प्रताप आसबे
शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याची केलेली घोषणा आणि नंतरच्या घडामोडी यातून भाजपला खुले आव्हान मिळालेच, पण पक्षात दुसऱ्या फळीमध्ये असलेल्या नेत्यांवरची पवार यांची पकड अधिक घट्ट झाली..
शरद पवार हे राजकारणातील एक अजब रसायन आहे. महाराष्ट्र कधीही एकमुखाने त्यांच्यामागे उभा राहिला नाही. तमिळनाडू, प. बंगाल, ओरिसा यांच्यासारखे औदार्य पवारांच्या वाटय़ाला कधीच आले नाही. राष्ट्रीय पक्ष सोडल्यास तसा महाराष्ट्र कुणाच्याही मागे उभा राहिला नाही. तरीही गेली ६० वर्षे सलग ते केवळ स्वत:च्या हिमतीवर एकहाती राजकारण करत आहेत. यशापेक्षा अपयशाचे खडतर दान त्यांच्या वाटय़ाला नेहमीच आले. यश कधीच त्यांनी डोक्यात जाऊ दिले नाही. तर अपयश त्यांना कदापिही नामोहरम करू शकले नाही. कधीकधी निवडणुकीच्या प्रचारात त्यांना पराभव स्पष्टपणे दिसत असतो तेव्हा तर ते आणखी हिरिरीने प्रचार करतात.
या नेत्याने महाविद्यालयीन जीवनापासून स्वबळावर राजकारण केले. सुरुवातीला यश आणि परिस्थितीने साथ दिली तेव्हा अपार कष्टाने ते स्वत:च्या पायांवर खंबीरपणे उभे राहिले. राजकारणाच्या बाहेर सर्व क्षेत्रांत त्यांनी कष्ट उपसले. त्यांची निर्णयक्षमता दांडगी आहे. कधी, केव्हा आणि कसे निर्णय घ्यायचे, याचे आडाखे ठरलेले असतात. निर्णय घेताना पूर्ण विचारांती निर्णय घेतात. त्याचे बरेवाईट परिणाम बिनबोभाट सहन करतात. पण मागे हटत नाहीत. ते कट्टर नेहरूवादी आहेत. संसदीय लोकशाहीवर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळेच अगदी उमेदीच्या काळापासून ते दिल्लीच्या अधिकारशाहीशी लढत राहिले. निष्ठावंत म्हणून आपल्या विचाराला मुरड घातली असती तर वर्षांनुवर्षे छत्रचामराच्या छायेत राहिले असते.
यशवंतराव त्यांच्यासाठी गुरुस्थानी आहेत. यशवंतराव महाराष्ट्राचे मानिबदू मानले जात, पण त्यांनीही जेव्हा इंदिरा गांधींपुढे हात टेकले तेव्हा त्यांना बाजूला सारून शरद पवार त्यांची लढाई स्वत: लढत राहिले. त्याचे राजकीय परिणाम आयुष्यभर भोगत राहिले. ‘‘काँग्रेसमध्ये या, संजयबरोबर काम करा,’’ असे इंदिराजींनी सुचवताच ‘‘तुम्हीच माझ्या नेतृत्वाला का नाही पाठिंबा देत,’’ असा थेट सवाल करण्याची हिंमत कोण करेल? या हिमतीची किंमतही उमदेपणाने चुकती केली. विरोधक त्यांच्या पाचवीलाच पुजलेले.. त्यांचे दिवसरात्र ‘शरदपुराण’! पण त्यांच्याविषयी यांच्या तोंडून चुकून ब्रही निघाला नाही. घाव वर्मावर घेतले आणि झटकूनही टाकले. त्यांच्या राजकीय व्यवहारात सुडाच्या राजकारणाला स्थानच नव्हते. त्यामुळे अनेक विरोधक कालांतराने त्यांचे समर्थक झाले. त्यांनी कष्टाने निवडून आणलेले लोक पाखरांसारखे भुर्रकन उडाले. पण त्यांच्याविषयी यांची तक्रार नाही. राजकारणात असे होतच असते, असे ते इतरांना समजावतात. त्यामुळे सोडून गेलेलेही त्यांचा आदर करत. सातारचे उदयनराजे- त्यांच्या पक्षाचे खासदार! उठताबसता पवारांची बिनधास्त टिंगलटवाळी करायचे. तेही त्यांनी कधी मनावर घेतले नाही. टीव्हीवाल्यांना टीआरपीचे मोठेच घबाड. त्यामुळे गडी आणखी चेकाळला. हिंमत इतकी वाढली की एके दिवशी खासदारकीचा राजीनामाच पवारांच्या तोंडावर फेकला. मी छत्रपतींचा वारस आहे. माझ्या बळावर मी निवडून येतो, अशा फुशारक्या मारल्या. छत्रपतींच्या या मस्तवाल तेराव्या वारसाला यांनी खुद्द साताऱ्यात जेव्हा चौदावे रत्न दाखविले तेव्हा गडय़ाला अद्दल घडली.
