प्रा. संतोष शेलार
राजीव साने यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील वाय. एस. साने सिव्हील इंजिनीअरींग विषयाचे अभ्यासू प्राध्यापक. पुढे ते त्या क्षेत्रात व्यावसायिक म्हणून पण गाजले. त्यांच्यामुळे राजीव साने यांना थोर लोकांना ऐकण्याची संधी बालपणापासूनच मिळत गेली. या अर्थाने त्यांच्याकडे कुटुंबाकडून लाभलेली ‘शिदोरी’ समृद्ध होती. लहानपणापासूनच विविध विषयांत रस घेणं, चर्चा करणं, चिकित्सा करणं, एखाद्या गोष्टीचा उलगडा होईपर्यंत पिच्छा न सोडणं ही त्यांची वैशिष्ट्यं राहिली. विद्यार्थीदशेत इंजिनीअरींगचं शिक्षण घेता घेता फर्ग्युसन रोडवरील ‘कॅफे डिलाईट’ नि ‘हॉटेल रुपाली’ या ‘विद्यापीठां’मध्ये शाब्दिक कोट्या नि अफाट चर्चा यांची नशाही अनुभवली. तसेच आपली संगीत-साधनाही सुरू ठेवली. नंतरच्या काळात त्यांनी टेल्कोमध्ये नोकरी केली. पुढे कामगार चळवळीतही सक्रीय सहभाग घेतला. या काळात ते नवमार्क्सवादी (फ्रँकफर्ट स्कूल) असले तरी गांधीवादाशीही त्यांचा संवाद होता. या काळातही त्यांचे संज्ञा-संकल्पना यांच्या काटेकोर व्याख्या करणं, अर्थांचे घोटाळे पकडणं, ते सोडवणं, समोरच्याला विचार करायला प्रवृत्त करणं असे उद्योग सुरूच होते. या काळात लिहिलेल्या ‘थर्ड शिफ्ट’, ‘मर्म जिज्ञासा’ आदी सदरांतून याचा प्रत्यय येतो.

याच काळात त्यांचा संपर्क मे. पुं. रेगे, श्रीनिवास दीक्षित या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांशी आला. तर यशवंतराव मराठे यांच्याकडून ते न्याय-वैशेषिक शिकले. ते जे काही शिकले, अभ्यास केला त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. एखादा ग्रंथ घ्यावा तो अथपासून इतिपर्यंत बारकाईने वाचून काढावा, असा प्रकार ते करत नाहीत. त्यांना तपशीलात नाही, तर तत्त्वात रस असतो. कोणत्याही गोष्टीचं ‘सार पकडणं’ त्यांना महत्त्वाचं वाटतं. म्हणून एखाद्या ग्रंथाचं सार कशात आहे ते एखाद्या तज्ञांकडून समजावून घेतात आणि तेवढीच सारभूत पानं वाचतात, ज्यातून त्यांना काही अंतर्दृष्टी प्राप्त होईल. त्या मर्मदृष्टी पचवून स्वत:च्या भावविश्वात जो काही विचारव्यूह आहे तो कसा अधिकाधिक विकसित होत जाईल, त्यां दिशेनेच ते वाचन-चिंतन करतात.

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
lokrang article on marathi author saniya s kahi aatmik kahi samajik book
सर्जनाच्या वाटेवरील प्रवास
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
loksatta readers feedback
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान
Kushal Badrike and Viju Mane wished Pravin Tarde on his birthday in a funny prediction
Video: प्रवीण तरडेंसाठी कुशल बद्रिकेने लिहिलेल्या कविता ऐकून विजू माने वैतागले, म्हणाले…
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती

हेही वाचा : बौद्धिक उपासमार आणखी किती काळ?

या प्रवासात त्यांच्या विचारधारेतही प्रचंड बदल झाले. नवमार्क्सवादाबरोबरच इतरही विचारधारांचा अभ्यास, चिंतन व कामगार चळवळीतील प्रत्यक्ष अनुभव यातून त्यांना नवमार्क्सवादाचाही अपुरेपणा जाणवू लागला. या काळात जागतिकीकरणाचे वारे जोराने वाहात होते. नरसिंहराव सरकारने सुरू केलेल्या आर्थिक सुधारणा देशाला खड्ड्यात नेणार, याविषयी पुरोगामी (मुख्यत: डावे) विचारवंत आणि संघवाले यांचं आश्चर्यकारक एकमत होतं. अशा वेळी या सर्वांच्या विरोधात जाऊन आर्थिक सुधारणांचं ठाम समर्थन करणारे जे अपवादात्मक विचारवंत होते, त्यात राजीव साने हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या या कृतीमुळे त्यांना केवळ शिव्याच खाव्या लागल्या असे नव्हे तर कधीकधी जमाव अंगावर येण्याचे पण प्रसंग घडले. राजीव दीक्षित यांच्या ‘स्वदेशी’चंही त्यांनी खंडन केलं. हा लेख त्याकाळी खूप गाजला. या बदलत्या परिस्थितीत एका नव्या राजकीय-आर्थिक विचारव्यूहाची गरज होती. ती साने यांच्या ‘युगांतर’ या ग्रंथाने भागवली.

