प्रा. मिलिंद जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो ४ डिसेंबर रोजी वयाची ८० वर्षे पूर्ण करीत आहेत, त्या निमित्ताने..ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो ४ डिसेंबर रोजी वयाची ८० वर्षे पूर्ण करीत आहेत, त्या निमित्ताने..

अस्सल मराठी वळणाचे सुंदर व प्रासादिक लेखन करणारे सव्यसाची लेखक म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा परिचय मराठी वाचकांना आहे. वसईतील वटार गावात ते जन्मले आणि वाढले. अनेक साहित्यिकांना त्यांच्या घरातून साहित्यिक वारसा मिळाला. परिस्थितीमुळे दिब्रिटो यांच्या वाटय़ाला तसे काही आले नाही. पण त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती. हायस्कूलमध्ये शिकत असताना लोकमान्य आणि लोकसत्ता ही वृत्तपत्रे, साने गुरुजींचे श्यामची आई, गांधीजींच्या जीवनावरील छोटय़ा पुस्तिका, बुद्धचरित्र व ख्रिस्तचरित्र, बाबूराव अर्नाळकर, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके या साहित्यामुळे त्यांची वाचनातली गोडी वाढत गेली.

धर्मगुरू होण्याचा निर्णय

अकरावी झाल्यानंतर त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घ्यावे, असे घरच्यांचे मत होते. त्याच वेळी धर्मगुरू होण्याचा विचार दिब्रिटो करीत होते. धर्मगुरूंचे जीवन किती खडतर आहे याची कल्पना घरातल्या मंडळींनी दिलेली होती. फादर होणे म्हणजे घरापासून दूर राहायचे, संसाराकडे पाठ फिरवायची, साधे जीवन जगायचे, अधिकारी पाठवतील तिकडे जायचे, ही आव्हाने तुला पेलवतील का, असेही त्यांना विचारले होते. पण दिब्रिटो यांच्या मनाचा निश्चय पक्का झाला होता. त्यांनी फादर होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचे वय १९ वर्षांचे होते. धर्मगुरू होण्यासाठी त्यांनी गोरेगाव येथील संत पायस गुरुविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे मराठी, इंग्रजी पुस्तकांचे भांडारच होते. याच काळात अध्यात्मपर ग्रंथ, संतचरित्रे यांच्या वाचनाबरोबरच इंग्रजी विदग्ध साहित्याचे वाचन करण्याची संधी त्यांना मिळाली. निवडक जागतिक साहित्य नावाची अनुवादित ग्रंथमाला त्यांच्या वाचनात आली. त्यामुळे अभिजात जागतिक साहित्याची त्यांना तोंडओळख झाली.

हेही वाचा >>>‘युद्ध गुन्हेगार’ ही किसिंजर यांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू…

तत्त्वज्ञानाच्या अभ्यासामुळे त्यांच्या जाणिवांचा परीघ विस्तारला. मराठी भाषेच्या प्रेमापोटी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्राज्ञ, विशारद आणि साहित्य आचार्य या परीक्षा दिल्यामुळे त्यांना मराठीच्या अंतरंगाची ओळख झाली. सर्वधर्मीयांकडे पोहोचता यावे, त्यांच्या भाषेत त्यांच्याशी बोलता यावे म्हणून ते संतसाहित्याच्या वाचनाकडे वळले. दिब्रिटोंचा प्रवास प्रभू ख्रिस्तांकडून सर्व धर्मातील संतांकडे सुरू झाला. पंढरपूर, देहू, आळंदी, नेवासे, नांदेड ही माझ्यासाठी तीर्थस्थाने आहेत, असे मानणाऱ्या दिब्रिटोंना हिंदू, बौद्ध, जैन व शीख धर्मीयांनी त्यांच्या व्यासपीठावर निमंत्रित करून विचार व्यक्त करण्याची संधी दिली. भारतीय मनुष्य सहिष्णु, सर्वसमावेशक आणि उदार प्रवृत्तीचा असल्याचा प्रत्यय त्यांनी अनेकदा घेतला.

