कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)
‘युद्ध जिंकायचे असेल तर शत्रूच्या नेत्याला मारून टाका’ हा परंपरागत लष्करी सिद्धांत आहे. तीन मेच्या रात्री मॉस्को या रशियाच्या राजधानीत, क्रेमलिन या अध्यक्षीय प्रासादाच्या आकाशात झालेल्या नाटकामागे हाच सिद्धांत होता… रशियाने त्या नाट्याबद्दलची दृश्येही अधिकृतपणे प्रसारित केली आहेत. गुरुवारी पहाटे रशियन सोशल मीडियावर मॉस्कोवर धुराचे लोट दाखवले जात होते. रशियाच्या म्हणण्यानुसार, या कामेकाझी ड्रोन्सचे लक्ष्य मॉस्कोमधील क्रेमलिन प्रासाद हेच होते आणि अशा हल्ल्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना ठार मारण्याचा प्रयत्न युक्रेनचाच होता. याला अमेरिकचे पाठबळ असल्याचाही आरोप रशियाने केला आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे दोननंतर, क्रेमलिन प्रासाद संकुलाच्या भिंतींमागे दोन स्फोट झाल्याची बातमी प्रसारित झाली. रशियाच्या सरकारी गोटांतून असेही सांगण्यात आले की, रशियन विशेष सेनादलांनी हे दोन्ही ड्रोन त्यांच्या लक्ष्यावर पोहोचण्याआधीच, विशेष इलेक्ट्रॉनिक रडार-आधारित सेवांचा वापर करून अक्षम केले. त्या वेळी पुतिन क्रेमलिनमध्यें नव्हते. हल्लेखोर ड्रोनची काही शकल/तुकडे क्रेमलिनवर पडले असून हल्ल्यात क्रेमलिन संकुल अथवा तेथील इमारतींचे कोणतेही भौतिक नुकसान झालेले नाही.
आणखी वाचा- खरा ‘सामाजिक न्याय’ मोदी- शहा देतील, तर…
रशिया आता म्हणते आहे की, आमच्या अध्यक्षांची हत्या करण्याचा हा नियोजित प्रयत्न आम्ही विफल केला. याच्या विरोधात जेव्हा, जेथे व योग्य वाटेल त्या तऱ्हांनी योग्य वेळी जशास तसे पाऊल उचलण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो आहोत. रशियन सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी पुनरुच्चार केला की ‘आता व्लादिमीर झेलेन्स्की आणि त्याच्या लष्कराच्या शारीरिक निर्मूलनाशिवाय इतर कोणताही पर्याय शिल्लक नाही. युक्रेनच बिनशर्त आत्मसमर्पण स्वीकारण्यासंबंधी विचारांना आता तिलांजली देऊन या घटनेचा योग्य तो सूड घेतला जाईल’.
विजय- संचलन मंगळवारी
याच क्रेमलिन संकुलामध्ये दरवर्षी नऊ मे रोजी; रशियाने दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीवर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी भव्य ‘व्हिक्टरी परेड’ आयोजित केली जाते. यंदा होणाऱ्या या विजय-संचलनाच्या काही दिवस आधी हा कथित हल्ला करण्यात आला आहे. क्रेमलिनच्या चौकातहोणाऱ्या या भव्य परेडला, सर्वसाधारणपणे रशियातील सर्व परदेशी मुत्सद्दी/लष्करी मान्यवर आणि काही आमंत्रित परदेशी पाहुणे उपस्थित असतात. यंदा परदेशी पाहुण्यांची उपस्थिती तुरळकच असेल.
आणखी वाचा-करडय़ा नेतृत्वाच्या घोषणांचे रंग फिके..
