आशय गुणे
शेख हसीना यांच्या पलायनानंतर बांगलादेश हा पाकिस्तानसारखा धार्मिक वाटेवर जाईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. धार्मिक ओळखीवर भर दिल्याने समाज किंवा देश एकजिनसी बनतात; मात्र धर्मनिरपेक्ष राहिल्याने विविधता टिकून राहते व सामाजिक वीण अधिक घट्ट बसते.
२००९च्या ऑगस्ट महिन्याची गोष्ट आहे. मी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टन – क्लियरलेकला शिकत होतो. तिथे आम्हाला जेनेटिक्स हा विषय शिकवायला मूळ बांगलादेशचे पण तिथे स्थायिक झालेले प्रोफेसर होते. त्यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला. ‘जिने दोन देशांचे राष्ट्रगीत लिहिले आहे अशी व्यक्ती कोण?’ त्यांनीच उत्तर दिलं, ‘रवींद्रनाथ टागोर’. मी विचारलं, ‘पण प्रोफेसर, टागोर १९४१ या वर्षी वारले. आणि बांगलादेशचा जन्म तर १९७१चा!’ मग टागोर हे भारतीय की बांगलादेशी यावर आमच्यात थोडी रस्सीखेच झालीच! मात्र वर्ग संपल्यावर त्यांनी मला सांगितलं. ‘आम्ही बांगलादेशींनी टागोरांना जेवढं महत्त्व दिलं तेवढं तुम्ही भारतीयांनी नाही दिलं.’
आज या घटनेला १५ वर्षं झाली. तेव्हा टागोरांना भारतीय या ओळखीत ‘कैद’ करून ठेवणारा मी आज मात्र राष्ट्रीयत्व या संकल्पनेच्या पलीकडे पाहतो आहे. मुळात आपली ओळख काय असावी? पण ‘ओळख’ ही संकल्पना – विशेषत: भारतीय उपखंडासारख्या विविधतांनी व गुंतागुंतीने व्यापलेल्या प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर – एकजिनसी असू शकत नाही. बांगलादेशातील लोकांना त्यांच्या ५३ वर्षांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या प्रवासात आपली ओळख नेमकी काय आहे, असा प्रश्न कधी पडला असेल का?
हेही वाचा >>>महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्था म्हणजे अनागोंदी आणि विषमतेची महायुती
‘बँकर टू द पूअर’ या आपल्या आत्मकथनात मोहम्मद युनूस (ज्यांनी शेख हसीना यांच्या पलायनानंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नुकतीच शपथ घेतली) यांनी त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला आहे. १९४७ या वर्षी त्यांच्याभोवती असलेले सर्व जण भारतापासून वेगळं होऊन स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करीत होते. त्यांचा नुकताच बोलू लागलेला लहान भाऊ इब्राहिम हा त्याच्या आवडीच्या पांढऱ्या रंगाच्या साखरेला ‘जिना शुगर’ म्हणत असे व नावडत्या तपकिरी चॉकलेटी साखरेला ‘गांधी शुगर.’ आणि अर्थातच तिथल्या लोकांनी जिना यांच्या विचारसरणीची निवड केलीच! परंतु ही निवड पुढे २४ वर्षंच टिकू शकली. कारण ‘धर्म’ ही ओळख स्थापन करण्याचा आधार इतका तकलादू निघाला की लोकांनी अलिप्त होणे पसंत केले. मुख्य म्हणजे ‘धर्म’ हा स्वतंत्र ओळख स्थापन करण्याचा आधार असू शकत नाही या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील विचारांना बळकटी प्राप्त झाली.
किंबहुना, ‘धर्म’ हा ओळखीचा आधार किती तकलादू होता हे पाकिस्तानकडे पाहून अगदी सहज पटण्यासारखे आहे. सांस्कृतिकदृष्ट्या विचार केला तर असं लक्षात येईल की भारतातील काश्मीर, पंजाब, राजस्थान व गुजरात या राज्यातील सीमेपलीकडील भाग हा केवळ पाकिस्तान नसून अनुक्रमे काश्मिरी, पंजाबी, राजस्थानी व कच्छी हीच लोकं तिकडे राहतात. परंतु एकदा आपली ओळख एकजिनसी ( homogenous) ठरवली की या सूक्ष्म ओळखी पुसून टाकल्या जातात व भिन्नता ( heterogeneity) स्थापन होत नाही. देश म्हणून आपली ओळख इस्लाम आहे या साच्याबाहेर ते कधीही पडू शकणार नाहीत. आणि तोच त्यांच्या जगण्याचा संघर्ष ( crisis) सदैव टिकून असणार आहे.
हेही वाचा >>>मला उमगलेले माझे दादा!
