काही बाबतीत मी आमच्या पिढीला भाग्यवान समजतो. रंगायन, आविष्कार, थिएटर अकॅडमी, छबिलदासची नाटकं ऐन भरात असताना आम्ही ती पाहिली. कानेटकर, दळवी पाहिलेच; पण आमची अभिरुची छबिलदासने आणि छबिलदासशी सलगी करणाऱ्या रंगभूमीने घडवली, समृद्ध केली. तेंडुलकर, बादल सरकार, मोहन राकेश आणि गिरीश कर्नाड यांची कितीतरी नाटकं जशी आली, तशी आम्हाला पहायला मिळाली. याच्या बरोबरीने आमची सिनेमाची अभिरुची श्याम बेनेगलने घडवली, असं म्हणता येतं. मृणाल सेन आणि इतर यांचे चित्रपट येत होतेच; पण सातत्यानं येत राहिले ते बेनेगलचे चित्रपट. ‘समांतर सिनेमा’ हे एक लेबल आहे. अनुदानाविना, सरकारी आश्रयाविना चालू न शकणाऱ्या सिनेमाला ते लावलं जातं. श्याम बेनेगलचा सिनेमा त्यात बसत नाही. श्याम बेनेगलने आमच्यासारख्या असंख्य लोकांना दर्जेदार, अर्थपूर्ण, बुद्धीला समाधान देणारा सिनेमा पाहण्याची चटक लावली आणि तशा प्रकारच्या सिनेमाचा प्रेक्षकवर्ग तयार केला.
‘अंकुर’चा नायक कोण होता? कुठे कोण होता! नायिका होती शबाना आझमी. गावातली एक उठावदार तरुणी. जमीनदार हक्काने तिला जवळ करतो आणि ती जणू कर्तव्य पार पाडल्यासारखी त्याच्या कवेत जाते. म्हणजे ती नवऱ्याशी व्यभिचार करते, असं नाही. नवऱ्याबद्दल जमीनदाराकडे म्हटलेले ‘उसको कुछ नको बोलू’ हे तिच्या तोंडचे शब्द अजून आठवतात. धनदांडगा जमीनदार निव्वळ घाबरून तिच्या नवऱ्याला फोडून काढतो, तेव्हा तिने केलेला आकांत आठवतो. याशिवाय आठवते, ती सिनेमाची शेवटची फ्रेम. एका लहान मुलाच्या सोबतीने कॅमेरा मागे मागे येतो आणि तो मुलगा एक दगड उचलून जमीनदाराच्या दिशेने भिरकावतो.
हेही वाचा >>>गांधी – आंबेडकर… समन्वयाआधीचा अंतर्विरोध
(हा दगड जणू सिनेमा बघणाऱ्या आपणा प्रेक्षकांच्या वतीने जुलमी जमीनदारावर मारलेला दगड आहे. पुढे नागराज मंजुळेच्या ‘फँड्री’मध्येदेखील शेवटी एक दगड मारला जातो. तो दगड थेट कॅमेऱ्यावर, म्हणजे प्रेक्षकाच्या, तुमच्या आमच्या दिशेने मारलेला दगड आहे. दिग्दर्शकांच्या आशयात मोठा फरक आहे.)
सिनेमा ही एक कम्पोझिट आर्ट आहे. दुसऱ्या कुठल्याही कलेच्या तुलनेत सिनेमा आस्वादकाला सुपूर्द होण्याअगोदर खूपच जणांचा हातभार लागलेला असतो. कथा, पटकथा, संवाद, फोटोग्राफी, संगीत, अभिनय, एडिटिंग अशा प्रत्येक पातळीवर कोणीतरी संवेदनशील कलावंत त्याचं योगदान देत असतो आणि मग सिनेमा पूर्णत्वाला जातो. या सगळ्यांचा कॅप्टन तो दिग्दर्शक. त्याच्यासाठी कथा हाच काय तो कच्चा माल. पुढच्या प्रत्येक पायरीवर दिग्दर्शक दिशा देत असतो. ‘दिग्दर्शक’ या शब्दाचा अर्थच मुळी दिशा देणारा, असा आहे. त्यामुळे चित्रपटाच्या ए3केका अंगाची अभिव्यक्ती (समजा) स्वतंत्रपणे जाणवली तरी एकूण चित्रपटाच्या यशापयशाची धनी दिग्दर्शक हाच असतो. त्याच्याच संस्कारातून चित्रपट घडला, असं मानलं जातं.