 अनुवादोची वाटचाल

दिब्रिटो यांचे सुरुवातीचे लेखन स्फुट स्वरूपाचे होते. ‘निरोप्या’ आणि ‘सुवार्ता’ या ख्रिस्ती मासिकांसाठी ते लेखन करीत होते. पुण्याला डॉ. म. रा. लेदर्ले हे जर्मन धर्मगुरू, आंतरराष्ट्रीय अभिजात ख्रिस्ती आध्यात्मिक ग्रंथांचा मराठीमध्ये अनुवाद प्रसिद्ध करीत होते. त्यांनी दिब्रिटोंकडे ‘द वे ऑफ द पिलग्रीम’ हा ग्रंथ अनुवादासाठी पाठविला. १९ व्या शतकातील एका अनामिक यात्रिकाचे हे आत्मनिवेदन होते. दिब्रिटोंनी त्याचा ‘पथिकाची नामयात्रा’ या नावाने अनुवाद केला. त्याला प्रसिद्ध अध्यात्मवादी ग. वि. तुळपुळे यांची प्रस्तावना लाभली. या अनुवादावर नागपूरच्या तरुण भारतचे तत्कालीन संपादक ग. त्र्यं. माडखोलकर यांनी संपादकीय लिहिले. या निमित्ताने साहित्याच्या अनुवादाची नवी वाट दिब्रिटोंना सापडली. पुढे ‘गिदीयन’ या नाटकाचा ‘कृतघ्न’ नावाने त्यांनी अनुवाद केला. जानेवारी १९६५ मध्ये ‘लोकसत्ता’च्या रविवार आवृत्तीतील पद्मविभूषण कार्डिनल ग्रेशस यांच्यावरील परिचयपर लेखापासून त्यांचे वृत्तपत्रीय लेखन सुरू झाले. पुढे महाराष्ट्रातील सर्व नामवंत वृत्तपत्रात त्यांनी नियमित स्तंभलेखन केले.

‘सुवार्ता’ची जबाबदारी

१९८३ मध्ये ‘सुवार्ता’ या चर्चच्या मुखपत्राची जबाबदारी दिब्रिटोंवर सोपविण्यात आली. या मासिकाचा दर्जा सुधारून त्यांनी ते अधिक वाचकप्रिय केले. ‘सुवार्ता’चे चाकोरीबद्ध आणि प्रचारकी रूप बदलून त्यांनी ‘सुवार्ता’ला साहित्यिक रूप दिले. कवितेचे दालन सुरू केले.  धर्म आणि राष्ट्रीयत्व आदी विषयांवर त्यांनी परिसंवाद घडवून आणले. ख्रिस्ती विचारवंतांबरोबर इतरही मान्यवर लेखकांनी सुवार्तासाठी लेखन केले. त्यामुळे विचारांचे आदानप्रदान झाले. सुवार्ताला साहित्य चळवळीचे स्वरूप देताना उपवासकालीन व्याख्यानमालेत उजवे, डावे, पुरोगामी, प्रतिगामी अशा सर्व प्रकारच्या वक्त्यांना निमंत्रित करून त्यांनी विचारमंथन घडवून आणले. त्यामुळे वसईत श्रवणभक्ती वाढीस लागली. ‘सुवार्ता’ ने श्रोत्यांच्या सांस्कृतिक श्रीमंतीत भर घातली. सुवार्ताच्या संपादकीयातून वाचकांच्या जिव्हाळय़ाच्या विषयावर तसेच वादग्रस्त प्रश्नांसंबंधी त्यांनी सातत्याने मतप्रदर्शन व मार्गदर्शन केले. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील गैरव्यवहारांवर आसूड उगारले. त्यामुळे अनेकांचा रोष त्यांना ओढवून घ्यावा लागला.

हेही वाचा >>>समस्याग्रस्त चिनी अर्थव्यवस्थेच्या ‘स्वायत्त’ संस्थांचीही भिस्त सत्ताधाऱ्यांवरच!

लेखनातील योगदान

निसर्गाला सखा आणि सोबती मानणाऱ्या दिब्रिटोंनी अनुभवलेले निसर्गाचे नानाविध विभ्रम ‘तेजाची पाऊले’, ‘सृजनाचा मोहोर’, ‘सृजनाचा मळा’ या तीन ललित लेखसंग्रहात शब्दबद्ध झाले. ‘तेजाची पाऊले’ हे पुस्तक वाचून पुलंनी दिब्रिटोंना पत्र लिहिले. त्यात पु.ल. लिहितात, ‘वसईतल्या पानमळय़ासारखा तुमच्या लेखनातला सुखद गारवा तुमच्या ग्रंथाच्या पानापानातून जाणवत गेला. सुंदरतेच्या सुमनावरचे दंव चुंबुनि घ्यावे, अशा सुसंस्कृत रसिकवृत्तीने तुम्ही जगत आला आहात. पवित्र बायबल वाचावे अशा श्रद्धेने निसर्गाचा हा अनंत रूपांनी नटलेला महान उघडा ग्रंथ तुम्ही चर्मचक्षूंनी आणि अंत:चक्षूंनी वाचत आला आहात. त्या ग्रंथाच्या वाचनातून लाभलेला आनंद, मन:शांती तुम्ही लेखांद्वारे प्रसादासारखी वाचकांना वाटून दिली आहे. एखाद्या कवितासंग्रहासारखे हे पुस्तक पुन्हापुन्हा वाचावेसे वाटत राहणार यात शंका नाही. तुमचे मन:पूर्वक अभिनंदन करायला हवे ते इतकी सात्त्विक आणि सुंदर जीवनदृष्टी तुम्हाला लाभल्याबद्दल.’

