आपल्या अलौकिक स्वराविष्काराने संगीतप्रेमींना जिंकून घेणाऱ्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका, नवनवीन बंदिशी रचणाऱ्या वाग्येयकार, मुक्तहस्ताने विद्यादान करणाऱ्या गुरू, संगीत रंगभूमीवरील गायिका-अभिनेत्री, संगीत विचारवंत, लेखिका, कवयित्री, स्वरमयी गुरुकुल संस्थेद्वारे किराणा घराण्याचे संग्रहालय साकारणाऱ्या आणि आई-वडिलांच्या स्मृती जतन करून समाजातील चांगुलपणाचे पुरस्काराच्या माध्यमातून कौतुक करणाऱ्या अशी बहुआयामी ओळख असलेल्या डॉ. प्रभा अत्रे यांनी अवघे जीवन संगीताला वाहून घेतले होते. ९१ वर्षांचे आयुष्य समाधानाने व्यतीत करून झोपेत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आबासाहेब अत्रे आणि इंदिराबाई अत्रे यांच्या घरामध्ये १३ सप्टेंबर १९३२ रोजी प्रभा अत्रे यांचा जन्म झाला. इंदिराबाई गाणे शिकत असताना त्यापासून प्रेरित होऊन प्रभाताई वयाच्या आठव्या वर्षी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. सुरेशबाबू माने आणि नंतर त्यांच्या भगिनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडून त्यांना घराणेदार गायकीचे शिक्षण मिळाले. हिराबाई यांच्याकडे शिकत असताना प्रभाताई यांनी त्यांना भारताच्या विविध भागांत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये स्वरसाथ केली होती. संगीत शिक्षणाबरोबरच त्यांनी फग्र्युसन महाविद्यालयातून विज्ञान आणि आयएलएस विधी महाविद्यालयातून कायदा विषयांत पदवी संपादन केली. संगीतातील सरगम गानप्रकारावर संशोधन आणि प्रबंध सादर करून त्यांनी पीएच. डी. (डॉक्टर ऑफ म्युझिक) संपादन केली. लंडन येथील ट्रिनिटी म्युझिक कॉलेजमध्ये पाश्चात्त्य संगीताचे शिक्षण घेतलेल्या प्रभाताईंनी कथक नृत्यशैलीचेही औपचारिक शिक्षण घेतले होते.
ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गज़्ाल, उपशास्त्रीय संगीत, नाटय़संगीत, भजन व भावसंगीत गायकीवर प्रभाताईंचे प्रभुत्व होते. आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वत: रचलेल्या बंदिशी सादर करत. त्यांच्या ‘मारूबिहाग’ रागातील ‘जागू मैं सारी रैना’, ‘कलावती’ रागातील ‘तन मन धन’, किरवाणी रागातील ‘नंद नंदन’ या रसिकांच्या विशेष पसंतीच्या रचना आहेत. प्रभाताईंनी ‘अपूर्व कल्याण’, ‘मधुरकंस’, ‘पटदीप-मल्हार’, ‘तिलंग-भैरव’, ‘भीमकली’, ‘रवी भैरव’ यांसारख्या नव्या रागांची निर्मिती केली. किराणा घराण्याच्या गायकीत त्यांनी प्रथमच टप्पा गायनाचा परिचय करून दिला होता. प्रभाताईंनी ‘संगीत शारदा’, ‘संगीत विद्याहरण’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत मृच्छकटिक’ यांसारख्या संगीत नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या होत्या.
डॉ. प्रभा अत्रे यांच्या ‘स्वरमयी’ या पहिल्याच पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांच्या ‘सुस्वराली’ या पुस्तकालाही भरभरून प्रतिसाद मिळाला. मध्य प्रदेश शासनाने दोन्ही पुस्तकांचे हिंदी भाषेत अनुवाद प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या ‘स्वरांगिणी’ आणि ‘स्वररंजनी’ मराठी भाषेतील पुस्तकांत त्यांनी रचलेल्या पाचशे शास्त्रीय रागबद्ध रचना आणि लोकरचना आहेत. ‘अंत:स्वर’ या त्यांच्या कवितासंग्रहाचा इंग्रजी अनुवाद झाला आहे. आकाशवाणीच्या संगीत विभागात सहायक निर्मात्या, परदेशातील विद्यापीठांमध्ये संगीताच्या मानद प्राध्यापिका, मुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात (एसएनडीटी) प्राध्यापिका आणि संगीत विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले होते. पुण्यातील गानवर्धन संस्थेच्या त्या अध्यक्षा होता.
