गणेश काळे हा बीड जिल्ह्यातील एक बेरोजगार तरुण. गेल्या पाच वर्षांपासून त्याची शासकीय नोकरीसाठी पायपीट सुरू आहे. स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठीचा खर्च मोठा असतो. तेवढी ऐपत नाही म्हणून गणेशने सारे लक्ष सरळ सेवा भरतीवर केंद्रित केलेले. राज्यात जिल्हा परिषद व तलाठी भरती जाहीर झाल्यावर त्याने फुटपाथवर दुकान चालवणाऱ्या भावाकडून ३० हजार रुपये उसने घेतले व अनेक ठिकाणी अर्ज केले. पोलीस भरतीसाठी तो सहा जिल्हे फिरला. पण पोलीस भरतीसाठी शरीरयष्टी योग्य नसल्याने त्याची संधी हुकली. पोलीस नाही तर आता तलाठी तरी व्हायचेच म्हणत त्याने कसून अभ्यास केला. परीक्षेच्या काळात पेपरफुटीच्या बातम्यांनी तो अस्वस्थ होताच, तरीही त्याने मन लावून परीक्षा दिली. पण निकालानंतर त्यातही घोळ झाल्याचे दिसताच अस्वस्थ झालेल्या गणेशने शेतात जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आजूबाजूचे लोक धावले आणि त्यांनी त्याला गळफास घेण्यापासून परावृत्त केले. गणेशला वडील नाहीत. आई शेतमजुरी करते. भावाने उसनवारीसाठी तगादा लावलेला. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या गणेशसमोर आता मोठा अंधार पसरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लखन खटाणे हासुद्धा बीडचाच. पाच वर्षांपासून तो नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. म्हाडाच्या परीक्षेत तो प्रतीक्षा यादीत क्रमांक एकवर होता. स्पर्धा परीक्षेत त्याची संधी दोनदा चार गुणांनी हुकली. तलाठी परीक्षेत त्याला दोनशेपैकी १८० गुण मिळाले पण दोनशेपेक्षा जास्त गुण मिळवणारे बघून तो हैराण झालाय.

राज्याच्या कोणत्याही भागात गेलो, तरी असे कितीतरी गणेश आणि लखन भेटतात. लाखोच्या संख्येत असलेली ही तरुणाई सध्या अस्वस्थतेचे ओझे घेऊन जगतेय. त्यामागचे एकमेव कारण म्हणजे परीक्षेत होणारे गैरप्रकार. करोना काळानंतर झालेल्या आरोग्य खात्यातील भरतीपासून हे ग्रहण लागले. त्यानंतर राज्यात आठ परीक्षा झाल्या. त्यातल्या पाच परीक्षांत पेपर फुटले, सामूहिक कॉपी झाली. यातली बहुतांश प्रकरणे उघडकीला आणली ती याच विद्यार्थ्यांनी. मग ते अहमदनगर असो, संभाजीनगर असो वा मुंबई, पिंपरी चिंचवड, बीड, नागपूर… ठिकठिकाणचे गैरप्रकार याच विद्यार्थ्यांनी उघडकीस आणले होते.

हेही वाचा >>>‘प्राणप्रतिष्ठा’ होऊन गेल्यावर तरी संविधानाचे प्राण, धर्मनिरपेक्षतेची प्रतिष्ठा जपू या…

परीक्षा जाहीर झाल्यावर तयारी करायची, कसून अभ्यास करायचा. ती दिली की जिथे कुठे गैरप्रकार घडल्याचे कानावर आले असेल तिथे समूहातील एक-दोघांनी धाव घ्यायची. त्यांच्या तिकीट खर्चासाठी इतर सर्वांनी वर्गणी गोळा करायची. गैरप्रकार कसा घडला ते शोधल्यावर पोलीस ठाणे गाठायचे. तक्रार द्यायची. गुन्हा दाखल झाला की माध्यमांकडे धाव घ्यायची. बातम्या प्रकाशित झाल्या की आंदोलने करायची. नेहमीप्रमाणे सरकारने लक्ष दिले नाही की निराश व्हायचे. काही दिवस याच अवस्थेत काढल्यावर पुन्हा मनाला उभारी देत नव्या परीक्षेच्या तयारीला लागायचे…

