श्रीमंत देशपांडे
इतिहास आपल्याला सांगतो की अमेरिकेहून मोठी असलेली साम्राज्ये शेकडो वर्षे जगावर सत्ता गाजवल्यानंतर देखील नष्ट झाली आहेत. अनावश्यक युद्धे, आर्थिक अस्थिरता, चलनवाढ, खालावणारे राष्ट्रीय व्यक्तित्व आणि मूलभूत शोधप्रक्रियेकडे होणारे दुर्लक्ष आणि वैचारिक नाविन्याची घुसमट यासह अनेक कारणांमुळे रोमन आणि मुस्लिम साम्राज्ये लयास गेली आणि नेमकी हीच परिस्थिती आता अमेरिकेत उदभवली आहे भारताच्या दृष्टीने हा इतिहास महत्वाचा आहे. भारत हा महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचे स्पष्ट संकेत अमेरिकेने पाठवले आहेत कारण अमेरिकेला आता भारताची गरज भासते आहे.. ही भारताकरता प्रथमदर्शनी चांगली गोष्ट वाटली तरी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की भूतकाळातील प्रत्येक साम्राज्य बुडाले आहे आणि बुडताना या साम्राज्यांनी त्यांच्या मित्रपक्षांना पण त्यांच्या बरोबर बुडवलेले आहे. त्यामुळे आपल्याला अमेरिकेवर पूर्ण विसंबून राहता येणार नाही.
इतिहास तपासता लक्षात येते की पंडित नेहरूंनी अलिप्ततावादी धोरण का स्वीकारले असावे आणि हे धोरण कदाचित आपल्याला पुन्हा एकदा अवलंबावायची गरज आहे. गेल्या दोन हजार वर्षात तीन बलाढ्य साम्राज्यांनी जवळपास सर्व न्याय प्रदेशावर प्रबुध्दत्व गाजवले. रोमन साम्राज्याने साधारणपणे ७०० वर्षे दरारा ठेवला. त्यांनतरची सुमारे ७०० वर्षे मुस्लिम साम्राज्ये आघाडीवर होती आणि त्यानंतर आत्तापर्यंत ७०० वर्षे पश्चिम युरोपने जगावर प्रभुत्व ठेवले. यापैकी आपल्या काळाला जवळचा इतिहास हा पश्चिम युरोपच्या वसाहतवाद आणि भांडवलशाहीचा आहे. सर्वज्ञात आहे की, स्पॅनियार्ड्सनी अमेरिका जिंकून त्यांची संपत्ती आणि वर्चस्व निर्माण केले. तथापि, या संपत्तीने प्रचंड भ्रष्टाचार माजवला आणि महागाई प्रचंड वाढली. नवीन सापडलेल्या संपत्तीने काही निवडक लोकांना समृद्ध केले त्यामुळे सामान्य लोकांमध्ये असंतोष वाढला. कॅथोलिक चर्चने स्वतंत्र विचारांवर गदा आणल्यानंतर लवकरच स्वतंत्र विचारसरणीचे प्रोटेस्टंट पश्चिमेकडे स्थलांतरित झाले आणि अशाप्रकाराने आर्थिक समस्या आणि धर्माबद्दल मर्यादित दृष्टिकोन या दोन गोष्टींनी स्पॅनिश साम्राज्याचा अंत झाला. तोवर ब्रिटिश त्यांची जागा घेण्यास तयार होते. स्पेनने या प्रक्रियेची सुरुवात केली असे कदाचित असले तरी भांडवलशाहीला खरा आकार दिला ते ब्रिटिशांनी. पण ब्रिटिशांना त्यांच्या व्यापारी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी दोन महायुद्धे लढावी लागली. युद्धे जिंकली असली तरी या प्रक्रियेदरम्यान इंग्रज दिवाळखोरीत निघाले आणि आर्थिक चणचणीमुळे इंग्रजांचे साम्राज्य देखील कोसळले.
आणखी वाचा-डॉ. आंबेडकरांची स्वप्ने कधी आणि कशी पूर्ण होणार?
भांडवलशाहीची सूत्रे ब्रिटननंतर अमेरिकेच्या हातात गेली आणि लवकरच अमेरिका जागतिक प्रबळ शक्ती म्हणून मानली गेली. परंतुअमेरिकेचे हे वर्चस्व किती काळ टिकणार आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या भांडवलशाहीने पाश्चिमात्य उदयाला चालना दिली ती भांडवलशाही आता ओळखण्यापलीकडे भ्रष्ट झाली आहे. भांडवलशाहीचे बलस्थान म्हणजे छोटे उद्योग जे आज कोमेजत आहेत. भांडवलशाही लहान वस्तूंच्या उत्पादनातून वाढली परंतु आता असे उत्पादन मुख्यतः परदेशात गेले आहे. चुकीच्या सल्ल्यानुसार करोना टाळेबंदीमुळे आर्थिक ताण निर्माण होण्याव्यतिरिक्त छोट्या व्यवसायांच्या मृत्यूला नक्कीच वेग आला आहे. आजकाल अमेरिकेतील संपत्तीचे उत्पादन हे उत्पादकता सुधारणे आणि नवोन्मेष यांपेक्षा आर्थिक उलाढालींवर आधारित आहे.
