चित्रभ्रमर

गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीचा प्रमुख नादाव लापिड याने ‘कश्मीर फाइल्स’विषयी केलेल्या विधानामुळे अचानक त्याचे नाव भारतीय प्रसारमाध्यमांत आणि समाजमाध्यमांत चर्चेत आले. त्याच्या विधानामुळे त्याच्यावर आग पाखडणाऱ्या किंवा त्याच्यावर खूश झालेल्या बऱ्याचशा लोकांना त्याच्याविषयी आणि त्याच्या चित्रपट कारकीर्दीविषयी काहीही माहीत नाही, हे अगदी उघड आहे. ताज्या गाजणाऱ्या मुद्द्यावर व्यक्त होण्याआधी तसे कष्ट घेण्याची गरजही बहुतेक लोकांना वाटत नाही. मात्र, ज्यांना या निमित्ताने तरी या व्यक्तीविषयी विकी वगैरे नेहमीच्या स्रोतांपलीकडे जाऊन काही जाणून घेण्याची इच्छा झाली आहे त्यांच्यासाठी हा लेख.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
Sunil Pal reveals kidnapping details
Comedian Sunil Pal: बेरोजगारांनी केलं कॉमेडियन सुनील पाल यांचं अपहरण; खंडणीच्या पैशांतून सोनं घेतलं, २० हजार देऊन पाल यांना सोडलं

फिल्म स्कूलमध्ये चित्रपटाचे रीतसर प्रशिक्षण घेताना लापिडने केलेल्या एका लघुपटानेच सर्वप्रथम जगाचे लक्ष वेधून घेतले. कान चित्रपट महोत्सवाअंतर्गत तरुण दिग्दर्शकांसाठी चालवल्या जाणाऱ्या सिनेफाउंडेशन रेसिडेन्सीसाठी त्या लघुपटाच्या जोरावर लापिडची निवड झाली. या रेसिडेन्सीत दिग्दर्शकांना आपल्या पहिल्या किंवा दुसऱ्या पूर्ण लांबीच्या चित्रपटासाठी काही महिने फ्रान्समध्ये राहण्याची संधी मिळते. तिथे त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते. रेसिडेन्सीच्या मदतीने लापिडने केलेला आपला पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट ‘पोलिसमॅन’ २०११ साली प्रदर्शित झाला. त्याला लोकार्नो (स्वित्झर्लंड) इथल्या चित्रपट महोत्सवात विशेष ज्यूरी पुरस्कार मिळाला. पुरस्काराच्या पलीकडे जाऊन चित्रपट काय होता हे पाहिले तर राजकीय भाष्य करण्याची लापिडची प्रकृती त्यात स्पष्ट दिसते.

‘पोलिसमॅन’ – शोषक की शोषित?

इस्रायली संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असणाऱ्या दहशतवादविरोधी पथकातील एका पोलिसाची ही गोष्ट आहे. एकीकडे अशा प्रकारच्या वातावरणात जे निखळ पौरुष जोपासले जाते त्याचा सणसणीत आविष्कार असलेला हा पोलीस हळूहळू नैतिक पेचात सापडतो.

इस्रायलसारख्या पुरेसे व्यक्तिस्वातंत्र्य आणि समता असणाऱ्या देशातील एक सुशिक्षित, सुसंस्कृत नागरिक म्हणून आपले व्यक्तिगत आयुष्य एकीकडे जगायचे आणि दहशतवादविरोधी पोलीस म्हणून गरजेची असणारी ही विखारी पुरुषी वृत्ती त्याच वेळी स्वतःत जोपासत राहायची, यातल्या अंतर्विरोधामुळे हा पेच निर्माण होतो. या पथकाने केलेल्या एका एन्काउंटरमध्ये पॅलेस्टिनी ‘दहशतवाद्या’बरोबरच त्याचे इतर निरपराध कुटुंबीय सापडलेले असतात. चित्रपटाचा उत्कर्षबिंदू जिथे गाठला जातो तिथे समोर असलेले दहशतवादी अरब नसून इस्रायली ज्यूच असतात. ‘पोलीस असलात, तरीही तुम्ही शोषक नाही, तर प्रस्थापितांनी आपल्या स्वार्थासाठी उभ्या केलेल्या व्यवस्थेच्या चौकटीत तुम्हीही शोषितच आहात’, हे तिथे त्या पोलिसाच्या मनावर बिंबवले जाते. पॅलेस्टिनी लोकांचे शोषण करणाऱ्या आणि तसे करणे हा आपला राष्ट्रधर्मच आहे असे म्हणत त्याचे नैतिक समर्थन करणाऱ्या ‘पुरुषी’ इस्रायली व्यवस्थेवर यात टीका आहे, हे उघड आहे.

‘किंडरगार्टन टीचर’ – हरपत चाललेले काव्य!

