डॉ. मनोज भाटवडेकर
एकीकडे घरातून मिळणारा संस्कारांचा उपदेश, दुसरीकडे इंटरनेटवरून वहात असलेला ‘नको त्या माहिती’चा महापूर आणि तिसरीकडे निसर्गानुसार होणारे शारीरिक बदल या तिन्हीच्या कात्रीतून आजची पौगंडावस्थेतील पिढी विलक्षण अशा संभ्रमावस्थेत आहे. हा तिढा सोडवण्यासाठी तिला अत्यंत विचारपूर्वक मदत देणे गरजेचे आहे.
गेल्या काही दिवसांत मन सुन्न करणाऱ्या बलात्कारांच्या आणि लैंगिक शोषणाच्या घटनांनी आपण उद्विग्न झालो आहोत. भारतात या घटना वाढण्याची अनेक कारणं वेगवेगळया तज्ज्ञांच्या मते वेगवेगळी आहेत. या घटनांच्या मुळाशी मोठ्या प्रमाणावर राजकीय आणि कायदेविषयक बाजू आहेत. अशा घटना घडल्या की मेणबत्त्या पेटवल्या जातात़, मोर्चे निघतात़, जाहीर निषेध आणि दुखवटे व्यक्त होतात़, न्यायाची मोठ्या प्रमाणावर मागणी होत़े, तज्ज्ञ मंडळी आपापली मतं मांडतात़ तर सामान्य माणसं स्वत:च्या षंढपणाची शरम वाटून अधिकच हतबल होतात. ही लाट ओसरली की पुन्हा सारं शांत होतं. अर्थात पुन्हा अशी एखादी घटना घडेपर्यंत. हे दुष्टचक्र कधी संपणार हा प्रश्नही मागे पडतो. कारण नवीन वेगळे प्रश्न (एखाद्या विद्यार्थ्याची आत्महत्या, कुणाचा तरी खून वगैरे घटना) आपलं लक्ष वेधतच असतात. आपला समाज भावनिकदृष्टया निरक्षर आहे ही बोचणी मात्र पुन्हा पुन्हा सलत राहते. सध्याच्या परिस्थितीत लैंगिकतेच्या शिक्षणाचा पुनरुच्चार करण्याची वेळ आली आहे.
सध्याची पौगंडावस्थेतली मुलं एका विलक्षण संभ्रमित अवस्थेत सापडली आहेत. प्रसारमाध्यमांमधून त्यांना कामभावना उत्तेजित करणारे संदेश मिळताहेत. शरीरात वयपरत्वे होणारे बदल या संदेशांना प्रतिसाद देऊ पाहताहेत. समाज मात्र संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली नैसर्गिक प्रवृत्ती दडपत आला आहे. दडपलेली प्रकृती नेहमीच विकृतींना जन्म देते. नैसर्गिक कामभावनेची योग्य अभिव्यक्ती दडपली गेल्यामुळे मुलं छुप्या चोरट्या, विकृत आणि असुरक्षित मार्गांनी कामभावनेची परिपूर्ती करतात. इंटरनेटवरच्या लक्षावधी ‘पॉर्न साइट्स’ या मुलांच्या लैंगिक शिक्षणाची साधनं बनल्या आहेत. त्यातून मिळणारे संदेश नेहमीच शास्त्रीयदृष्ट्या चुकीच़े, विकृत आणि अतिशयोक्त असतात. साहजिकच ज्या वयात मुलांना प्रकृतीविषयीही धड माहिती नाही, त्या वयात ती एकदम विकृतींना सामोरी जातात. संस्कृती दूरच राहिली. लैंगिक संबंध प्राणीदेखील करतात. त्यामागे फक्त पुनरुत्पादन हा एकमेव हेतू असतो. प्राणी लग्न करत नाहीत आणि संस्कृतीही निर्माण करत नाहीत. माणसाच्या बाबतीतली लैंगिकता शारीरिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक अंगांनी नटलेली असते. या बाबतीतली प्रगल्भता उपजतच असावी किंवा ती आपोआप यावी ही अपेक्षा गैरवाजवी आणि अवास्तव आहे. ही प्रगल्भता येण्यासाठी लैंगिकतेच्या शिक्षणाची गरज आहे. हल्ली शाळांमधून लैंगिक शिक्षण दिलं जातं. पण या शिक्षणाचा भर प्रामुख्याने एचआयव्ही- एड्स प्रतिबंध यावर जास्त असतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जणू सगळं माहीतच असतं असं गृहीत धरलं जातं. त्यांच्यासाठी हे कार्यक्रम नसतातच.