विरोधक, प्रतिस्पर्धी आणि मित्र या सगळय़ांशी त्यांचे जिव्हाळय़ाचे संबंध असतात. त्यांनी नाही ठेवले तरी हे महाशय ठेवतात. येताजाता बोलतात. कमी-जास्त विचारतात. वेळप्रसंगी पाहिजे ती मदत करतात. कधी कोणाशी शत्रुत्व नाही. सर्वाशी सौहार्द. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ते आवर्जून गुणांची पारख करतात आणि दोषांकडे दुर्लक्ष करतात. याचेही फायदे- तोटे होतातच. सर्वाशी सौहार्दाचे संबंध ठेवल्यामुळे बुद्धिबळातील चाली अचूक ठरतात. लोक म्हणतात हेही त्यांचे मित्र आणि तेही त्यांचे मित्र. कशाची टोटल कुणालाच लागत नाही. त्यामुळे राजकीय खेळी करण्यासाठी मोठा अवकाश त्यांच्याकडे असतो. ते कुणाच्या बाजूचे आणि कुणाच्या विरोधात, हे त्यांनाच पक्के ठाऊक असते. कुणाला बरोबर घ्यायचे आणि कुणाचा गेम करायचा हेही ठरलेले असते. सौहार्दाच्या संबंधांमुळे सगळेच गाफील असतात. तेव्हा हे ज्याच्यावर मात करायची ती करून पुढे जातात. राजकारणातील या खेळी फार दूरचा विचार करून ते करत असतात.
२०१४ पासून देशातील आणि राज्यातील वातावरण कमालीचे बदलून गेले. त्यात बिगरभाजप पक्षांची धूळधाण झाली. तत्पूर्वी सत्ताबदलाचे राजकारणही खेळीमेळीचे होते. त्यांना सत्ता मिळाली त्यांनी पाच वर्षे राबवावी. उद्या आम्ही सत्तेत येऊ, असा दृष्टिकोन. निव्वळ गबाळा, पण चौदानंतर मोदी-शहा जोडगोळीने विरोधकांवर आणि त्यातल्या त्यात काँग्रेसवाल्यांवर गाढवांचे नांगर फिरवायला सुरुवात केली. विरोधी विचार, विरोधी पक्ष म्हणजे राष्ट्रद्रोही. ते समूळ उखडून टाकण्यासाठी साम-दाम-दंड-भेदनीतीचा उघडपणे अवलंब केला. संसदीय संकेत धुळीला मिळवले. केंद्रीय तपास यंत्रणांचा बेदरकारपणे वापर केला. विरोधकांनी हा यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची आदळआपट केली. ‘विशिंग मशीन’ म्हणून बोंबाबोंब केली. पण बोंबला काय बोंबलायचे ते, असाच त्यांचा खाक्या. तपास यंत्रणांच्या लांडगेतोडीत भलेभले गारद झाले. जिल्ह्याजिल्ह्यांत अनेक पक्षांचे वासे पोकळ झाले. राजकीय उद्दिष्टांसाठी हिंदूत्वाचा उघडपणे गैरवापर करताना हिंदूत्वाचे मक्तेदार आम्हीच असाही पवित्रा भाजपने घेतला. शिवसेना हा त्यांचा वर्षांनुवर्षांचा जीवश्चकंठश्च मित्रपक्ष. पण तोही हिंदूत्वात वाटेकरी असता नये, असे यांनी ठरविले. साहजिकच बाळासाहेबांनंतर कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरू लागला. ही बाब पवारांनी पक्की हेरली.
