विजय पांढरीपांडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मध्ये काही काळ शेतकऱ्याच्या आत्महत्या हा विषय गाजला. त्याचे सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन तो सरकारी पातळीवर चर्चेचा ठरला. पण तरुण विद्यार्थी जीवन संपविण्याचे पाऊल उचलतात त्याकडे आजही गांभीर्याने पाहिले जात नाही. यातील अनेक मृत्यू हे परीक्षेच्या अवाजवी तणावामुळे घडले आहेत. राजस्थानमधील कोटा शहर हे शिकवणी (क्लास)ची फॅक्टरी म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे भावी इंजिनीअर्स, डॉक्टर्स तयार होण्यासाठी प्रवेश परीक्षेसाठीची पूर्वतयारी करवून घेतात. तीही दोन वर्षे! अतिशय कठीण अन् तणावाचा काळ असतो हा मुलांसाठी. पालक चक्क कर्ज काढून, पोटाला चिमटा लावून हा लाखो रुपयांचा खर्च करतात. पहाटे उठल्यापासून रात्री झोपपर्यंत अभ्यास, गृहपाठाशिवाय, सतत होणाऱ्या चाचण्यांशिवाय दुसरा कसलाही टाईमपास नाही. प्रसंगी इथले शिक्षक अतिशय कठोर होतात. कारण त्यांच्या क्लासेसचे यश मुलाच्या चांगल्या गुणांवर अवलंबून असते. इथे कुणी कुणाचा मित्र नसतो. सगळे एकमेकांचे स्पर्धक असतात. त्यामुळे या काळात लळा, जिव्हाळा, प्रेम सहानुभूती, काळजी हे शब्दच मुलांना माहिती नसतात. या सर्व गोष्टींचा प्रचंड ताण असतो. शिवाय पालकांचा ताण वेगळाच. एका माहितीनुसार कोटामध्ये दरवर्षी होणाऱ्या आत्महत्यांचा आकडा दोन अंकी आहे. गेल्या सात आठ वर्षात या शहरात १५० वर मुलामुलींनी जीव गमावला आहे, असेही सांगितले जाते. हे विधान चमत्कारिक वाटेल. पण या आत्महत्या नाहीत. त्यांच्याच घरच्यांनी, शिक्षकांनी केलेले हे खून आहेत!
आणखी वाचा-‘त्या’ समितीत कोण आहे पाहा… मग कळेलच अहवाल कसा असेल ते!
अनेक वर्षापासूनचा हा चुकीचा ग्रह आहे पालकांचा की मुलांनी इंजिनिअर, डॉक्टर, आयएएस अधिकारीच झाले पाहिजे. जणू इतर क्षेत्रे गौण आहेत. त्यातही माहिती तंत्रज्ञान, संगणक ही क्षेत्रे घ्या आणि पदवी घेऊन एकदाचे परदेशात जा. म्हणजे पालकांचे घोडे गंगेत न्हाले! खरे तर कला, विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन, लिबरल आर्टस, कायदा, समाजशास्त्र अशा सर्वच क्षेत्रात करियरला तितकाच प्रचंड वाव आहे. आता तर भविष्यातील गरजा, नोकऱ्या, कामाचे स्वरूप हे सातत्याने प्रचंड वेगाने बदलणार आहे. तिथे तुम्ही काय शिकलात, किती शिकलात, तुमची श्रेणी काय याला फारसे महत्व राहणारच नाही. तुमची स्वतःची क्षमता काय, सातत्याने नवे, नव्या दमाने, तत्परतेने शिकण्याचे, जुने विसरून नवे आत्मसात करण्याचे कौशल्य तुमच्यात कितपत आहे हेच तपासले जाणार. अधिक वेगाने, अधिक अचूकपणे तुमची सगळी बौद्धिक कामे कौशल्याने करणारे तंत्र म्हणजे एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता वेगाने विकसित होते आहे. त्यामुळे भविष्यातील कामाचे, नोकरीचे स्वरूप आरपार बदलणार. तिथे तुमची पदवी आयआयटीची की एनआयटीची हे कुणी विचारणार नाही. तुम्हाला तुमची नव्याने ओळख करून द्यावी लागणार. तुमचे कौशल्य सतत सिद्ध करावे लागणार. त्यासाठी तुमची भावनिक, मानसिक क्षमता, भावनिक बुद्धिमत्ता महत्वाची ठरणार.
आत्महत्या करणारी व्यक्ती मानसिक, भावनिकदृष्ट्या कणखर नसते. ती स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता गमावून बसते. आपल्यासाठी चांगले काय, वाईट काय हे वयात आल्यावर पालकांनी नाही, तर आपण स्वतः ठरवायचे असते. आमच्या बंड्याला, किंवा बबडीला कसलीच अक्कल नाही या भ्रामक समजुतीतून पालकांनी बाहेर आलेले बरे!
