पारूल कुलश्रेष्ठ, फैजान मुस्तफा
राजस्थानातील कोटा कशासाठी प्रसिद्ध आहे, ते आता सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे त्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. कोट्याला काय चालतं, हे आधी ज्यांना माहीत नव्हतं, त्यांना ते व्हायरल फीव्हरच्या ‘कोटा फॅक्टरी’चे सीझन्स बघून समजलं असेलच. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेणाऱ्या या कोटामधल्या केंद्रांचं खरोखरच परीक्षांच्या फॅक्टरींमध्ये कधी रुपांतर झालं ते समजलंही नाही. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसाठीची नीट आणि जेइइ ही प्रवेश परीक्षा देऊन त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवू इच्छिणारी देशभरातून जवळपास दोन लाख मुलं दरवर्षी कोटा मध्ये असलेल्या केंद्रांमध्ये या अभ्यासाच्या तयारीसाठी येतात. या मुलांच्या गरजांसाठीची एक व्यवस्था, एक जाळंच तिथं तयार झालं आहे. नुकतीच घडलेली एक घटना या ‘फॅक्टरी’मध्ये भरडल्या जाणाऱ्या एका मुलाबद्दल असली तरी आजवर अनेक मुलांच्या बाबतीत ते घडलं आहे, असं सांगितलं जात आहे.
२२ फेब्रुवारी रोजी १२ वीच्या परीक्षेसाठी आपल्या वसतिगृहातून बाहेर पडलेला आदित्य (खरंतर त्या मुलाचं नाव वेगळं आहे, पण आपण त्याला आदित्य म्हणू या.) परीक्षा केंद्रावर नेणारी बस चुकल्यानंतर परीक्षा केंद्रावर गेला नाही आणि वसतिगृहातही परतला नाही. त्याचा मोबाइलही त्याच्या वसतिगृहातील खोलीतच आहे, असा निरोप कोट्याहून १५०० किलोमीटरवर, सिलिगुडी इथे असलेल्या त्याच्या वडिलांना मिळाला आणि त्यांचं धाबं दणाणलं. कोचिंग क्लासच्या नीटसाठीच्या परीक्षेत ७२० पैकी ७०० गुण मिळवणाऱ्या, हुशार गणल्या जाणाऱ्या आपल्या १७ वर्षांच्या एकुलत्या एक लेकाचं काय झालं असेल या काळजीनं त्यांच्या जिवाचं पाणी पाणी झाली. मिळेल ती पहिली फ्लाइट पकडून त्यांनी पत्नीसह कोटा गाठलं. आदल्याच दिवशी दुपारी अडीच वाजता ते आपल्या लेकाशी बोलले होते. आपल्याला ९० टक्क्यांहून जास्त मार्क मिळणार याची त्याला खात्री होती. आणि असा मुलगा परीक्षेला गेला नव्हता आणि तो कुठे गेला आहे, ते कुणालाच नाहीत नव्हतं.
हेही वाचा : लवाद-प्रक्रियेवर सरकारी लत्ताप्रहार
त्याच्या आईवडिलांनी कोट्यात थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनीही ताबडतोब सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आणि आदित्यचा ठावठिकाणा समजायला सुरुवात झाली. कोट्याच्या रेल्वेस्टेशनवर येऊन आदित्य आग्रा ट्रेनमध्ये चढला खरा, पण दहा बारा वेळा खाली उतरला, पुन्हा चढला. त्याच्या जवळ एक मोबाइलही असल्याचं सीसीटीव्हीत दिसलं आणि पोलिसांचं काम सोपं झालं.त्याचा मोबाइल त्याने बरोबर घेतला नव्हता, पण त्याच्या मृत आजीचा बरोबर घेतला होता, हे त्याच्या पालकांच्या लक्षात आलं. त्यामुळे मोबाइल नंबर ट्रेस करत पुढच्या गोष्टी सोप्या झाल्या. तिथून तो वेगवेगळ्या ट्रेन पकडत पश्चिम बंगालच्या दिशेने निघाला असल्याचं लक्षात आलं. म्हणजे तो कदाचित घरी निघाला होता. पण मध्येच त्याचं लोकेशन पटण्याजवळच्या जंगलात दिसायचं, तर हावडा स्टेशनवर तीन तास तो एका जागी बसला असावा, असं दिसत होतं. सिलिगुरीपासून ११ तासांवर असलेल्या जलपाइगुडी स्टेशनवर तो पोहोचणार हे लक्षात आल्यावर त्याच्या वडिलांनी आपल्या एका नातेवाईकांना तिथं पाठवलं. त्यांना एका बोगीत अत्यंत विमनस्क अवस्थेत बसलेला आदित्य अखेर सापडला.
