प्रताप आसबे
पावलापावलावर येणारी संकटं, राजकीय अस्तित्वापुढेच प्रश्नचिन्ह उभे करणारे शह- काटशह, घनघोर संघर्ष आणि तोही एकाकी, शिवाय त्यातून मिळणारं मर्यादित यश हा शरद पवार यांचा सहा-साडेसहा दशकांचा राजकीय इतिहास आहे. पण पक्षातली फूट कौटुंबिक ऐक्याचाही वेध घेते, तेव्हा जिव्हारी लागलेली जखम घेऊनही आयुष्याच्या मावळतीला पुन्हा त्याच जिद्दीने उभा राहतो तो शरद पवारांसारखा नेता! अशी दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या पवारांना हलक्यात घेऊ नये, हे साधंसोपं राजकीय शहाणपण गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांना नसल्याचा परिणाम व्हायचा तो झाला.
दिग्गज म्हणविणाऱ्या मोदी- शाह यांनीच ताळतंत्र सोडल्याने भाजपच्या गल्ली-बोळांतील शेंबड्या पुढाऱ्यांनीही पवारांची यथेच्छ टवाळी केली. केंद्रीय तपासयंत्रणा घरगड्यासारख्या वापरून राज्याराज्यांत नेत्यांना गजाआड केलं. राजकीय पक्ष तोडून फोडून त्यांची लक्तरं रस्त्यारस्त्यांवर टांगली. न्यायालयांच्या निष्पक्षपातीपणावर गदा आणण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाचा खेळखंडोबा केला. सत्तेची सूत्रं हातात ठेवण्यासाठी ऊतमात, बेदरकारपणे केला. लोक हे उघड्या डोळ्यांनी पहात होते; तरीही ते जातात कुठे, इतकं त्यांना गृहीत धरलं होतं.
शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष फोडले. काँग्रेसचे नेते गळाला लावले. म्हणजे आता ते संपलेच अशा थाटात भाजपवाले वावरत होते. शिंदे, फडणवीस, पवार या सरकारनं हवे ते निर्णय घेतले. सत्ताधारी आमदार खासदारांच्या मतदारसंघात पाचपाचशे आणि हजारहजार कोटी रुपयांची कामं काढली. गावागावात गल्लीबोळात कामं काढली म्हणजे लोक झक्कत आपल्या आमदार खासदारांना निवडून देतील, असं गृहीत धरून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. मध्यम आणि उच्चमध्यमवर्गाला खूश करण्यासाठी कांद्याच्या आयात-निर्यातीसंबंधात पक्षपाती धोरणं राबविली. राज्यातले उद्याोगधंदे गुजरातकडे वळविले. पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेची गाजरं दाखवून बेरोजगार तरुण भुलतील; गारपीट, अवकाळी आणि दुष्काळात होरपळणारे लोक चार तुकडे टाकले की आपल्याच मागं धावतील; धर्माच्या अफूनं लोक कायम वेडेपिसे होतील; जात धर्माच्या राजकारणानं कायम पिसाट होतील… अशा तोऱ्यात सत्ताधारी होते.
हेही वाचा >>>विकासाकडे न पाहणारा अनाकलनीय जनादेश
राज्यात असंतोष खदखदत होता. पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपची टोळधाड तुटून पडायची. देवेंद्र फडणवीस, बावनकुळे इतकंच काय पण ज्यांची नावंही घ्यायच्या लायकीचे नाहीत, ते गल्लीबोळातील ते शेंदाड शिपाईसुद्धा वाट्टेल तसा पाणउतारा करायचे. हे सगळं वर्तमानपत्रं ठळकपणे छापायची. इलेक्ट्रॉनिक माध्यमं ‘ब्रेकिंग’ म्हणून त्याची पारायणं करायची. याचा प्रतिवाद एकटे संजय राऊत करायचे. पण त्यांचंही वस्त्रहरण माध्यमांत व्हायचं. तरीही पवार आणि उद्धव मात्र पायाला भिंगरी लावल्यागत महाराष्ट्रभर फिरत राहिले. पक्ष गेला, नाव गेलं, चिन्ह ओरबाडलं, दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेतेही गेले… तशाही अवस्थेत ते कशाचीही पर्वा न करता लोकांना थेट भिडले. तेव्हा लोक आणि विशेषत: तरुण या एकाकी योद्ध्यांमागे धावू लागले.