राज्यातील सुमारे तीस लाख तरुण याच चक्रात अडकले आहेत. परीक्षार्थीही तेच आणि जागल्याच्या भूमिकेतही तेच. या तरुणांचा कुणीही नेता नाही. राहुल कवठेकर आणि नीलेश गायकवाड हे माध्यमांना या विषयावर प्रतिक्रिया देतात म्हणून ते चर्चेत आहेत. प्रत्यक्षात तेही परीक्षार्थीच. या तरुणांची लाखाच्या घरातील संख्या बघून राजकारणी आणि त्यातल्या त्यात विरोधी पक्षांचे नेते या समूहाकडे राजकीय आशेने आकर्षित झाले आहेत. पण त्यांचा सहभाग केवळ आंदोलनापुरता असतो. एखादा नेता जरा जास्तच कनवाळू निघाला तर तो आंदोलनासाठी थोडीफार आर्थिक मदत करतो, बाकी काही नाही. त्यामुळे सत्ता बदलली की या आंदोलनात सहभागी होणाऱ्या नेत्यांचे चेहरे बदलतात, प्रश्न मात्र कायम राहतो, हेही या तरुणांच्या अंगवळणी पडलेले आहे.

गैरप्रकाराविरुद्ध न्यायालयात दाद मागावी तर पैशाचा प्रश्न असतो. इतर नेत्यांनी केवळ तोंडपाटीलकी केली. गैरप्रकार हा एक भाग झाला, पण त्यांच्या एकूण मागण्यांपैकी काही मागण्या तरी मार्गी लावता येतील का यावर साधा विचारही सरकारकडून आजवर झालेला नाही. पेपरफुटीविरुद्ध कठोर कायदा आणि राजस्थानप्रमाणे वर्षाला एकदाच नाममात्र शुल्क भरल्यावर कोणतीही परीक्षा देण्याची सवलत मिळावी या मागण्या सहज मान्य करता येण्यासारख्या आहे.

हेही वाचा >>>सामाजिक न्यायाच्या वाटेवरचा जननायक

विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्यांची परीक्षा त्या त्या जिल्ह्यात घ्यावी ही मागणीही पूर्ण करणे शक्य आहे. टीसीएस कंपनीने हेच लक्षात घेत उमेदवारांना जवळच्या परीक्षा केंद्राचे पर्याय दिले. पण प्रत्यक्षात हॉल तिकीट मिळाले ते दूरच्या जिल्ह्याचे. ही फसवणूक लक्षात येऊनसुद्धा सरकारी पातळीवर फारशी हालचाल झाली नाही. खासगी कंपन्यांनी संगणक प्रशिक्षण केंद्रांची परीक्षा केंद्र म्हणून निवड करणे सुरू केल्यावर याचे पेवच फुटले. अनेकांनी १०० संगणक विकत घेत अशी केंद्रे चक्क गोदामात सुरू केली. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक नियम करावेत, शासनाच्या परवानगीची अट घालावी, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याकडेही दुर्लक्ष झाले आणि गैरप्रकार करून नव्याने उदयास आलेले हे केंद्रचालक अल्पावधीत कोट्यधीश झाले. यातले बहुतांश राजकारण्यांच्या जवळचे आहेत, असे सांगितले जाते.

