-सिद्धार्थ खांडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड अशा बड्या नेत्यांशी टक्कर घेताना एखादा भिडू गांगरला असता. क्वचित एखाद्याने पलायनही केले असते. परंतु संदीप मधुसुदन पाटील ही आव्हानांना शिंगावर घेणारी असामी. त्यामुळे पराभवाचा विचारही न करता, ती लढली. कारण लढणे तिच्या वृत्तीत होते.
शिवाजी पार्क आणि वानखेडेवर क्रिकेटप्रेमी निव्वळ संदीप पाटील यांच्या षटकारांची आतषबाजी पाहायला घोळक्याने यायचे. खरे तर दादर, शिवाजी पार्क म्हणजे तंत्रशुद्ध, खडूस मुंबईकर फलंदाज घडवणारी खाणच. ‘सरांनी सांगितल्याप्रमाणे’ मान खाली, नजर चेंडूवर, कोपर वर, पाय पुढे अशा(च) पद्धतीने चेंडूचा सामना करायचा, तो तटवायचा. निदान सुरुवातीला तरी क्रिकेटमधील धुळाक्षरे या प्रकारेच गिरवायची. संदीप पाटील त्या पठडीमध्ये कधीच रमले नसावेत. अण्णा वैद्यांसारख्या त्यांच्या मुरब्बी गुरूंनीही आपल्या शिष्याच्या शैलीत आणि सहजप्रवृत्तीत बदल करण्याचा नाद सुरुवातीलाच सोडून दिला असावा. संदीप पाटील म्हणजे नखशिखान्त गॅलरी क्रिकेटर. उंचपुरे, देखणे व्यक्तिमत्त्व, त्याला साजेसा मैदानातील वावर आणि फलंदाजी करताना गोलंदाजावर हुकूमत गाजवण्याची एकमेव मनिषा. सौराष्ट्राविरुद्ध त्यांनी लगावलेला आणि वानखेडेच्या सीमा ओलांडून लगतच्या हॉकी स्टेडियममध्ये पोहोचलेला षटकार अस्सल क्रिकेटदर्दींच्या आजही स्मरणात असेल. १९७९ मध्ये रणजी स्पर्धेच्या उपान्त्य सामन्यात पारपंरिक प्रतिस्पर्धी दिल्लीविरुद्ध मुंबईची अवस्था ४ बाद ७२ अशी झाली. सहाव्या क्रमांकावर उतरलेल्या पाटील यांनी १४५ धावा तडकवल्या. त्यांच्या कोणत्याही सहकाऱ्याला २५ च्या वर मजल मारता आली नव्हती.
संदीप पाटील यांची कारकीर्द प्रदीर्घ नव्हती, पण लक्षणीय नक्कीच होती. त्यांच्या अनेक सामन्यांच्या बाबतीत ‘मीदेखील होतो बरं का त्यावेळी स्टेडियममध्ये’ असे सांगणाऱ्यांची संख्या फार मोठी. तीच पाटील यांची संपत्ती. कीथ मिलर, गॅरी सोबर्स, टायगर पतौडी, व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याप्रमाणे पाटील यांचा वावरही बिनधास्त आणि रुबाबदार असायचा. ऑस्ट्रेलियन दौऱ्यात लिली, थॉम्सन, पास्को, रॅकेमन, हॉग अशा वेगवान गोलंदाजांच्या घरच्या मैदानांवर खेळताना पाटील यांनी तसा मुजोरीयुक्त रुबाब दाखवला. सिडनी कसोटीमध्ये एकदा हॉगचा चेंडू त्यांच्या गळ्यावर आदळला, तरी विनाहेल्मेट ते खेळत राहिले. पुढे तिसऱ्या सत्रात पास्कोचा चेंडू त्यांच्या कानावर आदळला आणि ते खेळपट्टीवर कोसळले. तरी जायबंदी अवस्थेतच नंतर खेळायला उतरले. पुढच्याच अॅडलेड कसोटीमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियन तोफखान्यासमोर १७४ धावा चोपून काढल्या. त्यावेळी ती ऑस्ट्रेलियन भूमीवरील सर्वोच्च भारतीय खेळी होती. धावांची अशीच ढगफुटी पुढे इंग्लंडमध्येही दिसून आली. इंग्लंडचे तेज गोलंदाज साक्षात बॉब विलिस यांच्या एका षटकात ४, ४, ४, ०, ४, ४, ४ (एक नो-बॉल) अशी आतषबाजी झाली. त्या सामन्यात पाटील यांनी शतक झळकावले. १९८३ मधील विश्वचषक स्पर्धेत त्यांनी उपान्त्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध केलेल्या नाबाद ५१ धावा आणि अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध केलेल्या २७ धावा बहुमोल ठरल्या होत्या. त्यांची चारपैकी तीन शतके परदेशी मैदानांवर (ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान) होती. तरीदेखील आक्रमक फटका मारण्याच्या नादात बाद होऊन संघाला अडचणीत आणल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली. आक्रमक स्वभावाला मुरड घालण्याच्या फंदात ते कधी पडले नाही. कदाचित क्रिकेटच्या सौंदर्यशास्त्राची त्यांची स्वतःची अशी व्याख्या असावी. तिच्यात फेरफार करणे त्यांना पसंत नसावे.