प्रभाताईंच्या सांगीतिक योगदानाचा गौरव करण्यासाठी गानवर्धन संस्थेमार्फत युवा कलाकाराला प्रभा अत्रे पुरस्कार प्रदान केला जातो. ‘स्वरमयी गुरुकुल’ संस्थेमार्फत प्रभाताईंनी पारंपरिक गुरू-शिष्य शैलीतील शिक्षणाबरोबरच अनेक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने १९९० मध्ये ‘पद्मश्री’, २००२ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०२२ मध्ये ‘पद्मविभूषण’ किताब प्रदान करून प्रभा अत्रे यांचा गौरव केला होता. राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न पं. भीमसेन जोशी पुरस्कार आणि पुणे महापालिकेच्या वतीने स्वरभास्कर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे या माझ्या आईच्या गुरुभगिनी असल्याने माझ्या सांगीतिक मावशी होत्या. त्यांच्या गायनात किराणा घराण्याची वैशिष्टय़े होतीच; मात्र त्या उत्तम रचनाकारदेखील होत्या. गेली काही वर्षे सवाई गंधर्व महोत्सवात त्यांचे गायन होत असे. आमच्यावर त्यांचा कायमच आशीर्वाद होता. त्यामुळे एक पोरकेपणा जाणवत आहे. – श्रीनिवास जोशी, कार्याध्यक्ष, आर्य संगीत प्रसारक मंडळ
ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी अनेक वर्षे संगीताची सेवा केली. माझी आजी-आजोबांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला डॉ. प्रभा अत्रे यांचे गाणे झाले होते, अशी आठवण मला आजीने सांगितली होती. शुद्ध, स्वच्छ, निर्मळ, सुंदर सुरांनी सजलेले व रेखीव असे त्यांचे गायन प्रत्यक्ष ऐकता येणार नाही हे दु:ख आहे. – राहुल देशपांडे, प्रसिद्ध गायक
प्रभाताईंच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. किराणा घराण्याची परंपरा त्यांनी मोठय़ा अभिमानाने व समर्थपणे पुढे नेली. त्यांचा सुरेल आवाज, स्वच्छ तान, गायनातील शास्त्रशुद्धता, रंजक सादरीकरण, सौंदर्यदृष्टी व सादरीकरणात असलेली सहजता यामुळे त्यांचे गाणे कायम स्मरणात राहील. उस्ताद राशिद खान यांच्या मागोमाग प्रभाताई यांचे जाणे हा संगीत विश्वाला बसलेला मोठा धक्का आहे. – पं. अतुलकुमार उपाध्ये, प्रसिद्ध व्हायोलिनवादक
डॉ. प्रभा अत्रे यांनी किराणा घराण्याचे गाणे समृद्ध केले. आपली वेगळी शैलीही निर्माण करणाऱ्या त्या विचारवंत गायिका होत्या. त्यांचे संगीत क्षेत्रातील संशोधन महत्त्वाचे होते. त्यांनी ते पुस्तकरूपातही रसिकांसमोर मांडले होते. त्या आम्हाला कायमच एका दीपस्तंभासारख्या होत्या. – आनंद भाटे, प्रसिद्ध गायक
ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन आलापीप्रधान आणि सर्वागसुंदर होते. प्रभाताई यांचे गाणे मी खूप ऐकायचे, असे मला गुरू किशोरीताई आमोणकर सांगायच्या. माझी, माझ्या आधीची पिढी आणि नंतरची अशा तीन पिढय़ांवर डॉ. अत्रे यांच्या गाण्याची छाप आहे. त्यांचे गाणे, बोलणे दोन्ही सुरेलच होते. ‘स्वरमयी’ हे पुस्तक वाचताना आपण त्यांची मैफल अनुभवतोय असे वाटते. – रघुनंदन पणशीकर, प्रसिद्ध गायक