भेटीगाठींतून राजकीय बेगमी
निवडणुका जाहीर होण्याआधी पंतप्रधानांनी दौऱ्यांचा सपाटा लावला. जिल्ह्याजिल्ह्यांत विकासकामांचे नारळ फोडले. रकानेच्या रकाने भरून जाहिराती दिल्या. रोजच्या रोज विरोधकांची हेटाळणी, टिंगळटवाळी ठरलेली होती. पंतप्रधानांच्या पाठोपाठ समाजमाध्यमांतून ट्रोल-धाडी पडायच्या. या सगळ्या गोंधळ- गदारोळात पवारांनी आपल्या रणनीतीला आकार द्यायला सुरुवात केली. जिल्ह्याजिल्ह्यांतल्या लोकांना भेटायला सुरुवात केली. काही विश्वासातल्या मोहऱ्यांना त्यांनी छोट्यामोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. पण याची खबर या कानाची त्या कानाला नव्हती. समजा लागली तरी त्यातून काय हाती लागणार, असाच समज व्हायचा. या सगळ्या दौऱ्यांमध्ये एक दिवस अचानक ते वाकडी वाट करून अकलूजला विजयदादांच्या प्रकृतीची विचारपूस करायला गेले. याची ठेच भाजपच्या नेत्यांना लागली खरी; पण पवारांनी माढ्याचं गणित जुळवलं याची कल्पना मात्र त्यांना आली नाही. कोल्हापूरचे संभाजीराजे हे राज्यात बऱ्याच उचापत्या करत होते. त्याकडे काणाडोळा करून पवार शाहू महाराजांना भेटले. माढ्यापाठोपाठ कोल्हापूरची तटबंदी मजबूत केली. एकदा असेच ध्यानीमनी नसताना अमरावतीला गेले आणि बच्चू कडू यांचा पाहुणचार घेतला. यातील अनेकांचे लागेबांधे सत्ताधाऱ्यांशी होते. काहींनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनाही त्यांच्या नकळत कामाला लावले. विजयदादा मोहिते आणि सुशीलकुमार शिंदे यांचं सोलापूरच्या राजकारणात विळ्या-भोपळ्याचं सख्य. त्यांचीही एक अंगतपंगत पवारांनी घडवली. त्यातून पुढे सोलापूर जिल्हा आघाडीला सुकर झाला. एकदा पवारांनी अचानक महादेवराव जानकरांना माढ्याची गळ घातली. जानकरांनी बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याशी दोन हात केले होते. तसे भाजपवाले खडबडून जागे झाले. त्यांनी जानकरांना परभणीला नेलं. इकडे उत्तमराव जानकर माढ्यात आघाडीच्या दिमतीला आले. जानकर परभणीला गेले खरे, पण म्हणतात ना, जगात जर्मनी आणि मराठवाड्यात परभणी!
मराठा आरक्षण : कुणाचा खेळ?
मराठा आरक्षणाचा मोठा खेळ रंगला होता. हे आंदोलन राज्यभर उभं राहावं, अशी भाजपची रणनीती होती. त्यातून साहजिकच मराठा-ओबीसींत ठिणगी पडणार होती. या जातीय ध्रुवीकरणाचा लाभ भाजपला होणार होता. भाजपची ही खेळी जबरदस्त होती. जरांगे पाटलांना परभणी-जालन्याबाहेर कोणी ओळखत नव्हतं. त्यांच्या उपोषणादरम्यान पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. राज्यभरातले मराठे संतापून उठले. ओबीसींच्या कोट्यातूनच आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीला जोर चढला. संभाजी ब्रिगेडनं त्याला विरोध केला. पण त्यांचं कोण ऐकतो? लाखालाखांच्या संख्येने मराठे बाहेर पडले. जेसीबीतून फुलपाकळ्यांचा वर्षाव सुरू झाला. रातोरात जरांगे मराठ्यांचे अनभिषिक्त सम्राट झाले. तसे ओबीसी नेते छगन भुजबळ सात्त्विक संतापाने पेटून उठले. सुरुवातीला जरांगेंची भाषा भुजबळ साहेब वगैरे अशी होती. तेव्हा भुजबळांमधल्या मुरब्बी राजकारण्याने त्यांना उचकवायला सुरुवात केली. तसे जरांगे बिथरले आणि आपोआप मराठा विरुद्ध ओबीसी अशी धार आली. भाजपचं काम फत्ते झालं होतं. त्यांची ओबीसी व्होट बँक मजबूत झाली. आणि बिथरलेले मराठे बहिष्काराची भाषा बोलू लागले. त्यात प्रकाश आंबेडकरांनी जरांगे यांना एकतर्फी पाठिंबा जाहीर केला. विरोधकांचा कडेलोट करण्याची परफेक्ट रणनीती आकाराला येत होती. तथापि, पवार नामक मुरब्बी राजकारण्याला याची आधीच टोटल लागली होती. त्यामुळे लाठीमार झाल्याझाल्या पवारांनी जरांगे यांना भेटून कुरवाळलं! फडणवीस, भुजबळ आणि आंबेडकर कामाला लागले होते, तसेच काही लोक पवारांनीही पेरले होते. पुढे काय झालं, ते आपण पाहतोच आहोत.