त्यांची आकडेवारी भरीव नसेल, पण पाटील यांना क्रिकेटच्या सर्व पैलूंची जाण उत्तम होती. मध्य प्रदेश, केनिया, ओमान अशा दुय्यम संघांचे प्रशिक्षकपद स्वीकारून त्यांनी या संघांना अभूतपूर्व यश मिळवून दिले. ‘एकच षटकार’ या साप्ताहिकाचे संपादकपद ही त्यांची क्रिकेट मैदानाबाहेरची आणखी लक्षणीय खेळी ठरली. राष्ट्रीय निवड समिती अध्यक्षपदावर असताना त्यांनी भल्याभल्या क्रिकेटपटूंची गय केली नव्हती.
आव्हानांसमोर हार मानणे त्यांना कधी जमले नाही. तसे नसते तर मुंबईच नव्हे, तर इतरत्रही निवडणुकीच्या रिंगणात मुरलेल्या राजकारण्यांसमोर क्रिकेटपटूंचा निभाव फारसा लागत नाही, हे त्यांच्या लक्षात आले असते. माधव मंत्री वि. मनोहर जोशी, अजित वाडेकर वि. शरद पवार, दिलीप वेंगसरकर वि. विलासराव देशमुख या द्वंद्वांमध्ये राजकारणीच विजयी ठरले हा इतिहास पाटील यांना ठाऊक नसेलच, असे नाही. मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषवलेले शेवटचे कसोटीपटू म्हणजे माधव मंत्री, हेही त्यांच्या लक्षात आले असेलच. तरीही त्यांनी लढण्याचा निर्धार दाखवला. शरद पवार सुरुवातीस त्यांच्याबरोबर होते, पण नंतर आशिष शेलार यांच्याबरोबर राहिले. पाटील तसे पाहिल्यास एकाकी होते. परंतु तरीही त्यांच्याविरुद्ध सर्वच वजनदार राजकीय नेत्यांना एकत्र येऊन भोजनावळी मांडाव्या लागल्या. पाटील यांचा झंझावात कोणत्या क्षणी उठेल याची खात्री नसल्यामुळेच शेवटपर्यंत राजकारणी एकेका मताविषयी जागरूक राहिले. न जाणो, एखाद्या वेळी लिली, पास्को, विलिस यांच्यासारखी आपली अवस्था झाली तर… ही धास्ती त्यांच्याही मनात असावी! पाटील एकाकी ठरले, पण लढले. आणि पराभूत झाले. त्यांच्याकडून नेहमीच अपेक्षा बाळगणाऱ्यांना बहुधा त्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षांचे स्मरण झाले नसावे. किंबहुना क्रिकेटप्रमाणेच निवडणुकीच्या मैदानावरही शर्थीने लढून हौतात्म्य पत्करणे हेच त्यांचे प्राक्तन असे आम्हीही जणू गृहित धरले. क्रिकेटप्रेमी, क्रिकेटदर्दी वगैरे म्हणवल्या जाणाऱ्या मुंबईत एका मुंबईकराचा पराभव झाला. ‘बाय बाय मिस अमेरिकन पाय’ या प्रसिद्ध गाण्यात ‘द डे द म्युझिक डाइड’ अशी एक खिन्न ओळ आहे. संदीप पाटील यांच्या पराभवानंतर ‘द डे द क्रिकेट डाइड’ अशीच बहुतांची भावना झाली. पण कोणी काहीच करू शकले नाही.
सॉरी, संदीप…!