेन मला दिले. हे पेन सुनील गावस्कर यांनी त्यांना सप्रेम भेट दिले होते. गप्पांच्या ओघात भारताच्या पहिल्या पाकिस्तान दौऱ्याचा विषय निघाला. हा दौरा डिसेंबर १९५४ ते मार्च १९५५ या दरम्यानचा होता. त्या दौऱ्यासाठी यष्टिरक्षक म्हणून भारतीय संघात आपली निवड होईल असा बहुधा त्यांचा कयास होता. परंतु भारताच्या संघात यष्टिरक्षक म्हणून नरेन्द्र ताम्हणे यांची प्रथमच निवड झाली. आपली ती संधी हुकली याची सल चंदू पाटणकर यांना आजही वाटत असल्यास नवल वाटायला नको. मात्र नरेन्द्र ताम्हणे यांच्याबद्दल त्यांच्या मनात तिळमात्र असूया किंवा मत्सर नाही. उलट अमाप जिव्हाळाच आहे. पाकिस्तानच्या त्या दौऱ्यात लाहोर, पेशावर किंवा बहावलपूर यांपैकी कुठल्यातरी एका शहरात भारतीय संघाच्या सगळ्या खेळाडूंना एकाच ठिकाणी एकत्रितपणे राहणे शक्य होईल असे एकही दर्जेदार हॉटेल नसल्याने त्यांची राहण्याची सोय चक्क तिथल्या रेल्वेस्थानकातल्या लोहमार्गावर रेल्वेचे दोन खास डबे एकाच जागी उभे करून त्यांमध्ये करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले. त्याकाळी पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात संघातल्या प्रत्येक खेळाडूला प्रतिदिनी ५० रुपये दिले जात असत. सामना चारच दिवसांत संपला तर पाचव्या दिवसाचे पैसे मिळत नसत. १९५५ साली ते जो एकमेव एक कसोटी सामना खेळले, तेव्हा पॉली उम्रीगर हे त्या संघाचे कर्णधार होते. विनू मंकड आणि नरी कॉन्ट्रॅक्टर हे सलामीचे फलंदाज होते. पंकज रॉय तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज होते. विजय मांजरेकर, पॉली उम्रीगर, गुलाबराय रामचंद आणि जयसिंगराव घोरपडे हे मधल्या फळीचे फलंदाज होते तर दत्तू फडकर आणि जी. सुंदरम् हे द्रुतगती गोलंदाज म्हणून आणि सुभाष गुप्ते हे फिरकी गोलंदाजीचे जादूगार म्हणून या संघात होते. अशा संघात यष्टिरक्षक म्हणून खेळण्याची संधी चंदू पाटणकर यांना मिळाली होती. असो.
चंदू पाटणकर यांचा जन्म पेण येथे २४ नोव्हेंबर १९३० रोजी झाला होता. त्यांचे वडील डॉक्टर होते. वैद्यकीय व्यवसायासाठी ते पुण्याला आले. त्यांनी डेक्कन जिमखान्यालगतच्या पी. वाय. सी. हिंदू जिमखान्यासमोरच घर घेतले आणि तिथेच आपला दवाखाना सुरू केला. साहजिकच त्याच भागात राहत असलेले क्रिकेट महर्षी प्रा. दि. ब. देवधर यांचे त्या दवाखान्यात अधूनमधून येणे – जाणे होऊ लागले आणि चंदू पाटणकर यांचे वडील हे प्रा. देवधर यांचे मित्र आणि फॅमिली डॉक्टर झाले. प्रा. देवधर हे एस. पी. कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. कॉलेज संपल्यावर संध्याकाळच्या वेळी ते धोतर नेसून मात्र पायांना पॅड बांधून जिमखान्याच्या मैदानावर क्रिकेटचा सराव करत असत. त्यामुळे चंदू पाटणकर यांना त्यांच्या बालपणीच प्रा. देवधर यांची फलंदाजी अगदी सहजपणे आणि जवळून बघता आली. पुण्यातल्या सुप्रसिद्ध मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकत असताना ते शाळेच्या क्रिकेट संघाचे कॅप्टन होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्यातल्याच फर्ग्युसन कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला मात्र वर्षभरानंतर