यानंतर २०१४ सालच्या ‘किंडरगार्टन टीचर’ने लापिडची ख्याती आणखी दूरवर नेली. त्याला मिळालेल्या अनेक पुरस्कारांपैकी भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारच त्याला कदाचित आज पुन्हा त्याच महोत्सवात घेऊन आला असणार. या चित्रपटातला बालवर्गात शिकणारा गोंडस मुलगा आपल्या शिक्षिकेचे लक्ष वेधून घेतो, कारण त्याला कविता ‘होऊ’ लागतात. मुक्तछंदातील त्याच्या कविता अजिबात बालसुलभ नसतात, तर एखाद्या प्रौढ, संवेदनशील, तरल, कवीच्या प्रतिभेला साजेशा असतात. त्याची शिक्षिका त्याला प्रोत्साहन देऊ पाहाते; पण हळूहळू तिच्या लक्षात येते की आपण ज्या समाजात आज राहतो, त्या समाजात त्या एका मुलाच्याच नव्हे, तर कोणत्याही कोवळ्या मनाच्या व्यक्तीच्या संवेदनशीलतेचा गळा घोटला जाणे क्रमप्राप्त आहे. लहान वयातच जंक फूडच्या अधीन झालेली पिढी; पॉप संगीत किंवा तत्सम लोकरंजनाची माध्यमे मेंदूला देत असलेली बधीरता; जीवनशैली टिकवण्यासाठी पुष्कळ पैसे कमवावे लागणार आहेत ही टोचणी, अशा सगळ्या अस्त्रांनिशी आधुनिक जग तमाम जनतेला आपल्या चौकटीत जखडून टाकते आहे. या जगात कोणत्याही कवीचा अंतच होणार हे विधिलिखित आहे. इस्रायली राजकारणावर यात उघड टीका नाही, पण आधुनिक समाजाच्या उपभोगवादातून आणि उपयुक्ततावादातून ज्या असंवेदनशील पिढ्या निर्माण होत आहेत त्या विखारी आणि द्वेषमूलक राजकारण करणाऱ्यांच्या सोयीच्या आहेत हे विधान मात्र त्यात आहे.

‘सिनॉनिम्स’ – वैयक्तिक व वैश्विक विधानांचा समानार्थ

यानंतर आलेला २०१९ सालचा ‘सिनॉनिम्स’ सर्वार्थाने लापिडचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. त्यातील प्रखर राजकीय विधानामुळे त्याची सनसनाटीही अधिक झाली. याचा नायक इस्रायलला कंटाळून देश सोडून फ्रान्सला आला आहे. त्याला इस्रायल नकोसा झाला आहे यामागे कदाचित पॅलेस्टिनी जनतेवरचा अन्याय असेल; कदाचित तिथली वाढती धर्मांधता आणि तिच्या साहाय्याने केले जाणारे कडवे उजवे धर्माधारित राजकारण असेल. कारणे काहीही असोत, त्याला आपली अस्मिता पुसायची आहे हे मात्र नक्की. चित्रपटातला हा तपशील आत्मचरित्रात्मक आहे. लापिड अशा मनस्थितीत काही काळ फ्रान्समध्ये येऊन राहिला होता. त्याविषयी बोलताना एका मुलाखतीत त्याने म्हटले आहे : “माझं भविष्य इस्रायलशी जोडलं जाणं माझ्यासाठी एखाद्या आपत्तीप्रमाणे आहे. ही व्यक्ती अमुक किंवा तमुक पंतप्रधानाच्या कारकीर्दीत इथे वास्तवाला होती, हे माझ्या कबरीवर कोरलं जायला मला नको आहे. आकाश, झाडं, प्रेम, शरीरसंबंध, मानवी स्वभाव अशा गोष्टींभोवती माझं आयुष्य फिरावं असं मला वाटतं; पॅलेस्टिनी लोकांशी शांतता करार करावा का, त्यांना गाझाचा भूभाग द्यावा का, अशा गोष्टींभोवतीच ते फिरू नये. इस्रायल अगदी एकाकी पडला आहे. कुणी तरी माझा गळा इथे घोटत आहे असं मला वाटत राहतं. ”

‘सिनॉनिम्स’मधले राजकीय विधान मात्र वैश्विक होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या तत्त्वांवर उभ्या राहिलेल्या फ्रान्ससारख्या देशात आपण मोकळा श्वास घेऊ शकू अशा विचाराने नायक जेव्हा फ्रान्सचे नागरिकत्व घेऊ पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येऊ लागते की इथेही आपला जीव गुदमरेल, कारण इथेही राष्ट्रवाद आणि त्याच्याशी जोडलेली अस्मिता आहेच. म्हणजे इस्रायल किंवा समकालीन राजकारण ही समस्या नसून ‘राष्ट्र’ ही संकल्पनाच कदाचित समस्येचे मूळ आहे. लापिड एके काळी तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी होता हे ह्या चित्रपटात ठळकपणे जाणवते.

या चित्रपटाला गोल्डन बेअर हा बर्लिन चित्रपट महोत्सवातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला आणि लापिड खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचा दिग्दर्शक झाला. त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या अनेक याद्यांमध्ये ‘सिनॉनिम्स’चा समावेश होता.

‘अहेद्स नी’ – प्रतिक्रियेची प्रेरणा!