चित्रपटाला इतके सारे पैलू असल्यामुळे ‘चित्रपटाचा आस्वाद’ – फिल्म ॲप्रिसिएशन – हे एक विशिष्ट कौशल्य झालं आहे. त्याचे कोर्सेस असतात. तसा कोर्स केलेले किंवा सिनेमाविश्वाशी संबधित असलेले लोक सिनेमाचं पूर्णार्थाने रसग्रहण करू शकतात, असंही मानलं जातं. माझ्यासारख्या एखाद्याला, ज्याने असला कोणताही कोर्स केलेला नाही, जो निव्वळ प्रेक्षक आहे; त्याला त्यामुळे बेनेगलच्याच काय, दुसऱ्या कुठल्याही दिग्दर्शकाच्या सिनेमाचं विश्लेषक वर्णन, रसग्रहण, मूल्यमापन करता येणार नाही. सिनेमा दिग्दर्शकाचा, असंच तो धरून चालणार.
आणखी एक गोष्ट. हिंदी सिनेमा असा, म्हणजे दिग्दर्शकाच्या मालकीचा नसतो. उदाहरणार्थ, देव आनंदचा सिनेमा हा देव आनंदचा सिनेमा असतो. (हे गोविंदा, बऱ्याच अंशी शाहरुख यांच्या बाबतीतदेखील खरं आहे) दिग्दर्शकामुळे थोडाफार फरक पडत असला, तरी त्या सिनेमाची प्रकृती, ओळख ‘देव आनंदचा सिनेमा’ अशीच राहते. काही चित्रपट त्यातल्या संगीताचे असतात. उदाहरण द्यायचं तर ‘नागिन’ या चित्रपटाचं देता येईल. वैजयंतीमाला आणि प्रदीप कुमार ही नावं एकूण हिंदी सिनेमाच्या वाटचालीत दुय्यम नाहीत. तरी ‘नागिन’ हा चित्रपट हेमंतकुमारच्या संगीताचाच. अगदी याच न्यायाने त्या काळातले आघाडीचे कलावंत सोबतीला असले तरी श्याम बेनेगलच्या सिनेमाला ‘श्याम बेनेगलचा सिनेमा’ असं म्हणता येईल.
हेही वाचा >>>ध्रुवीकरणाने पछाडलेले जग
‘अंकुर’ने सुरुवात झाली. दुसऱ्या, ‘निशांत’ या चित्रपटाने दाखवून दिलं की ‘अंकुर’ हा अपघात नव्हता. ‘जमून गेला’ असं झालेलं नव्हतं. या चित्रपटातही जमीनदार आणि त्यांचा जुलमी दरारा, हे होतं. यातल्यासुद्धा काही गोष्टी लक्षात आहेत. चार जमीनदार भावांच्यातला मोठा अमरीश पुरी. तो जेव्हा जेव्हा पडद्यावर येतो, तेव्हा दरारादर्शक संगीत वाजतं. तो काय करताना दिसतो, तर तो दारू पितो. त्याचे दोन धाकटे भाऊ गावभर उंडारतात. पण त्यांची दादागिरी चालते, ती वडील भावाच्या जरबेच्या बळावर. पण तो तर कधीच अतिरेकी वर्तन करताना दिसत नाही! नुसत्या पार्श्वसंगीताच्या जोरावर आणि अमरीश पुरीच्या व्यक्तिमत्वाच्या बळावर गावावर असलेली त्याची हुकूमत प्रक्षेपित होते. ‘निशांत’च्या दुसऱ्या आठवणीत सगळ्या बाजूंनी हतबल झालेला गिरीश कर्नाडचा शाळामास्तर खांदे पाडून गावी परत येताना वाटेत अचानक उसळतो आणि हातातल्या काठीने वाटेवरच्या झुडुपांनाच झोडपू लागतो! तोंडाने मोठमोठ्याने ओरडत. ऐकायला आजूबाजूला कोणीही नसताना. अगोदर जवळून आणि लगेच दुरून दिसणारं हे दृश्य अंगावर काटा आणतं. पुढच्या भीषण नाट्यासाठी प्रेक्षकांच्या मनाची तयारी करतं. आणि लक्षात राहतो तो अर्थात चित्रपटाचा शेवट. पार्श्वभूमीवर जराही आवाज नाही. कॅमेरा उद्ध्वस्त घरावरून फिरतो. पुन्हा एक मुलगाच हे बघत असतो. काय बघतो? तिथे भटकणारा एक कुत्रा आणि मरून पडलेले दोन जीव.