ते मुंबईला आपल्या थोरल्या बहिणीकडे हिंदू कॉलनीत राहायला आले. त्याच इमारतीत क्रिकेटपटू माधव मंत्री राहत होते. चंदू पाटणकर यांची बहीण रुईया कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्राची प्राध्यापक होती आणि मेव्हणे त्याच कॉलेजमध्ये पदार्थविज्ञान विषयाचे प्राध्यापक होते. याच कारणास्तव चंदू पाटणकर यांनी रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना कॉलेजच्या क्रिकेट संघातून खेळायची संधी मिळत गेली. त्यांना मुंबई विद्यापीठाच्या संघात यष्टिरक्षक म्हणून घेण्यात आले. इंटर – युनिव्हर्सिटी सामन्यांमधली त्यांची कामगिरी पाहून त्यांना मुंबईतर्फे रणजी सामन्यात खेळायची संधी आपोआपच मिळाली. १९५३ पासूनच्या पुढील दहा वर्षात ते दहा रणजी सामने खेळले. त्यातले अखेरचे एक – दोन सामने ते केवळ त्यांचे मित्र चंदू बोर्डे यांच्या आग्रहास्तव, महाराष्ट्र संघाकडून खेळले. चंदू बोर्डे हे त्या काळी महाराष्ट्र संघाचे नेतृत्त्व करत असत.
हेही वाचा – मतदान न करणाऱ्यांना शिक्षा हवीच! हक्क बजावणे बंधनकारकच हवे!
चंदू पाटणकर यांनी १९५४ साली आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होताच मुंबईतल्या बी. ई. एस्. टी. मध्ये तिकीट तपासनीसाची नोकरी स्वीकारली आणि १३ वर्षे ती इमाने इतबारे केली. त्यादरम्यान ते ‘टाईम्स शील्ड’ साठीचे सामने खेळले. प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि यशस्वी उद्योजक माधव आपटे यांनी सोलापूर येथील लक्ष्मी विष्णु कॉटन मिल विकत घेतल्यानंतर चंदू पाटणकर यांना १९७० साली त्याच मिलमध्ये जनसंपर्क अधिकारी या पदावरची नोकरी दिली. ही नोकरी करत असताना त्यांनी सामग्री व्यवस्थापनशास्त्र ( मटेरियल्स मॅनेजमेंट ) या विषयाचा अभ्यास केला आणि पुढे त्याच विषयात पुणे विद्यापीठाची ‘डॉक्टरेट’ मिळवली. एम्. एस्सी. केल्यानंतर तब्बल ३० वर्षांनी त्यांनी ही उपाधी प्राप्त केली होती. ही उपाधी प्राप्त करणारे ते एकमेव भारतीय कसोटीवीर आहेत. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे तत्कालीन अध्यक्ष राज सिंह डुंगरपूर यांनी सी. सी. आय. च्या सचिवपदी त्यांची नियुक्ती केली त्यामुळे ते उर्वरित काळात क्रिकेट या खेळाशी आणि क्रिकेट खेळाडूंशी कायम निगडित राहिले. त्याशिवाय सेवानिवृत्तीनंतर तहहयात मिळणाऱ्या निवृत्तीवेतनासाठी देखील ते पात्र ठरले. आज त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना मिळत असलेले घसघशीत रकमेचे निवृत्तीवेतन त्यांच्यासाठी जणू वरदानच ठरले आहे. बी. सी. सी. आय. ने एके वर्षी त्यांच्यासाठी ‘बेनेफिट मॅच’ घ्यायचे ठरवून त्यांना दहा लाख रुपयांची थैली देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु नेमके त्याच सुमारास दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए याचे मॅच फिक्सिंग उघडकीस आले आणि क्रिकेट विश्वाला जबरदस्त हादरा बसला. परिणामतः चंदू पाटणकर यांच्यासाठी आयोजित केलेला मदत – सामना रद्द करण्यात आला. त्याऐवजी बी. सी. सी. आय. ने चंदू पाटणकर यांना आधी ठरवलेल्या रक्कमेच्या दामदुप्पट रक्कम देऊन त्यांचा सन्मान केला.
pravinkarkhanis@yahoo.com