राजस्थानातील कोटा शहरासह देशभरात अनेक ठिकाणी विद्यार्थी आत्महत्येच्या घटना गेल्या काही महिन्यांत नोंदविल्या गेल्या. कोटा शहरात वर्षभरात तब्बल २४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. कोटासह देशभरातील प्रशिक्षण केंद्रांचे नियमन सरकारने करावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांना केली होती. सर्वोच्च न्यायालयाने २० नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी केली आणि पालकांचा दबाव हेच आत्महत्यांमागचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले. मात्र कोटा येथील वास्तव काय आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’च्या ‘लोकनीति केंद्रा’तर्फे आक्टोबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यात कोटा येथे शिकणाऱ्या एक हजार विद्यार्थी/ विद्यार्थिनींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून पुढे आलेले निष्कर्ष विचारप्रवृत्त करणारे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आपण येथेच का आलात’, ‘कोणत्या प्रवेश परीक्षेसाठी प्रशिक्षण घेत आहात’, ‘कितव्यांदा या परीक्षेला बसत आहात’ इ. मुद्द्यांवर सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून असे दिसून आले की, येथे येणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ३७ टक्के विद्यार्थिनी आहेत. येथील प्रवेश परीक्षेसाठी किमान १२वी पास होण्याची अट असल्यामुळे हे विद्यार्थी १५-१९ वयोगटातील आहेत. बहुतेक विद्यार्थी बिहार (३२ टक्के), उत्तर प्रदेश (२३ टक्के), राजस्थान (१८ टक्के) व मध्य प्रदेश (११ टक्के) येथून आलेले आहेत. यातील ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी त्या त्या राज्यांतील लहान मोठ्या शहरांतून आलेले आहेत व खेड्यातील विद्यर्थ्यांची संख्या केवळ ११ टक्के आहे. बहुतेक सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांची पार्श्वभूमी मध्यमवर्गीय आहे. २७ टक्के विद्यार्थ्यांचे पालक सरकारी नोकरीत आहेत. २१ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांचा स्वत:चा व्यवसाय आहे, तर अवघे चार टक्के विद्यार्थी शेतकरी वर्गातील आहेत.

हेही वाचा – लोकमानस: क्रिकेटवेडाचे मतांमध्ये रूपांतर करण्याचा डाव फसला

कोटा येथे येण्यामागची कारणे शोधताना असे लक्षात आले की इतर कोणालातरी तिथे शिकल्याचा लाभ झाला, नात्यातील किंवा परिचयातील कोणाला तरी येथे शिकल्यामुळे प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळाले, त्यामुळे आपल्या पाल्यालाही असेच घवघवीत यश मिळेल, असा विचार दिसतो. १३ टक्के विद्यार्थ्यांचे अगदी जवळचे नातेवाईक/ पालक कोटा येथील कोचिंग क्लासमध्ये शिकले आहेत. २८ टक्के विद्यार्थ्यांच्या दूरच्या नातेवाईकांनी कोटा येथील प्रशिक्षणाचा अनुभव घेतला आहे. त्यांच्याकडूनच त्यांना कोटाबद्दलची माहिती मिळाली आहे. ५३ टक्के विद्यार्थ्यांचे कुठलेही नातेवाईक कोटा येथे शिकलेले नाहीत. ४३ टक्के विद्यार्थ्याना कोटाबद्दलची माहिती समाजमाध्यमातून मिळालेली होती. सुमारे ४६ टक्के विद्यार्थी कोटा येथील कोचिंग क्लासेसची ‘यशोगाथा’ ऐकून/ वाचून आलेले होते. ३९ टक्के विद्यार्थी पालकांच्या आग्रहास्तव व १० टक्के कोटा येथे शिकणाऱ्या मित्रांमुळे येथे आले.

येथे येणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी नीट या मेडिकल शिक्षणाच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ५९ टक्के आहे. त्यातही विद्यार्थिनींचे प्रमाण ७६ टक्के आहे. उर्वरित विद्यार्थी जेईई या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी करणारे आहेत. त्यात विद्यार्थिनींची संख्या केवळ १६ टक्के आहे. यातील सुमारे ५० टक्के विद्यार्थी प्रथमच स्पर्धा परीक्षा देणार आहेत. २६ टक्के दुसऱ्यांदा व १३ टक्के विद्यार्थी तिसऱ्यांदा परीक्षा देण्यासाठी तयारी करण्यासाठी येथे आलेले आहेत. २९ टक्के विद्यार्थी कोटा येथे येण्यापूर्वी अन्य कोणत्या तरी ठिकाणी प्रशिक्षण घेऊन आलेले आहेत. मात्र तिथे मिळणारे शिक्षण समाधानकारक नसल्याने त्यांनी कोटाचा पर्याय स्वीकारला आहे. प्रत्यक्षात परीक्षेत अपयश आल्यामुळे त्यांना वैफल्य आले असावे, असे त्यांनी दिलेल्या उत्तरांतून दिसते. कोटा येथे शिक्षण घेतल्यानंतरही प्रवेश परीक्षेत अपयशच आले, तर पुढे काय, याचे उत्तर शोधणाऱ्यांत आत्महत्या हा पर्याय समोर ठेवणाऱ्यांचे प्रमाण जास्त असावे, असे दिसते.

हेही वाचा – मांघर गावाने केली मधुक्रांती; आता पाटगाव झाले मधाचे गाव…

येथील प्रवेश परीक्षेसाठी १२वी उत्तीर्ण होण्याची अट असल्यामुळे त्या त्या राज्यातील अधिकृत बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे हायस्कूलचे शिक्षणही घेतलेले असणे अपेक्षित असते. परंतु सर्वेक्षणात फक्त १६ टक्के विद्यार्थी नियमितपणे हायस्कूलमध्ये गेलेले असतात, असे दिसून आले. इतर तब्बल ८१ टक्के विद्यार्थी ‘डमी स्कूल’मधून दूरस्थ (डिस्टन्ट) पद्धतीने परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले असतात.

या सर्वेक्षणात अन्यही अनेक मुद्द्यांवर नोंदी करण्यात आल्या. त्यातून मिळालेल्या उत्तरांच्या आणि आकडेवारीच्या विश्लेषणातून अन्यही अनेक लक्षणीय बाबी समोर येतात. ‘कोटा फॅक्टरी’चे उदात्तीकरण व त्यातील ‘बिमारू’ राज्यांचा सहभाग याचा विचार करता, हे सारे पैसे आणि प्रतिष्ठेभोवतीचे गणित असल्याचे दिसते. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रशासन व्यवस्थेत ‘चिकटलेल्या’ अधिकाऱ्यांची लग्नाच्या बाजारातील पत वाढते. अशा अधिकारपदांमुळे त्यांना मिळणारी प्रतिष्ठा आणि पैसा हे त्यामागचे कारण असावे, असे दिसते. याचबरोबर आपली शिक्षणव्यवस्था, नोकरीच्या संधींचा तुटवडा, नोकरीतील असुरक्षितता, स्पर्धा परीक्षांना मिळालेले अवाजवी महत्त्व हीदेखील या जीवघेण्या स्पर्धेमागची कारणे आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students take admission in coaching classes in kota what are the reasons for this ssb
Show comments