युक्रेननी मात्र अद्याप, रशियाच्या या दाव्यांवर कोणतीही टिप्पणी दिली नाही. प्रत्येकी १७ व १९ किलो वजनाचे, क्रेमलिनवरील हे हल्लेखोर ड्रोन कॅनेडियन होते. या युद्धासाठी आतापर्यंत युक्रेनला ३५ अब्ज डॉलरची लष्करी मदत देणाऱ्या अमेरिकेनी अलीकडेच युक्रेनला अतिरिक्त ३०० दशलक्ष डॉलरची लष्करी मदत दिली आहे. यात क्रेमलिन हल्ल्यासाठी प्रश्नांकित असलेल्या कॅनेडियन ड्रोनचा समावेश होता. त्यांचा स्फोट क्रेमलिनच्या १९ किलोमीटर पूर्वेला, मॉस्कोच्या वेशीवर झाला. या आधी पुतीन भेट देणार असलेल्या औद्योगिक संकुलाचा नाश करणारा मोठा स्फोट २३ एप्रिलला झाला होता. त्यानंतर २९ एप्रिलला सेव्हस्टोपोल ऑइल डेपो आणि रिफायनरीत दुसरा मोठा स्फोट झाला. कदाचित हे दोन्ही स्फोट, पुतीन यांच्या हत्येसाठी करण्यात आले असावेत. वॅगनर ग्रूप या अर्धलष्करी सेनेचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांच्या मते, ही युक्रेनच्या वासंतिक हल्ल्याची सुरुवात आहे. प्रिगोझीनची सेना आजमितीला, दक्षिण युक्रेनमधील बाख़्मुत शहरावर ताबा मिळवण्यासाठी लढते आहे.
प्रस्तुत लेखकानुसार,या घटनेसंबंधी काही अनुत्तरित प्रश्नांच स्पष्टीकरण आवश्यक आहे :
(१) क्रेमलिन ही एक मोठी,भव्य इमारत आहे. एकूण ३६ किलो स्फोटके असलेल्या दोन ड्रोनमुळे क्रेमलिन कॉम्प्लेक्सच्या आत असलेल्या अध्यक्षीय निवासस्थानाचे कोणतेही मोठे नुकसान होण्याची शक्यता नव्हती/नाही. युक्रेनमधील लष्करी तज्ज्ञांनाही हे माहित असणारच.मग युक्रेनला ‘पुतिन यांच्यावर जीवघेणा हल्ला’च करायचा होता तर त्यासाठी फक्त दोन ड्रोन का वापरले?
(२) क्रेमलिनसारख्या भव्य इमारतीला नुकसान पोहोचवण्यासाठी किमान २५-३० ड्रोन व ३००-४०० किलो स्फोटकांची आवश्यकता असेल. क्रेमलिन नष्ट करणे हे एक मोठे आव्हाग्न आहे. युक्रेन हे करण्यासाठी किंवा त्याच्या देशातून पार पाडण्या इतका सक्षम आहे का?
(३) युक्रेन सीमेपासून मॉस्कोपर्यंतचे अंतर किमान ३५०-४०० किलोमीटर आहे. सध्याच्या ड्रोनमध्ये एवढा पल्ला गाठण्याची क्षमता नाही. मग, हे ड्रोन कुठून लाँच केले ? युक्रेनमधून की रशियातून? हे ड्रोन युक्रेनचेच आहेत या रशियन दाव्याचा आधार काय?
(४) जर हे ड्रोन युक्रेनच्या सीमेवरून लाँच झालेत तर, इतक्या लांब उड्डाण वेळेत (लॉन्ग फ्लाईट टाइम) रशियन हवाई संरक्षण प्रणाली (एअर डिफेन्स सिस्टीम) काय करत होती? त्याच्या कुठल्याही रडारवर किंवा मानवी दृष्टिपथात हे ड्रोन आले नाहीत का?
(५) अमेरिकन जिओ ट्रॅकिंग सॅटेलाइट्स पैकी कोणालाच/अगदी याविषयी माहिती मिळाली/मिळू शकली नाही का?
(६) त्यामुळे, पृथ्वीवरून युक्रेनच अस्तित्व पूर्णपणे पुसण्यासाठी अत्यंत जालीम दंडात्मक कारवाईला मोकळीक मिळावी म्हणून; क्षेपणास्त्र/ हवाई/ कमी प्रतीची सामरिक अण्वस्त्रे/डर्टी बॉम्बच्या स्ट्राइकद्वारे नष्ट करण्याच्या उद्देशानी उचललेल हे कुटील/घातकी रशियन पाऊल (डर्टी प्लॉय) आहे का?
यापैकी पहिल्या पाच प्रश्नांची उत्तरे कधीही अधिकृतपणे दिली जाणार नाहीत… सहाव्या प्रश्नाचे उत्तर मात्र येणाऱ्या काळात मिळू शकते.
लेखक लष्करात कर्नल या पदावर होते.
abmup54@gmail.com