नरेंद्र मोदी, पंतप्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीच्या या महापर्वात एक अशी बातमी कानी आली, ज्यामुळे मन आणि विचार काही क्षणांसाठी ठप्प झाले. भारताच्या आध्यात्मिक श्रद्धेचे एक प्रखर व्यक्तिमत्व श्रीमंत स्वामी स्मरणानंदजी महाराज यांचे समाधिस्थ होणे, ही एक वैयक्तिक पातळीवरील क्लेशदायक गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी स्वामी आत्मास्थानंदजी यांचे महाप्रयाण आणि आता स्वामी स्मरणानंद यांचा अनंताचा प्रवास ही घटना कित्येकांना शोकसागरात बुडवणारी आहे. मी देखील त्यांचे कोटय़वधी भक्त, संतजन आणि रामकृष्ण मठ आणि मिशनच्या अनुयायांइतकाच दु:खी झालो आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला माझ्या बंगालच्या दौऱ्यावेळी मी रुग्णालयात जाऊन स्वामी स्मरणानंद यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. स्वामी आत्मास्थानंद यांच्याप्रमाणेच स्वामी स्मरणानंदजी यांनी आपले संपूर्ण आयुष्य, आचार्य रामकृष्ण परमहंस, माता शारदा आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी समर्पित केले होते. हा लेख लिहिताना माझ्या मनात, त्यांच्याशी झालेली भेट, त्यांच्याशी केलेली चर्चा आणि त्या अनेक स्मृती जिवंत होत आहेत.

हेही वाचा >>>पाकिस्तानात चिनी प्रकल्पांवर वारंवार हल्ले का होताहेत?

जानेवारी २०२० मध्ये ज्यावेळी मी बेलूर मठाला भेट दिली, त्यावेळी मी स्वामी विवेकानंद यांच्या कक्षात बसून ध्यानधारणा केली होती. त्या दौऱ्याच्या वेळी मी स्वामी स्मरणानंद यांच्याशी स्वामी आत्मास्थानंदजी यांच्या बद्दल खूप वेळ बोललो होतो.

रामकृष्ण मिशन आणि बेलूर मठ यांच्याशी माझे किती जिव्हाळय़ाचे संबंध आहेत, ते तर तुम्ही जाणताच. आध्यात्मिक क्षेत्रात जिज्ञासा असल्याने मी पाच दशकांच्या कालखंडात वेगवेगळय़ा संत महात्म्यांच्या भेटी घेतल्या आहेत आणि विविध ठिकाणी वास्तव्य देखील केले आहे. रामकृष्ण मठात देखील मला अध्यात्मासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या अनेक संतांचा परिचय झाला, ज्यामध्ये स्वामी आत्मास्थानंदजी आणि स्वामी स्मरणानंदजी यांच्यासारख्या प्रमुख व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता. त्यांचे पवित्र विचार आणि ज्ञानाने मला नेहमीच एक समाधान लाभले आहे. जीवनातील या सर्वात महत्वाच्या कालखंडात अशाच संतांनी मला जन सेवा हीच ईश्वर सेवा असल्याची शिकवण दिली. स्वामी आत्मास्थानंदजी आणि स्वामी स्मरणानंदजी यांचे आयुष्य, रामकृष्ण मिशन च्या ‘आत्मनो मोक्षरथ जगद्धिताय च’ या तत्वाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

शिक्षणप्रसार आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत रामकृष्ण मिशन करत असलेले कार्य आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी आहे. रामकृष्ण मिशन, भारताची  आध्यात्मिक जाणीव, शिक्षणाचे सक्षमीकरण आणि मानवतेची सेवा या संकल्पानुसार कार्य करत आहे. बंगाल मध्ये 1978 मध्ये जेव्हा पुराने थैमान घातले होते, तेव्हा रामकृष्ण मिशनने आपल्या नि:स्वार्थ सेवेने सर्वाची मने जिंकली होती. माझ्या स्मरणात आहे की ज्यावेळी २००१ मध्ये कच्छ मध्ये मोठा भूकंप झाला होता, त्यावेळी मला सर्वात आधी दूरध्वनी करणाऱ्यांमध्ये स्वामी आत्मास्थानंदजी एक होते. त्यांनी मला सांगितले की या संकट काळात आपत्ती व्यवस्थापन कार्यात रामकृष्ण मिशन आपल्याला सर्वतोपरी सहाय्य करायला तयार आहे. त्यांच्या निर्देशांप्रमाणे रामकृष्ण मिशनने भूकंपाच्या त्या संकटात लोकांची खूप मदत केली.

हेही वाचा >>>मविआने ‘वंचित’ला सोबत न घेतल्याचे परिणाम काय होऊ शकतात?

गेल्या काही वर्षांत, स्वामी आत्मास्थानंद जी आणि स्वामी स्मरणानंद जी यांनी विविध पदे भूषवताना सामाजिक सक्षमीकरणावर मोठा  भर दिला. ज्यांना या महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनासंदर्भात  माहिती  आहे, त्यांच्या  नक्कीच स्मरणात असेल की यांच्यासारखे संत आधुनिक शिक्षण, कौशल्य आणि महिला सक्षमीकरणासाठी किती गंभीर असत.

स्वामी आत्मास्थानंद जी यांच्या महान व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्टय़ाने मला सर्वाधिक  प्रभावित केले ते म्हणजे, प्रत्येक संस्कृती आणि प्रत्येक परंपरेबद्दल त्यांना असणारे  प्रेम आणि आदर हे आहे .याचे कारण असे की, त्यांनी भारताच्या विविध भागात बराच काळ व्यतीत केला  आणि ते सतत प्रवास करत असत. गुजरातमध्ये राहून ते गुजराती बोलायला शिकले. माझ्याशी देखील ते केवळ गुजरातीमध्येच बोलत असत. मला त्यांची गुजराती पण खूप आवडत असे.

भारताच्या विकासाच्या प्रवासात अनेक टप्प्यांवर, आपल्या मातृभूमीला स्वामी आत्मास्थानंद जी, स्वामी स्मरणानंद जी यांसारख्या अनेक साधुसंतांचा आशीर्वाद लाभला असून याने  आपल्याला सामाजिक परिवर्तनाची नवी चेतना दिली आहे.या संतांनी आपल्याला समाजहितासाठी एकत्र काम करण्याची दीक्षा दिली आहे. ही तत्त्वे आजपर्यंत शाश्वत आहेत आणि येणाऱ्या काळात हेच विचार विकसित भारताची आणि अमृतकाळाची  संकल्पशक्ती बनतील. 

 पुन्हा एकदा संपूर्ण देशाच्या वतीने मी या महान संतांना श्रद्धांजली अर्पण करतो. मला विश्वास आहे की, रामकृष्ण मिशनशी संबंधित सर्व लोक त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे वाटचाल करतील आणि हा मार्ग अधिक प्रशस्त करतील.

ओम शांती

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swami samranandji maharaj a stalwart figure of indian spiritual faith passed away amy