सारंग यादवाडकर, प्राजक्ता महाजन
नुकताच ऑक्टोबर २०२४ मध्ये स्पेनमध्ये मुसळधार पाऊस झाला. रस्ते व शहरे जलमय झाली आणि मृतांच्या संख्येने २०० चा आकडा ओलांडला. २०२१ मध्ये असाच अचानक पूर येऊन युरोपमध्ये २५० लोक मृत्युमुखी पडले होते आणि ४६ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. स्पेनच्या आताच्या आर्थिक नुकसानीचे आकडे यथावकाश आपल्याला माहीत होतीलच. पण विकास आणि अर्थव्यवस्थेचा जप करता करता निसर्गाचा विध्वंस केल्याने अर्थव्यवस्थेलाच फटका बसतो आहे, हे आता स्पष्ट दिसू लागले आहे.
स्पेनमध्ये ढगफुटी होऊन बऱ्याच भागांत एका दिवसात पाच ते सात इंच पाऊस झाला तर चिवा भागात तब्बल २० इंच पाऊस झाला! अशा ढगफुटीच्या वाढत्या घटना पर्यावरणातील बदलांमुळे होतात, हे आता सर्वांना माहीत झाले आहे. भूमध्य समुद्राच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान यंदा ऑगस्टमध्ये २८ अंश सेल्सियसच्या पुढे गेले होते. त्यामुळे हवेतले बाष्प वाढले आणि पाऊस जास्त तीव्रतेने पडला. हवेचे तापमान जसे वाढेल, तसे ती जास्त बाष्प धरून ठेवते. एका अंशाने तापमान वाढले, की हवा सात टक्के जास्त बाष्प धरून ठेवते. त्यामुळे आता बदलत्या काळात अशा घटना आणखी वाढणार आहेत.
हेही वाचा >>>बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
स्पेनच्या पुराच्या विदारक चित्रांमध्ये प्रामुख्याने व्हलेन्सियाचे फोटो दिसत होते. पाण्याने भरलेले, चिखलाने भरलेले रस्ते, पाण्याखाली गेलेल्या गाड्या, कागदी होड्यांसारख्या पाण्यात वाहून मोडकळीला आलेल्या गाड्या अशी कितीतरी चित्रे दिसत होती. २० इंच पाऊस झालेल्या चिवाच्या खालच्या अंगाला समुद्राजवळ व्हलेन्सिया शहर आहे. या शहरातून टुरिया नावाची नदी वाहते. नासाच्या फोटोंमध्ये या टुरिया नदीचे पाणी सगळीकडे पसरलेले दिसले आणि अर्थातच तिच्याबद्दल उत्सुकता वाढली. जसजसे तिच्याबद्दल वाचन केले, तशी धक्कादायक माहिती मिळत गेली आणि एक भयाण वास्तव समोर आले.
टुरिया नदीच्या काठी व्हलेन्सिया वसलेले होते आणि कुठल्याही प्रदेशाचे असतात तसे या भागाचे या नदीशी सांस्कृतिक बंध होते. व्हलेन्सियातून वाहत ही नदी पुढे भूमध्य समुद्राला मिळत असे. नदीच्या मुखाशी बराच गाळ साचत असल्याने बंदरातील बोटींना ते गैरसोयीचे होते. त्याखेरीज ही काही वर्षभर दुथडी भरून वाहणारी नदी नव्हती. आपल्याकडच्या बऱ्याच नद्यांप्रमाणे वर्षातला बराच काळ एक बारीकसा प्रवाह असलेली बऱ्याचशा कोरड्या पात्राची नदी होती. त्यामुळे ‘‘तिला व्हलेन्सियाच्या बाहेर हलवा आणि बंदर मोकळे करा’’ अशी मागणी १७६५ पासून अधूनमधून उचल खात असे. अशातच ऑक्टोबर १९५७ मध्ये टुरियाला मोठा पूर आला आणि त्यात ८१ लोक मृत्युमुखी पडले. प्रचंड आर्थिक हानी झाली. नदीला व्हलेन्सियातून विस्थापित करायला चांगलेच निमित्त मिळाले.