हेही वाचा >>> वेकर का चिडले आहेत? पर्यटनाचा कहर मुळावर उठला आहे का?
लैंगिक शिक्षण याचा अर्थ लैंगिक संबंध ‘कसा’ करावा याचं शिक्षण नाहीच. ते द्यावं लागत नाही. लैंगिकता नावाच्या एका व्यापक गोष्टीकडे बघण्याचा एक निरोगी दृष्टिकोन निर्माण करणं हा या शिक्षणाचा हेतू आहे. आपल्या अस्तित्वाला मुळात जबाबदार असलेल्या लैंगिकता नावाच्या मूलभूत घटनेबद्दल वेगवेगळया बाजूंनी विचार करणं हा एक अभ्यासपूर्ण (आणि आनंददायीदेखील) उपक्रम असू शकतो. यात शारीरिक, मानसिक, सामाजिक, कलात्मक सांस्कृतिक अशा वेगवेगळया पैलूंचा समावेश आहे. लैंगिक शिक्षणात दोन महत्त्वाचे भाग आहेत. माहिती आणि मूल्यं. या दोन्ही बाबतीत मुलांना लैंगिक शिक्षणाद्वारे सजग करता येतं. त्यातला माहितीचा भाग ‘‘शिकवता’’ येतो. मूल्यांचा भाग हा ‘‘शिकायचा’’ असतो. तो मुलांनी शिकावा यासाठी योग्य प्रकारचं वातावरण मुलांना उपलब्ध करून द्यावं लागतं. मुलांना मोकळया चर्चेसाठ़ी संवादासाठी वाव हवा असतो. घरातली आणि आसपासची मोठी माणसं या बाबतीत काय बोलतात़, कसं वागतात यामधून मुलं बरंच काही शिकतात.
पालक आणि शिक्षक हे मुलांच्या लैंगिक शिक्षणातला महत्त्वाचा वाटा उचलू शकतात. मुळात लैंगिक शिक्षण पुस्तकी नसावं. ते सहज़ अनौपचारिक आणि व्यावहारिक जगण्याशी संलग्न असावं. एखाद्या बातमीच्या किंवा एखाद्या पाहिलेल्या घटनेच्या संदर्भात मुलांशी चर्चा करून एखादा संदेश मुलाला देता आला तर त्याचा परिणाम जास्त चांगला होतो. पौगंडावस्थेतल्या मुलांच्या मतांबद्दल आदर बाळगून त्यांच्यावर टीका न करता आपला दृष्टिकोन मांडण्याची कला पालकांनी शिकायला हवी. कुठलीही टोकाची ‘‘नैतिक’’ भूमिका इथे उपयोगाची नाही. नैतिकतेचे डोस या वयातल्या मुलांना नको असतात. नैतिक अनैतिक यापेक्षासुद्धा निरोगी आणि विकृत, उपयोगी आणि निरुपयोगी या संकल्पनांचा मुलांना जास्त फायदा होतो.