ही गोष्ट २६ फेब्रुवारीची. म्हणजे २२ ते २६ हे पाच दिवस हा १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा कोटा ते सिलिगुडी असा भटकत होता. त्याला कशाचंच भान नव्हतं. मध्येच तो ट्रेनमधून उतरून अयोध्येत भटकला, हे वगळता त्याला काहीच आठवत नव्हतं. छत्तीसगढमध्ये तिथल्या बाजारात असाच फिरत राहिला. काही भल्या लोकांनी त्याला खायला प्यायला घातलं आणि त्याच्या बोलण्यात पश्चिम बंगालचा उल्लेख आला म्हणून त्याला हावड्याचं तिकिट काढून ट्रेनमध्ये बसवून दिलं. हावडा स्टेशनवर त्याने जलपाइगुडीची घोषणा ऐकली आणि त्याला आपलं घर सिलिगुडीत आहे हे आठवलं. त्याने टीसीला जलपाईगुडीचं तिकिट काढून द्यायची विनंती केली. आणि त्या टीसीनेही तसं तिकिट काढून देऊन त्याला ट्रेनमध्ये बसवलं. जलपाईगुडी आल्या आल्या त्याच्या नातेवाईकांनी त्याला ताब्यात घेतलं. तोपर्यंत आदित्यला आपण कोण, कुठं चाललो आहोत, आपलं घर, आईवडील काही म्हणजे काही आठवत नव्हतं. ठिकठिकाणचे पोलीस, आदित्यला खायला प्यायला घालणारे, तिकीट काढून देणारे सामान्य लोक, टीसी यांच्यामुळे आपल्याला आपला मुलगा परत मिळाला असं आदित्यचे वडील सांगतात.
हेही वाचा : विरोधी पक्षाचे प्रगतिपुस्तक!
कोटामध्ये मुलगा हरवला असल्याची तक्रार दिल्यामुळे त्या बाबतच्या पुढच्या कार्यवाहीसाठी आदित्यच्या वडिलांना कोट्याला परत जाणं भाग होतं. पण आदित्यने पुन्हा कोट्यात पाऊल टाकायला साफ म्हणजे साफ नकार दिला. त्याला कसंबसं समजावून परत कोट्याला नेलं खरं, पण तो परत त्या वसतिगृहात पाऊल ठेवायलाही तयार नव्हता. तो अल्पवयीन असल्यामुळे बाल कल्याण समितीचे समुपदेशक त्याच्याशी बोलले. त्यांच्या मते तो वसतिगृहात सतत फक्त अभ्यासच करायचा. त्याने तिथे कुणाशीही मैत्री केली नव्हती. अजिबात सोशल लाइफ नसण्यातून त्याचं हे असं झालं असावं, असं त्यांचं म्हणणं होतं.
आदित्यचे वडील सांगतात की आम्ही त्याला रिलॅक्स व्हायला सांगितलं आहे. नंतर हळूहळू मी परत अभ्यासाला लागेन, मला परत नीटची परीक्षा द्यायची आहे, असं तो म्हणतो आहे.
कोट्याहून मुलं अशा पद्धतीने बेपत्ता होणाऱ्या मुलांना शोधण्याचं काम करणारे कुनिधी पोलीस स्टेशनचे अरविंद भारद्वाज सांगतात की ही गायब होणारी मुलं कोणतंही टोकाचं पाऊल उचलत नाहीत, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांचे पालक आणि प्रशासनाची मुलांच्या या वागण्यामुळे घाबरगुंडी उडते. पालकांना मुलांचं अपयशी बघायचं नसतं आाणि मुलांना अपयश पचवता येत नाही. या सगळ्याचा मुलांवर प्रचंड ताण येतो. हा ताण कमी होत नाही, तोपर्यंत हे असंच सुरू राहणार.