हेही वाचा >>>धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ
एकदा ‘‘पूरनियंत्रण’’ असे नाव दिले, की माणूस नदीची आणि तिच्या परिसंस्थेची दैना करायला मोकळा होतो. इथेही तेच झाले. टुरिया नदीवर बांध घालून तिचा मार्ग शहराच्या बाहेर दक्षिणेला वळवला गेला आणि एका आखीव मार्गाने तिला (बंदरापासून लांब) समुद्रात नेऊन सोडले गेले. हा नवा प्रवाह आधीपेक्षा रुंद करण्यात आला आणि त्याला काठाने तटबंध बांधले गेले. तटबंधांच्या पलीकडे रस्ते आणि त्यापलीकडे उद्याोग-व्यवसायाच्या जागा तयार केल्या गेल्या. शहराच्या मध्यभागात जिथे पूर्वी नदीचे पात्र होते, तिथे वेगवेगळ्या सोयींनी युक्त असे मोठे ‘टुरिया उद्यान’ बांधले. या उद्यानात कारंजे, मनोरंजन क्षेत्र, कॅफे, क्रीडा सुविधा, नृत्याची जागा असे सर्व काही आहे. उद्यानाचे नाव वाचून गंमत वाटते. जिला विस्थापित करून हे उद्यान बांधले, त्या टुरिया नदीचे नाव दिले, की झाले काम.
हे सगळे बदल करायला प्रचंड खर्च झाला. सात अब्ज पेसेटा (स्पेनचे जुने चलन) खर्च करावे लागले आणि त्यासाठी व्हलेन्सियाच्या नागरिकांना जास्तीचा करही भरावा लागला. ही झाली आर्थिक किंमत. पण त्याचबरोबर पर्यावरणाचीही मोठी किंमत मोजावी लागली. नदीचा नैसर्गिक प्रवाह आणि भूजलाचे भरण बदलण्यात आले. जुन्या पात्राच्या आजूबाजूला जो झाडझाडोरा होता, प्राण्यांचा अधिवास होता, तो पूर्णपणे नष्ट झाला. नव्याने पात्र आखल्यामुळे त्याजागी पूर्वी जी झाडी आणि परिसंस्था होती, ती पूर्ण नष्ट झाली. नवीन पात्राला तटबंध बांधल्यामुळे नदीला पसरायला कुठेही पूरमैदाने उरली नाहीत. नदीच्या गाळ वाहण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम झाला.
इतका खर्च आणि इतका विध्वंस केल्यावर शेवटी आताचा पूर आलाच, अगदी प्रलयंकारी वाटेल असा आला आणि जीवित व आर्थिक हानी करून गेला. मग नदीला विस्थापित करून काय साधले? व्हलेन्सियाच्या बातम्यांमध्ये पावसाच्या तीव्रतेचा उल्लेख असतो (ती तर वाढतच जाणार आहे) आणि लोकांना आगाऊ सूचना दिली नाही हेही सांगितले जाते. पण त्याच्या पलीकडे जाऊन स्पॅनिश लोकांना नदीचा विचारही करावाच लागेल. पाण्याला धरून-बांधून काही उपयोग नाही, तर त्याला त्याची जागा देऊनच प्रश्न सुटणार आहेत, हे आधुनिक तत्त्व शिकावे लागेल. ‘‘पाण्याविरुद्ध नाही, तर पाण्यासह’’ जगण्याचे शहर नियोजन करावे लागेल. पावसाच्या वाढत्या तीव्रतेमध्ये नदीला तटबंध बांधून उपयोग होत नाही. सिमेंट-काँक्रीटमुळे पाणी जिरत-मुरत नाही. पावसाचे पाणी शोषून घेऊन जिरवणारी क्षेत्रे निर्माण करावी लागतात. नदीसाठी पूरमैदाने आणि पाणथळ जागा राखाव्या लागतात. भारतीय लोकांनाही यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. आपल्याकडेही बऱ्याच नद्यांना तटबंध बांधणे आणि काठावरच्या परिसंस्था उध्वस्त करून व्यापारी व मनोरंजन केंद्रे बांधण्याच्या योजना सुरू आहेत. ‘‘नदीकाठ सुशोभीकरण’’ अशा नावाने अहमदाबाद, पुणे, लखनौ अशा कितीतरी शहरांत तशी कामेही सुरू आहेत. स्पेनची पूरस्थिती हा आपल्यासाठी धोक्याचा इशारा आहे, हे आपण वेळीच ओळखायला हवे.
(सदस्य पुणे रिव्हर रिव्हायवल डॉट कॉम)
yadwadkarsarang@gmail.com
mahajan.prajakta@gmail.com