‘भूमिका’ हा स्मिता पाटीलचा उत्सव होता. अमरीश पुरी, अमोल पालेकर, नसिरुद्दीन शहा, अनंत नाग असे एकापेक्षा एक तगडे अभिनेते असतानादेखील. त्यातलं पुष्कळ आठवतं. स्मिता तर फारच. तिचं खळखळून हसणं, तिचं वारंवार साडी फेडणं. आणि अगदी सुरुवातीपासून तिच्या दर्शनाच्या वेळचे भडक रंग. तशा रंगातली तिची उत्तान लावणी. आठवतं, ती लहान असतानाचं घर. तिथे धोतरकोटात येणारा अमोल. त्याच्या वावरातून व्यक्त होणारा कावेबाज, तरीही दुबळा पुरुष. तिची जुन्या वळणाची आजी कुसुम देशपांडे. नंतर ज्याच्या इंटेलेक्चुअल बोलण्यावर ती भाळते आणि जो तिला फसवून निघून जातो तो सिनेदिग्दर्शक नसीर. तिच्यावर प्रेम करणारा आणि त्यामुळे तिच्यापुढे असहाय्य होणारा अनंत नाग. काय सिनेमा होता! ‘अंकुर’ आणि ‘निशांत’ या चित्रपटांमध्ये घडणाऱ्या घटनांवर विचार करायला, प्रतिक्रिया बनवायला प्रेक्षकाला फुरसत मिळत होती; ‘भूमिका’ वेगाने पुढे सरकतो. कदाचित ‘भूमिका’चा टाइमस्पॅन मोठा असल्यामुळे असेल. ‘भूमिका’ एकदा बघून समाधान होत नाही. प्रेक्षक म्हणून आपण स्मिताशी समरस होतो आणि तिचं जे काही होतं, त्याचा प्रभाव नीट जाणवून घ्यावासा वाटतो.
या चित्रपटांपेक्षा ‘मंडी’ अगदीच वेगळा आहे. मला स्वत:ला ‘मंडी’ हा श्याम बेनेगलचा सगळ्यात जास्त आवडलेला चित्रपट. वेश्यागृह चालवणारी एक मुरलेली, प्रौढ वेश्या आणि तिच्याकडे ‘काम’ करणाऱ्या इतर जणी. आणि तिची लाडाकोडात ठेवलेली मुलगी झीनत. आणि तिथे येणारे एक एक नमुने. तो लोचट, आगाऊ फोटोग्राफर ओम पुरी. तो झीनतच्या खोलीत चोरून शिरतो तेव्हा नुसतं ‘‘चिल्लाऊं?’’ असं खिदळत विचारून त्याची घाबरगुंडी उडवणारी ती झीनत. तिच्यावर पागल झालेला तिथल्या बड्या हस्तीचा मुलगा. वेश्यागृहाचा हरकाम्या नोकर झुमरूस की कोण. काय एकेक कॅरेक्टर्स आहेत.
तरी ‘मंडी’ची खास बात वेगळीच आहे. या वेश्या अजिबात ‘नशिबाची शिकार’ नाहीत. समाजाकडून पिळवणूक होत असल्यामुळे उदास नाहीत, ‘दारुण परिस्थितीत गांजलेल्या’ नाहीत. त्या सगळ्या मजेत आहेत. गोंधळ घालतात. प्रेम करतात. लफडी करतात. त्यांची देहबोली सर्वसामान्य गरती बायकांची नाही. शरीरच विकण्याचा धंदा करतात, तर शरिराची, अंगाप्रत्यांगाची लज्जा काय म्हणून बाळगतील? आणि अक्षरश: प्रत्येक फ्रेममध्ये हे व्यक्त होतं. आणि तसं व्यक्त होताना त्यांच्यातलं कुणी बेशरम, पाऊल वाकडं पडून वाया गेलेली अशी वाटत नाही. सगळा सिनेमा त्यांच्या दृष्टिकोनातून आहे! इतका, की जिला तिथे धरून आणलेली असते आणि जी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते; तीच शेवटी मालकिणीकडे येते आणि ‘आशेला जागा आहे,’ अशी भावना मालकिणीला मिळवून देते!