नीटची परीक्षा, आईवडिलांच्या अपेक्षा, त्यासाठी बारावी चांगली देणं या सगळ्याचा असा ताण घेणारा आदित्य एकटाच नाही. असे अनेक आदित्य या चक्रव्यूहाला बळी पडत आहेत. त्यांच्या भवितव्याचा नीट विचार करायची वेळ आज आली आहे.
नीटची परीक्षा विद्यार्थीकेंद्रित न राहता तिचे अती केंद्रीकरण करण्यातून तिच्याबद्दलचे आजचे प्रश्न निर्माण झाले आहेत, असे म्हणता येईल. तमीळनाडूने या परीक्षेला विरोध केला आहेच, शिवाय इतरत्रही विरोधाचा सूर उमटायला सुरूवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानेदेखील या परीक्षेच्या पावित्र्यावर परिणाम झाला आहे, अशी टिप्पणी नुकतीच केली आहे. आदित्यच्या निमित्ताने नीटमधल्या काही त्रुटींचा विचार करूया.
हेही वाचा : ‘आघाडीधर्मा’मुळे काही मोदींचे ‘वलय’ कमी होणार नाही!
विद्यार्थी वंचित
नीट आणि तत्सम इतर राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमुळे फक्त कोचिंग क्लासेसची भरभराट होते आहे, असं आजचं चित्र आहे. हे बहुतेक कोचिंग क्लासेस शहरांमध्ये असल्याने, ग्रामीण भागातून येणारे गरीब विद्यार्थी आणि ज्यांनी स्थानिक माध्यमात शिक्षण घेतले आहे असे विद्यार्थी यांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावं लागतं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि राज्य मंडळांच्या अभ्यासक्रमात आणि मानकांमध्येही मोठ्या प्रमाणात तफावत आहे. वेगवेगळ्या परीक्षांचे म्हणून काही फायदे आहेत आणि ते नाकारता येत नाहीत. म्हणजे एखादा विद्यार्थी एका परीक्षेच्या वेळी आजारी पडला किंवा एका परीक्षेचा पेपर त्याला चांगला गेला नाही तर दुसऱ्या ठिकाणची परीक्षा देऊन तो पुढे जाऊ शकतो जेणेकरून त्याचं वर्ष वाया जाणार नाही. दुसरं म्हणजे नीटव्यतिरिक्तच्या व्यवस्थेत विद्यार्थ्याला त्याच्या आवडीची संस्था निवडता येते. तिसरं म्हणजे, नीटचा पेपर गेल्या चार वर्षांत दोनदा फुटला; त्यामुळे नीटच्या निष्पक्षता आणि पारदर्शकतेवर विद्यार्थ्यांचा फारसा विश्वास उरलेला नाही. शिवाय, चुकीच्या भाषांतराचा मुद्दाही आहेच. २०१८ मध्ये झालेल्या नीटमध्ये, तब्बल ४९ प्रश्नांमध्ये तमिळ भाषांतरात त्रुटी होत्या ज्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाने प्रत्येक ४९ चुकीच्या भाषांतरित प्रश्नांसाठी चार गुण किंवा तामिळनाडूच्या सर्व १.७ लाख उमेदवारांना १९६ गुण देण्याचा आदेश दिला होता. पण प्रत्येकाला ग्रेस गुण देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला.
