मराठी माध्यमात शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर पोहोचलेल्या काही कर्तृत्ववान व्यक्तींची मनोगते मांडणाऱ्या ‘मराठीने घडवलेले’ या ‘लोकसत्ता’कृत पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी केलेल्या भाषणाचा संपादित सारांश

आमची पिढी स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली. त्यामुळे मुलाला कुठल्या शाळेत पाठवायचे, याचा आमच्या आई-वडिलांमध्ये न्यूनगंड नव्हताच. आम्ही शनिवार पेठेत राहत असल्याने घराजवळची, ती सगळ्यांत चांगली शाळा या निकषानुसार मी रमणबाग प्रशालेत, भाऊ नूमविमध्ये आणि बहीण अहिल्यादेवी प्रशालेत गेली. माझे आई-वडील, मामा, मावश्या मराठीत शिकल्या. मॉडर्न हायस्कूल सुरू झाल्यानंतर पहिल्या तुकडीच्या मॅट्रिकमध्ये माझा मामा बॅ. विठ्ठलराव गाडगीळ होता. त्यामुळे मराठीमध्ये काय शिकायचे, हा न्यूनगंड मनात नव्हता. तेव्हा सेंट ऑर्नेलाज, सेंट व्हिन्सेंट, एसएसपीएमएमस आणि नॅशनल मॉडेल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळा होत्या. ज्येष्ठ मित्र दिलीप पाडगावकर हा सेंट व्हिन्सेंटचा माजी विद्यार्थी. सुरेश कलमाडी हाही सेंट व्हिन्सेंटमध्ये शिकला.

फर्ग्युसन महाविद्यालयात गेल्यावर, आम्ही लोकमान्य टिळक, आगरकर यांनी सुरू केलेल्या शाळेतून आलेले आहोत आणि काँग्रेसच्या पुढाऱ्यांची मुले मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आलेली आहेत, हे ध्यानात आले. पुण्याचे पहिले महापौर बाबूराव सणस यांची दोन्ही मुले, सुभाष आणि जवाहर (जो माझ्या वर्गात होता) हे कॉन्व्हेंटमध्ये शिकले होते. त्याचे इंग्रजीचे उत्तम वाचन होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील मुले इंग्रजी माध्यमातून शिकून आलेली होती. विखे-पाटील यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली होती. साखर कारखानदारांनी महाविद्यालयांबरोबरच इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढल्या. रामराजे नाईक-निंबाळकर हादेखील इंग्रजी माध्यमात शिकला होता. काँग्रेसचा खासदार आणि नंतर मंत्री झालेला अनंत देशमुख ग्वाल्हेरला सिंदिया स्कूलमध्ये शिकून आला होता. त्यामुळे इंग्रजी माध्यमाचे तेव्हापासून चालत आले आहे. परंतु, आमच्या वेळेला शिक्षक इतके उत्तम होते, की नवीन मराठी शाळेतील शिक्षकसुद्धा परदेशी शिकून आले होते. आमचे प्राथमिक शाळेचे प्राचार्य विष्णू साने इंग्लंडला शिकले होते.

आमच्या वेळी तीन भाषांची जी चौकट होती, त्यात पाचवी-सहावीत गेले, की हिंदी आणि आठवीत गेले, की इंग्रजी शिकायला सुरुवात व्हायची. पण, मराठी भाषा ही प्राधान्याने होती. या तीन भाषा तुम्हाला यायला पाहिजेत. त्यामुळे मराठी माध्यमाविषयी आपुलकी निर्माण झाली. फर्ग्युसनमधील आमचा बारामतीचा मित्र प्रभाकर करंदीकर, जो मुख्य सचिव होऊन निवृत्त झाला, तो प्रशासकीय अधिकारी प्रशिक्षणासाठी मसुरीला असताना, त्याने माझी ‘झुलता पूल’ ही एकांकिका मागून घेतली होती. ती त्याने हिंदीत सादर केली. आयआयटीमध्ये जी मुले जायची, तीही मराठी माध्यमात शिकलेली असायची आणि मराठी नाटक करायची. मराठी नाटकाची आवड त्यांना पहिल्यापासून राहिली.

