सुशिल सुदर्शन गायकवाड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षी सात नोव्हेंबर हा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. बाबासाहेबांचे पहिले शैक्षणिक पाऊल पडलेल्या सातारच्या शाळेत त्यांना दरवर्षी मानवंदना दिली जात असते. बाबासाहेबांच्या कार्याची कीर्ती ही जगभरच असली आणि अगदी कोलंबिया विद्यापीठातही त्यांचे स्मारक असले, तरी ज्या साताऱ्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले शैक्षणिक पाऊल पडले त्या सातारच्या मातीसाठी ही अभिमानाची आणि गौरवाचीच बाब आहे.७ नोव्हेंबर १९०० रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल मध्ये (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला होता.आज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा ७ नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जात असतो.

डाॅ. बाबासाहेबांसारखा ज्ञानी विद्यार्थी दुसरा क्वचितच असेल. इतका ज्ञानी विद्यार्थी हा अनेक पक्षांच्या व विविध संघटनांच्या विद्यार्थी संघटनांसाठी प्रेरणास्रोत असायला हवा. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन हा अनेक विद्यार्थी संघटनांना माहीतच नाही. ज्या संघटनांच्या नावात विद्यार्थी हा शब्द आहे, अशा अनेक संघटनांनी गेल्या वर्षीच नव्हे तर २०१७ मध्ये तेवहाच्या शिक्षणमंत्र्यांनी हा दिवस राज्यभर ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्याचे परिपत्रक काढले तेव्हापासूनच या दिवसाकडे दुर्लक्ष केलेले आहे. अनेक पक्षाच्या विद्यार्थी संघटनांना या दिनाचा विसर पडलेला आहे. काही संघटनांनी ह्या दिवसाचे महत्त्व लक्षात ठेवून हा दिवस साजरा केला. परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना कार्यरत असतात, अशांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान विद्यार्थ्याचा विसर पडू शकतो ही खूपच मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. गेल्या वर्षी हे चित्र पाहायला मिळालेले होते. निदान या वर्षी तरी या दिनाकडे विद्यार्थी संघटनांनी पाहणे अपेक्षित आहे.

‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ असा संदेश देणारे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही अशी गर्जना करणारे विद्यार्थ्यांचे प्रेरणास्रोत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर! त्यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रवासात सातारच्या मातीपासून ते अगदी परदेशातून धडे गिरवले, प्रबंध लिहिले. जीवनात शैक्षणिक क्रांती घडल्यास मोठी किमया होते ती कशी, याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ आपल्या देशासाठीच नव्हे तर जगासाठी प्रेरणास्रोत बनलेले आहेत.

सातारच्या शाळेत त्यांनी ७ नोव्हेंबर १९०० ते १९०४ पर्यंत इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता चौथीपर्यंत इंग्रजीतून शिक्षण घेतले.आजही शाळेच्या रजिस्टर मध्ये १९१४ या अनुक्रमांकावर भिवा हे नाव पाहायला मिळते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सपकाळ हे सेवानिवृत्त झाल्यावर साताऱ्यात लष्करी भागात राहायला आले होते.भिवाच्या शिक्षणाचा प्रवास हा खडतर असाच होता.जातीयता आणि अस्पृश्यतेने इथली समाज व्यवस्था माणसा माणसाला माणसापासून दूर लोटत असताना यातून मार्ग काढत एक शैक्षणिक संघर्ष चालू होता.आज हाच संघर्ष नव्या परिवर्तनाची नांदी बनला.बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाची व त्यांनी केलेल्या परिवर्तनवादी कार्याची ख्याती जगभर पसरलेली आहे.

देशाचे संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेबांसारख्या ज्ञानी विद्यार्थ्याचे देशासाठी खूप मोठे योगदान आहे. डॉ. आंबेडकरांनी संघर्षमय असाच शैक्षणिक प्रवास केलेला आहे हे जगाला ज्ञात आहे. मग इथल्या विद्यार्थी संघटनांनी बाबासाहेबांना अभिवादन करत त्यांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिवस साजरा करण्यासाठी का पुढे येऊ नये ? त्यांचे कार्य विद्यार्थ्यांमध्ये नेण्यासाठी विविध उपक्रम का घेतले जाऊ नयेत? ज्या महाराष्ट्रातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव हे संपूर्ण जगात अजरामर आहे त्याच महाराष्ट्रातील विद्यार्थी संघटना या महान विद्यार्थ्यांस विद्यार्थी दिनी विसरत असतील, तर संघटनेच्या नावात विद्यार्थी हा शब्द असूनही उपयोग काय?

बाबासाहेब हे आजच्या विद्यार्थ्यांना कळणे गरजेचे आहे.विद्यार्थी हित व त्यांचे शिक्षण विषयक प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी बाबासाहेब हे मार्गदर्शक ठरणारे आहेत. बाबासाहेबांसारख्या ज्ञानी विद्यार्थ्याचा विद्यार्थी संघटनांना अजिबातच विसर नसावा. या दिनी गरीब गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्य देण्यापासून ते अनेक विद्यार्थी दत्तक घेण्यापर्यंतचे कृतिशील उपक्रम हे विद्यार्थी संघटनांना घेता येऊ शकतात.

लेखक ग्रामीण भागात, शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत sushilgaikwad31@gmail.com