वेश्यांना नॉर्मल माणसं म्हणून दाखवणारा, त्या काहीही वावगं करत नाहीत, असं ठणठणीतपणे म्हणणारा आणखी कुठला चित्रपट आठवतो? ‘गंगूबाई काठियावाडी’? ‘मंडी’ भाषणबाजी करत नाही! या वेश्यांकडे सार्वजनिक संवादकला नाही. जरी त्यांची मालकीण पक्की जहांबाज असली तरी.
‘मंडी’त नसीर, ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, सईद जाफरी, स्मिता, शबाना, नीना गुप्ता असे सगळे भारी अभिनयपटू असले तरी अगदी वेगळ्या धाटणीची भूमिका मस्त रंगवण्याचं कसब दाखवलं आहे ओम पुरी आणि नसिरुद्दीन शहा यांनी. त्यातही नसीर फारच भारी. कसलंच मेरिट नसलेला, एक पूर्ण बिनकिंमतीचा हरकाम्या नोकर म्हणून जवळपास बिनसंवादाची भूमिका नसीरने केली आहे. यात मालकिणीचं काम करण्यासाठी शबानाने वजन वाढवलं होतं. ती इतर वेश्यांपेक्षा वयाने मोठी दिसते. पुष्ट, मुरब्बी, नवख्यांना सोडून बड्यांना सांभाळणारी दिसते. स्मिता तिची मुलगी झीनत. अल्लड, फारशी अक्कल नसलेली. स्मिता हेसुद्धा करू शकते!
‘मंडी’ कधीही बघावा. असा सिनेमा आपल्याकडे विरळा.
‘झुबेदा’मध्ये मनोज बाजपेयी आहे. रेखा आहे. पण खुद्द झुबेदाच्या भूमिकेत चक्क करिश्मा कपूर आहे. करिश्मा आवडत होतीच. गोविंदाबरोबरची तिची जोडी फारच प्रिय होती. पण ‘झुबेदा’ पाहिला आणि मनात आलं, आता यापुढे ही बाई कशी काय आचरट कामं करेल? एकदा अस्सल भूमिका वठवण्याची संधी मिळाल्यावर पुन्हा डेव्हिड धवनी गंमत जम्मत कशी करावीशी वाटेल?
अर्थात नटनट्यांचं असं काही नसतं. पण ‘झुबेदा’मधलं करिश्माचं काम उत्तम आहे. नेमकं आहे. मग वाटतं, याचं क्रेडिट एकट्या करिश्माचं कसं असेल? दिग्दर्शकाचं असेलच ना?
श्याम बेनेगलच्या सगळ्या चित्रपटांची दखल इथे घ्यायची नाही आहे. हे काही नमुने झाले. श्याम बेनेगलने एका पिढीची अभिरुची घडवली; एका पिढीला ‘चांगले’, सुसंगत मांडणी असलेले चित्रपट बघण्याची चटक लावली, एवढं सांगण्यासाठी ही उदाहरणं पुरेशी आहेत. सिनेमारसिकांसाठी अगदी दिलीप कुमार ते शाहरुख खान ते कार्तिक आर्यन सगळे अरेतुरेतले असतात. कारण सिनेमा आणि सिनेमाचे कारक – हिरो, हिरॉइन, दिग्दर्शक, संगीतकार, सगळे दिलात जाऊन बसलेले असतात. आमच्या लेखी श्याम बेनेगलला तसंच स्थान आहे. श्याम बेनेगलला कोणी सुपर सक्सेसफुल कमर्शियल दिग्दर्शक म्हणणार नाही; पण तो बिगरप्रेक्षकीय आधारानं तगलेला चित्रपटकर्ता तर नक्कीच नव्हता. आणि ते अभिरुची घडवली म्हणून आहे. आदराचं आहे. त्याला हा अखेरचा सलाम!
hemant.karnik@gmail.com