किराणा घराण्याच्या गाण्याला आणि एकूणच भाववादी शैलीला एक नवीन आयाम देणाऱ्या काही सिद्धहस्त कलाकारांमध्ये माझ्या गुरू स्वरयोगिनी प्रभाताई अत्रे यांचा प्राधान्याने समावेश होतो. आयुष्यभर संगीताचा ध्यास घेत त्यांनी आपल्या गायनातून, लिखाणातून, सप्रयोग व्याख्यान मालिकातून मांडला. स्त्री कलाकाराचे गायन सादरीकरण कसे असावे याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला. सुरेल आस्वादक आणि कलाकार आणि सुजाण नागरिक म्हणून त्या जगल्या. – आरती ठाकूर-कुंडलकर, प्रभाताईंच्या शिष्या
गुरुतुल्य प्रभाताईंना त्यांच्या कार्यक्रमात संवादिनीची साथ करत असताना तसेच रंगमंचाव्यतिरिक्त त्यांचा वावर पाहताना कायमच त्यांचे एक सुरेल, रसिक, शिस्तशीर, आस्वादक व्यक्तिमत्त्व अनुभवायला मिळाले. नवीन पिढी काय करत आहे हे पाहण्यासाठी त्या कायम उत्सुक असत. त्यांनी लिहून ठेवलेले सांगीतिक साहित्य, त्यांचे विचार हे सांगीतिक घराण्यांच्या पलीकडे जाऊन सर्वच गायक, वादक, नृत्य कलाकारांना मार्गदर्शक आहेत. – सुयोग कुंडलकर, प्रसिद्ध संवादिनीवादक
प्रभाताईंचे जाणे म्हणजे सुरेल गायकीचा शेवट. सन १९६५ पासून मी त्यांचे गायन ऐकत आहे. त्या काळात आकाशवाणीसाठी त्यांनी आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली गांधी वंदना ऐकली आहे. संगीतातील सर्व प्रकार त्यांनी कौशल्यपूर्ण हाताळले. – पं. सुहास व्यास, ज्येष्ठ गायक
चित्रपट संगीत अजिबात वाईट नाही. या संगीताने भारतीय स्वरमेळाची (हार्मनी) निर्मिती केली. चांगल्या गोष्टी ठरवून लोकांना शिकवायला हव्यात. काय आणि कसे ऐकायचे हे श्रोत्यांनाही कळले पाहिजे. आपल्या परंपराही तपासून घ्यायला हव्यात.
नियमांच्या चौकटीत राहून वेगळे काही करणे आव्हानात्मक असते. आहे त्यात नावीन्य साधता आले पाहिजे. नवा आकृतीबंध गरजेचा असतो, तसा त्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोनही गरजेचा आहे. कलेतही ज्याची गरज असते तेच टिकून राहते. राग विकसित होण्याच्या टप्प्यांमध्ये संगीतात अनेक बदल झाले. कलाकाराला संगीताचे व्याकरण माहिती हवे, शास्त्र आलेच पाहिजे. मात्र, मला शास्त्र कळते हे दाखवण्यासाठी गाऊ नये. श्रोत्यांना आनंद देण्यासाठी मैफल सजली पाहिजे. कलाकार आणि श्रोते एकाच स्तरावर येऊ लागतात, तेव्हा निर्मितीचा स्तरही उंचावतो.
भारतीय संगीताने आजवर अनेक मातब्बर कलाकार पाहिले. त्यांची कला समजून घेतली. संगीतामध्ये त्यानुसार बदल होत गेले. अनेकांनी आपल्या प्रतिभेने संगीत पुढे नेलेलं आहे. पण यापुढे काय, असा प्रश्न कायम पडतो. शास्त्रीय संगीतात पुढे काय होणार, या प्रश्नावर आपसूकच मुद्दा येतो- मग या गाण्याने बदलायला हवं का? ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमात नोव्हेंबर २०१८ मध्ये ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्याशी साधलेल्या संवादातील काही अंश.