धर्म, जाती, आर्थिक स्तर यांच्यामध्ये असलेल्या संघर्षाच्या वातावरणात सध्या आपला समजा ढवळून निघत असतानाच या अशा संघर्षांमधलाच आणखी एक पदर नुकताच पुढे आला आहे. तो आहे रंगाचा. केरळच्या मुख्य सचिव सरदा मुरलीधरन यांना त्यांच्या काळ्या रंगावरून कुणीतरी जाणीवपूर्वक हिणवलं. त्यासंदर्भात त्यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट आता व्हायरल झाली आहे. सरदा मुरलीधरन, यांचे पती व्ही. वेणू ३१ ऑगस्ट २०२४ रोजी केरळचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले आणि सप्टेंबरमध्ये सरदा मुलरीधरन यांच्याकडे ती जबाबदारी आली. वास्तविक केरळ या राज्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एखाद्या आयएएस जोडप्याने लागोपाठ राज्याचे मुख्य सचिवपद सांभाळले आहे. सरदा मुरलीधरन या पदावर काम करायला लागल्यानंतर एका व्यक्तीने त्यांच्या मुख्य सचिव या त्यांच्या पदाचा उल्लेख करून त्यांना लिहिले की तुमच्या पतीचे नेतृत्व शुभ्र होते, तुमचे नेतृत्व काळे आहे.किती धक्कादायक विधान आहे हे. एखादी स्त्री आपल्या कतृत्वाने राज्याच्या मुख्य सचिवपदापर्यंत जाते आणि तिच्याबद्दल चर्चा काय होणार तर ती काळी आहे? तिच्या कामाबद्दल, कतृत्वाबद्दल आपण बोलणारच नाही?
सरदा मुरलीधरन यांनी या विधानाबाबत एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी त्यांना त्यांच्या काळ्या रंगावरून कसे आयुष्यभर टोमणे ऐकून घ्यावे लागले त्याबद्दल लिहिले आहे. त्या म्हणतात, गेली ५० वर्षे मलाही असेच वाटत राहिले आहे की माझा रंग काही फारसा चांगला नाही. खरंतर मला माझ्या रंगाचा अभिमान असायला हवा होता. एवढं लिहून त्यांनी त्यांची ती पोस्ट डिलिट करून टाकली होती. पण नंतर मित्रमंडळी, आप्तेष्ट यांच्या आग्रहामुळे आणखी तपशीलवार पोस्ट त्यांनी लिहिली. त्यात त्या म्हणतात, कुणीतरी असा उल्लेख करणं याचं मला खरंतर वाईट वाटलं. एकतर मी हे पद स्वीकारल्यापासून माझी सतत माझ्या नवऱ्याशी तुलना होत आहे. त्याची मी सवय करून घेतली. पण आता त्या पलीकडे जाऊन माझ्या रंगावर चर्चा होते आहे. (मी स्त्री आहे आणि काळी आहे, हा पदरही त्याला आहेच) म्हणजे माझा रंग काळा असणं हा माझा मोठा दोषच आहे. काळं असणं म्हणजे त्यांच्या लेखी काहीतरी वाईट, नकारात्मक, दुबळं वगैरे असंच समीकरण आहे.
सरदा मुलरीधरन पुढे लिहितात, ‘पण काळा रंग वाईट असं का? काळा रंग विश्वाचे अनिवार्य सत्य आहे. काळा म्हणजे सर्व काही सामावून घेणारी शक्ती. ती सर्वात प्रभावी ऊर्जा आहे. काळा हा सर्वांना खुलणारा रंग आहे. मग तो का नको? मी चार वर्षांची असताना माझ्या आईला विचारले होते की मला पुन्हा पोटात ठेवून गोरी करून जन्माला घालशील का? मी ५० वर्षांहून अधिक काळ असाच विचार करत जगले की माझा रंग सुंदर नाही. काळा रंग म्हणजे काहीतरी वाईट या सामाजिक समजुतीचाच भाग होऊन मी जगले. गोरेपणाकडे आकर्षित झाले. गोरा रंग, गोरे मन, आणि जे काही गोरे व चांगले आहे त्यालाच श्रेष्ठ मानत राहिले. आणि मी गोरी नाही, त्यामुळे माझ्यात काहीतरी कमी आहे, असं मला कायम वाटत राहिलं. पण मला मुलं झाली आणि माझे हे विचार बदलले. माझी मुलं त्यांचा काळा रंग कमी लेखत नाहीत. त्यात मला दिसले नाही, ते सौंदर्य त्यांना दिसतं. त्यांनी मला शिकवलं की काळा हा एक केवळ सुंदरच नाही तर अप्रतिम रंग आहे. त्यांच्यामुळंच आज मला अभिमानाने म्हणता येतं – मला काळा रंग आवडतो. मला माझ्या रंगाचा अभिमान आहे.
