श्रीराम शिंदे
१६ ऑक्टोबरच्या संध्याकाळी अण्णांचा म्हणजे नीलिमकुमार खैरे यांचा निरोप आला. ‘अनिल आता आपल्यात नाही.’ क्षणभर काहीच सुचेना. थोड्या वेळानं भानावर आलो, तेव्हा ३२ वर्षांचा काळ काही क्षणातच डोळ्यांपुढून गेला.
१९९० साली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नागपंचमीच्या निमित्ताने आयोजित केलेली सर्पयात्रा आठवली. त्या वेळी अनिल खैरे, आकुर्डी सर्पोद्यान म्हणजे निर्गकवी बहिणाबाई प्राणिसंग्रहालयाचा संचालक म्हणून कार्यरत होता. त्या दिवशी माझी अनिलशी ओळख झाली आणि त्याच्यामुळे सर्पविश्वाची ओळख झाली असं म्हणायला हरकत नाही.
सामान्य माणसाच्या मनातील सापांविषयाचे गैरसमज दूर करून त्यांच्या उपयुक्ततेविषयी, त्यांच्या संवर्धनाच्या आवश्यकतेविषयी, जनजागृती करण्याचे काम, अनिल त्याचे थोरले बंधू, नीलिमकुमार खैरे, यांच्या पावलावर पाऊल ठेवून करत होता. आपल्या परिवाराचा, वडिलांचा व्यवसायातील वारसा चालवणारे अनेक लोक आपण पाहिले असतील. परंतु नीलिमकुमार खैरे या आपल्या वडीलबंधूंकडून त्यांच्या छंदाचा वारसा घेऊन, त्या क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवणारा अनिल, हा कदाचित पहिला आणि एकमेव असावा.
आकुर्डी सर्पोद्यानात उल्लेखनीय असे बदल घडवून आणत, त्याला लोकप्रिय करण्यामध्ये अनिलचा सिंहाचा वाटा होता. हे कार्य करत असतानाच, त्याने अनेक मित्रसुद्धा जोडले. नवनवीन मित्र बनवणे, त्यांचा मनात घर करणे यात अनिलचा हातखंडा होता. मैत्री करावी कशी आणि ती टिकवावी कशी, हे अनिलकडून शिकायला मिळाले. आपण त्याच्या संपर्कात राहिलो न राहिलो तरी तो मात्र आठवणीनं संपर्क साधायचा. कधी फोनवरून, तर कधी प्रत्यक्ष येऊन. कित्येकदा, अनिल अचानक समोर येऊन उभा राहत असे आणि ‘कामानिमित्त इकडे आलो होतो, म्हटलं तुला भेटून जावं’ असं म्हणत जवळीक अधिकच दृढ करायचा. आणि हे तो त्याच्या सगळ्याच मित्रांशी करत असे.
आयआयटीत प्रशिक्षण घेतलेल्या अनिलनं सर्पक्षेत्रात येण्यापूर्वी टाटा मोटर्समध्ये काही काळ काम केलं होतं. तिथल्या जुन्या सहकाऱ्यांपासून ते जुने शाळकरी मित्र, संपर्कात येणारे पत्रकार, पालिकेतील अधिकारी, सर्परक्षणाचे काम करणारे स्वयंसेवक अशा अनेक जणांचा समावेश त्याच्या मित्रांच्या यादीत असे. केवळ मित्रच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांशीसुद्धा अनिलचे जिव्हाळ्याचे संबंध त्याने निर्माण केले होते.
मित्रमंडळींप्रमाणेच, त्याच्या कुटुंबातसुद्धा तो सर्वांचा आवडता होता. सगळ्या बहिणींचा आवडता धाकटा भाऊ, सगळ्या भाचे कंपनीचा आवडता छोटा मामा, संपूर्ण कुटुंबाचा महत्त्वाचा दुवा होता.
साप वाचवणे, त्यांची देखभाल करणे आणि बऱ्या झालेल्या सापांना पुढे निसर्गात सोडणे, इतक्यापुरते मर्यादित कार्य त्याने केले नाही, तर सर्पविषयक संशोधन आणि त्यांचे बंदिस्त अवस्थेतील प्रजननासारख्या क्षेत्रात त्याने आपला अधिकार सिद्ध केला. भारतीय सर्पविज्ञान संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘हर्पेटॉन’ या सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी शास्त्रीय लेख प्रसिद्ध करणाऱ्या नियतकालिकाचे काम त्याने अनेक वर्षं हाताळलं. ग्लोबल ओपन युनिव्हर्सिटी, नागालँड आणि जेराल्ड डुरेल कन्झर्व्हेशन अकादमीमध्ये घेतलेलं प्रशिक्षण त्याला सर्पोद्यानाच्या कामात फार उपयोगी पडलं.
आपलं आवडीचं काम करत असतानाच त्याने आपला छंदसुद्धा नीट जपला. सापांनंतर त्याचा सगळ्यात आवडीचा विषय होता गाड्या. अनेक प्रकारच्या वाहनांची त्याला सखोल माहिती असायची. गाडी चालवणं हे त्याचं सर्वात आवडीचं काम. अंतर कितीही असो, गाडी कोणतीही असो, रस्ता बरा असो की वाईट, चालकाच्या जागी अनिलच असायचा. त्याची स्वत:ची गाडी कायमच उत्तम स्थितीत असायची. मित्रांच्या गाड्यासुद्धा तो चालवून बघायचा आणि दोष असेल तर पटकन निदर्शनास आणून द्यायचा.
त्याच्या या स्वभावामुळे अनेक लोक त्याच्याकडे, त्याच्या कार्याकडे आकर्षित झाले, त्याला सहकार्य करू लागले. मीसुद्धा त्यापैकीच एक. सर्पोद्यानाचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात करणारा मी, भारतीय सर्पविज्ञान संस्थेच्या कार्यात खेचला जाऊन या दोन भावांच्या कार्यात खारीचा वाटा उचलू शकलो, याला अनिलच बहुतांशी जबाबदार होता. अण्णांबरोबर त्याने केलेलं कार्य पुढे सुरू ठेवणं, पूर्णत्वास नेणं, हीच अनिलला खरी श्रद्धांजली ठरेल.
shrirams@gmail.com