भांडवलशाही म्हणजे एकेकाळी सर्वात सक्षमांसाठी संधी. परंतु आज अमेरिकेमध्ये संधी बहुतेककरून संपन्न कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तींना दिल्या जातात. अमेरिकेतील भांडवलशाहीचे प्रतिगमन आता सरंजामशाही समाज व्यवस्थेमध्ये झाले आहे. कोणत्याही अर्थपूर्ण चर्चा करण्यास नकार देणारे डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन यांच्यात देश उभा विभक्त झाला आहे. विविध वांशिक गटांना देखील अमेरिकेन व्यक्तित्वात मिसळण्याऐवजी त्यांची स्वतःची ओळख टिकवून ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. इतिहासाचा असंबद्ध आणि चुकीचा अर्थ लावला जात आहे. नवीन पिढी अमेरिकन अस्मितेचा तिरस्कार करत मोठी होत आहे. परंतु अमेरिकेसमोरील सर्वात गंभीर धोका हा आर्थिक आघाडीवर आहे. अमेरिका आपल्या विविध सामाजिक कार्यक्रमांना वित्तपुरवठा करण्यासाठी मोठी तूट चालवते. अमेरिकेला अशी वर्षानुवर्षे तूट चालवणे शक्य आहे कारण अमेरिकन डॉलर हे जगाचे राखीव चलन आहे. युनायटेड स्टेट्सने काहीही केले तरीही, उर्वरित जगाला डॉलर्स खरेदी करणे आवश्यक आहे. तथापि, इतर देशांना आता हे समजू लागले आहे की अमेरिकन डॉलरवर अवलंबित्व हे धोकादायक आहे कारण अमेरिका डॉलरच्या आडून अमेरिका इतर देशात महागाई निर्यात करत आहे.
आणखी वाचा-नरेंद्र मोदींचं स्वतःच्याच प्रतिमेवर एवढं प्रेम का आहे?
अनेक देश आता डॉलरला पर्याय शोधत आहेत. याचा परिणाम म्हणजे डॉलर कमकुवत होऊन अमेरिकेत महागाई वाढू शकते. अमेरिकादेखील चुकीचे निर्णय घेऊन चीनला मदत करत आहे. रशियाला कमकुवत करण्याच्या आपल्या चुकीच्या रणनीतीने अमेरिकेने रशियाला चीनशी युती करण्यास प्रवृत्त केले आहे. इराण आणि सौदी अरेबियाला नाराज करून, अमेरिकेने इतिहास निर्माण केला. पण सातव्या शतकातील शिया सुन्नी फाळणीनंतर कित्येक शतकांनी आता सौदी अरेबिया आणि इराण यांच्यात समेट होण्याची चिन्हे आहेत, ती अमेरिकेच्या या चुकीच्या निर्णयांमुळेच. हे कमी नव्हते म्हणून शिया व सुन्नी गट आपापल्या परीने रशिया आणि चीनशी हातमिळवणी करत आहेत.
मागील काही वर्षांमध्ये चीनचा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे, पूर्वीच्या साम्राज्यांप्रमाणेच. नवोन्मेष आणि संशोधनाच्या बाबतीत चीन आता जगात आघाडीवर आहे. भूतकाळात अकल्पनीय घटना घडल्या आहेत हे आपण बघितले त्यामुळे जग चीनला नवीन जागतिक शक्ती बनताना पाहणारच नाही असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. परंतु भविष्य जरी अनिश्चित असले तरी बहु-ध्रुवीय शक्तींचे सध्याचे जग अमेरिकन महासत्तेला निश्चितपणे धोक्यात आणत आहे, एवडे मात्र निश्चित. अर्थातच, साम्राज्याचा पाडाव काही महिन्यात किंवा दशकात होत नाही तर त्यासाठी एखादे शतक जावे लागते. अशा मधल्या काळात, भविष्यातील अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी आपल्या पुढील पिढीला तयार करणे हे मात्र आपल्या हातात आहे. ते कसे? यासाठी अलिप्ततावादाकडे पुन्हा पाहावे लागेल.
ShrimantDeshpande2023@outlook.com