याच पार्श्वभूमीवर बांगलादेशकडे पाहणं रोचक ठरतं. प्रश्न असा उपस्थित होतो की, बांगलादेशची नेमकी ओळख कशी परिभाषित करायची? आज ‘बांगलादेश’ म्हणून जो भूभाग अस्तित्वात आहे तीच त्याची ओळख मानावी का? परंतु हे व्यावहारिकदृष्ट्या बरोबर नाही, कारण ज्या व्यक्ती अथवा सांस्कृतिक प्रतीकं ‘बांगला’ म्हणून आपल्या समोर ठेवली जातील ती बांगलादेशच्या भोवती असलेल्या भारताशी (विशेषत: पश्चिम बंगालशी) सामायिक करावीच लागतील. रवींद्रनाथ टागोर आणि काझी नजरुल इस्लाम हे जितके बांगलादेशचे आहेत तितकेच पश्चिम बंगालचेही (आणि त्यामुळे भारताचेही) आहेत. किंबहुना, जे रवींद्रनाथ टागोर रचित ‘आमार शोनार बांगला’ हे आज बांगलादेशचे राष्ट्रगीत आहे ते खरं तर त्यांनी १९०५ या वर्षी इंग्रजांनी केलेल्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात लिहिले होते. याचा अर्थ असा की बांगलादेश ज्या गीताने स्वत:चे राष्ट्रीय अस्तित्व प्रस्थापित करतो आहे तेच मुळी संपूर्ण बंगालच्या (भारताचा पश्चिम बंगाल व आताच बांगलादेश) सामूहिक ओळखीला उद्देशून लिहिले होते. शिवाय ‘बंगाल’ ही ओळख इतकी व्यापक होती की ४०च्या दशकात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते तेव्हा बंगालमधील एक वैचारिक वर्तुळ असेही होते जे हिंदुस्थान, पाकिस्तान व बंगाल हे तीन देश प्रस्थापित व्हावेत या मताचे होते.
मग बांगलादेश व पश्चिम बंगाल ही सामायिक ओळख मान्य करायची का? या प्रश्नाचं स्पष्टपणे जाणवणारं उत्तर हो असं असलं तरी हे तितके सोपे नाही. कारण तसं झाल्यास बांगलादेशचाही अस्तित्वाचा संघर्ष ( crisis) निर्माण होईल.
भाषा, खाद्यापदार्थ, वस्त्र, संगीत (आणि या दोन्ही बंगालचा विचार केला तर नद्या आणि मासे!) यांच्यापैकी कशाचाही एक स्राोत सांगता येत नाही. आणि याच्या बरोबर उलट धर्म ही संकल्पना आहे जिचा एक स्राोत (धर्माचा किंवा पंथाचा संस्थापक) सांगावाच लागतो. धर्म या संकल्पनेद्वारे समाजाला एक ओळख देण्याचा प्रयत्न केला जातो तर भाषा, वस्त्र, संगीत, खाद्या (काही बाबतीत धर्म ही त्यांच्या निर्मितीची प्रेरणा असली तरीही) यांच्यामुळे अनेक ओळखी ( identities) निर्माण होऊ शकतात. परिणामी अनेक ओळखी निर्माण झाल्यामुळे समाज अनेक बिंदूंनी एकमेकांशी जोडला जातो व ही वीण अधिक घट्ट राहते. आणि अनेक ओळखी निर्माण झाल्यामुळे केवळ धर्म ही एकजिनसी ओळख राहत नाही. आता जर पश्चिम बंगाल व बांगलादेश यांची सामायिक ओळख मान्य करायचं ठरलं तर इस्लाम या त्यांच्या अधिकृत धर्माचं गणित कसं बसवायचं? किंबहुना, त्याची प्रासंगिकता काय?
पाकिस्तानने हा वैचारिक संघर्ष निर्माण व्हायलाच नको यासाठी धर्माला प्राधान्य दिलं व अनेक ओळखी निर्माण करू शकणाऱ्या या प्रवाहांना दुय्यम स्थान दिलं. बांगलादेशने मात्र अजून तरी असे पाऊल अधिकृतरीत्या उचलल्याचे ऐकिवात नाही.
कोणत्याही राष्ट्राचा जसा टोकाच्या राष्ट्रवादाकडे प्रवास होऊ शकतो तसा प्रयत्न बांगलादेशमध्येही होत आला आहे. ‘आमार शोनार बांगला’ हे बांगलादेशचे राष्ट्रगीत नसावे कारण ते बांगलादेशच्या बाहेरच्या आणि मुख्य म्हणजे एका हिंदू व्यक्तीने लिहिले आहे असा विचारप्रवाह तिथे अजूनही आहे. ‘बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी’ या उजव्या विचारसरणी मानणाऱ्या पक्षाच्या मते ‘आमार शोनार बांगला’ या गीताची जागा ‘प्रोथोम बांगलादेश’ या गीताला द्यावी कारण ते बांगलादेशी मुस्लीम व्यक्तीने लिहिले आहे. २००२ या वर्षी बांगलादेश जमात-ए-इस्लामी या संघटनेकडून मुस्लीम धर्मातील मूल्यांचा दाखला देत ‘आमार शोनार बांगला’ या गाण्यातील शब्दात बदल करण्याची मागणी करण्यात आली होती.
