गेल्या काही विश्वचषक आणि युरो स्पर्धांच्या भारतातील प्रक्षेपणाच्या वेळी निर्धारित क्रीडा वाहिन्यांच्या सामनापूर्व आणि सामनापश्चात विश्लेषण कार्यक्रमात युरोपातील फुटबॉल लीगमध्ये हुन्नर दाखवलेले अनेक माजी खेळाडू दिसून येतात. या कार्यक्रमांत हमखास दिसून येणारे भारतीय चेहरे दोनच. एक सूत्रधार आणि दुसरा सुनील छेत्री.
अगदी सुरुवातीला जेव्हा छेत्री या कार्यक्रमांमध्ये दिसू लागला, त्यावेळी जरा धास्तीच वाटली. कारण बाकीचे बहुतेक हे ‘माहितीत’ले दिग्गज होते. छेत्री केवळ यजमान देशातील कोणी तरी हवा म्हणून तेथे बसवला गेला काय? असा समज होणे हा नव्वदोत्तर फुटबॉल रसिक पिढीचा करंटेपणा. नव्वदच्या दशकात केबल वाहिन्यांवरून युरोपातील फुटबॉलचे दर्शन होऊ लागले आणि केवळ विश्वचषक किंवा युरोची वाट न पाहताही हरसाल उत्तमोत्तम खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळू लागली. याचा एक दुष्परिणाम असा झाला, की भारतीय फुटबॉलपटूंकडे, भारतातील लीगकडे अधिकच दुर्लक्ष होऊ लागले. त्यातही बायचुंग भुतिया आम्हाला ठाऊक होता आणि त्याच्यानंतर बऱ्याच काळाने सुनील छेत्री. त्याच्या मैदानावरील कारकीर्दीच्या उत्तरार्धात सुनील विश्वचषक आणि युरो स्पर्धांदरम्यान ‘स्टुडिओ’ गाजवू लागला होता. अनेकदा त्याने केलेली सामनापूर्व भाकिते सामनापश्चात खरी ठरायची. काही वेळा ती इतरांपेक्षा वेगळी आणि धाडसीही असायची. हे महत्त्वाचे. त्याच्या तुलनेत मैदानावर हुन्नर दाखवलेले निष्णात फुटबॉलपटूही ‘प्रेडिक्टेबल’ आणि म्हणून कंटाळवाणे वाटायचे. सुनील छेत्री हा विचारी फुटबॉलपटू होता. कदाचित भारतीय संघाचे नेतृत्व करताना, निव्वळ गुणवत्तेवर भागणार नाही हे कळाल्यामुळेच त्याचे फुटबॉलविषयक विचार काळाच्या ओघात अधिक धारदार बनले असावेत. ते काहीही असो, पण मैदानावरील सुनील छेत्रीइतकाच स्टुडिओतला सुनील छेत्रीही रंजक वाटायचा. किंबहुना थोडा अधिकच. वर्षे जात गेली, तसा स्टुडिओमध्ये छेत्रीचा आत्मविश्वासही वाढलेला जाणवू लागला. आता मैदानावरील छेत्री ६ जून रोजी निवृत्त होईल त्यावेळी खंत नक्कीच वाटेल. पण हाच छेत्री अधिक जोमाने आणि सातत्याने विश्लेषक म्हणून दिसेल, ही बाब मात्र नक्कीच आश्वासक.
हेही वाचा : राजकीय संस्कृती जपणे निवडणूक जिंकण्याएवढेच महत्त्वाचे!
३९ वर्षांचा छेत्री गेली १९ वर्षे भारतासाठी खेळतोय. निवृत्त होण्याविषयी त्याने भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीशी चर्चा केल्याचे प्रसारमाध्यमांत प्रसृत झाले आहे. कदाचित विराटनेही त्याच्याकडे तंदुरुस्तीबाबत सल्ला मागितला असू शकतो. आज ३९व्या वर्षीही सुनील भारतीय फुटबॉल संघातील सर्वांत फिट फुटबॉलपटूंपैकी एक आहे. छेत्रीच्या दीर्घकालीन यशाचे तेही एक कारण. सक्रिय खेळाडूंमध्ये लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या सुविख्यात फुटबॉलपटूंच्या पाठोपाठ सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल झळकवण्याचा विक्रम छेत्रीच्या नावावर आहे. म्हणजे त्याची गोलांची भूक अक्षय राहिली, तशीच शारीरिक तंदुरुस्तीही चिरकाल राहिली. यशस्वी फुटबॉलपटूसाठी हे दोन्ही घटक अत्यावश्यकच. १५० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये छेत्रीने ९४ वेळा चेंडू गोलजाळ्यात धाडला. गोलांचे शतक रोनाल्डो आणि मेसीने करून दाखवले, तसे ते बहुधा छेत्रीला साधणार नाही. परंतु मेसी आणि रोनाल्डोइतकी दर्जेदार लीगमधून दर्जेदार खेळाडूंसमोर वा बरोबर खेळण्याची संधी छेत्रीला मिळाली नाही. या संदर्भात छेत्रीचा गोलधडाका अधिक कौतुकास्पद ठरतो.
सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीमध्ये पहिल्या दहात हंगेरीचा फेरेन्क पुस्कास किंवा अलीकडचा पोलंडचा रॉबर्ट लेवान्डोवस्की अशी नावे दिसतात. या सर्वच देशांमध्ये फुटबॉलचा इतिहास आहे, फुटबॉलपटू घडवतील अशी व्यवस्था आहे. आपल्याकडे त्याबाबत फार आशादायी स्थिती नाही. भारताने १९७० च्या आशियाई स्पर्धांमध्ये कांस्य पदक जिंकले, जे आंतरराष्ट्रीय मूल्याचा विचार करता शेवटचेच. छेत्री प्रामुख्याने खेळला दक्षिण आशियाई अजिंक्यपद म्हणजे सॅफ स्पर्धांमध्ये. या परिघातील संघांच्या दर्जाबाबत शंका घेता येऊ शकते. पण येथे दखलपात्र बाब म्हणजे, सॅफ स्पर्धा जिंकत असताना भारत अलीकडच्या काळात एशिया कप स्पर्धांमध्ये खेळू लागला आहे. युरोपात युरो आणि दक्षिण आफ्रिकेत कोपा अमेरिका या स्पर्धांचे हे आशियाई भावंड. १९८४नंतर २७ वर्षांनी भारत पहिल्यांदा एशिया कप स्पर्धेत खेळला आणि नंतर आणखी दोन स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी भारताला मिळाली, ही प्रगती बऱ्याच अंशी छेत्रीमुळेच साध्य झाली. आशियाई संघांचा दर्जा गेल्या तीन दशकांमध्ये प्रचंड सुधारला आहे. या जागतिक दर्जाच्या आशियाई संघांशी भिडण्याची संधी सातत्याने मिळणे आणि याच काळात छेत्रीचा उदय होणे या दोन्ही बाबी परस्परावलंबी ठरतात.
हेही वाचा : लेख : शिक्षणातील ‘प्रभुत्वा’ची आयआयटींनाही झळ
सुनील छेत्रीचे हेच यश. विश्वचषक स्पर्धेत आपण का हो खेळू शकत नाही, असा अजागळ प्रश्न विचारणाऱ्या बहुतेकांना विश्वचषकही समजलेला नसतो आणि फुटबॉलही. विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होणे ही अतिशय खडतर, त्रिस्तरीय प्रक्रिया आहे. भारतात जेथे या खेळाची पाळेमुळे पाचहून अधिक राज्यांमध्येही पसरलेली नाहीत, तेथे भारतीय फुटबॉलविषयी अशा अवास्तव, अस्थानी अपेक्षा बाळगणे अन्यायमूलकच. बुद्धिबळ, बॅडमिंटन, कुस्ती, हॉकी हे खेळदेखील फुटबॉलच्या नकाशापेक्षा अधिक राज्यांमध्ये खेळले जातात. क्रिकेट हा तर कित्येक वर्षांपासून सर्वव्यापी आहे आणि हे मध्यंतरीच्या काळात हॉकीप्रमाणेच फुटबॉलच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण. या सर्व खेळांत भारत चमक दाखवू लागला आहे. फुटबॉलच्या बाबतीत मात्र उलटी गंगा वाहते आपल्याकडे!
येथील प्रमुख फुटबॉल लीगमध्ये अजूनही पेन्शनीतले आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू प्राधान्याने खेळवले जातात. नवीन फुटबॉलपटू आकृष्ट व्हावेत, घडवले जावेत यासाठी आवश्यक क्लबची रचना किंवा फुटबॉल अकादम्या पुरेशा सक्षम नाहीत. एखादा देश फुटबॉल महासत्ता दोन कारणांमुळेच बनू शकतो – त्या देशात चांगली क्लब व्यवस्था असणे किंवा गुणवान फुटबॉलपटूंच्या प्राथमिक विकासाच्या सुविधा असणे, जेणेकरून असे उदयोन्मुख फुटबॉलपटू परदेशातील क्लबांमध्ये मोठ्या संख्येने जाऊ शकतात. भारत अजूनही या दोन्हींपैकी कोणत्याच प्रकारात मोडत नाही. छेत्री हे सगळे घडून येण्याची वाट पाहात बसला नाही.
हेही वाचा : ‘नोटा’ हा उमेदवार मानायचा का?
मोहन बागान, ईस्ट बंगाल या पारंपरिक बंगाली क्लबांप्रमाणेच आधुनिक काळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बंगळूरु एफसीमध्येही तो खेळला. त्याचा आदर्श असलेल्या बायचुंग भुतियाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय क्लब फुटबॉल खेळण्याची माफक संधी त्याला दोन वेळा चालून आली होती. पण ती मूर्तरूपात उतरली नाही. तरीही छेत्री निराश झाला नाही. त्याचे फुटबॉलवर प्रेम आहे, भारतावर प्रेम आहे. आणि मुख्य म्हणजे भारतीय फुटबॉलच्या प्राक्तनाशी त्याने विनातक्रार जुळवून घेतले. त्यामुळेच मेसी आणि रोनाल्डोच्या बरोबरीने त्याचे नाव घेतले जाऊ शकले. हे फार भारतीयांच्या लक्षात मात्र बराच काळ आले नाही. त्याबद्दल माफ करण्याचा उमदेपणा छेत्रीमध्ये आहे.
अलविदा आणि धन्यवाद!
siddharth.khandekar@expressindia.com