२०२१ साली ‘अहेद्स नी’ प्रदर्शित झाला. याचा नायक एक सिनेदिग्दर्शक आहे. एका छोट्या गावात त्याच्या चित्रपटाचा खेळ आयोजित केला गेला आहे. त्यासाठी तो तिथे आला आहे. त्याचे अवघे अस्तित्वच तणावाखाली आहे. कदाचित हा त्याचा नर्व्हस ब्रेकडाऊन आहे. त्यामागची कारणे पुन्हा एकदा त्याच्या इस्रायली असण्यात आहेत. अहेद तामिमी नावाच्या पॅलेस्टिनी मुलीने २०१७ साली एका इस्रायली सैनिकाच्या थोबाडीत मारली होती. तिचा व्हिडीओ त्यावेळी व्हायरल झाला होता. तिला पुढे अटक झाली होती. इस्रायली अतिक्रमणाखाली पॅलेस्टिनी मुलांना कसे जगावे लागते याचे प्रतीक म्हणून ही घटना पाहिली गेली. ही सत्यघटना नायकाच्या पुढील प्रकल्पामागची प्रेरणा आहे. किंबहुना, त्यावर समाजमाध्यमात आलेली एका उच्चशिक्षित इस्रायली पुरुषाची प्रतिक्रिया त्याची प्रेरणा आहे : ‘अहेदच्या गुडघ्यात गोळी घालायला हवी!’ गावात त्याच्या चित्रपटाचा खेळ आयोजित करणारी स्त्री इस्रायलच्या सांस्कृतिक मंत्रालयासाठी काम करते. म्हणजे तो इथे सरकारी पाहुणा आहे. ‘चित्रपटाचा खेळ संपल्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता, पण उत्तरं नसतातच’ असे तो सांगतो. इस्रायलमध्ये प्रत्येक युवकाला काही काळ सैन्यात घालवावा लागतो. त्या काळातला एक प्रसंग हा दिग्दर्शक सांगतो. सीरियाशी युद्ध चालू असताना त्यांची तुकडी त्यात सहभागी असते. शत्रूची सरशी होऊ लागली तर पकडले जाण्याआधी सायनाइडची गोळी खाऊन आत्महत्या करण्याची आज्ञा त्यांना वरिष्ठांनी दिलेली असते. अशा वातावरणात राहिलेल्या व्यक्ती त्यातून सुखरूप बाहेर जरी पडल्या तरी त्यांच्यावरचा मानसिक आघात कदाचित आयुष्यभर राहणार आहे. आणि अशा पिढ्याच्या पिढ्या इस्रायलमध्ये आज जगत आहेत. सैनिक म्हणून तर आपण युद्धात भाग घेतलेला आहेच; पण इस्रायली सांस्कृतिक खात्यातर्फे जर आपल्या सिनेमाचे खेळ भरवले जात असतील, तर मग सरकारचे एक लाभार्थी या नात्याने आपणही इस्रायलच्या कृष्णकृत्यांना जबाबदार ठरतो का, अशी अपराधी भावना कदाचित या दिग्दर्शकाच्या मनात आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा लापिड हा स्वतःदेखील इस्रायलसाठी एक चांगले ‘एक्स्पोर्ट क्वालिटी प्रॉडक्ट’ आहे हेदेखील वास्तव आहेच! कदाचित त्यामागच्या अपराधभावनेपोटीच त्याला भारतात येऊन भारत सरकारचा पाहुणा म्हणून मंचावरून भारतीय आणि इस्रायली सरकारच्या गैरसोयीचे वक्तव्य करायची इच्छा झाली असेल का?

‘पर्सनल इज पॉलिटिकल’ हा लापिडच्या सर्जनशीलतेचा गाभाच आहे, हे त्याच्या चित्रपटांवरून स्पष्ट होते. त्यामुळे ‘कश्मीर फाइल्स’ला त्याची तीव्र प्रतिक्रिया येणे हे खरे तर साहजिक आहे. जसजसा इस्रायल अधिकाधिक उजवीकडे झुकतो आहे तसतसा एक सर्जनशील कलाकार म्हणून आपण वास्तवात काहीही बदल घडवू शकत नाही ही टोचणी अधिक तीक्ष्ण होत असेल का? त्यातून आलेली नपुंसकत्वाची भावना लापिडचे नायक घडवत असेल का? एक आधुनिक लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाकडे पाहताना लापिडला प्रश्न पडतात हेदेखील लक्षात घ्यायला हवे, कारण तो काही सरकारविरोधी सिनेदिग्दर्शकांना तुरुंगात टाकणाऱ्या इराणचा नागरिक नाही. ताज्या प्रसंगात कोण कोणास काय म्हणाले, आणि समाजमाध्यमांवर किती गदारोळ झाला, या सर्व प्रकाराचे उत्तरदायित्व कुणाकडे, वगैरे गोष्टींत अडकून पडण्यापेक्षा लापिड आपल्या चित्रपटांतून जे प्रश्न उपस्थित करतो आहे ते आपण आपल्या वास्तवाला लावून पाहिले तर कदाचित त्याच्या या वक्तव्यामागचा हेतू आपण समजून घेऊ शकू.

Story img Loader