वास्तविक ‘आमार शोनार…’ या गीताची राष्ट्रगीत म्हणून निवड केली बांगलादेश आवामी लीगच्या शेख मुजिबूर रहमान (बांगलादेशचे राष्ट्रपिता, पहिले राष्ट्राध्यक्ष व शेख हसीना यांचे वडील) यांनी व त्याला गैर-इस्लामिक आणि गैर-बांगलादेशी म्हणून विरोध करत आले आहेत बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी व बांगलादेश जमात-ए-इस्लामी. अर्थात, एक व्यापक बंगाली ओळख आणि सध्याच्या बांगलादेशच्या भूभागापुरती मर्यादित व कट्टर इस्लामिक ओळख या दोन विचारसरणींमधला हा संघर्ष आहे. शेख हसीना यांच्या पलायनानंतर हिंसक जमावाने शेख मुजिबूर रहमान यांच्या पुतळ्याची मोडतोड का केली असावी याचा विचार या सर्व सांस्कृतिक (आणि त्या मार्गाने राजकीय) इतिहासाच्या पार्श्वभूमीवरही केला जावा. ढोबळ अर्थाने असंही म्हणण्यास वाव आहे की, आवामी लीग हा सर्वधर्म किंवा मिश्र संस्कृतीला मानणारा पक्ष आहे व उरलेले हे दोन पक्ष सांप्रदायिक विचारांचे आहेत. बांगलादेशातील हिंदूंसाठी अवामी लीग हा सुरक्षा प्रदान करणारा पक्ष आहे व आता शेख हसीना नसण्याने त्यांच्यासाठी पुढचा प्रवास खडतर ठरू शकतो.
या सगळ्या संदर्भांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या राज्यघटनेत कोणत्याही धर्माला अधिकृत स्थान नाही ही आपली अत्यंत जमेची बाजू आहे हे अधोरेखित होणं गरजेचं आहे. आपल्या सर्व शेजारी राष्ट्रांनी हीच चूक केली व परिणामी त्यांच्यासमोर आपली ओळख काय याचा संघर्ष ( identity crisis) कायमस्वरूपी उभा आहे. भारतात लोकशाही टिकून राहण्याचं रहस्यदेखील इथली धर्मनिरपेक्ष घटना व त्यामुळे टिकून राहिलेली विविधता ही आहे. या विविधतेत अनेक ओळखी नांदतात व त्या अनेक मार्गांनी एकमेकांशी घट्ट जोडलेल्या राहतात. बहु-सांस्कृतिक ( multicultural) समाजाचे हेच सर्वात मोठे लक्षण आहे. भारतात सिनेमा, संगीत, कलाकृती, साहित्य हे आतापर्यंत विकसित होऊ शकण्याचं कारण हेच की, इथे ज्या संस्कृतींनी व्यापार किंवा आक्रमणाद्वारे प्रवेश केला त्या सर्वांना वगळण्यापेक्षा सामावून घेण्यावर भर दिला गेला. भारताचे शेजारी मात्र आपली एकजिनसी ओळख स्थापन करण्यात व्यस्त आहेत. कारण ‘धर्म की धर्मनिरपेक्षता’ या वादात त्यांनी धर्माची निवड केली. पण त्यांनी धर्मनिरपेक्ष राहणे पसंत केले असते तर त्यांच्याही देशात सर्व सांस्कृतिक प्रवाह खुले झाले असते, सर्व भाषा फुलल्या असत्या, सर्वप्रकारच्या कला आणि संगीत यांचा विकास झाला असता आणि तरीही (भारतासारखा) सर्वांनी आपापला धर्मही पाळला असता. पण तसं झालं असतं तर फाळणीची प्रासंगिकताच नष्ट झाली असती व त्या त्या देशातील विचारी नेत्यांचे विचार खुजे ठरले असते. बहु-सांस्कृतिक समाजाचे वैशिष्ट्य हे आहे की सर्वप्रकारच्या ओळखींना हा समाज आपला वाटतो आणि त्यामुळे तो समाज कोणत्याही एका ओळखीला प्राधान्य देत नाही. तिथे सर्वप्रकारच्या ओळखी (धार्मिक, वांशिक, भाषिक, आहाराशी संबंधित इत्यादी) समान पातळीवर नांदतात. भारत व त्याचे शेजारी यांच्यात मुख्य फरक हाच आहे!
आणि म्हणूनच जाता जाता डॉ. मोहम्मद युनूस यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो. तो असा की स्वत:च्या जीवनाचे आत्मपरीक्षण करताना जिनांच्या मार्गापेक्षा गांधींचाच मार्ग व्यावहारिक, शाश्वत व सत्याचा होता हे निदान खासगीत तरी तुम्ही मान्य कराल का?
gune.aashay@gmail.com
© The Indian Express (P) Ltd