ज्याच्याकडे ‘शेंगदाणा’ तो उत्तीर्ण

अलीकडे उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन परीक्षेचा पेपर फोडण्याचे प्रकार सुरू आहेत. चीन आणि दक्षिण कोरियातून आयात केलेले उच्च दर्जाचे डिव्हाईस दिल्ली आणि गुरुग्रामच्या बाजारात सहज मिळते. यात शेंगदाण्याच्या आकाराचे एक यंत्र असते. ते परीक्षार्थीने कानाला लावायचे असते. ब्ल्युटुथचा वापर करून त्यावर संवाद साधता येतो. या डिव्हाईसची चीप एटीएम कार्डसारख्या दिसणाऱ्या कार्डात बसवता येते. ते खिशात ठेवायचे. परीक्षा केंद्रावर गेल्यावर संगणकासमोर हे कार्ड धरले की त्यातील बटनाच्या आकाराचा कॅमेरा समोर येणाऱ्या प्रश्नांचे छायाचित्र घेतो आणि ते लगेच बाहेर पाठवतो. बाहेर प्रश्न सोडवणारी टोळी तयारच असते. ती लगेच आतल्याला उत्तर सांगते.

ज्याच्या कानात ‘शेंगदाणा’ त्याला ते ऐकू येते. हे तंत्रज्ञान जॅमरवर मात करणारे आहे. अनेक नेत्यांना आणि पोलिसांना या विद्यार्थ्यांनी त्याचे प्रात्यक्षिक दाखविले, पण काहीही परिणाम झाला नाही. याचा वापर करून पेपर फोडणारी एक टोळी मराठवाड्यात सक्रिय आहे. कन्नड, बैजापूर व जालना भागात राहणारे एकाच जमातीचे लोक यात सहभागी आहेत, असे सांगितले जाते. ही टोळी तलाठी भरती परीक्षेसाठी १५ ते २०, भरती परीक्षेसाठी १० तर अभियांत्रिकी सेवेसाठी ३० लाख रुपये प्रतिउमेदवार उकळते. ही सर्व माहिती विद्यार्थांनी अनेकदा तपास यंत्रणांना पुरवली आहे, पण काहीच कारवाई होत नाही.

लाखोंच्या संख्येत असलेल्या या विद्यार्थ्यांची वर्गवारी दोन गटात होते. त्यातला पहिला स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा तर दुसरा ‘सरळ सेवे’वर अवलंबून असलेला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांचे मुख्य केंद्र पुणे तर ‘सरळ सेवे’साठी तरुण नाशिक, जळगाव, नांदेड, संभाजीनगर, नागपूर अशी ठिकाणे अभ्यासासाठी निवडतात. पुण्याच्या तुलनेत येथील खर्च जरा कमी असतो. चार ते पाच हजारात महिना भागतो. तेही एकवेळ नाश्ता व रात्री जेवण करून. टेलिग्राम हेअ‍ॅप या विद्यार्थ्यांचा मुख्य आधार. कारण यावर चॅनलच्या माध्यमातून लाखोच्या संख्येत विद्यार्थ्यांना सामील करून घेता येते. हे लक्षात येताच या अ‍ॅपवर टेस्टसिरीजचा सुळसुळाट झाला आहे. दोन ते पाच हजारांपर्यंतच्या खर्चाच्या या चाचण्या द्यायच्या आणि अभ्यासातील प्रगती बघायची.

एवढे करूनही गैरप्रकारामुळे नोकरी मिळत नसेल तर जायचे कुठे, करायचे काय या प्रश्नांनी या वर्गाच्या मनात सध्या काहूर माजवले आहे. या तरुणांमध्ये व्यवस्थेविषयी, ती संचालित करण्याची जबाबदारी असलेल्या सरकारविषयी विश्वास निर्माण करायचा असेल तर भरती प्रक्रिया पारदर्शक हवी. त्यासाठी राज्य लोकसेवा आयोग हाच एकमेव पर्याय. मात्र त्यावर सरकारकडून नुसती चालढकल सुरू आहे. अशा स्थितीत दाद तरी कुणाकडे मागायची, अभ्यास करायचा की आंदोलनेच करत राहायचे, या प्रश्नांनी हे लाखो तरुण अस्वस्थ आहेत.

devendra.gawande@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Study or protest examination malpractice unemployed youth competitive exam prerequisites amy