आणखी वाचा- ‘एक देश, एक निवडणूक’ व्यापक राष्ट्रीय चर्चेशिवाय निर्णय घेणे चुकीचे!
पण मुलांचे बालपण, त्यांचे तारुण्य यातली गंमत पालक हिरावून घेताना दिसतात. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रात एका सातवीच्या मुलीने आत्महत्या केल्याचे वृत आले. या कोवळ्या मुलीचे दिवसाचे वेळापत्रक बघा. सकाळी सात ते तीन शाळा, दुपारी चार ते रात्री आठ शिकवणी, नंतर झोपेपर्यंत गृहपाठ! अवांतर वाचन नाही, खेळ नाही, गप्पा नाही, हसणे खिदळणे नाही. फक्त चरकात ऊस पिळतात तसे फोल्पट होऊन बाहेर पडायचे. आयुष्य एन्जॉय करायचे नाही. कोवळ्या वयात किती अत्याचार? घाण्याच्या बैलासारखे अभ्यासाच्या चाकाभोवती फिरत राहायचे. ही मुले अशाने आपले बालपण, तारुण्य हरवून बसतात. त्यातील निवडक काही ताण सहन करीत, स्वसामर्थ्याने यशस्वी होतात. इंजिनिअर, डॉक्टर होतात. पण चांगला माणूस म्हणून, जबाबदार सुसंस्कृत नागरिक म्हणून, किती घडतात, यशस्वी, खऱ्या अर्थाने सुखी होतात हा संशोधनाचा विषय!
युरोपातील काही देशांमध्ये छान पद्धत आहे. शाळेत अभ्यासाचे ओझे नाही. परीक्षेचा ताण नाही. सगळे हसत खेळत, निसर्गाशी हातमिळवणी करीत शिकतात. सातवीनंतर अनेक चाचण्या घेऊन शिक्षकच मुलाचा, मुलीचा कल कुठे आहे, त्यांना कशाची आवड आहे ते तपासून ठरवतात. इथे पालकाची लुडबुड चालत नाही. हा कल पुढे बदलण्याची देखील संधी मिळते. म्हणजे वोकेशनल बॅचला गेलेली मुले चांगल्या श्रेणी मिळवून विज्ञान विषयाकडे वळू शकतात. मुलांनी भरपूर वाचावे, प्रश्न -शंका विचारून, चर्चा करून शिकत जावे असा प्रयत्न असतो. आयते मिळवणे, नोट्स हा प्रकार नाही. आपल्याकडे नवे शैक्षणिक धोरण आले तरी असे ताणविरहित शिक्षण प्रत्यक्षात येईल की नाही शंका आहे. कारण आपल्याकडील पालकांच्याच मागण्या विचित्र आहेत. त्यांना खूप अभ्यास, खूप गृहपाठ, खूप गुण यातच जास्त रस असतो. संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासात रस नसतो. आयुष्य एन्जॉय करण्याच्या वयात ते मुलांच्या डोक्यावर नको तितके, नको ते ओझे टाकतात! त्यामुळे मुलांचे मानसिक संतुलन ढळले नाही तरच नवल!
आणखी वाचा-मानवकेंद्रित जागतिकीकरणाच्या दिशेने..
आपल्याकडे अशी परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असलेली समुपदेशनाचीदेखील सोय नसते. खरे तर मुलाचेच नव्हे तर पालकाचेदेखील समुपदेशन व्हायला हवे. तज्ज्ञ समुपदेशकांच्या वेळीच घेतलेल्या सल्ल्याने बरेच प्रश्न सुटू शकतील, मुलांना विनाकारण प्राण गमवावे लागणार नाहीत. कुटुंब उद्ध्वस्त होणार नाहीत. इथे शिक्षकाची भूमिका देखील तितकीच महत्वाची ठरते.
परमेश्वराने दिलेले आयुष्य निश्चितच सुंदर आहे. आत्महत्येने ते उध्वस्त करण्याचा कुणालाच अधिकार नाही. कोवळ्या वयातील मुलांना तर नाहीच नाही. त्यासाठी आपण सजग असले पाहिजे. शाळा कॉलेजात समुपदेशनाची चांगली सोय असली पाहिजे. मुलांशी सतत बोलले पाहिजे, त्यांना बोलते केले पाहिजे. त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, ते वेळीच समजून घेतले पाहिजे. सगळे काही उद्ध्वस्त झाल्यावर पश्चाताप करण्यात अर्थ नसतो. खरे तर तशी वेळ येण्याआधीच सावध झालेले बरे! कारण गेलेला जीव परत येत नाही.