वर्ग हा घटक दुर्लक्षित
नीट हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो कारण आपल्याकडच्या न्यायाधीशांना असं वाटतं की नीटमुळे गुणवत्तेला प्रोत्साहन मिळतं. पण योग्यता म्हणजे काय यावर तरी सगळ्यांचं एकमत आहे का? ब्रिटीश समाजशास्त्रज्ञ मायकेल डनलॉप यंग यांच्या द राइझ ऑफ द मेरिटोक्रसी (१९५८), या पुस्तकात ‘मेरिटोक्रसी’ ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा मांडली गेली आहे. गुणवत्तेसाठी स्पर्धा आणि संधीची समानता आवश्यक आहे, असा त्याचा अर्थ. गुणवत्तेची बहुआयामी रचना पुरेशा प्रमाणात, अचूकपणे मोजली जाऊ शकत नाही, असं नीटचे प्रशासक आणि न्यायाधीश मानतात ही वस्तुस्थिती नाही का? नीट आणि अशा इतर प्रवेश चाचण्या या मूलभूत निकषांची पूर्तता करत नाहीत, तेव्हा स्पर्धेला निष्पक्ष आणि न्याय्य म्हटलं जाऊ शकत नाही आणि संधीची समानता ही भ्रामक गोष्ट बनते. पाश्चिमात्य देशांमध्ये भरपूर शिष्यवृत्त्या (सॅक्स, फ्रीडल, वेल्स, कॅमारा आणि श्मिट) आहेत, असा युक्तिवाद केला जातो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की सामान्य प्रवेश चाचण्या कल्पनाशक्ती, कुतूहल आणि प्रेरणा यासारख्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या क्षमता मोजू शकत नाहीत. न्यायमूर्ती मिश्रा यांनी ग्रामीण भागात सेवा करण्यासाठी डॉक्टरांची बांधिलकी नसल्याचा मुद्दा मान्य केला (हा मुद्दा वेल्लोरमधील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजसंदर्भात होता) परंतु अखेरीस गुणवत्तेच्या नावाखाली नीटच्या बाजूने निर्णय घेतला. प्रमाणित सामान्य चाचण्यांवरील अमेरिकेमधील प्रायोगिक संशोधनात असं आढळून आलं आहे की या चाचण्या लोकसंख्येतील गरीब आणि वंचित वर्ग, महिला आणि अल्पसंख्याक यांच्याबाबत पक्षपाती आहेत. म्हणजेच नीटमध्ये असलेल्या वर्ग या घटकाकडे भारतीय न्यायव्यवस्थेने आतापर्यंत दुर्लक्ष केलं आहे.
हेही वाचा : देवाच्या दारी लूट थांबविण्यासाठी एवढे तरी कराच!
एखाद्या परीक्षेबाबत ती अन्यायकारक असल्याची भावना तरुणांमध्ये निर्माण झाली, तर त्यामुळे शिक्षणाचा समतोल बिघडतो. वर्षानुवर्षे, तरुण मनांचं मूल्यांकन अन्यायकारकपणे केलं गेलं आहे. निःपक्षपाती मूल्यमापन ही केवळ नैतिक अट नाही, तर ती समानतेची एक प्रमुख अट आहे. आपल्या शिक्षण पद्धतीत जात, लिंग, भाषा आणि सामाजिक उतरंडीच्या इतर पैलूंमधून उद्भवणाऱ्या असमानतेच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. कोचिंग उद्योगामुळे या समस्यांमध्ये आणखी वाढ होते. यांत्रिकपणे घेतल्या जाणाऱ्या या चाचण्या एकाच वेळी मोठ्या संख्येने घेता येतात, हे खरं, पण त्याची जबरदस्त किंमत आपण मोजतो आहोत.
आदित्यसारख्या मुलांच्या बातम्या आपल्याला हे लक्षात आणून देतात की एखाद्याची क्षमता मोजण्याची आपण निर्माण केलेली एखादी व्यवस्था समाज आणि देश म्हणून आपलं किती नुकसान करते आहे.
हेही वाचा : लेख : निवडणूक निकाल – परकीय गुंतवणूकदारांच्या नजरेतून
हा फक्त तरुणांच्या मनातील ताणतणावाचा मुद्दा नाही. आजकाल अगदी लहानपणापासूनच मुलांना ताणतणावांना सामोरं जावं लागतं. वास्तविक सुरुवातीच्या आयुष्यातील ताणतणाव हे शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा ठरतात. आपल्यावर अन्याय होतो आहे, या भावनेने जगण्यात कडवटपणाची भावना निर्माण होते. हे पुढे जाऊन लोकशाहीसाठी धोकादायक ठरतं. गोष्टी या थराला जाऊ नये असं वाटत असेल तर नीट या व्यवस्थेचा नीट विचार करणं आवश्यक आहे.
या लेखातील ‘आदित्य’ हा भाग पारुल कुलश्रेष्ठ यांच्या लिखाणातून घेतला असून ते इंडियन एक्स्प्रेसचे जयपूर प्रतिनिधी आहेत. उर्वरित भाग फैजान मुस्तफा यांच्या लेखातून घेतला असून ते नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगचे माजी संचालक आहेत.
समाप्त