पवारांचे मोदी आणि ठाकरे या दोघाही हिंदूत्ववाद्यांशी उत्तम संबंध. त्यातही डावे कोण उजवे कोण, याची खूणगाठ त्यांनी बांधलीच होती. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी मोदींचा बारामतीत पाहुणचार केला. तेव्हा पवार भाजपबरोबर जाणार या वावडय़ा उठू लागल्या. पवारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. उलट त्या तशाच चर्चेत राहाव्यात, असे त्यांचे वागणे. संबंध चांगले ठेवायचे, पण लक्ष्मणरेषा ओलांडायची नाही, असे धोरण. बाळासाहेब ठाकरे आणि पवार राजकारणातले कट्टर विरोधक. पण एरवी उभयतांत गाढा दोस्ताना. बाळासाहेबांनंतर उद्धवशी त्यांची फारशी जवळीक नव्हती. ती राज यांच्याशी होती. उद्धव हिंदूत्वाची कडवट भाषा करायचे. पण सेनेचा डीएनए त्यांना चांगला ठाऊक होता. मित्र कोण आणि प्रतिस्पर्धी कोण, याची आखणी त्यांनी बरीच आधी केली होती. २०१४चे निकाल लागत असतानाच राष्ट्रवादीने भाजपला एकतर्फी पाठिंबा जाहीर केला. त्यातून भाजपवाले आणखी मातले. काँग्रेस, राष्ट्रवादीला लक्ष्य करताना शिवसेनेचाही नित्यनेमाने पाणउतारा सुरू झाला. उभयतांतील दरी रुंदावत गेली.
२०१९च्या निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीचा बाजार उठवायचा चंग भाजपने बांधला. जिल्ह्याजिल्ह्यांत राष्ट्रवादीला भगदाडे पाडली गेली. मस्तवाल आणि शक्तिशाली नेते भाजपच्या दिशेने सैरावैरा पळत सुटले. पवारांचा एकखांबी तंबू भुईसपाट झाला, अशी स्थिती निर्माण झाली. भाजपला सोमय्यांसारखा हर्षवायू झाला होता. टिनपाट कार्यकर्तेही पवारांच्या नावे टिऱ्या बडवू लागले होते. या उत्साहाच्या भरात ईडीने थेट पवारांनाच लक्ष्य केले. राष्ट्रवादीच्या नेत्या-कार्यकर्त्यांची वाचाच बसली. भल्याभल्यांचा थरकाप उडाला. दोन दिवस रागरंग पाहिल्यानंतर आपण स्वत: ईडीच्या नोटिशीला उत्तर द्यायला दोन दिवसांनी मुंबईत ईडी कचेरीत जाणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले. पवार स्वत:च ईडीशी दोन हात करणार म्हटल्यावर कार्यकर्ते लढय़ाच्या खुमखुमीने पेटून उठले. ‘एक तरी माई का लाल उतरला ईडीला आव्हान द्यायला,’ अशी भाषा सुरू झाली. अख्ख्या महाराष्ट्रातील कार्यकर्ते मुंबईकडे निघण्याची तयारी सुरू झाली. अख्खा महाराष्ट्र मुंबईत येतो की काय, अशी सनसनाटी निर्माण झाली. कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला.
मग मात्र ईडीची स्थिती अशी झाली की ‘‘तुम्ही नका येऊ आमच्याकडे’’, अशी गयावया करू लागले. पण पवार इरेला पेटले होते. राज्य सरकारचेही धाबे दणाणले होते. पवारांनी घराबाहेर पडूच नये, असे प्रयत्न सरकारदरबारी सुरू झाले. त्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी सरकारला मदत केली. पवारांनी ईडी कार्यालयात जाणार नसल्याचे आश्वासन मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. गृहमंत्री, मुख्यमंत्री नामानिराळे राहिले, पण पवारांच्या चालीने राज्यातील तरुणाई पेटून उठली होती.
मातब्बर मोहिते पाटील घराणे भाजपवासी झाल्याने सोलापुरातील राष्ट्रवादीचा खेळ संपल्यात जमा होता. शेजारच्या उस्मानाबादेत सदासर्वकाळ शड्डू ठोकणारे डॉ. पद्मसिंह पाटील भाजपच्या वळचणीला जाऊन बसले होते. तिथेही सोलापूरसारखेच भकास वातावरण होते. पवार पहिल्यांदा सोलापुरात थडकले. तेव्हा गावागावांतून पोरके झालेले हजारो कार्यकर्ते पेटून उठले होते. त्यांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाने पवारांच्या प्रचाराची दिशा नक्की केली. तरुणाईचा तोच उत्साह त्यांना उस्मानाबादेत पाहायला मिळाला. सातारच्या सभेने तर इतिहास घडवला. ही पावसातली सभा साताऱ्यात जशी सुरू होती तशी गावागावांतल्या समाजमाध्यमांवर त्याच वेळी चालली होती. पवार एकाकी असतात तेव्हा ते आणखीनच तापदायक ठरतात. मात्र हा धडा भाजपने गांभीर्याने घेतला नाही.
