बाजारात फटाक्यांची दुकाने अगदी गल्लोगल्ली दिसत आहेत. फटाक्यांच्या विक्रीच्या माध्यमातून हंगामी उत्पन्न मिळत असले तरी फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे समाजाचे नुकसान होते, त्याचे काय, असा व्यापक विचार होताना दिसत नाही. फटाके विक्रेता कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे, हे कळण्यासाठी काही ठिकाणी फटाक्यांच्या स्टॉल्सवर राजकीय पक्षांचे बॅनर लावले जातात. ते यंदाही दिसत आहेत. फटाके विक्रीतून चार लोकांना मिळणारा नफा महत्त्वाचा मानायचा की त्यातून होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे निसर्ग आणि पर्यायाने समाजाची होणारी हानी अधिक गांभीर्याने घ्यायची ? पण ‘कोण कुठला समाज. आम्ही फक्त आमचाच विचार करतो. नाहीतरी प्रत्येक जण तेच करतो. मग आम्ही फटाके विक्रीच्या माध्यमातून चार पैसे मिळवले तर कोणाच्या पोटात का दुखावे ? रोजच्या गरजांच्या पूर्तीसाठी म्हणा किंवा अन्य खर्चाच्या अनुषंगाने आवश्यक असलेले पैसे कोणी खिरापत म्हणून वाटत नसते. त्यामुळे प्रदूषण वगैरेचे उपदेश आम्ही मानत नाही’, असा विचार रूढ झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी माणूस फटाके विक्रीच्या व्यवसायात अग्रस्थानी दिसतो. अन्य राज्यांतून येणाऱ्या लोकांनी उदरनिर्वाहासाठी उपाहारगृहे थाटली, भेळ – पाणीपुरीच्या गाड्या टाकल्या, भाजी – मासेही विकत आहेत. राज्याचे भूमीपुत्र म्हणवणारे व्यवसाय थाटण्यासाठी दिवाळी वाट बघत फटाके विक्रीचा स्टॉल कधी लावता येईल, घाऊक बाजारातून फटाके आणून स्थानिक ठिकाणी कसे विकता येतील, याचाच विचार करत असतात का, असा प्रश्न पडतो.

हेही वाचा – युरोपियन युनियन ‘उजव्या’ वळणावर?

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी सर्वाधिक फटाके वाजवले जातात. दिवाळीच्या अन्य दिवसांतही हमखास ते वाजतच असतात. अमुक हजार रुपयांचे फटाके आणले आहेत, याचे भूषण वाटणारे महाभागही आहेत. एका बाजूला लक्ष्मी देवीची विधीवत पूजा करायची आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी देवतेचे स्वागत फटाक्यांचा कचरा आणि धूर करून करायचे, ही विसंगती न वाटता तसे न करणाऱ्यांची टिंगल केली जाते. फटाके विक्रेता, फटाके वाजवणारे आणि ते न वाजवणारे असे सर्वच जण याच निसर्गातून मिळत असलेल्या प्राणवायूवर जिवंत आहेत. पण त्या निसर्गाची चिंता केवळ फटाके न वाजवणाऱ्या मंडळींना असते आणि यांनाच मूर्खात काढले जात आहे.

फटाक्यांवर कायमची बंदी आणण्याचा विचार कधी होईल का, याचे उत्तर नाही असेच वाटते. प्रदूषणामुळे श्वास कोंडत आहे. पण तरीही फटाक्यांवर बंदी आणायचा सरकार पातळीवर विचारही होत नाही, याचे खरच आश्चर्य वाटते. कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी फटाके बंदी येणे अशक्य वाटते. कारण निसर्गाकडे गांभीर्याने पाहण्याचा व्यापक विचार करण्याची कुवत दिसत नाही. दोन – चार वृक्ष लावताना फोटो काढले की झाले निसर्गाचे संवर्धन, असे करून निसर्ग जपता येत नाही. याची कल्पना असूनही औपचारिकतेला पर्याय नाही, असेच वागले जाते. फटाके वाजवण्यासाठी ठरावीक वेळ घालून दिली तरी त्याचे कोणीही पालन करत नाही. कारण फटाके वाजवणाऱ्या लोकांचा आणि वेळेचा दुरान्वयेही संबंध नसतो. फटाके वाजवण्याची वेळ ठरवणे ही एक औपचारिकता आहे. फटाके वाजवा पण ठराविक वेळेत, अशी भूमिका घेतली तर फटाके बंदीची डाळ शिजणे अशक्यच !

फटाके वाजवण्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा गरिबांना दिवाळीचा फराळ, नवीन कपडे इत्यादी देण्यासाठी तेच पैसे खर्च करता येतील. आपल्यामुळे कोणाची दिवाळी गोड झाली तर चांगलेच आहे, इतका साधा विचार करण्यासाठी बुद्धी चालवण्याची इच्छा नसणे यासारखा माणूसकी शून्यपणा नव्हे. बरं, कोणाला काही द्यायची नियत नसेल तर फटाके वाजवून किमान निसर्गावर आणि श्वासाशी निगडीत विकार असणाऱ्या रुग्णांवर अन्याय तरी करू नका.