कोणी ज्ञान कुठल्या भाषेत घ्यावे, संवाद कुठल्या भाषेत कसा साधावा, हा खरे तर ज्याचा-त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. लहानपणी काय करावे, हे त्याच्या आई-वडिलांनी ठरवावे. सध्याच्या पालकांमध्ये फार न्यूनगंड आहे, असे वाटते. इंग्रजी माध्यमातच त्यांना घालतात. इंग्रजी, ही इंग्रजी भाषा म्हणून शिकवली गेली पाहिजे. वसाहतवादी कालखंडानंतर जसा इंग्रजी भाषेचा ‘हँगओव्हर’ आपल्या जीवनावर पडला आहे, तसा आता इंग्रज गेल्यानंतर हिंदी भाषेचा ‘हँगओव्हर’ आपल्याभोवती आहे, असे वाटते. ही हिंदी भाषा काही आपली नाही. म्हणजे आपली आहे, देशाची भाषा आहे ती. परंतु, ती माझ्या जवळची भाषा नाही. माझी चिंतनाची, विचार करण्याची भाषा ही मराठीच आहे, असे मला वाटते. मग करायचे काय? भाषा अभिजात तर झाली आहे. उद्या सगळी शाळा-महाविद्यालये बंद तर करता येत नाहीत. मग मराठीचा लडिवाळ वाढवायचा कसा? तो प्रेमाने वाढवावा लागेल. आक्रमकपणे कुठली भाषा नाही शिकली जाणार. जबरदस्ती करून किंवा नियम करून कुणी भाषा नाही शिकवू शकत.

महाराष्ट्र केडरमध्ये असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये मराठी संस्कृतीचा गोडवा कसा वाढवायचा, याचाही विचार करावा लागेल. मराठी नाटक हा संस्कृतीचा प्रातिनिधिक भाग आहे. दशावतार, तमाशा, नागरी नाटकाची गोडी कशी लावायची? आम्ही दिल्लीला महाराष्ट्र माहिती केंद्रामध्ये दर वर्षी नाटक करायचो. राज्य नाट्य स्पर्धेतून पहिली तीन आलेली तीन नाटके शासनाच्या खर्चाने हिंदीमध्ये सादर व्हायची. अशी महाराष्ट्र माहिती केंद्रे देशभरात ठिकठिकाणी सुरू करता येणार नाहीत का? प्रशासकीय अधिकारी दोन वाक्ये मराठीत बोलून टाळ्या घेतात आणि नंतरचे भाषण हिंदी किंवा इंग्रजीमध्ये करतात. भाषावार प्रांतरचना आपण स्वीकारली आहे. तर मग सरकारी धोरणे राबविणाऱ्या अधिकाऱ्यांना स्थानिक भाषेविषयी आत्मीयता वाटली पाहिजे. त्यांना सांगायला पाहिजे, की हे नाटक बघा, हा चित्रपट बघा किंवा हे पुस्तक वाचा. पुस्तकाचे भाषांतर करून दिले पाहिजे. त्या काळामध्ये सत्यदेव दुबे सगळ्यांकडून मराठीतून हिंदीमध्ये, हिंदीतून मराठीमध्ये भाषांतर करून घ्यायचा. हे आदानप्रदान प्रेमाने व्हायला पाहिजे.

भाषेचा लडिवाळ वाढविण्यात उद्याोगांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले पाहिजे. छोटे उपाय राबविण्यासाठी मोठा खर्च येईल असे नाही. मराठीचा प्रचार करण्यासाठी रिल्सचा वापर करू शकतो. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील संवाद कोल्हापुरी भाषेत कसा होऊ शकेल, याचे दर्शन घडविणे हा मराठी लोकप्रिय करण्याचा उत्तम उपाय आहे. आपल्याला मराठी भाषेची मजा घेता येईल, असे काही तरी करायला पाहिजे.