कोणाच्या ध्यानीमनी नसताना पवारांनी महाविकास आघाडीचा डाव रचून भाजपला सत्तेबाहेर ठेवले आणि उद्धव ठाकरे यांच्या हातात राज्याची सूत्रे दिली. सत्तेबाहेर राहिलेला भाजप पाण्याबाहेरच्या माशासारखा अडीच वर्षे तडफडत होता. त्यांनी सगळय़ा भल्याबुऱ्या मार्गाचा वापर करून शिवसेनेत मोठी फूट पाडली आणि सरकार गडगडले. भाजपच्या वरदहस्तामुळे पक्षाचे नामोनिशाणही बंडखोर शिवसेनेला मिळाले. शिंदे-फडणवीस सरकारने अडीच वर्षांतल्या महाविकास आघाडीचे निर्णय फिरविले. भाजपने महाविकास आघाडीचे सरकार उलथवले आणि सत्ता हाती घेतली. निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या सेनेने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पण तिथेही उशिराने सुनावणी झाली. निकाल अद्याप बाकी आहे. त्यामुळे िशदे- फडणवीस सरकारचा कारभार बिनधास्त सुरू आहे. भाजपचे स्वप्न साकार झाले खरे, पण राज्याच्या जनमानसातून पक्षाला उतरती कळा लागली. भाजपची घालमेल सुरू झाली. दुय्यम भूमिकेच्या अदाकारीने फडणवीसही कासावीस होते. भाजपच्या दृष्टीने २०२४ च्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भाजपच्या आधी ठरलेल्या ‘प्लॅन बी’ने वेग घेतला.
हा प्लॅन म्हणजे शिवसेनेच्या ‘प्लॅन ए’प्रमाणे राष्ट्रवादीची वासलात लावायची. पक्षाचे नाव, घडय़ाळ ही निशाणी बंडखोरांकडे जाईल, याची तयारीही होती आणि आहे. ईडीचा ससेमिरा मागे लागल्यामुळे अवघ्या राष्ट्रवादीतील नेते हैराण आहेत. त्यातही पक्षाची भिस्त असणारी दुसरी फळी अधिकच अस्वस्थ. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रकारामुळे ईडी थेट अजित पवारांच्या घरात शिरली आहे. त्यांच्या भगिनींच्या घरांचीपण झाडाझडती झाली. पाव्हणेरावळेही हैराण झाले. पवार कुटुंबालाच लक्ष्य करायचे आणि बारामतीचा गड काबीज करायचा, अशी रणनीती. ईडीच्या छाप्यामुळे पवार कुटुंबीयांत कमालीची अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील इतर नेतेही कुणी जात्यात तर कुणी सुपात आहेत. पवार कुटुंबीयांवरच्या हल्ल्याने अस्वस्थ दुसरी फळी पडत्या फळाच्या आज्ञेने कामाला लागली. अजितदादा आणि दुसऱ्या फळीत फारसे सख्य नाही. पण संकटाला तोंड देण्यासाठी हे कार्यकर्ते
अजित पवारांच्या खनपटीला बसू लागले- मार्ग काढा.