आपल्याकडे बुद्धिवाद (रॅशनॅलिझम) म्हणून जी विचारधारा प्रसिद्ध आहे ती मुख्यत: प्रत्यक्ष्य प्रमाणवादी (अँग्लोसॅक्सन) परंपरेतून आली आहे. रॅशनॅलिझमच्या इतरही काही परंपरा आहेत, हे मराठी विचारविश्वाला फारसे माहिती नाही. साने यांच्या मते या परंपरेत जे खरेखुरे दार्शनिक प्रश्न असतात ते टाळले जातात. त्यातून जीवनदृष्टी मिळत नाही. ज्यातून जीवनदृष्टी मिळत नाही त्याला तत्त्वज्ञान म्हणायचे कशासाठी, असा सवाल ते करतात. म्हणून खऱ्याखुऱ्या दार्शनिक प्रश्नांना भिडणारी ‘कॉंन्टिनेन्टल’ परंपरा त्यांना जवळची वाटते. आधुनिकोत्तर काळात उद्भवलेल्या ‘उच्छेदवादी’ विचारधारांचे त्यांनी खंडन केले आहे.

हेही वाचा : आपत्ती व्यवस्थापनाचे पितळ (यंदाही) उघडे…

साने हे रॅशनॅलिस्ट असले तरी अध्यात्म या विषयाचे त्यांना वावडे नाही. अध्यात्मासाठी कोणत्याही प्रकारच्या ‘पर’लोकाची गरज नाही, असे त्यांचे मत आहे. त्यांनी स्वत:चीच अशी ‘इहवादी आत्मविद्या’ विकसित केली आहे.

धर्माबाबतीत आपल्याकडे दोन प्रमुख प्रवाह आहेत. एक प्रवाह कट्टर धर्मनिष्ठ असून त्याला धर्मातील दोष दिसतच नाहीत. दुसरी जी पुरोगामी विचारधारा आहे त्यात धर्म ही जर टाकाऊच गोष्ट असेल तर तिचा विचार तरी कशाला करा, असं मानणारी आहे. धर्मचिकित्सकांनी धर्माचे दोष दाखवताना ‘जन्माधारित विषमता’ या मुद्द्यावरच भर दिला आहे. मात्र साने यांनी याव्यतिरिक्तही जे हिंदू मानसिकतेतील दोष आहेत, ते उघड केले. उदा. युगकल्पना, कर्मविपाक, तपश्चर्यावाद, राजसी कर्त्याचा निषेध इत्यादी. तसंच हिंदूधर्माची जी बलस्थानं आहेत (उदा. एक धर्मग्रंथ नसणं), त्यांचा फायदा घेऊन धर्मसुधारणा कशी करता येईल, हेही दाखवून दिलं. हिंदू धर्माला दार्शनिक अंगं आहेत हे ते लक्षात घेतात आणि त्यातल्या दार्शनिक आखाड्यात उतरून आपली नवी दार्शनिक भूमिका मांडतात. त्यांचं ‘नवपार्थहृद्गत : एक आधुनिकतावादी गीताचिंतन’ या भूमिकेचं परिपक्व फळ आहे.

नीतिशास्त्र या विषयावर मराठीत अत्यल्प लेखन आहे. त्यातही स्वत:चं स्वतंत्र नीतिशास्त्र उभा करणं अक्षरशः अपवाद! साने यांनी अलीकडेच लिहिलेल्या ‘स्फूर्तीवादी नीतिशास्त्र’ या ग्रंथातून एक नवी पायवाट सिद्ध केली आहे. दुष्कृत्यांच्या रोधनाबरोबरच अधिक प्रसाद-विकल्प खुले कसे करता येतील याचा शोध प्रकर्षाने त्यांनी त्यात घेतला आहे.

हेही वाचा : ‘मध्यान्हरेषा’ ग्रीनिचच्याही आधी उज्जैनला होती, हे कितपत खरे?

साने यांनी मराठी भाषेच्या विकासातही मोलाचं योगदान दिलं आहे. कोणताही तत्त्वज्ञ जेव्हा नवा विचारव्यूह रचतो तेव्हा त्याच्यासमोर भाषेची अडचण उभी राहातेच. कारण त्याला ज्या नव्या संज्ञा, संकल्पना, रचना मांडायच्या असतात, त्यासाठी प्रचलित भाषेत पुरेसे शब्द नसतात. साने यांनी कित्येक नवे शब्द घडवून यावर मात केली आहे. उदा. शत्रुकेंद्री विचारधारा, सार-संभार-विवेक इत्यादी. अनुवाद करतानासुद्धा आपल्याकडे एखाद्या संकल्पनेचे ‘सार’ कशात आहे हे न पाहता शब्दशः अनुवाद केले जातात. साने ते अमान्य करतात. उदा. ‘एग्झस्टेशिआलिझम’चं भाषांतर साने ‘अस्तित्ववाद’ असं न करता ‘असारसत्तावाद’ असं करतात. सूत्रमय भाषेत लिहिणं हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य! ही सूत्रं कधी काव्यमय तर कधी अक्षरश: मंत्राचं रूप धारण करतात. उदा. ‘पुरुषसत्तेने स्त्रीला रतिमंद आणि शीलबंद केले आहे.’ “शिवी ‘देऊ’ नये ही नीती आहे मात्र शिवी ‘घेऊ’ नये हे अध्यात्म!”

साने कोणत्याही विषयावर लिहित असोत पण त्यांच्या लेखनातून प्रकर्षाने समोर येतो तो त्यांच्यातला तत्त्वज्ञ! रेगे यांनी त्यांच्याविषयी म्हटलं आहे, “राजीव फिलॉसॉफी फक्त समजून घेत नाही तर स्वत: फिलॉसॉफी करतो!” रेगे यांच्या या प्रमाणपत्राचा प्रत्यय आपल्याला साने यांच्या कोणत्याही लेखनातून येत राहातो.

((समाप्त))