आपल्याकडचे बरेचसे लोक परदेशात आहेत. नॉर्थ कॅरोलिनाला मी पिंपळवाडकर नावाच्या मित्राच्या घरी गेलो होतो. तेथील मराठी लोक आपल्या मुलांना रविवारी मराठी शाळेत पाठवितात. ती दर रविवारी दोन तास भरते. मराठी कुटुंबातील गृहिणी तेथील शाळेत गेली २५-३० वर्षे शिकवत आहेत. जगभरात ठिकठिकाणी होत असलेल्या अशा उपक्रमांना संघटनात्मक स्वरूप द्यायला पाहिजे. अशा शाळांमध्ये दोनशे मुले येतात. त्यांच्यासाठी चालविण्यात येणाऱ्या अभ्यास वर्गाकरिता पुस्तके मिळाली, तर? त्यांच्यामध्ये लोकप्रिय असणाऱ्या व्यक्तिरेखा, इंग्रजी पुस्तके ही मराठीत करून दिली, तर या मुलांमध्ये मराठी शिकण्याची गोडी वाढेल. कुठल्याही पद्धतीचा अट्टहास न करता मराठीची गोडी कशी वाढेल आणि भाषेचा गोडवा विचारांमध्ये कसा येईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

‘मराठीने घडवलेले’ हे पुस्तक मातृभाषेतील शिक्षणाच्या सामर्थ्याला केलेले एक अभिवादन आहे. या पुस्तकात मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या व्यक्तींनी गाठलेल्या उल्लेखनीय यशाची कहाणी आहे. भाषा ही अडथळा नसून ताकद आहे, हे यातून सिद्ध होते. या उपक्रमाला पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटतो. कारण हे पुस्तक पुढील पिढ्यांना उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देईल.-उषा काकडे, ग्रॅव्हिटस फाउंडेशन

‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून मराठी भाषेचे महत्त्व उलगडले. एका बाजूला मराठी भाषेमध्ये इंग्रजी-हिंदी शब्दांचा वापर वाढत असताना ‘लोकसत्ता’चा जाणीवपूर्वक मराठी शब्दांचा वापर करण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. इतकेच नव्हे, तर एखाद्या इंग्रजी शब्दासाठी मराठी शब्द वापरात आणून तो रुळविण्यामध्ये ‘लोकसत्ता’ने मोलाचे योगदान दिले आहे.मनोज चौधरी, कौटिल्य मल्टिक्रिएशन

‘लोकसत्ता’ने आयोजित केलेला कार्यक्रम मराठी भाषा, तिचा वारसा आणि भविष्यातील दिशा यावर चिंतन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मंच ठरला. दीपक घैसास, अभिनेते गिरीश कुलकर्णी, अतुल कुलकर्णी आणि सनदी अधिकारी अभिजित बांगर यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती ही या उपक्रमाची प्रतिष्ठा दर्शवते. त्यांच्या विचारमंथनातून मराठी भाषेच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा झाली. जी नक्कीच प्रेरणादायी ठरली. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशा कार्यक्रमांची नितांत आवश्यकता आहे.-सुशील जाधव, विभागीय प्रमुख, लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, पुणे

‘लोकसत्ता’ नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प हाती घेत असतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्त मराठी माध्यमात शिकून कर्तृत्वाची उंची गाठलेल्यांच्या खऱ्या कहाण्या सांगणारे ‘मराठीने घडवलेले’ हे पुस्तक प्रकाशित करून ‘लोकसत्ता’ने आणखी एक अभिनव उपक्रम साकार केला आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद केवळ उत्सवी पातळीवर न राहता, भाषेला आणखी पुढे घेऊन जाणारा असाच हा उपक्रम आहे.-प्रा. मिलिंद जोशी, भारती विद्यापीठ

Story img Loader