सरदा यांचं हे म्हणणं विचार करायला लावणारं आहे. पण गेली अनेक वर्षे हीच चर्चा पुन्हा पुन्हा करावी लागते, त्याचं काय करायचं ? खरं तर शतकानुशतकं वेगवेगळ्या वंशांच्या लोकांची ये जा सुरू असल्यामुळे आपल्या देशात माणसांच्या रंगांच्या विविध छटा बघायला मिळतात. अशा छटा इतरत्र कुठेही पहायला मिळत नाहीत कारण तिथे अशी सांस्कृतिक सरमिसळ झालेली नाही. ही सरमिसळ ही खरेतर आता आपली सांस्कृतिक श्रीमंती आहे. पण ब्रिटिश इथे आल्यापासून गोऱ्या रंगाला एक विचित्र महत्त्व मिळत गेलं. गोऱ्या रंगाच्या व्यक्तीला आपसूकच एक प्रकारचं श्रेष्ठत्व मिळायला लागलं. काळेपणाला हिणवलं जायला लागलं. या वृत्तीच्या जास्त बळी ठरल्या त्या स्त्रिया. सगळ्याच पुरुषांना लग्नसाठी गोरीपान बायको हवी अशी अपेक्षा निर्माण झाल्यामुळे सावळ्या, काळ्या रंगाच्या मुलींच्या वाट्याला अपमान, अवहेलना येऊ लागली.
वास्तविक एखाद्याचे गुण बघण्यापेक्षा रंग बघून त्याची योग्यता ठरवणं ही किती अमानुष आहे? मुळात तुमच्या वाट्याला येणारा रंग हा तुमचा वंश, अनुवंश, भौगेलिकता या सगळ्यावर आधारित असतो. त्वचेचा रंग गोरा किंवा इतर कोणताही असणं यात तुमचं कर्तृत्व काहीच नसतं. भारतीय लोक ज्यांना मानतात, ते कोणतेही देवदेवता गोरेपान नाहीत, कारण तो इथला नैसर्गिक रंगच नाही.शिवाय निमगोरा, सावळा, तुकतुकीत काळा हे त्वचेचे रंग सुंदर नसतात असं कोण म्हणतो? या रंगांच्या आणि विलक्षण देखण्या अशा किती व्यक्तींची नावे सांगावीत? मुळात कोणतीही व्यक्ती देखणी दिसते ती तिच्या व्यक्तिमत्वामुळे, तिच्या विचारांमुळे, तिचं मन तिच्या वागण्याबोलण्यातून ज्या पद्धतीने परावर्तित होतं त्यामुळे. शहरामध्ये अगदीच केविलवाणा दिसणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याला त्या शेतात जाऊन त्याच्या पिकांबद्दल विचारा, त्याचं सगळं तनमन बोलायला लागतं आणि तो विलक्षण देखणा दिसायला लागतो. दुर्बलांना प्रेमाने जवळ घेऊन त्यांच्या पाठीवरून हात फिरवणाऱ्या मदर तेरेसा काय कमी देखण्या वाटायच्या का? परंपरेने जिला शतकानुशतके चूलमूल करायला लावलं ती स्त्री एखाद्या राज्याची मुख्य सचिव होते आणि राज्याचं प्रशासन हाकायला लागते, तेव्हा त्या आत्मविश्वासाचं तेज तिच्या चेहऱ्यावर किती विलक्षण दिसत असेल? अशा वेळी तिचं ते तेज न पाहता तिचा रंग पाहणारेच खरं तर करंटे म्हणायला हवेत. vaishali.chitnis@expressindia.com
© The Indian Express (P) Ltd