हेही वाचा >>> ‘बहिणीं’नो, दीड हजार रुपयांसाठी ‘भावां’ना प्रश्न विचारण्याची ताकद गमावू नका…
स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला मोठा फरक असा की स्वातंत्र्य हे संपूर्णपणे जबाबदारीवर आधारलेलं असतं. ‘‘मी माझ्या वर्तनाची संपूर्ण जबाबदारी घेतो. त्यामुळे इतर कुणालाही माझ्या आयुष्यात दखल घ्यावी लागत नाही याचाच अर्थ मी स्वतंत्र आहे’’ हा सूर आजच्या तरुणांनी आळवायला हवा आहे. लैंगिक बाबतीतलं स्वातंत्र्य याचा दुसरा अर्थ जबाबदार आणि प्रगल्भ लैंगिक वर्तन. यासाठी लैंगिक शिक्षणाला दुसरा पर्याय नाही. प्रौढांनी मुलांना योग्य ती माहिती द्यावी. मूल्यांचं उदाहरण स्वत:च्या वागण्यातून त्यांच्यापुढे ठेवावं. त्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि त्यांना त्यांचे पर्याय निवडू द्यावेत. त्यांच्याशी या बाबतीत संवाद मधून मधून चालू ठेवावा. सकारात्मक संदेश देत रहावं. त्यातूनच मुलं लैंगिक सु़ख त्यातले संभाव्य धोके आणि त्या बाबतीत घेण्याची खबरदारी यांची योग्य सांगड घालून वावरायला शिकतील. माणसाचं कामजीवन हा एक आदिम ऊर्जास्राोत आहे. ऊर्जा जेव्हा जननेंद्रियांतून प्रवाहित होते तेव्हा ती लैंगिक असते. तीच ऊर्जा जेव्हा ऊर्ध्वगामी होते तेव्हा ती सर्जनशीलतेचं रूप धारण करते. क्रीडा- कला यांची जोपासना, ध्यान (मेडिटेशन) यांतून या ऊर्जेला योग्य वळण मिळू शकतं.
अनेक वर्षांपूर्वी काही महाविद्यालयांतून अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं. फिजिऑलॉजीच्या एक प्राध्यापक (लैंगिकतेच्या शारीरिक बाबींबद्दल), इंग्रजीच्या एक प्राध्यापक (लैंगिकतेच्या कलात्मक बाबी म्हणजे साहित्यातून चित्र, शिल्प़, नृत्य कलांमधून लैंगिकता कशी व्यक्त होते याबद्दल) आणि मी (लैंगिकतेच्या मनोसामाजिक बाबींबद्दल) अशा तिघांनी मुलांशी संवाद साधला होता. लैंगिकता ‘‘घाणेरडी’’ नाह़ी, तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन ‘‘घाणेरडा’’ आहे. लैंगिकतेला एक सुंदर बाजू आहे. निसर्गात जिथे जिथे सौंदर्य नजरेला पडतं (उमललेली फुल़ं, नाचणारा मोर, गाणारा कोकीळ आणि अशा असंख्य गोष्टी) तिथे तिथे लैंगिकतेचं वास्तव्य आहे. लैंगिकतेचा संबंध मुळात सुंदरतेश़ी, आनंदाशी आहे आणि स्त्री-पुरुष सुसंवादातून निरोगी लैंगिक जीवन फुलतं ही सकारात्मक जाणीव मुलांमध्ये रुजायला यातून मदत झाली. या मुलांचं वय होतं १७ ते १९ वर्षं. भरपूर प्रश्नोत्तरं झाली. हे कार्यक्रम चार चार तास रंगले. हे चर्चासत्र निरोगी आणि उपयुक्त आहे अशी मुलांची एकदा खात्री पटली की मुलं मोकळेपणाने प्रश्न विचारतात. मुलांनी विचारलेले काही प्रश्न वानगीदाखल इथे देतो. सौंदर्य म्हणजे काय? प्रेम आणि शारीरिक आकर्षण यातला फरक कसा ओळखायचा? मुलींवर मुलांपेक्षा जास्त बंधनं का असतात? आमच्या मनात येणारे लैंगिक विचार आम्ही थोपवायचे की येऊ द्यायचे? त्यामुळे अभ्यासावर परिणाम होतो तो कसा टाळायचा वगैरे वगैरे. कार्यक्रमाचं यश त्याच्या प्रयोजनातच सामावलेलं होतं.
आजची तरुण पिढी भावी पिढीची जन्मदाती आहे. ही पिढी जर एका विवेकपूर्ण आणि जबाबदार स्वातंत्र्याची पुरस्कर्ती झाली तर ती आपले संस्कार पुढच्या पिढीला देऊ शकेल. समाजाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
drmanoj2610 @gmail.com