अजितदादांची अस्वस्थता
पवारांच्या जिव्हारी लागलं होतं ते अजितदादांचं बंड. भाजपने बारामतीच्या बालेकिल्ल्यालाच भगदाड पाडलं नव्हतं तर पवार नामक कौटुंबिक जिव्हाळ्यातही बिब्बा घातला होता. अजितदादांनी पत्नी सुनेत्राताईंनाच उभं केलं पाहिजे, असं दडपण होतं. या खेळीतून सुप्रिया सुळेंचा पराभवच नव्हे तर साठपासष्ट वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात मुरलेल्या पवार यांचंच नाक कापण्याची भाजपची सुप्त इच्छा होती. वाचाळ चंद्रकांत पाटलांनी ते स्वच्छपणे पत्रकारांना सांगितलं. तेही सुनेत्राताईंच्या समोरच. मग अजितदादा पिसाटणार नाहीत तर काय?
पवारांनी अजितदादांवर विश्वासानं बारामती सोपविली होती. राज्याच्या पक्षाची धुराही त्यांच्याकडे दिली होती. बारामतीवर दादांची पकड असल्यानं सुप्रिया सुळेंसाठी निवडणूक सोपी नव्हती. धोका लक्षात घेऊन पवारांनी राज्यभरात जी रणनीती आखली होती तशीच बारामतीत पावलं टाकली. सुप्रियाताईंची स्थिती सुधारत गेली तसा दादांचा तोल सुटत गेला. ते अधिकाधिक फसत गेले. पण सुनेत्राताईंनी आपला तोल ढळू दिला नाही. वेगळे झालेल्या राष्ट्रवादीनं शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. अगदी प्रफुल्ल पटेलांपासून. तोच कित्ता नंतर दादांनी बारामतीत गिरवला. अगदी सुधाकरराव नाईकांपासून २००४ सालापर्यंतचा इतिहास उगाळला. हे करण्याची गरज नव्हती. नेते म्हणून व्यापक पक्षहिताचे निर्णय घ्यावे लागतात. ते सगळ्यांना रुचतीलच, असं नाही.
भाजपचं ठीक आहे, ते आपल्या सोयीसाठी वाट्टेल ते करतील. पण पवारांनी पुन:पुन्हा समजावूनही दादांनी स्वत:च्या हातानं पायावर धोंडा मारून घेतला. एकाकी पवार फिरायला लागल्यापासून अजितदादांच्या गोटात अस्वस्थता सुरू झाली होती. त्यांना निवडणुकीत मिळणाऱ्या प्रतिसादामुळे अनेकांच्या पोटात गोळा आला होता. त्यामुळे या निकालानंतर विधानसभेच्या तोंडावर त्यांच्यासोबत कोण राहील, हा प्रश्नच आहे. शरीर थकले. गात्रं शिथिल झाली. भाजपनं त्यांचं सर्वस्व हिरावलं… टिंगलटवाळी आणि मानहानी केली. पण वस्ताद म्हातारा झाला तरी तो वस्तादच असतो. राजकारण हा त्यांचा जीव की प्राण आहे. त्यांनी ‘घरी बसावं’ असा सल्ला मीही कधीतरी त्यांना दिला होता. पवार न कळल्याचा तो परिणाम होता. त्यांचं जगणंच राजकारण आहे, हे आमच्याप्रमाणे त्यांच्या अनुयायांना आणि पुतण्यालाही कळायला हवं होतं.
आता लाखाचे बारा हजार झाल्यावर उपरती होऊन फायदा नाही. एकाकी पवार आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा पुरती बदलली. उद्याच्या विधानसभेच्या रणसंग्रामाची दिशाही त्यांनी निश्चित केली. भाजपनं गेली दहा वर्षे राज्यात सत्तेवर असताना आणि नसतानही जे गलिच्छ राजकारण केलं त्याची फळं त्यांना मिळाली. उद्याच्या विधानसभा निवडणुकीतही मिळतील. मोदी, शहा आणि फडणवीस हे महाराष्ट्रातल्या भाजपच्या अपयशाचे मानकरी आहेत, यावर आज शिक्कामोर्तब झालं.
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.
asbepratap@gmail. Com