‘लहान मुले फटाक्यांसाठी हट्ट करतात. त्यांच्यासाठी फुलबाजा, चक्र, पाऊस असे फटाके घ्यावे लागतात. ते नाही घेतले तर रडून मुलं उच्छाद करतील.’ पालकांचा हा विचार पाल्याला केवळ स्वतःचाच विचार करण्यास प्रेरित करतो. एरव्ही मूल रडू लागल्यावर त्याला शांत करण्यासाठी पालक ते मागेल त्याला देतात. अगदी त्याला शांत करण्यासाठी मोबाईल, टॅब यांसारखी इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स दिली जातात. पण नेमके जे द्यायला पाहिजे तेच देत नाहीत. किंबहुना, अजून लहान आहे असे म्हणत त्याचा हट्ट पुरवण्यात आनंद मानतात. मुलांना बालपणापासूनच निसर्ग – सामाजिक कर्तव्य – रुग्ण यांच्याविषयी त्यांची कर्तव्ये काय आहेत, याची जाणीव करून दिली पाहिजे. मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितले की, ते त्यांच्या मनावर कोरले जाते. मुले अनुकरण प्रिय असल्याने लहानपणापासूनच त्यांच्यापर्यंत योग्य विचार पोहोचत राहाणे अनिवार्य आहे. अन्यथा वय पुढे चालले की, चांगले विचारही चुकीचे वाटू लागतात. त्याचा परिणाम काय होतो, याची प्रचिती आपण दिवाळीत वायू प्रदूषणाच्या रुपात घेतच आहोत.

फटाक्यांच्या बाजारात ९५ टक्के फटाके हरित फटाके असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या फटाक्यांपैकी अनेक फटाक्यांमध्ये ‘बेरियम’ हा घातक धातू आढळून आल्याचे ‘आवाज फाऊंडेशन’कडून सांगण्यात आले आहे. वर्ष २०१८ पासून ‘आवाज फाऊंडेशन’ फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि फटाक्यातील घटक यांच्या चाचण्या करत आहे. बेरियम या घटकावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालूनही हा घटक फटाक्यांमध्ये आढळल्याने ‘आवाज फाऊंडेशन’ने या फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध आणले जावेत, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. विकार पसरवणारे घटकच उघडपणे विकले जाणे धोक्याचे आहे. पण आता ऐन दिवाळीच्या तोंडावर काय केले जाणार ?

‘दिवाळीत फटाके फोडणे टाळा आणि मुखपट्टी वापरा’ असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. असे आवाहन फटाक्यांच्या धुरात हरवून टाकण्याचे काम लोक कसे करतात हे समजेलच. कारण त्यांनी फटाके वाजवण्याची तयारी करून ठेवली आहे. मुखपट्टीच्या उपयोगाशी देणेघेणे नसल्याचा त्यांचा आविर्भाव आहे. फटाक्यांच्या उपयोगाने इतरांसह स्वतःचाही जीव धोक्यात आहे, हे ज्यांना जाणून घ्यायचे नाही, ते माणूस म्हणून दुसऱ्याचा विचार काय करणार?

क्षेपनभूमीवर प्रतिदिन कचऱ्याचे ढीग साचत आहेत. तेथील कचरा जाळल्यावर येणाऱ्या दुर्गंधीने अक्षरशः जीव गुदमरतो. त्यात फटाक्यांच्या कचऱ्याचा अतिरिक्त समावेश म्हणजे श्वसनाचे विकार असणाऱ्या रुग्णांच्या जखमेवर जाणीवपूर्वक मीठ चोळणे होय. फटाक्यांचा कचरा उचलण्यासाठी स्थानिक मनपा, जिल्हा परिषद यांचे स्वच्छता कर्मचारी म्हणजे रस्ते स्वच्छ करणारे हक्काचे कर्मचारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. स्वतः कचरा करायचा आणि तो साफ करण्यासाठी दुसऱ्यावर सक्तीने भार टाकायचा, हा निर्लज्जपणाचा कळस झाला.

हेही वाचा – संशोधक वृत्तीचा लोकशाहीर

राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागांत वायू प्रदूषण वेगाने पसरत आहे. राजधानीतील प्रदूषणाची घातक पातळी लक्षात घेता कित्येक वर्षे या काळात शाळांना सुट्टी द्यावी लागत आहे. तरीही पालथ्या घड्यावर पाणीच असे म्हणता येईल. कारण प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्यावर तात्पुरते जागे होतात. देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांवर प्रदूषणाची दाट छाया आहे. देशातील प्रमुख महानगरे आणि शहरांची विदारक स्थिती आहे. बेसुमारपणे वाढत चाललेल्या लोकसंख्येच्या अन्न पदार्थविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी शेतीत रासायनिक खतांचा उपयोग होतो. त्यामुळे अन्नात कसदारपणा नाही. परिणामी माणसाची प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने अनेक आजारांनी त्याला घेरले आहे. प्रदूषित वातावरणात पिकत असलेले धान्य कसे असणार, हे सुज्ञास सांगणे न लागे.

दीपावली व्यतिरिक्त निवडणूक निकाल, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात आगमन – विसर्जन मिरवणुका, २५ डिसेंबर, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री, नेत्यांच्या सभांच्या वेळी, तसेच विभागात त्यांच्या भेटी दरम्यान, क्रिकेट सामने, विवाहाच्या मिरवणुका इत्यादी वेळी फटाक्यांचा धुमधडका पाहायला मिळतो. दिवाळीत फटाक्यांमुळे आग लागण्याच्या दुर्घटना होणे, भाजणे, डोळ्यांना दुखापत होणे, प्रसंगी तो अवयव निकामी होणे या घटनांकडे क्षुल्लक म्हणून पाहिले जात आहे. बाका प्रसंग कोणावर कधी ओढवेल हे सांगता येत नसते. कारण त्याची कटू फळे फटाक्यांशी संबंध नसलेलेच जास्त भोगतात.

jayeshsrane1@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shops selling fire crackers are ready in diwali citizens lives are in danger due to pollution caused by firecrackers ssb