प्रवास आणि भटकंती हा दिब्रिटोंचा आवडता छंद. त्यांचे तीन वर्षे युरोपला वास्तव्य होते. त्या वेळी आलेले विविध अनुभव, संस्कृतीचे रंग-तरंग आणि मानवी स्वभावाचे नमुने यावरील त्यांची निरीक्षणे वृत्तपत्रातील सदर लेखनातून प्रसिद्ध झाली. पुढे त्याचेच ओअ‍ॅसिसच्या शोधात हे पुस्तक राजहंसने प्रकाशित केले. त्याला महाराष्ट्रातील मानाचे सर्व साहित्य पुरस्कार मिळाले. दिब्रिटोंच्या सुबोध बायबलला साहित्य अकादमीने अनुवादाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन तर महाराष्ट्र शासनाने ज्ञानोबा तुकाराम हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. पोप दुसरे जॉन पॉल जीवनगाथा, ख्रिस्ती सण आणि उत्सव, तरंग, मदर तेरेसा यांच्या चरित्राच्या आणि आठवणीच्या अनुवादाचे पुस्तक, संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची, ख्रिस्तचरित्र ही पुस्तके प्रकाशित झाली.

पर्यावरणासाठी कणखर संघर्ष

सार्वजनिक जीवनात कसोटीच्या काळात दिब्रिटोंनी ठाम भूमिका घेतली आणि त्याची त्यांनी किंमतही मोजली. ऐंशी नव्वदच्या दशकात हिरव्या वैभवाचे आगार असलेल्या वसईवर विकासकांची आणि राजकारण्यांची नजर पडली आणि पडीक जमिनीलाही सोन्याचा भाव आला. हळूहळू सारे व्यवहार भूमाफीयांच्या हाती एकवटले. त्यांना विवेकशून्य राजकारण्यांची साथ मिळाली. टोळीयुद्धे भडकू लागली. अशा काळात दिब्रिटोंनी स्थानिक दहशतवादाविरुद्ध कणखरपणाने लढा दिला. दिब्रिटो धर्मगुरू असल्यामुळे आंदोलनावर धार्मिक शिक्का मारून ते तोडण्याचे प्रयत्नही विरोधकांनी केले. आंदोलन म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेला दिलेले आव्हान आणि न्यायावर आधारित नव्या निर्मितीसाठी घातलेली साद असते. ही एक प्रकारची लढाईच असते असे मानणाऱ्या दिब्रिटोंनी मनगटशक्तीविरुद्ध लोकशक्ती संघटित केली. अजिंक्य वाटणाऱ्या साम्राज्याला हादरे दिले. हरित वसई संरक्षण समितीची स्थापना हेच माफीया शक्तीला दिलेले आव्हान होते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकचळवळ उभी करून त्यांनी तिचे नेतृत्व केले. ३० सप्टेंबर १९८९ च्या अंकात ‘वसईचा आधुनिक संग्राम’ या शीर्षकाचे संपादकीय लिहून ‘लोकसत्ता’ने दिब्रिटोंची खंबीरपणे पाठराखण केली. ‘तुमच्या जीवाला धोका आहे. मोर्चाला जाऊ नका,’ असा निरोप विरोधकांनी विजय तेंडुलकरांना दिला. तरीही मोर्चाला तेंडुलकर आवर्जून उपस्थित राहिले. कुसुमाग्रज, सुंदरलाल बहुगुणा, शबाना आजमी यांनी पत्र पाठवून दिब्रिटोंचे बळ वाढविले. धर्मगुरूंनी आपली कर्मकांडाची कर्तव्ये पार पाडावीत, सामाजिक प्रश्नांबाबत तोंड उघडू नये, अशी टीका करणाऱ्यांना केवळ कर्मकांडात गुंतलेला धर्म शोषितांचा दिलासा न ठरता अफूची गोळी बनण्याची मोठी शक्यता असते, म्हणून धर्माला बांधिलकीचे कोंदण असले पाहिजे. आम्ही लढणारच असे परखडपणे सुनावत दिब्रिटो लढत राहिले. कोणतीही भूमिका न घेणे एवढीच एक भूमिका घेणाऱ्या बहुसंख्य लेखकांपेक्षा दिब्रिटो म्हणूनच वेगळे ठरतात.

साठ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात प्रेमाच्या धाग्याने त्यांच्याशी जोडलेली विविध जाती धर्मातली, विभिन्न विचारधारांची, सर्व वयोगटातील असंख्य माणसे हीच दिब्रिटोंची खरी कमाई आणि श्रीमंती आहे. त्यामुळेच नाही मी एकला, याची त्यांना खात्री आहे.

अव्यभिचारी जीवननिष्ठा आणि वाङ्मयनिष्ठा असलेल्या, मानव्याच्या प्रतिष्ठापनेसाठी लेखणीतून विचारांची दिवेलागण करताना त्याला कृतीची जोड देणाऱ्या, समाजहितासाठी ठाम भूमिका घेणाऱ्या, न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या या लढवय्या लेखकाला परमेश्वराने दीर्घायुष्यारोग्य द्यावे, हीच प्रार्थना.

(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत.)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior literary and former literary conference president father francis dibrito amy