दादांचे हात आधीच पोळलेले. म्हणणे बरोबर आहे, पण मी पुढाकार घेणार नाही. उद्या काय होईल, काय सांगावे? हो म्हणतील आणि मागे फिरतील. दादांनी कानाला खडाच लावला होता. ठरले की साहेबांनाच साकडे घालायचे. यात तुम्ही पुढाकार घ्या. मी साहेबांकडे येणार नाही. दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी थेट सिल्व्हर ओक बंगला गाठला. साहेबांना समजावण्याचे प्रयत्न सुरू झाले. आपल्यापर्यंत ठीक होते. पण आता घरादारापर्यंत आले आहे इत्यादी. दरम्यान राष्ट्रवादीच्या संभाव्य फुटीच्या बातम्यांचे पेवच फुटले होते. पवारसाहेब कमालीचे अस्वस्थ होते. ते म्हणाले, ज्यांना जायचे त्यांनी जा, मी येणार नाही. मी महाविकास आघाडीबरोबर राहणार आहे. नेत्यांनी बऱ्याच नाकदुऱ्या काढायचा प्रयत्न केला, पण पवार बधले नाहीत. सुप्रियाताईंनी दिल्लीत आणि मुंबईत दोन बॉम्बस्फोट होणार असल्याचे ट्वीट केले. चर्चेला पुन्हा उधाण आले. या घडामोडीत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पवारांना भेटले. तिथे त्यांनी त्यांना निक्षून सांगितले की मी महाविकास आघाडीसोबतच राहणार आहे. साहेबांचा रागरंग पाहून अजितदादांची भाषाही बदलत गेली.
पण बातम्या काही केल्या थांबत नव्हत्या. भाजपवाले आगीत तेल ओतायचे काम इमानेइतबारे करत होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात तिसऱ्या फळीत फेकल्या गेलेल्या काँग्रेस नेत्यांनाही चांगल्याच उकळय़ा फुटत होत्या. मारुतीच्या बेंबीत राष्ट्रवादीलाही गारगार लागणार, या शक्यतेनेच ते खूश होते. काही महाभाग नेत्यांनी तर बातम्यांचे हवाले देऊन राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांत वाटाघाटी सुरू असल्याचे ‘बाइट’ दिले. आता शिवसेना आणि आम्ही दोघेच मोठे भागीदार होणार, अशा फुशारक्या सुरू झाल्या. चॅनेलवाल्यांना ही तर पर्वणीच होती.
अस्वस्थ पवारांनी तरुण कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाकरी परतण्याची भाषा केली. ‘लोक माझे सांगाती’ या सुधारित राजकीय आत्मकथेच्या प्रकाशनाच्या वेळी ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा आपण राजीनामा देत आहोत,’ अशी घोषणाच पवारांनी केली. या राजीनाम्याने नेत्या कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले. सामान्य कार्यकर्ते सैरभैर झाले. राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी अजितदादांना सोबत घेऊन या निर्णयाबाबत पवार कुटुंबीयांचे एकमत केले होते. त्यामुळे दादांची बदललेली भाषा पाहून अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले. पवारांचा राजीनामा आणि तत्पूर्वी केलेली कौटुंबिक सहमती याची कल्पना प्रफुल्ल पटेलांपासून कुणालाच नव्हती. त्यामुळे दुसऱ्या फळीच्या नेत्यांना हा मोठा धक्का होता. पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेचे प्रत्येक जण आपल्या सोयीचे अर्थ-अन्वयार्थ काढण्यात मग्न झाले.
पवार स्वत: बाजूला होणार म्हणजे पक्ष म्हणून आम्हाला भाजपबरोबर जाण्याची मुभा देणार, असे दावे सुरू झाले. अर्थात खासगीत. काही नेते समजायचे ते समजून गेले. पण राजीनाम्याची घोषणा करून पवारांनी तरुण कार्यकर्त्यांवरील आणि एक अर्थाने दुसऱ्या फळीच्या खांद्यामागच्या पक्षावरील पकड घट्ट केली. नेतेमंडळी गेली तरी फरक पडत नाही, असा संदेश त्यांनी दिला. भाजपने राष्ट्रवादीला अंगावर घ्यावेच, असा खुल्ला इशाराच त्यांनी दिला. यानंतरही पक्षातून काही नेतेमंडळी भाजपवासी होणार नाहीत, पक्ष फुटणार नाही, असे नाही. तो फुटेलही; पण पक्षातील सामान्य तरुण कार्यकर्ता हा शरद पवारांच्या सोबत असेल. या कार्यकर्त्यांवरच त्यांची खरी भिस्त आहे. पवारांना नेते एकाकी सोडून जातात, हे नव्यानेच घडत नाही. ऐंशीच्या दशकापासून हेच घडत आले आहे. एकदा नव्हे, अनेकदा. तरीही एकाकी पवार कमालीचे सामथ्र्यशाली आणि अधिक धोकादायक असतात. कुणी काहीही म्हणो. याची प्रचीती या वेळीही अनेकांना आलेली असेलच.
लेखक ज्येष्ठ राजकीय पत्रकार आहेत.
asbepratap@gmail.com